महाराष्ट्राच्या कला परंपरेमध्ये कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कोल्हापूराने राज्याला एक श्रेष्ठ कलापरंपरा दिली. चित्रकार व्ही. ए. माळी, नव्हे माळीसर हे या कलापरंपरेतील शिरोमणी. या माळी सरांनी रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी सरांच्या अभिष्टचिंतनासाठी आलेल्या अध्र्याहून अधिक चित्रकारात सध्याच्या प्रख्यात चित्रकारांचा समावेश होता. ते सारे माळी सरांचे विद्यार्थी. सरांनी चितारलेली लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सेठ लालचंद हिराचंद, न्या. एम. सी. छागला, महात्मा फुले आदींची व्यक्तिचित्रे आदर्श मानली जाणारी.
त्या कलाकृतींनी केवळ नामवंतांच्याच संग्रहात नव्हे, तर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया म्युझियमपासून ते मुंबई-बडोद्यातील म्युझियमपर्यंत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये स्थान पटकावले आहे. त्यांच्या कलाकृती लंडनमधील इंडिया हाऊसमध्येही आहेत. माळी सरांचे वडील अनंत माळी हेही चित्रकारच. मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. मुंबईमध्ये नशिब अजमावण्यासाठी आलेल्या अनंत माळी यांचे निधन झाले, त्यावेळेस सर अवघे १० वर्षांंचे होते. शालेय शिक्षणानंतर केतकरांच्या कला संस्थेत दोन वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या माळी सरांनी जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. १९३२ साली जी. डी. आर्ट झाल्यानंतर माळी सरांनी कोळवणकरांच्या स्टुडिओमध्ये काम सुरू केले. कोळवणकर हे माळी सरांच्या वडिलांचे जिगरी दोस्त. किंबहुना मुंबईत नशिब अजमावण्यासाठी येण्याचा निर्णय अनंत माळी व कोळवणकर यांनी एकत्रितरीत्या घेतलेला होता. माळी सर व्यक्तिचित्रण करीत ते फोटोवरून किंवा प्रत्यक्षात व्यक्तीला समोर बसवून. इथेच त्यांना व्यक्तिचित्रणाची प्रमुख गोडी लागली. हातातले काम संपल्यानंतर सर स्वत बाहेर पडत आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्यांना स्डुडिओमध्ये आणून बसवून त्यांची व्यक्तिचित्रे चितारत. व्यक्तिचित्रण हा रईसांचा शौक मानला गेल्याच्या कालखंडात त्याकाळी माळीसरांनी मात्र माकडवाला, गोंधळी, पोतराज, भिल्ल स्त्रिया यांना स्थान दिले. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ सुंदर किंवा दिमाखदार दिसणाऱ्या व्यक्तीचे चित्रण या समजाला त्यांनी यशस्वीरित्या छेद दिला. माळी सरांच्या व्यक्तिचित्रणात म्हणूनच कृष्णवर्णाच्या व्यक्तींचे चित्रण पाहायला मिळते. माळी सरांच्या चित्रणशैलीचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे, या गडद रंग छटांचे चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावी पद्धतीने येते. त्यात त्यांचा शैलीदार जोरकसपणाही आहे आणि रंगांची केलेली वेगळी हाताळणीही आहे. रूढार्थाने आपण ज्याला यश म्हणतो असे यशही माळी सरांना दीर्घकाळ लाभले. १९४० साली त्यांना कलकत्ता अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टचे सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर माळीसरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९४४ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रौप्यचषक तर ४५ साली मोर विकणाऱ्या तरुणीच्या चित्रास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक. या चित्राचे प्रचंड कौतुक आणि माळी सरांचे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या पंधरा- वीस वर्षांंत आणखी काही महत्त्वाचे बहुमान माळी सरांच्या दिशेने चालत आले. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रूपधर पुरस्काराचाही समावेश आहे. शरीराच्या थोडय़ा कुरबुरी सुरू झालेल्या असल्या तरी आजही चित्रकलेचा विषय निघाला की, सर तरतरीत होतात. कुणी चित्र दाखवायला गेले की, आजही मार्गदर्शन करतात, प्रसंगी सुनावतातही. त्यांच्या सुनावण्यात आशीर्वाद असतोच, पण मोलाचे मार्गदर्शनही असते. ते टीकाही करतात आणि तेवढय़ाच अधिकाराने चूक सुधारण्याचा मार्गही सांगतात. राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना वयाची शंभरी साजरी करणाऱ्या या दिग्गज चित्रकाराचा राज्य सरकारने यथोचित गौरव केला तर तो राज्याचाच मोठा सन्मान ठरेल. माळी सरांना शताब्दी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.
माळी, व्ही. ए.