स्मरणगाथा : २

नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .



— सकाळचे साडेसहा वाजले होते .

नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .
“गोविंद मोकाशी साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे . ”
त्यानं सांगितलं .
मी त्याला आत बोलावलं . चहा दिला .
आणि मोकाशीनी दिलेल्या कागदावरचा मजकूर वाचला .

” सर , आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने सादर केलेल्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या तुमच्या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरचे लेखनाचे पहिले पारितोषिक मिळाले आहे . अभिनंदन ! आत्ताच सकाळच्या सहाच्या राष्ट्रीय बातमीपत्रात ही बातमी सांगितली गेली . तातडीने तुम्हाला कळवावी म्हणून शिपायाला पाठवलं आहे , ड्युटी संपली की घरी येतो .”

मला क्षणभर काय करावे सुचेना .
सौभाग्यवतीला आणि मुलांना ही बातमी सांगितली .
आणि घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं .
चहा घेऊन शिपाई निघून गेला .

मी तेव्हा थिबा रोडवर टिव्ही रिले सेंटर समोर रहात होतो .
माझ्याकडे फोन नव्हता .
कारण तेव्हा ती चैन परवडण्यासारखी नव्हती .
पण आमच्या बिल्डिंगमध्ये बेळगावच्या तरुण भारतचे ऑफिस होते . त्यांचा फोन मी वापरत असे . कारण तरुण भारतचा मी लेखक होतो . आणि फोन केव्हाही वापरा असं किरण ठाकूर यांनी सांगितलं होतं .
त्या फोनवरून घरी हरचिरीला आई अण्णांना ही बातमी सांगितली .

हळूहळू ही बातमी सगळ्यांना कळली असावी . कारण तरुण भारतच्या फोनवरून मला अभिनंदनासाठी कॉल येऊ लागले होते .

राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारा महाराष्ट्रातील मी पहिलाच होतो .
१९९६ – ९७ याकाळात दहा हजार रुपयांचे पारितोषिक , दिल्ली येथे विशेष समारंभ , दिल्ली दर्शन असं त्या पारितोषिकाचं स्वरूप होतं .

कै . गोविंद मोकाशी आज आपल्यात नाहीत . पण त्यावेळी आमची मैत्री चांगली होती . त्यांनीच मला या राष्ट्रीय स्तरावरच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त केलं होतं .
तसं पाहिलं तर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची स्थापना झाल्यापासून मी सातत्याने लेखन करत होतो . श्रुतिका , कथा , कविता , तेरा भागांच्या दोन मालिका , दीपावलीसाठी संगीत नाटके , चर्चासत्र , मुलाखती , विविध सणांसाठी खास लेखन असं विविधांगी लेखन करत होतो . पण स्पर्धात्मक स्वरूपात हे पहिलेच लेखन होते आणि त्यात घवघवीत यश लाभले होते .

डेथ ऑफ कॉमनसेन्स ही एक फँटसी होती .
२०६० साली कौटुंबिक विश्वात , भारतात काय घडू शकेल आणि वृद्धांच्या बाबतीत नेमकी कोणती गोष्ट घडेल असा विचार करून ती फॅन्टसी मी लिहिली होती . लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी वयाच्या साठाव्या वर्षी सक्तीचा मृत्यू असा कायदा झाला आणि ती वेळ एखाद्या कुटुंबात आली तर भावनिक दृष्ट्या संस्कारक्षम कुटुंबात काय हलकल्लोळ होईल . कायद्याला चकवून मृत्यू टाळायचा असं ठरवलं तर नियतीपुढे सगळे कसे हतबल होतील , असा विषय मी मांडला होता .
गोविंद मोकाशी आणि त्यांच्या टीमने या नभोनाट्याचे अतिशय सुंदर असे सादरीकरण केले होते . कलाकारांचा आवाज , पार्श्वसंगीत आणि एकूणच दर्जा उच्च स्वरूपाचा होता .
या नभोनाट्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले . त्या त्या भाषेत त्या राज्यातील आकाशवाणीने त्याचे सादरीकरण केले .
रत्नागिरीकरानी, वृत्तपत्रांनी खूपच कौतुक केले .
त्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे , सत्कार समारंभ झाले .
नगर वाचनालयात झालेल्या त्यावेळच्या कार्यक्रमात लोकांना बसायला जागा नव्हती इतकी गर्दी झाली होती , तरीही जिन्यावर , मिळेल तेथे जागा शोधून लोक उभे राहून कार्यक्रम ऐकत होते .
हे ही विलक्षण होते .

सगळे दिवस आनंदाने निथळणारे होते .

दिल्लीतील कार्यक्रम मावळंगकर सभागृहात झाला . त्याची रंगीत तालीम झाली , दुसऱ्या दिवशी नभोवाणी मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले . मी आणि सौभाग्यवती ऋचा , दोघंही त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो .

आयुष्यातील हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा होता .

आणि लेकाचे हे कौतुक बघताना आई अण्णाना आनंदाश्रू आवरत नव्हते .
तो त्यांचा आनंद माझ्यासाठी तो फार मोठा सन्मान होता .
आजही तो काळ जसाच्या तसा आठवतो आणि कृतकृत्य झाल्यासारखे वाटते .

🌹 बुकमार्क 🌹

त्या दिवशी अभिनंदनाचे फोन येत होते , त्यातला एक फोन चांगलाच लक्षात राहिला आहे .
अभिनंदन करून झाल्यावर त्या व्यक्तीने सांगितले ,
“ज्याला बक्षीस मिळाले आहे , तो श्रीकृष्ण जोशी तूच आहेस ना याची अगोदर खात्री करून घे .”
क्षणभर मीच गोंधळात पडलो .
कारण श्रीकृष्ण जोशी या नावाचे पाच जण रत्नागिरीत रहात होते .
त्यामुळे थोडावेळ संभ्रमावस्था आली . पण पुढच्या क्षणी सावरलो .
हे लेखन माझेच होते आणि बाकीचे श्रीकृष्ण जोशी लेखक नव्हते , हे माझ्या लक्षात आले .
पण काही सेकंद का होईना बावरलो होतो , हे नक्की .
माझे हवेत उडू पाहणारे विमान त्या फोनने जमिनीवर आणले , म्हणून त्या व्यक्तीला मी मुद्दाम फोन करून धन्यवाद दिले .

डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २३ जुलै २०२५
८९५१९०६७०१
—————-
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही .

Author