संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
अर्थात पुन्हा पुन्हा लक्षात ठेवावे असे स्मरण गाथेतील अपयशाचे पान !
‘ कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे .’
ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो .
प्र .ल. वाट बघत होते .
‘ आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .’
माझ्या स्कूटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कूटरला किक मारायला विसरलो .
‘ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ?’
मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले .
‘ एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल ?’
‘ ते त्यालाच विचारा .’
त्यांनी विषय संपवला .
आम्ही हॉटेलवर आलो .
रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
‘ जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .’
‘ अहो पण …’
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . कीआणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती .
पण त्या कथेवर नाटक ?
मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
प्र ल मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .
आणि प्रकाश बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि व्यावसायिक रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती .
हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले .
एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते . आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .
पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .
दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
‘ नाटकाचे नाव काय ठेवणार ? ‘
प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल !
‘ असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .’
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
‘ हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला . ‘
— आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस …अनेक गोष्टी .
‘खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..’
त्यांना मी एक प्रत दिली .
ते त्या रात्री मुंबईला गेले .
नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला .
मीसुद्धा व्यग्र होतो .
आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
‘ प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू झाला आहे …’
मला धक्काच बसला .
अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं .
त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं . त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हतं .
पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं .
त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं.
प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही .
पण मी नाराज नाही .
कारण माझी संहिता दमदार आहे .
कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे .
दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी देणारं आहे .
आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत .
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय .
केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
“…श्रीनटेश्वर , रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी , धमाल विनोदी नाटक , अरे , चल उचल ! ”
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे.
– डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
८९५१९०६७०१
——-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही