वाढदिवस

गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता



गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता. अलीकडे परकर-पोलक्याची fashion नाही आणि आता पूर्वीसारखी तशी कापडं ही मिळत नाहीत आणि मिळालीच तर कोल्हापूर बंगलोर ह्या बाजूला मिळतात असे बरेच वेळा त्यांना सांगून झाले होते. पण नातीचा सातवा वाढदिवस होता त्यामुळे तिला परकर पोलकं शिवायलाच पाहिजे आणि त्यातून तिची आत्या अमेरिकेत आहे म्हणून ते शिवून आणायची नैतिक जबाबदारी कावेरी ताईंची आहे असा त्यांनी स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय करुन घेतला होता. त्यामुळे जसे कापड मिळाले ते त्यांच्यासाठीच सुंदर होते.
एका आठवड्यात परकर-पोलकं शिवून मिळावयासाठी कसे बसे त्या टेलर बाईंना पटवले होते. कावेरीताईंची नातीसाठी परकर-पोलकं शिवण्याची ती धडपड आणि इच्छा बघून त्या बाईं बिचाऱ्या आठवड्यात शिवून देण्यासाठी तयार झाल्या होत्या. लगेच आमच्या कावेरीताईंनी कागदावर संपूर्ण डिझाईन काढून दिले. बॉर्डर हाताला घ्या, परकरच्या घोळावर घ्या, ब्लाऊज जरा लांबच शिवा वगैरे, वगैरे अनेक सूचना देऊन झाल्या होत्या. त्यांचा तो उत्साह बघून बिचाऱ्या टेलर बाई सगळी fashionकरुन द्यायला तयार झाल्या. मग काय विचारता “आजी” एकदम खुश झाल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी परत सकाळी सकाळी फोन आला. “ मंगलताई, जरा आपण परत बाजारात जाऊया, याल का? ”
“का हो, कुठे जायचे आहे? ” मी विचारले.
“अहो, ह्यांचे म्हणणे असे आहे कि परकर-पोलकं तर ठीक आहे पण तिला पैंजण पण घेऊन ये. तुम्ही माझ्या बरोबर आलात तर बरे होईल” त्या म्हणाल्या.
“हो, अकरा वाजेपर्यंत येते” मी त्यांना सांगून टाकले. परत त्या रणरणत्या उन्हात आम्ही आपल्या बाजारात गेलो आणि खूप ‘छमछम वाजणारे पैंजण’ घेऊन आलो.
पैंजण पाहून आजोबा फारच खूष झाले होते आणि आम्ही सगळे गप्पात रंगून गेलो होतो. तितक्यात कावेरीताईंच्या सूनबाई ‘शॉपिंग’ करुन पोहचल्या. तिनेही लेकीसाठी खरेदी केली होती. जीन्स पँट, 3/4 पँट, 3-4 टी-शर्टस एकदम मॉडर्न कपडे. शिवाय मॅचिंग Hair-band, Shoes वगैरे भरपूर खरेदी करुन आली होती. सूनबाईंची ती खरेदी बघून आजी-आजोबांनी एकमेकांना आश्चर्यजनक look दिला होता. आणि आजी-आजोबांची खरेदी बघून सूनबाईंनी सुद्धा “कुठल्या जमान्यात हे लोक राहतात” असे expressions चेहऱ्यावर आणली होती. एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन घरी काम आहे अशी सबब देत मी तिथून पळ काढला.
दोन दिवसांनी कावेरीताईंच्या सूनबाईंचा फोन आला. “ काकी 26 तारखेला राणीचा वाढदिवस हॉटेल मध्ये करायचा असे ठरवले आहे. तुम्ही संध्याकाळी बरोबर सहा वाजता U. S. Pizza मध्ये या. आणि सगळे या. फक्त वेळेवर या, कारण आपले booking नऊ वाजे पर्यंतच आहे. ”
“हो, हो नक्की येतो ” मी सांगितले.
संध्याकाळी रोजच्याप्रमाणे आम्ही बाहेर चालायला निघालो तेंव्हा लक्षात आले, कि गेले काही दिवस नातीचा वाढदिवस, वाढदिवस करणाऱ्या कावेरीताई आज गप्प होत्या. दोन तीन वेळा तुम्हाला बरं वाटत नाही का?
असे विचारूनही झाले होते. पण मोघम, मोघम उत्तर देऊन त्यांनी तो विषय टाळला होता. पण कुठेतरी काहीतरी बिनसले आहे हे लक्षात आले होते. घरी परत येता येता त्या म्हणाल्या, “सूनबाईचा फोन आला होता का? ”
“हो, आला होताना, उदया सहा वाजेपर्यंत आम्ही हॉटेलवर पोहचतो.
मी म्हणाले.
“मी ठरवले होते, सगळ्या मुलांना घरी बोलवीन, छान गोड शिरा वगैरे मुलांना आवडतील असे काही पदार्थ घरी करीन. पण काय बोलणार? आपल्याला कोण विचारतय, जाऊ दे त्यांची इच्छा” कावेरीताई अगदी नाराज होऊन बोलत होत्या. त्यांचे दुःख आम्ही समजत होतो. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत मी म्हणाले, “अहो कावेरीताई आजकाल मुलांना अशाच गोष्टी खायला आवडतात. तो पिझा बघा कसा, तुझा माझा करत खातील. दिवस बदलले आहेत. मुलांच्या आवडीनिवडी पण बदलल्या आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत आणि नाराज ही नाही व्हायचे. आपण ही थोडे काळाप्रमाणे बदलायचे. त्यांच्या बरोबर आपण ही आनंद लुटायचा” वगैरे वगैरे. त्यांच्या गळी ते काही फारसे उतरले नव्हते. पण गुपचूप ऐकून मात्र घेतले होते.
२६ तारखेला सूनबाईंची संध्याकाळी चार वाजल्यापासून पळापळ चालू होती. ती आणि त्यांचा नोकर दोघे मिळून मुलांसाठी घेतलेले वेगवेगळे समान (return gifts) डोक्यात घालण्यासाठी रंगीबेरंगी टोप्या, फुगे, तोंडावर लावायचे मुखवटे असे बरेच काही गाडीतच चढवत होते.
“काही मदत हवी का गं?” असे ह्यांनी खिडकीतूनच विचारले.
” नाही काका, हा रामू आहे ना मदतीला, फक्त तुम्ही वेळेवर या ” तिने अगदी खुशीत उत्तर दिले.
” तू एकटीच का पळापळ करते आहेस? चिरंजीव कुठे आहे? इथेच आहे का टूरवर गेलाय? ” वरच्या गोरेकाकू म्हणाल्या.
तशी तावातावाने ती म्हणाली, “त्याचे काय, कायमच ऑफीस पहिले असते. सगळी हौस मलाच आहे ना, तसा म्हणाला आहे सहा वाजेपर्यंत पोहोचेन म्हणून, बघूया”.
चिरंजीव म्हणजे कावेरीताईंचा मुलगा. तिचा तो आवेश बघून गोरेकाकूंना त्या क्षणी असे वाटले, अरे आपण चूक केली का काय? उगाचच हिला विचारले. बिचाऱ्या अगदी लाजिरवाण्या झाल्या होत्या. पण ही त्यांची नेहमीचीच सवय, नको ते बोलतात आणि मग त्यांना वाईट वाटत रहाते पण स्वभावाला काही औषध नसते ना, असो.
बरोबर सहा वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. आता हा आमच्या ह्यांचा स्वभाव, कोणाला जर वेळ दिली तर जीवाची पराकाष्ठा करुन हे ती वेळ पाळताच. पण कावेरीताईंच्या घरच्या मंडळींचा मात्र पत्ता नव्हता. एक एक करत लहान मुले, मोठी माणसे अशी बरीच मंडळी पोहोचली होती. शेवटी साडे सहा वाजता ह्यांनी फोन केला. “काय झाले? अजून का पोहोचला नाहीत? ”
गाडीच पार्क करतोय. पोहोचतोच आहोत. थोडा उशीर झालाय. पण आलोच. ” काका म्हणाले.
धावत पळत सूनबाईंचे लेकी सह हॉटेलात आगमन झाले. छोट्या मुलांचा आरडा ओरडा सुद्धा झाला होता. सूनबाईंनी नवीन कोरा सुंदर पंजाबी ड्रेस परिधान केला होता. चेहऱ्यावरचा मेक-अपचा लेप नुकतीच “Beauty parlour” मधून आल्याचा पुरावा देत होता. आणि उशिरा येण्याचे कारण सुद्धा सांगत होता.
कावेरीताईंच्या नातीने सूनबाईंनी आणलेल्या मॉडर्न कपड्यातील 3/4 पँट आणि टी-शर्ट परिधान केला होता. डोक्यातील हेअर-बॅन्ड पासून पायातील बूट – मोजे पर्यंत सुंदर मॅचिंग केले होते. पोर अगदी गोंडस दिसत होती.
तिला बघून हॉटेलच्या वेटर लोकांनी धडाधड फुगे फोडले आणि उत्सव मूर्तीने अगदी ठुमकत ठुमकत टाळ्यांच्या कडकडाटात entry घेतली. पाठोपाठ कावेरीताई आत आल्या. त्यांचा पडलेला चेहरा बघून त्यांच्या मनाचा अंदाज आला होता. नातीच्या ठुमकणाऱ्या इवल्याशा पायात “छमछमणारे” पैंजण नव्हते. आणि उन्हातान्हात घामाघूम होत दूकाने फिरुन आणलेलं परकर -पोलकंही तिच्या अंगावर दिसत नव्हतं. तरीही आम्हाला सगळ्यांना बघून त्यांनी स्वतःला सावरले आणि हसत हसत म्हणाला. “sorry आम्हाला थोडा उशीर झाला. चिरंजीवाची वाट पहात होतो पण त्याचा शेवटी फोन आला, म्हणाला तुम्ही निघा मी सरळ हॉटेल वरच पोहचतो.” आम्ही कोणीही, काहीही न विचारताच त्यांनी उशिरा येण्याचे कारण दिले. ते ऐकून सूनबाईंनी मात्र अतिशय आश्चर्य चकित नजरेने त्यांच्याकडे बघितले.
सात वाजेपर्यंत जवळ जवळ सगळी मंडळी जमा झाली होती. मुलांची पळापळ सुरु होती आणि आरडा ओरडा करुन त्यांनी सगळा हॉल डोक्यावर घेतला होता. चिरंजीव मात्र अजून पोहचला नव्हता. केक कापण्यासाठी सूनबाईंचा जीव खालीवर होत होता. पण त्याचा सुद्धा नाईलाज झाला होता. तो ट्रॅफीकमध्ये अडकला होता. नको त्या वेळेस नडणे हा ट्रॅफीकचा जणू गुणधर्मच आहे.
शेवटी साधारण साडेसातच्या सुमारास एक वेटर सूनबाईजवळ आला आणि तिला म्हणाला “मॅडम, आपण एक गोष्ट करु शकतो, तुम्हाला suggest करु का? ”
“हं, बोला ” अतिशय तिरसटपणे तिने उत्तर दिले.
” मॅडम, आपण असे करुया, आपण प्रथम मुलांचे गेम्स सुरु करु, त्यामुळे ती कंटाळणार नाहीत आणि सर आल्यानंतर केक कापू शकतो. ‘ नाईलाजाने तिने होकार दिला.
गोरागोमटा, नकटा, बुटका, छोट्या काळ्या भोर डोळ्यांचा असा हा वेटर डोक्यावर जोकरसारखी उंच टोपी घालून हातातील घंटा वाजवत त्या मुलांच्या घोळक्यात शिरला. आणि मग काय विचारता, त्याने एका मागून एक गंमती जमती करायला सुरवात केली आणि ती वानरसेना बघताबघता त्याच्या खेळात रममाण झाली.
मोठ्यामोठ्याने हसत हसत त्याच्या मागे पुढे धावत होती. त्या वेटरचे नावपण त्याच्या गोऱ्या रंगाला शोभेल असेच ‘गोरेलाल’ होते. हळूहळू मुलेच काय आम्ही मोठी मंडळी पण ह्या गोरेलालच्या खेळात रमून गेलो होते.
चिरंजीव मात्र अजून पोहोचला नव्हता. सूनबाईंचा पारा भरपूर चढला होता. गोरेलाल मुलांशी खेळता खेळता वेगवेगळे विनोद सांगून सूनबाईंचा चढलेला पारा उतरवण्याचा प्रयत्न करत होता. कित्येक खेळात देखील तिला सहभागी करुन घेण्याचा त्याचा प्रयत्न चालूच होता. त्याची ती सर्कस बघून बरीचशी पाहुणे मंडळी त्याचे अगदी कौतुक करीत होते. त्याच्या वागण्यावरुन मात्र त्याच्यासाठी हा काही नवीन अनुभव असावा असे वाटत नव्हते.
तेव्हढ्यात चिरंजीव आला बाबा एकदाचा; हुश्श ! आमच्या सगळ्यांचा जीव अगदी भांड्यात पडला होता. त्याला बघून सूनबाईंचा पारा अधिकच चढला होता. बहुतेक त्याला काय बोलू अणि काय नको अशी तिच्या मनाची घालमेल चालू असावी. पण तरीही शांत राहण्याचा ती प्रयत्न करीत होती.
तिच्या चेहऱ्याकडे बघून चिरंजीवाला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आली असावी असे वाटत होते. बिचारा लाजेने खोटे-खोटे हसतच हॉलमध्ये आला होता. तसा चिरंजीवचा स्वभाव पण लहानपणापासून शांतच.
पण गोरेलाल मात्र अतिशय हुशार होता. त्याने तिच्या मनात काय चालले असावे हे पूर्णपणे ओळखले असावे. तो खेळताखेळता त्या सगळ्या वानरसेनेला घेऊन त्याच्याजवळ पोहचला आणि धडाधड फुगे फोडतच चिरंजीवचे पण स्वागत केले. नंतर मात्र त्याने ते खेळ थांबवले आणि हॉटेलच्या किचनमध्ये गेला. दोन मजली मोठा होडीच्या आकाराचा केक घेऊन हजर झाला. त्याच्याबरोबर बाकीचे तीन चार वेटरसुद्धा आमच्या तैनातीला हजर झाले. ह्या गोरेलाल बरोबर मुलांची चांगलीच गट्टी जमली होती. मुले त्याला सोडायला तयार नव्हती. कावेरीताईंची नात ‘राणी’ तर त्याचा हात घट्ट धरुन त्याच्या बरोबरच फिरत होती. शेवटी तो तिला घेऊन केकजवळ येऊन उभा राहिला आणि त्याच्या आजूबाजूला सगळी मुले गोळा झाली होती. सूनबाई आणि चिरंजीव ह्यांच्यात मात्र बरीच बोलाचाली झाली असावी असे दिसत होते. ते दोघेही गप्प होते. गोरेलालचा त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न चालूच होता. शेवटी चिरंजीवने थोडा पुढाकार घेतला. आपल्या मुलीला गोरेलालकडून घेतले आणि उचलून कडेवर घेतले आणि बायकोचाही हात धरुन तिला केकच्या टेबलापाशी घेऊन आला. आता मात्र सूनबाई खुष झाल्या होत्या आणि तिने कावेरीताई आणि काकांनाही आपल्याजवळ बोलवून घेतले. तिथे पण त्या गोरेलालची लुडबूड चालूच होती. कुठे मेणबत्तीच लाव, कोणाला तरी हाकच मार, तो काही त्या टेबलपासून बाजूला सरकायला तयार नव्हता. शेवटी चिरंजीवने त्याला थोडे बाजूला सरकावले आणि कावेरीताईंच्या नातीने फुग्यांच्या धडाधड आवाजात आणि टाळ्यांच्या कडकडाटात केक कापला. गंगेत घोडे न्हाले एकदाचे. सूनबाई तर फारच खुश झाली होती. साहजिकच होते, बिचारी किती दिवसांपासून धावपळ करीत होती. Happy Birthday ची गाणी सुरु झाली होती. एकमेकांना केक भरवणे सुद्धा चालू होते. तितक्यात हा गोरेलाल पटकन राणीच्या जवळ पोहोचला. हळूच त्यातला एक केकचा तुकडा घेतला आणि त्याने तो तिच्या तोंडात भरवला त्याच क्षणी दुसऱ्या वेटरने मोबाईलच्या कॅमेराने त्याचा फोटो काढून घेतला. हे मात्र आम्हाला आणि अजूबाजूच्या लोकांना थोडे खटकले. इतकेच नाही तर त्या गोरेलालने थोडी जास्तच सवलत घेतली. सूनबाई चिरंजीव आणि राणीला आळीपाळीने हाताला धरुन नाचण्याचा प्रयत्न केला. आता मात्र आपापसात आमची कुजबूज सुरु झाली. राणीचा तर हातच सोडत नव्हता. न राहवून कोणीतरी म्हणाले, “कावेरीताईं तुमच्या नातीला त्याच्यापासून थोडे लांबच घ्या. हा जरा जास्तच शहाणा दिसतोय.” बहुतेक चिरंजीवने ऐकले असावे त्यांने पटकन राणीला उचलून घेतले. प्रत्येकाने आपल्या मुलांकडे लक्ष द्या असा एक इशारा हळूच प्रत्येकाच्या कानात पोहचविला गेला.
चिरंजीव आणि सूनबाई आलेल्या पाहुणे मंडळींच्या पाहुणचारात गुंग झाली होती. मोका मिळाला की सूनबाई नवऱ्याला उशिरा आल्याबद्दल टोमणा मारायचा सोडत नव्हती. चिरंजीव बिचारा हसण्यावारी उडवून नेत होता.
गोरेलालने परत चिरंजीवच्या हातातून राणीला आपल्याजवळ घेतले आणि तिचा हात एका हातात घट्ट धरून इकडे तिकडे फिरत होता. बाकीचे वेटर बिचारे आम्हाला serve करण्याचे त्यांचे काम करत होते.
कावेरीताईंनी पटकन नातीला त्याच्या हातातून ओढून घेतले आणि काकांच्या मांडीवर बसवले. दोघांनी मिळून तिच्या पायात पैंजण घातले. नात तर फारच खुश झाली. जोर जोराने नाचायला लागली आणि क्षणभरात हॉल “छमछम” आवाजाने भरुन गेला. त्या आवाजाबरोबर कावेरी ताई आणि काकांचा चेहरा पण आनंदाने फुलून गेला होता. नातीचे ते आनंदाने नाचणारे रुप बघून दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले होते. ते बघून माझ्या मनाला सुद्धा जरा दिलासा मिळाला होता. कारण अपार कौतुकाने नातीसाठी केलेल्या त्या खरेदीची मी एकटीच साक्षीदार होते. तेवढ्यात गोरेलाल आला आणि राणीचा हात धरुन तिला मुलांमध्ये घेऊन गेला. आता पायात पैंजण आल्यामुळे बाईसाहेब उड्या मारीत मारीत जास्तीतजास्त आवाज करीत त्याच्या बरोबर इकडेतिकडे फिरत होत्या. सगळी मंडळी खाण्यापिण्यात रंगून गेली होती.
मुले तर पिझ्झावर फारच खुश होती. आज त्यांना पिझा खाताना त्यांचे आई बाबा ओरडत नव्हते. त्यामुळे त्यांचे ताव मारुन खाणे सुरुच होते. शेवटी आईस्क्रीम, होते. मग काय विचारता. मुलांचा आनंद ओसंडून वहात होता. परंतु ह्या गोरेलालने राणीचा हात सोडला नव्हता. तो सतत तिच्या बरोबर होता. आणि तीही त्याला सोडत नव्हती. त्याने राणी बरोबर चांगली गट्टी जमवली होती. त्याचे ते वागणे बघून हा माणूस काही बरा नाही. असे आमचे बहुतांशी लोकांचे मत झाले होते.
इतक्यात कर्कश्य आवाज करीत बेलने वेळ संपल्याची आठवण करुन दिली. हळूहळू लहान मोठी सगळीच पाहुणे मंडळी निघून गेली होती. चिरंजीव आणि सूनबाईने बिल दिले. ती दोघेही ह्या गोरेलाल वर फार खुश झाली होती.
त्यांच्या दृष्टीने त्याने त्याचे काम मनापासून केले होते. त्यांनी त्याला भरपूर टीप दिली होती. टीप हातात पकडून तोही खूप खुश झाला होता. आम्ही सगळे जण राणीला हातात धरून बाहेर पडतच होतो, की गोरेलाल धावत आला आणि एक छोटेसे gift चे packet तिच्या हातात दिले आणि म्हणाला, “Happy Birthday Baby”.
” अरे इस की जरुरत नही हे भय्या, आपने इतने प्यार से काम किया वही काफी है ” चिरंजीव म्हणाला.
“नही सर, ऐसी बात नही है । आज हमारी बिटिया की भी सालगिरह है | उसके friends के लिऐ ऐसे छोटेसे gift हमने यहाँ से किसी के साथ भिजवा दिये है । एक ये गुडीया के लिए है ।” तो हसत हसत म्हणाला.
“ओहो ” आम्ही सगळे एकदम म्हणालो.
“हमारी बिटीया भी आज सात साल की हो गयी है। अभी अभी हमारे भाईने वहाँ से फोटो भेजे है, देखियेगा सर” असे म्हणत त्याने त्याच्या हातातला मोबाईल चिरंजीवच्या हातात फोटो बघण्यासाठी दिला आणि सूनबाईंच्या जवळ येऊन हळूच म्हणाला, “मॅडम बुरा मत मानियेगा, लेकिन हम सब पापा लोग बाहर काम करते है, घरपे पहुँचने के लिये कितना भी दिल हो फिर भी वक्त पे पहुँच नही पाते है । लेकिन हमारी बीबी काफी समझदार है | हमारे घर जाने पर वह दोबारा बेटी का जनम दिन मनाएगी। आज हमने आपकी बेटी के साथ मना लिया यही हमारे लिये खुशी कि बात है । बाय बाय बेटा” बोलता, बोलता त्याचे डोळे पाण्याने भरुन आले होते. आम्ही सगळे एकमेकांकडे बघतच राहिलो. इतका वेळ स्वतः हसून, मुलांना आणि आम्हांला हसवणाऱ्या त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावरच्या काळ्या भोर डोळ्यात ते अश्रु शोभत नव्हते.
देव जाणे कावेरीताईंना काय वाटले. त्यांनी त्याला थांबवले आणि म्हणाल्या “ये लो आपके बेटी के लिये गिफ्ट” असे म्हणत एवढ्या उत्साहाने नातीसाठी शिवलेलं परकर-पोलकं त्याच्या हातत ठेवलं.
तो सद्गदित झाला आणि म्हणाला “नही नही माँजी इसकी जरुरत नही है,” काकांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याला खुणेनेच सांगितले, राहू दे..
ते परकर-पोलकं पाहून तो फारच खूश झाला. त्याचा आनंद तो लपवू शकला नाही. कावेरीताई आणि काकांच्या पाया पडत म्हणाला, “ हमारी बिटिया की दादी नही है, उसको दादी मिल गयी है। हम जाकर उस को यह कपडा जरुर पहनाएंगे और आपको फोटो दिखाएंगे ” असे म्हणत हातात परकर-पोलकं घट्ट धरुन तो आत निघून गेला.
आम्ही आतमध्ये जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच बघत राहिलो. कावेरीताईंच्या डोळ्यात समाधानाची आणि आनंदाची वेगळीच छटा दिसत होती.
सूनबाई थोड्याशा खिन्न झाल्या होत्या पण शांतपणे उभे राहून घडणाऱ्या प्रसंगाच्या साक्षीदार झाल्या होत्या. !

Author