तीन घटना

जगात बर्‍याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्‍या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्‍याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.



जगात बर्‍याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्‍या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. घटनेनुसार ‘स्थानिक’ या शब्दाची व्याप्ती बदलते. गाव शहर, देश या पातळीवरील घटना ‘स्थानिक’ वाटू शकते. काही उदाहरणे, आमच्या शेजारच्या विद्यार्थ्याचे परीक्षेतील यश आमच्यासाठी स्थानिक आहे. शहरातील बॉम्ब स्फोट किंवा नवीन थीम पार्क उघडणे या घटना आमच्यासाठी स्थानिक आहेत. आपल्या देशावरील शत्रूचा हल्ला किंवा उपग्रहांचे प्रक्षेपण आमच्यासाठी स्थानिक घटना आहेत. बर्‍याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात. मी ज्या निवडक गोष्टींबद्दल अधिक विचार केला त्या अशा; 1989 चा महापूर, नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील बॉंबस्फोट आणि 2013 मधील यशस्वी भारतीय मंगळ मोहीम. या आहेत आणखी तीन घटना आहेत, डायनाचा (शोकांतिका) मृत्यू, ‘ट्विन टॉवर्स’ वर हल्ला (द्वेषयुक्त) आणि ‘शटल कोलंबियाचा अपघात’ (विनाशकारी). हे विस्तृत आणि व्यापक अर्थाने माझ्यासाठी स्थानिक आहे. कसे ते समजून घेऊया.

एक शोकांतिका (रविवार 31 ऑगस्ट 1997)

मी सकाळच्या हवामानाच्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही लावला. ही बातमी पुन्हा पुन्हा दिसत होती. मध्यरात्री पॅरिसमधील बोगद्यात एका कारचा अपघात झाला हाता. जागेवरच दोन पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रिन्सेस डायना यांचे नंतर रुग्णालयात निधन झाले. बातमी जगभरात पसरली. या अपघातावर सर्व माध्यमांचे लक्ष केंद्रित झाले होते. पापाराझी (फोटोग्राफर) यांनी कारचा पाठलाग केला. ड्रायव्हरने तो टाळण्यासाठी वेग घेतला, नियंत्रण गमावले आणि मर्सिडीज कार स्किड होऊन क्रॅश झाली.

अनेक एजन्सीज तपास करीत होत्या. रॉयल प्रोटोकॉलनुसार नातेवाईकांची प्रतिक्रिया जाहीर होत होती. इंग्लंडच्या नागरिकांसाठी डायनाचे निधन दःखदायक होते. शनिवारी अंत्यसंस्कार होणार होते. मी आणि माझा मुलगा हाईड पार्कमध्ये गेलो. केन्सिंग्टन पॅलेस ते वेस्टमिन्स्टर ऍबी पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांची गर्दी होती. काहीजण रात्रीपासून जागा पकडून थांबले होते. अशा परिस्थितीत आवश्यक त्या सर्व सुविधा नागरी अधिकार्‍यांनी पुरविल्या होत्या. तेथे कोणीही घोषणा देत नव्हते, फक्त दु:खी चेहरा आणि अश्रूं दिसले. शवपेटी घोड्याच्या गाडीतून नेली जात होती. कुटुंबातील सदस्य-डायनाचा नवरा, तिचे दोन मुलगे, सासरे आणि भाऊ मागून चालत होते. फोटो फ्लॅश रस्त्याच्या बाजूंनी झळकू लागले. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान आणि माजी पीएम, कुटुंबातील सदस्य, मान्यवर आणि सेलिब्रिटी वेस्टमिन्स्टर ऍबी येथे उपस्थित होते. काही निवडक जण दफनासाठी अल्थॉर्पला गेले.

प्रिन्स चार्ल्सने डायनाच्या बहिणीला लग्नासंबंधी विचारण्यासाठी तिच्या कुटुंबास भेट दिली. डायना एका शिशू शाळेत शिक्षका होती. प्रत्यक्षात डायना हीच ‘रॉयल’ बनली. तिचा स्वभाव तिला लोकांमध्ये मिसळण्यापासून रोखू शकला नाही. ती डिझायनर आउटफिट्समधे ज्या सहजतेने वावरायची तशीच ती लँडमाईन फील्डमध्ये जायची. पुष्पगुच्छ धरणारे हात तेच होते जे भुकेल्या आणि गरीब मुलांना उचून घ्यायचे. जेव्हा जेव्हा ती प्रिन्स चार्ल्सबरोबर घोडागाडी किंवा खुल्या कारमध्ये प्रवास करीत असे तेव्हा लोक तिच्याकडे नजर टाकत असंत. ती जिथे गेली तिथे तिने लक्ष वेधून घेतले. राजकुमाराला तिच्या कंपनीत दुर्लक्षित झाल्यासारखे वाटू लागले. मी त्यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात पाहिले होते. ते दोघे नंतर विभक्त झाले. परंतु या कारच्या अपघाताने डायना व चार्ल्स यांना वेगळ्या प्रकारे एकमेकांपासून दूर केले.

या घटनेचा परिणाम मलाही जाणवला कारण त्यावेळी मी लंडनकर होतो.

एक हल्ला (मंगळवार 11 सप्टेंबर 2001)

न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या टॉवर्सवरील विनाशकारी हल्ला हे एक दहशतवादी कृत्य आहे. विमाने हायजॅक करून इमारतींवर धडकवण्यात आली. त्या ठिकाणी गोंधळ माजला. हवाई वाहतूक थांबविण्यात आली. केवळ अमेरिकेतील नव्हे तर जगभरातील विमाने उतरविली गेली. जोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होत नाही आणि नियंत्रित होत नाही तोपर्यंत विमाने उडणार नाहीत अशा सूचना सर्वत्र देण्यात आल्या. काही वेळाने दोन्ही टॉवर्स कोसळले. या घटनेमुळे बरीच प्राणहानी आणि नुकसान झाले होते.

जेव्हा मीडियावर ही बातमी पसरली तेव्हा आम्ही लंडनच्या कार्यालयात काम करत होतो. इंटरनेट जाम झाले होते. आम्ही दुपारचे जेवण करून नुकतेच परत आलो होतो. बातमी ऐकल्यावर पुन्हा एकदा शेजारील इमारतीतील पबकडे टीव्ही पाहण्यासाठी धावलो. काही तासांनंतर आम्ही कार्यालयात आलो. दरम्यान मी लंडनमध्ये घरी वसुधाला फोन केला. ती काही तासांपूर्वी भारतातून आली होती. तिला घरातल्या विविध गॅझेटशी ओळख करुन देण्यासाठी माझ्याकडे वेळही नव्हता. मी तिला टीव्ही सुरू करण्यासाठी माहिती दिली. संध्याकाळी जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा ती बीबीसी न्यूज पहात होती. या घटनेमुळे ती अडकली नसल्याने आम्हाला दिलासा मिळाला. तिला ट्रान्झिटमध्ये ज्यूरिच विमानतळ (स्वित्झर्लंड) येथे उतरावे लागले असते किंवा ती उड्डाणात असताना दुसर्‍या देशात जावे लागले असते. ती लंडनमध्ये न पोहोचण्याची शक्यता जास्त होती. पण तिचे नशीब. हा एक क्षणिक विचार होता. त्यानंतर वसुधाच्या या सुयोगावर आम्ही कधीही आनंद व्यक्त केला नाही. कारण, जेव्हा आपण एखाद्या शोकांतिकेपासून वाचण्याइतके भाग्यवान असतो, तेव्हा काही लोक त्यात होरपळलेले असतात. जेव्हा आपण पीडित असतो, तेव्हा असे लोक असतात जे थोडक्यात बचावतात. या घटनेनंतर दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आनंद साजरा करीत होते. पण हे अमानुष कृत्य निंदनीय होते.

जगाला दहशतीच्या छायेत आणणारी घटना लंडनला असूनही अम्हाला ‘स्थानिक’ वाटली. या शब्दाची व्याप्ती आता विस्तारली होती.

एक आपत्ती (शनिवार 1 फेब्रुवारी 2003)

मी जलतरणाचा साप्ताहिक कार्यक्रम उरकून ‘गार्सिया पिझ्झा’ मधे गेलो आणि माझा आवडता डबल चीज पिझ्झा आणि मोसंबीचा रस मागवला. त्यावेळी टीव्हीवर स्पेस शटल कोलंबियाच्या अपघाताची बातमी दाखविली जात होती. मी हॉटेलच्या मालकिणीला विचारले की आणखी काही काळ बातम्या पाहू शकतो का? तिने सहमती दर्शविली.

नासाचे एसटीएस -113 मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) वर गेले होते. लिफ्ट-ऑफच्या आधी लॉन्चला 16 वेळा उशीर झाला होता. ते 1 फेब्रुवारी 2003 रोजी पृथ्वीवर परत येणार होते आणि केनेडी स्पेस सेंटरमध्ये उतरणार होते. परत येण्याची वेळ, मार्गातील हवामान आणि धावपट्टी अनुकूल होती. पण शटलमधे स्फोट झाला. ते टेक्सासवर असताना सकाळी 09.00 वाजता त्याचे तुकडे विखुरले. शटल 209,800 फूट (सुमारे 64 कि.मी.) उंचीवर प्रवास करीत होते. सर्व सात अंतराळवीरांनी आपला जीव गमावला. त्यातील एक म्हणजे कल्पना चावला. शटलच्या पंखांवरील एक टाईल निघली होती. परतीच्या वेळी वातावरणातील घर्षणाने उष्णता यानात शिरली. त्याचा फटका बसणे अटळ होते.

कॉस्मोलॉजीचा अभ्यास करताना मी नासाच्या कार्यक्रमांबद्दल माहिती घेत असतो. शटलला आयएसएसच्या कक्षेत जाण्यासाठी काही मिनिटे लागतात, परंतु त्यास जोडण्यासाठी काही तास लागू शकतात. Undocking करताना असेच घडते. कोलंबियाच्या बाबतीत अनडॉकिंग आणि परतीसाठीची अनुकूल परिस्थिती जुळली, परंतु पृथ्वीच्या वातावरणातील पुनःप्रवेश अयशस्वी झाला. कोलंबिया अपघातातील मृतांबद्दलच्या माझ्या भावना मिशन संबंधीच्या माझ्या कुतूहलामुळे जागृत झाल्या होत्या.

माझ्यासाठी ही ‘स्थानिक’ घटना होती कारण, एक अंतराळयात्री मूळ भारतीय होती आणि त्यावेळी मी अमेरिकेत होतो.

‘माझे घर’ ते ‘हे विश्वची माझे घर’ हा वैचारिक प्रवास अशा प्रकारे घडत असावा असे मला वाटते.

– रविंद्रनाथ गांगल

Author