स्थानबध्द

माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.



माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.

तुला फिरायची भारी हौस. युनियनच्या कामानिमित्तानं ती फिटायचीही. सगळा भारत पायाखाली घातलास. आम्ही सगळे म्हणायचोही पायाला चक्रं बांधली आहेत तुझ्या. मलाही बरोबर कुठं तरी प्रवासाला न्यावं असं वाटायचं तुला; पण माझी नोकरी, घर, सासूबाई, हर्षदचे बालपण, शाळा, अभ्यास, काही ना काही व्याप होतेच ना माझ्या मागे. तुझ्या मानानं फारच कमी प्रवास केला मी. हर्षदच्या सुट्या पाहून आपण जवळपास दोन-चार दिवस फिरूनही यायचो, त्या दिवसांत मात्र तू अगदी वेगळाच असायचा. तुझं काम, ऑफिस, युनियन याविषयी बोलणं एकदम बंद. पूर्णतः एक पती, पिता असायचास तू. त्या थोड्या अवधीत खूप भरभरून प्रेम द्यायचास तू. ती शिदोरी पुढं बरेच दिवस पुरायची मला. मग पुन्हा तू तुझ्या कामात, मी माझ्या चक्रात.

पण मग नियतीचं चक्र भलतीकडेच फिरलं. तुझा तो भीषण अपघात. तू पार मोडूनच पडलास. शरीरानं आणि मनानंही. तुझ्या युनियनच्या दौऱ्यासाठी तुला कोलकात्याला जायचं होतं. ऑफिसमधून घरी परत येताना आदल्या दिवशी तुझ्या स्कूटरला एका ट्रकन ठोकरून दिलं. तू कुठल्या कुठं फरफटत गेलास. माझ्या नशिबाने तुला कुणीतरी ओळखलं व दवाखान्यात पोहोचवलं, मला कळवलं. मग सगळं बदलूनच गेलं. माधव तुझ्या मेंदूला व मणक्याला मार लागला होता. परिणामी, तू अंथरूणाला खिळून राहणार हे भाकीत केलं डॉक्टरांनी. आपल्या पायाखालची जमीनच खचली. तू घरी आलास आणि आपल्या बारा बाय बाराच्या बेडरूममध्ये बंदिस्त झालास. एक सुंदर घडी विस्कटली. दुर्दैवाचे दारूण खेळ सुरू झाले.

तुझं सगळं लहान मुलासारखं करावं लागत होतं. तूही अगदी अपराधी मानून घ्यायचास स्वतःला. स्वत:वर रागवायचास, त्रागा करायचास. पायाला चक्र बांधलेला तू, पाय मोडल्यागतच झालास. मग घरातले आम्ही सगळे तुझी सेवा करू लागलो. आपला हर्षदही अधिकच समजूतदार झाला. सासूबाईची मदत किती व्हायची मला. हळूहळू ते सगळं अंगवळणी पडू लागलं होतं. दिवस सुरळीत गेल्यासारखं वाटायचं पण रात्र? रात्री तर आपण दोघंच असायचो ना माधव ! तेही एकत्र ! तुझ्या आजारपणाला मन सरावलं, माझं प्राक्तन म्हणून मी ते स्वीकारलं. तुला नाइलाजानं का होईना पण ते स्वीकारावंच लागलं. माझ्यापेक्षा तुझी अवस्था शतपटीनं दारूण होती. मधूनच शरीर मात्र वेगळीच मागणी करायचं. माझं ही अन् तुझंही. मग तू फार हळवा व्हायचास. मला जवळ बोलवायचास. हात हातात घरून कुरवाळत राहायचास. माझ्याकडे असोशीनं बघायचास; पण तेवढंच. ती होती आपल्या शारीर सहजीवनाची मर्यादा. बघता बघता तुझे डोळे भरून यायचे. एकदा म्हणालास,” आनंदी !
किती आवडीनं मी तुझं नाव आनंदी ठेवलं; पण तुला दिलंय मात्र दुःख, केवळ दु:ख ! तुझ्यासाठी, घरासाठी मी आता काहीच करू शकत नाही. नुसतं बुजगावणं झालंय माझं. माफ कर मला…. माफ कर. “किती मनापासून बोलायचास तू माधव. मलाही राहावायचं नाही. कसंबसं थोपवून धरलेलं पाणी डोळ्यातून सांडायचंच. एकमेकांना समजून घेत, धीर देत शरीराची तगमग सहन करायचो आपण.

काळ कुणासाठीच थांबत नाही. आपल्यासाठीही नाही थांबला. दिवस, महिने वर्षं सरली. काळगतीनुसार बऱ्याच गोष्टी घडल्या. आपल्या हर्षदच लग्न झालं. देविका आपली सून बनून घरात आली. त्यांचा संसार फुलला, बहरला. त्यांनी तर एकदम फार मोठा आनंद आपल्या झोळीत टाकला. जुळ्या नातवांची भेट दिली. आपल्याला किती किती आनंद झाला होता तुला! तुझ्याच आवडीची श्रीराम आणि राघव नावं ठेवली त्यांची; पण त्यांना बघायला आपल्या आई नव्हत्या राहिल्या. आपल्या मुलाचा संसार, आयुष्य स्वतंत्रपणे सुरू झालं. त्यांच्या सुखात आपण आपलं समाधान शोधू लागलो. आपल्या जीवनाच्या वैराण वाळवंटातलं तेच तर होतं ना ओॲसीस.

श्रीराम, राघव तुझ्या खोलीत खेळत खेळत यायचे. तू त्यांना वेगळाच वाटायचास. इतरांसारखा तू कधी वागू शकला नाहीस त्यांच्याशी.. त्यांना कधी उचलून घेतलं नाहीस. फिरायला नेलं नाहीस. जवळ घेऊन गोष्टी सांगितल्या नाहीस. त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न यायचे. ते तुला ‘झोपलेले आजोबा’ असंच म्हणायचे.

या सगळ्या वरवर सुरळीत वाटणाऱ्या जीवनात समांतर असा अंतस्थ एक प्रवाह होता. तो होता दुःखाचा. तुझ्या आजारपणाचा, एकाकीपणाचा. तुझ्या अन् माझ्याही. काळ सरत चालला तसा तो तीव्र बनत गेला. तुला जगण्याचाच कंटाळा येऊ लागला होता. तो तू बोलून दाखवू लागलास. मला संपवा, मला जाऊ द्या. असं सारखा डॉक्टरांच्या मागे लागायचास. मला तुझी ती तगमग बघवायची नाही. तुझं दुखणं वाढत गेलं. तसतसा तू अधिकच असहाय झालास. बी.पी., शुगरचा त्रास वाढला. मेंदूला लागलेल्या माराचे परिणाम आता अधिक गडद होऊ लागले. तुझं एक एक ज्ञानेंद्रिय क्षीण बनत गेलं. दातांच्या दुखण्यानं दात काढावे लागले. तुला कुशीवरदेखील स्वतःहून वळता येईना. चाकाच्या खुर्चीत बसवून तुला घराच्याच बागेत फिरवून आणणंही बंद करावं लागलं. मुख्य म्हणजे तुझे उच्चार अस्पष्ट होऊ लागले. तुझं बोलणं आम्हा कुणालाच कळेना. मग तुझा व्हायचा तो राग राग. तुझे पाय तुझ्या ताब्यात नव्हते. फक्त हातवारे करून तू जोरजोरात बोलायचा प्रयत्न करायचास. वाढत्या वयाचीही त्यात अधिकची भर पडली. त्यातून तुला आलेला तो जबरदस्त हार्टअटॅक. त्या दुखण्यातून तू उठशील असे वाटलेच नव्हते मला; पण तुझी जिगीविषा फार तीव्र असावी, म्हणून तू त्यातून बरा होउन घरी परतलास. तुझं जगणं त्या बेडरूमपुरतं नव्हे तर त्या पाच बाय आठच्या पलंगावर बंदिस्त झालं. खोलीत तुझ्यासाठी मुद्दाम लावलेला टी.व्ही. तू नुसता बघत राहायचास, मला बोलावण्यासाठी लावलेली बेल तू सतत वाजवायचास. प्रत्येक वेळी काम काही नसायचं फक्त माझी सोबत हवी असायची तुला. माझी नोकरी तर तुझ्यापायी कधीचीच सोडावी लागली मला. हर्षद, देविका असले तरी त्यांचे स्वतंत्र जग होते. त्यांची पिल्लं होती. तुझ्यासाठी वेळ काढणे फक्त मलाच जमण्यासारखं होतं. ते गृहीतच होते. तुझं दुःख, तुझा त्रागा, तुझा राग या साऱ्यांचा वर्षाव माझ्या एकटीवरच व्हायचा. मी तो निमूटपणे सोसायचे. तुझी मानसिकता समजून घ्यायचे; पण अरे, माझ्या मानसिकतेचे तीन तेरा वाजले होते त्यामुळं, त्याचं कुणालाच काही वाटत नव्हतं. वाटलं तरी सगळ्यांचाच नाइलाज होता.

पण खरं सांगू? तू जितकं सोसलंय ना तितकंच मीही हातीपायी धड असून सोसलंय. माझंही जग आपल्या घरापुरतंच सीमित झालं. घरी, दारी, नोकरीत सहानुभूतीचे असंख्य घाव सोसले. ती खरी असली तरी नकोशी वाटायची. सगळ्या दुःखांवर काळ हे रामबाण औषध असतं म्हणतात. आपल्यासाठी मात्र काळानं हे दुःख अधिकाधिक जहरी केलं. तुझ्यासमोर दाखवलं नाही कधी पण मला हळू-हळू या सगळ्याचा कंटाळा येऊ लागला होता. तुझ्यासाठी जीव तुटायचा; पण माझ्यासाठीही मी व्याकूळ व्हायचे. असंच किती वर्षानुवर्षं चालत राहणार याची भीती वाटायची. माझंही वय वाढत होतं. वयानुसार काही दुखणी शरीरानं स्वीकारली. त्यावर उपायही करीत गेले; पण मनाच्या दुखण्याचं काय?
येशूसारखा आपण दोघंही आपापला सूळ ओढत होतो. आपली सुटकाच नव्हती. पूजेला बसलं की वाटायचं यातून सुटका व्हावी तुझी अन् माझी. मी तशीच प्रार्थना करायचे देवाजवळ. याचा अर्थ कळतो ना तुला? आपली सुटका मागत होते मी म्हणजे तुझा मृत्यूच मागत होते. माझा पत्नीधर्म, माणुसकी, कायदा या सगळ्याच्या विरोधातच होती ती माझी प्रार्थना; पण मी तसं मागणं मागत होते हे खरंच. पण देवानं माझं ऐकावं इतकी कुठली मी पुण्यवान असायला? तुझ्या आजाराचं सावट आपल्या पूर्ण घरावरच पडलं होतं. आपल्या लेका सुनेनं ते स्वीकारलं होतं. पण मुलांचं काय? ती वाढत होती. त्यांच्या बालपणीच त्यांना जीवन-मरणाचा लपंडाव कळायला नको होता; पण कळत गेला होता. रम्य ते बालपण असं ते मोठं झाल्यावर म्हणू शकतील का? त्यांना जसं कळत गेलं तसं त्यांनी तुझ्या खोलीत यायचं बंद केलं.

तू आजारी असल्यानं स्थानबध्द होतास. मी तुझ्यामुळं स्थानबध्द होते. तुझं प्रकृतीमान सतत खालीवर होत होतं. एकदा परत तुला अटॅक आला अन् तुला दवाखान्यात न्यावं लागलं. तू पाच दिवस होतास.
आधीच्या दुखण्यातून तू उठला होतास, यातूनही कदाचित उठशील असं वाटत होतं; पण यावेळी तू आमच्या सर्वांचा अंदाज चुकवलास व जीवनाला खो देऊन तू पार निघूनच गेलास. मला एकदम पोरकं, अनाथ झाल्यासारखं वाटलं. त्यावेळी कळालं की तुझ्या आजाराचा कंटाळा आला होता मला.
मला जर अचानक काही झालं तर तुझं कसं होणार ही भीतीही होती मनात; पण त्या पलीकडे जाऊन तुझ्या शरीरातला ‘तू’ माझा होतास हे प्रकर्षानं जाणवलं आणि हुंदके अनावरपणे बाहेर पडू लागले.
हळूहळू जमलेले सारे नातलग गेले. सहानुभूतीचे ‘खूप केलंस त्याचं’, इ. इ. चे शेवटचे बाण झेलले. मग आलं ते रितेपण.आकाशपोकळीइतकं रितेपण. ते काही कमी होईना. कशात तरी मन रमवायचा प्रयत्न करते. दिवसाचे चोवीस तास मी तुझ्या अस्तित्वाशी जुंपले गेले होते तो वेळ एकदमच अंगावर पहाडासारखा कोसळून येऊ लागला, हा रिकामपणाचा पहाड कसा उचलायचा मी आता !

तू गेल्यावर किती किती वर्षांनी मी परत माझ्या माहेरी गेले ठाऊक आहे? दादावहिनी आग्रहानं मला काही दिवस कोल्हापूरला घेऊन गेले. खूप वर्षांनी गेले तर शहर न ओळखण्याइतकं बदललेलं दिसलं. जुन्या खुणा शोधत खूप फिरले. माहेरपण भोगलं. आता परत निघालेय आपल्या घरी नागपूरला. गाडी पुढं जातेय अन् मी मागंच रेंगाळतेय. माधव आयुष्याचा मोठा टप्पा मी तुझ्यासोबत चालले आहे. चालले आहे म्हणण्यापेक्षा तुझ्या सोबत बसून काढला आहे. ते सगळंय आठवतंय मला. बघ ना तू सोबतीला नाहीस तरी सगळं तुलाच मी हे सांगतेस अस वाटतंय.
एकच भीती वाटतेय माधव. तुझं आजारपण काढायला मी होते. तुझी हक्काची जोडीदार. माझ्यावर जर अशी वेळ आली तर? तू तर गेलास ना पुढं निघून ! कोण करणार माझं मग? ही एकच भीती छळतेय बघ आता मला. हीच एक भीती. स्थानबध्दतेतून मुक्त झाले असले तरी त्या भीतीची पडछाया माझ्या मनावर पडलेलीच आहे. तिच्यासह जगणं आहे आता. दुसरं काय? माधव ! आधी आपण लग्नामुळं शरीरानं एकत्र आलो. मग मनानं जवळ आलो. तुझ्या अपघातामुळं ते एकत्र येणं जखडणं झालं. अनेक वर्षं तू अंथरूणाला अन् मी तुला जखडले गेले होते. अक्षरश: तन आणि मनान आता तू नाहीस. कोणतेच काच आता राहिले नाहीत. पण मनाची बधिरता जायला तयारच नाही. आयुष्याचा जोडीदार गेल्याचं दु:ख करू की धर्मसंकटातून सुटल्याचा नि:श्वास टाकू हेच कळत नाही बघ.

Author