दिलकी कलम_से……गीत क्र.३७
ती खरी कोण असते? तीचं आणि आपलं खरं नातं काय?फक्त एक भावनिक गुंतवणूक! परस्परांना परतीने सव्याज देण्यात येणारी प्रेम आणि विश्वासाची गुंफण. त्यात नेमकं असतं तरी काय? फक्त झोकून देणं. विरघळण्यासाठी प्रथम पडायला,तर हवं!आपटण्याची भीती नसलेली माणसंच पडायचं धाडस करतात.
लीन झाल्याशिवाय विलीन होता येत नाही,हेच खरं!चलबिचल आपसूक होते. भावनिक नातं तयार होण्यासाठी “मनोभावे” हे एकच आयुध उपयोगी ठरतं.त्याने तगमग होते,पण जखम होत नाही.तरीही ‘विव्हळणं’ संयुक्तिक ठरतं.परिणामांची तमा न बाळगता त्या वाटेवरून 〰️ निमूटपणे शतपावली करण्यात धन्यता वाटते.
बेमालूमपणे वाहावणाऱ्यांना फक्त मिलनाची तृप्ती खुणावत असते.आपल्या जिवलगाच्या वर्तणूकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. हातचं राखून ठेवण्याच्या पलीकडे जाणारी अवस्था आहे ही.”समर्पण” यालाच म्हणतात का? स्पंदने उन्मुक्त होतात,तेव्हाच प्रीत बहरते. भावबंधनाच्या पलीकडचं क्षितिज नजरेच्या टप्प्यात येतं.काळजाच्या विशाल आभाळात इंद्रधनुष्य उमलण्याची भावना, केव्हाही आल्हाददायकच!!स्वप्नपूर्तीचा तो अद्भुत क्षण अनुभवण्यासाठी अख्खं आयुष्य तारण ठेवावं लागतं. हरखून जाणं,स्वायत्त गुणदोषांसकट आपलंसं करणं,या नंतरची पायरी म्हणजे “आत्मसमर्पण.” त्यानंतर विलग होत नाहीत तेच जिवलग.रेशमाच्या बंधांची वीण मजबूत असते,म्हणूनच चमकतात ना?,ते!