दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,” ती म्हणाली अक्षरशः राग आला होता. आज ही फोन करुन दुपारची विश्रांती गेली आणि उद्याची तर दुपारच गेली.
मी म्हणाली, ” ऐवढी Urgent? आणि तीन वाजता ही काय वेळ आहे?”
“हो मॅडम, काय करणार ती आपली सोनलबेन आहे नां, तिचा women’s day ला तिला doctorate मिळाली म्हणून सत्कार करायचा आहे. आज तर पाच तारीख आहे. आठ तारखेला women’s day आहे. आणि तिच्या बद्दल थोडी माहिती घ्यायची आहे. त्यामुळे तिची उपस्थिती जरुरी आहे. तिला नंतर वेळ नाही. काय करणार? त्यामुळे हिच वेळ ठेवली आहे.” काय बोलणार म्हटले, “ठीक आहे येते उद्या.”
झोप तर पूर्णपणे उडाली होती. नुसतीच बसले होते. असे ही ह्या सोनलबेन चे नांव ऐकुन माझे डोके फिरले होते. उगाचच काही बायका नेहमीच तिच्या पुढे पुढे करत असतात, तिला डोक्यावर चढवून ठेवली आहे.
हि, सोनलबेन आमच्या कमिटीमध्ये गेल्या वर्षभरापासून मेम्बर म्हणून आली आहे. म्हणजे तशी नवीनच आहे. वयाने आमच्या सगळ्यापेक्षा खुपच लहान आहे. हिच्या कडे Ph.D. पेक्षा पण मोठी डिग्री आहे. हिचे वडिल एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. हि कमिटीच्या मिटींग ला सुद्धा तिला वेळ असेल तेव्हाच येते आणि काम काय करणार, तर संस्थेत काही समाजिक कार्यक्रम असेल तर वक्ता शोधून आण, हॉलची सोय करणार. वडिलांच्या ओळखीमुळे हे तिला सहज शक्य होते. एकंदर व्यक्तिमत्व अतिशय उध्दट, पण दाखवणार असे की, “मी काय तुम्ही सांगाल ते काम करते.” आम्हा majority कमिटी मेम्बर ला ती अजिबात आवडत नाही. पण आमची संस्था सरकारी आहे. आमच्या ‘अध्यक्ष’ मॅडम च्या ‘हो’ ला ‘हो’ करणे आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या तर ‘सोनलबेन’ च्या प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणतात. सहाजिकच आहे सोनलबेन ही प्रतिष्ठित पक्षाच्या, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची
एकुलती एक मुलगी आहे. चलता है !….. प्रवाहा बरोबर नदीच्या पाण्याला सुद्धा वाहत जावे लागतेच नां, आयुष्य ही तसेच आहे.
विचारांचे चक्र डोक्यात चालूच होते. तितक्यात परत संध्याचा फोन आला. म्हणाली, “Sorry मॅडम, तुम्हाला परत त्रास दिला. पण उद्या दुपारी ‘मुक्ता’ च्या वडिलांना तुम्हाला भेटायला यायचे आहे. तुम्ही आणि सरोजबेन उद्या दुपारी थोडे लवकर म्हणजे दीड वाजेपर्यंत याल कां? तुम्हालाच दोन-दोन खेपा पडणार नाहीत. ”
जरा विचार केला आणि म्हटले, “चालेल, पण सरोजबेन ना confirm करुन मला परत सांग.”
आमच्या संस्थेमध्ये बहुतांशी बायका समाजाने टाकून दिलेल्या असतात. त्या इथे आसऱ्याला राहतात. प्रत्येकीचे कारण वेगळे वेगळे असते. काही ठिकाणी बाईची चूक असते तर काही ठिकाणी समाजाची. ह्या आमच्या संस्थेत ही ‘मुक्ता’ नावांची मुलगी आहे. तिची कहाणी या सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळी आहे. तिच्या कहाणीला बालिशपणा म्हणावा की मुर्खपणा हेच समजत नाही. पण तिच्या बद्दल वाईट मात्र खूप वाटते.
साधारणपणे वीस-बावीस वर्षांची आहे. डिप्लोमा इंजिनियरांगचा दोन वर्ष अभ्यास केला आहे. दिसायला साधारण आहे पण स्मार्ट आहे. अतिशय well-mannered आहे. एका संध्याकाळी कुठेतरी एकटीच बसलेली पोलिसांना मिळाली. काही बोलतच नव्हती शेवटी पोलिसांनी संस्थेत आणून सोडली होती. आमच्याकडे मात्र चार एक दिवसांनी तिने बोलायला सुरुवात केली होती.
ती सांगत होती, ‘ती घर सोडून निघून आली आहे.’ कारण काय तर ‘तिला दत्तक घेतली हे तिच्या आईवडिलांनी तिच्यापासून लपवून ठेवले होते.’ तिच्या दृष्टीने तिची फसवणूक झाली. आता घरी जाणार नाही म्हणे. मूर्खपणाचा कारभार. पण एखादे वेड डोक्यात शिरले की ते काढणे कठीण असते. आम्ही तिला खूप समजविण्याचा प्रयत्न केला. संस्थेतील फसवणूक होऊन आयुष्य बरबाद झालेल्या मुलींच्या कहाण्या सांगितल्या.
ती किती नशिबवान आहे तिला चांगले आई वडिल मिळाले हे सगळे सांगून झाले पण ती काही टस की मस झाली नाही.
तिच्या आईवडिलांना बोलावून घेतले. बिचारे खूप रडत होते. त्यांची तर परिस्थिती फारच वाईट होती. त्यांना ही घरांतून निघून गेली हे कोणा नातेवाईकांना सांगता सुद्धा येत नव्हते. त्यांची तर दयाच येत होती. जितका शाब्दिक आधार देणे आम्हास शक्य होते तितका आम्ही दिला होता. पण ह्या मुलीच्या मनांवर काही परिणाम झाला नाही.
शेवटी आम्ही सगळ्यांनी समजावले की निदान तुझे शिक्षण पुरे कर तर तुला पुढे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. आणि त्या गोष्टीला तयार झाली होती. आता अभ्यास करते.
तसे घरचे वळण पण चांगले आहे. मुलगी गोड आहे. वडिल मधून-मधून आम्हाला येवून भेटतात. तिला काही हवे नको विचारतात. पण हिच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. तिला ‘ती Adopted (दत्तक घेतलेली) आहे.’ हे जगाला सांगायची लाज वाटते. असे तिचे म्हणणे आहे. मूर्खपणाची काही सीमा नाही. असो.
झाले दीड वाजता आम्ही गेलो. आई – वडिल बिचारे तिला भेटण्याच्या आशेने आले होते. आणि रडून रडून परत गेले. हा नेहमीचाच प्रकार आहे, हे सगळे बघून तिचा खूप राग येतो. पण आता आम्ही तिला ओरडलो तर त्याचा विपरीत परिणाम होईल असा विचार करुन गप्प बसलो. ह्या सगळ्या प्रकाराने डोके सुन्न झाले होते.
आणि बरोबर तीन वाजता मिटींग सुरु झाली. ही सोनलबेन साडेतीन वाजले तरी पोहचली नव्हती. हिच्यासाठी भर दुपारी उन्हात तीन वाजता सगळे मेम्बर पोहचले होते. त्यामुळे थोडी आपाआपसात कुजबुज चालू होतीच. शेवटी कार्यक्रमाची रुपरेखा करायला सुरुवात झाली होती. प्रथम गणेश वंदना, नंतर प्रमुख पाहुणे कोणाला बोलावायचे हे ठरविले त्यांचा फोनवरच होकार घेतला. इतर Guest ची यादी तयार झाली. Venue नक्की झाला. थोडक्यात, काय तर सगळे काम झाले. मग ह्या ‘सोनलबेन’ उगवल्या. आल्याबरोबर मी इकडे busy होते तिकडे busy होते वगैरे वगैरे नेहमीचच कथा झाली. सगळे ऐकून घेतले आणि आमच्या स्टाफ मेम्बरला सांगितले हीचा सन्मान करायचा आहे तर त्या सन्मान पत्राचा मजकूर हिला वाचून दाखव. काही Changes असतील तर Print काढायच्या आधीच करता येईल.
तिने वाचायला सुरुवात केली. नांव, शिक्षण, कुठल्या कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये कुठल्या कुठल्या पदांवर काम करते त्याची यादी वाचून दाखविली. शेवटी नेहमीप्रमाणे एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यंकर्त्यांची मुलगी आपल्या वडिलांचा वारसा व्यवस्थित चालवत आहे आणि ह्या सगळ्या धावपळीतून वेळ काढून तिने डॉक्टरेटचा अभ्यास केला. वगैरे वगैरे …….
वा ! वा ! ऐकायला खूप छान वाटले. क्षणभर तिचे कौतुकही वाटले खरोखरीच एवढ्या लहान वयांत ती बऱ्याच गोष्टी करते आहे. पण शेवटी वडिलांच्या वारशाची गोष्टी ऐकुन मात्र असे वाटले की आपल्या देशातील ही घराणेशाही कधी संपुष्टात येईल, देव जाणे. डोक्यात विचार चालूच होते.
तेवढ्यात ती म्हणाली, “संध्या बेन, आमा छे नां एक लाईन add करजो.” संध्या म्हणाली, “बोलो”
माझ्या शेजारची मेम्बर म्हणाली, “आता काय नविन अगाऊपणा. ती संध्याला सांगत होती ” त्यात असे लिही की, मी माझ्या आई वडिलांची ‘दत्तक मुलगी’ ( adopted girl) आहे. मी पंचवीस दिवसांची असतांना त्यांनी मला दत्तक घेतले आहे.”
आम्ही सगळे आवाक होवून तिच्याकडे बघत होतो. आज ती बत्तीस वर्षांची तरी असेल पण ही गोष्ट कोणालाही माहित नाही.
ती म्हणाली, “अशा गप्प कां झालात? हे आजपर्यंत कोणाला माहित नाही. पण हेच ‘सत्य’ आहे.
“ मला अभिमान वाटतो मी त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे हे सांगताना ” ती सांगत होती.
आम्ही काय बोलणार शब्द तरी सुचायला पाहिजेत नां. तशा आमच्या मॅडम म्हणाल्या, “सोनलबेन तुला समजते आहे कां हयाचा काय परिणाम होईल? तुझ्या आई वडिलांना काय वाटेल? हे जरी सत्य असले तरी त्यानी ते जगापुढे आणलेले नाही. आणि ही हकीकत जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा Media वाले Press वाले केवढे वादळ उठवतील ह्याची तुला काही कल्पना आहे कां? हे साहेबांना आणि मॅडमना ( तिच्या आई वडिलांना) खूप त्रासदायी होईल.”
ती शांतपणे म्हणाली, “नाही असे काही होणार नाही. हे मी त्यांची परवानगी घेवूनच सांगते आहे. आणि या प्रसंगी सांगणार आहे. त्यांना काही त्रास होणार नाही. ते मनाने खूप भक्कम आहेत. माझ्या आईवडिलांच्यात खूप हिम्मत आहे. त्यांना समाजाची भिती कधीच नव्हती. त्यांना माझ्या मनावर काय परिणाम होईल याची काळजी होती. म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले हळूहळू समजावत समजावत हे मला सांगितले. त्यांनी ज्या दिवशी मला हे सांगितले त्या दिवशी त्यांच्या जीवाला किती यातना झाल्या असतील. एक क्षण कदाचित त्यांना भितीही वाटली असेल पण त्यांचा त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी स्वतःची तर हिम्मत ठेवलीच पण मला खूप हिम्मत देवून आज इतके सक्षम केले आहे. जगांपासून त्यांनी भले लपवून ठेवले पण माझ्यापासून लपवले नाही. आणि हे ‘सत्य’ च आमच्या तिघांचीही (आईबाबा आणि ती) ताकद आहे. मला माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे. तुम्ही त्या सन्मानपत्रांत नमूद करा. मी त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे.”
एखादा सिनेमातला सीन बघावा असा हा प्रकार घडतं होता. तिचा चेहरा अगदी शांत होता. तिच्या चेहऱ्यावरच्या उद्धटपणाचा आज अर्थ उमगला होता. तो उद्धटपणा नसून आत्मविश्वास होता. त्या क्षणी ती एक कर्तबगार स्वतः वर पूर्ण विश्वास असणारी व्यक्तिमत्व आहे हयाची पूर्ण जाणीव होत होती. पाच कुठे वाजले ते कळलेच नव्हते.
मिटींग संपवून बाहेर पडलो तेव्हा तिच्या कडे जावून तिची चक्क माफी मागितली. तिच्याबद्दल खूप गैरसमज होते हे सुद्धा कबूल केले. आणि संस्थेतील ‘मुक्ता’ ला तुझी खूप गरज आहे. तिच्यासाठी थोडा वेळ काढशील कां? अशी विनंती केली.
कसलाही विचार न करता ती म्हणाली, “जरुर वेळ काढीन. पण सध्या तिची परीक्षा आहे नां तेवढी पूर्ण होवून दे. मग रोज अर्धा तास तिच्यासाठी काढीन. आपण लवकरच तिला तिच्या आईबाबांकडे आनंदाने पोहचती करु.” हे ती खूप आत्मविश्वासाने बोलत होती. तिच्या ह्या आत्मविश्वासाला एक सलाम. धन्य हो सोनलबेन
सोनलबेन
दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,