वसंतराव नाईक यांचा वारसा लाभलेले सुधाकरराव नाईक हे मीतभाषी पण करारी बाणा असलेले व्यक्तिमत्व.पाणलोट क्षेत्राचा विकास हे नवे सूत्र सुधाकररावांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे छोटे बंधारे व पाझर तलाव निर्मितीस चालना मिळाली. १० हजार रुपये कर्ज घेतलेल्या शेतकर्याला पूर्वी १० टक्के व्याज असायचे. सुधाकररावांनी ते ६ टक्क्यांवर आणले. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांच्याच कारकीर्दीत मिळाला. स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची स्थापना व राज्यात १० नवीन सहकारी सूतगिरण्या सुरू करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना त्यांनी केली. त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधीजींची आत्मकथा शासकीय स्तरावर छापून कमी किंमतीत घरोघर पोहचविली होती. राजकीय आणि सामाजिक पातळीवर काम करतांना आभ्यासवृत्ती, लोकसंग्रह, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दल तळमळ आणि सहकारी व अनुयायांवर एक प्रकारचा नैतिक दरार ठेवण्याची क्षमता हे सुधाकररावांचे गुणविशेष सांगता येतील.