शिकवण

सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता.



सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता. पण सकाळपासून असलेल्या कामाच्या रहाटगाडग्यात त्यांना परत फोन करुन कारण विचारायला उसंतच मिळाली नाही आणि कशीबशी कामे आटोपून दुपारी त्यांच्याकडे येऊन पोहोचले होते.
तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आले की ह्या प्रोजेक्टमध्ये मुला-मुलींचा एक NGO आम्हाला सहाय्य करणार आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर कसे Co-ordinate करायचे हे ठरवण्यासाठी आम्हा सगळ्यांनाच बोलविण्यात आले होते.
प्रोजेक्ट नेहमीपेक्षा थोडे निराळेच होते. त्यासाठी लागणारा प्रोजेक्टर आणि सगळ्यात महात्वाचा असा सकारात्मक दृष्टीकोन हा त्या मुलांकडे होता त्यामुळे त्या मुलांच्या NGO शिवाय शक्यच नव्हते.
आज काल सगळे नवीन नवीन डे साजरे करण्याचे एक नवीनच वेड म्हणा; अतिशय बोकाळली आहे. कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, तरतऱ्हेचे डे तसाच त्या आठवड्यात ‘friendship day’ येणार होता आणि आम्ही तो ह्या NGO च्या सहाय्याने Special मुलांबरोबर साजरा करण्याचे ठरविले.
सामान्यपणे शाळा किंवा लहान मुलांसंबंधीत प्रोजेक्ट असले कि माझा नेहमीच उत्साह वाढत असतो. माझाच कशाला माझ्या बरोबर असणाऱ्या अधिकांश बायका खुश होत असतात. त्यातून खेड्यातील शाळा किंवा आश्रम असलेले प्रोजेक्ट फारच उत्साहाने होत असते. कारण तिथले वातावरण अतिशय स्वच्छ, शांत व रम्य असते. त्या प्रलोभनीय वातावरणाला निरागसतेचा सुंगध येत असतो. तिथली मुले तर काय, विचारु नका, विचारु नका, अतिशय उत्साहाने बागडत असतात आणि बाहेरच्या शहरातून लोक आले आहेत असे कळले की त्यांचा उत्साह ओथंबून वाहत असतो. ते त्यांच्या शिस्तीचे आणि व्यवस्थितपणाचे अतिशय तत्नमयतेने उत्कृष्ट प्रदर्शन करत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या भरपूर असते.
परंतु ह्या Special मुलांबरोबर दिवस साजरा करण्यासाठी हाताच्या बोटावर मोजून आठ-दहा बायका तयार झाल्या होत्या. आमचा असा एक अनुभव आहे की generally फोटो काढण्यासाठी तर लोक येतात, परंतु इथे त्याचीही कोणी तयारी दाखविली नव्हती.
मिटिंगमध्ये आम्हाला कळून चुकले होते की ही जी “Special” मुले आहेत ती सगळी HIV+ve आहेत.
ती वय वर्षे ६ ते १६ ह्या वयोगटातील एकंदरीत ५६ मुले आहेत. त्यातील ८०% मुले अनाथ आहेत. उरलेली बहुतांश single parent वाली आहेत आणि काही मुलांना आईवडिलांनी सोडून दिलेले आहे. अशा ह्या मुलांसाठी सरकारने हे ‘Special Children home’ अशी संस्था चालवलेली आहे. ह्या मुलांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना गर्दीत बाहेर फिरवणे शक्य नसते.
ही मुले सामान्य मुलांसारखी धावपळही करु शकत नाहीत कारण त्यांना इजा झाल्यास त्यांना होणारा रक्तस्त्राव (bleeding) फार धोकादायक होऊ शकतो.
त्यामुळे ह्या मुलांबरोबर काही बैठे खेळ खेळणे, एक दोन लहान Film दाखवणे, छान जेवण देणे आणि पारीतोषक वितरण सामरंभ करणे असा प्रस्ताव आम्ही मिटींग मध्ये मंजूर केला. आणि ठरल्यादिवशी सकाळी ९ वाजता तिकडे पोहचायचे असे नक्की करण्यात आले.
झाले, तो दिवस उजाडला. जुलै महिन्यात रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चोहिकडचा परिसर हिरवागार, आनंदी आणि स्वच्छ दिसत होता. झाडावरची पालवी, घरांची छप्परे, रस्ते सगळे सुंदर ताजेतवाने दिसत होते. अशा उत्साही वातावरणात सकाळी नऊ वाजता आम्ही त्या ‘Special home’ मध्ये पोहोचलो.
भक्कम उंच भिंतीने बंद अशा मोठ्या आवारात एक मोठे बंगला वजा घर होते. त्याच्या समोर गडद हिरवी गार, शांत मोठी लॉन होती. लॉनच्या एका कोपऱ्यात काही खेळण्याची साधने ठेवलेली दिसत होती, त्यांच्याकडे नजर फिरवता त्यांचा कोणीही वापर केलेला नसावा असा संकेत मिळत होता. त्या मोठ्या आवाराच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी Out house वजा खोली होती.
त्यावर मोठ्या ठळक लाल अक्षरात ‘मेडिकल रुम’ असे लिहिलेले होते. बाजूला एक जुनी मोडकळीत आलेली ambulance उभी होती. परंतु ती वापरात असावी कारण बाजूलाच खुर्चीवर डोळ्यावर रुमाल टाकून झोपलेला ड्रायव्हर बसलेला दिसत होता. त्या रुमच्या पलीकडे दोरीवर अतिशय जुनाट, मळकट धुवून वाळत घातलेले कपडे दिसत होते. संपूर्ण आवारात भयानक शांतता होती. भरवस्तीत असूनही कुठेतरी एकांतात असल्यासारखी ती जागा होती.
साधारणपणे मुले म्हटले कि खेळीमेळीचे, उत्साही वातावरण आढळते. मुले म्हणजे “गोंडस ” अशी कल्पना असते. परंतु इथे उपस्थित मुलांपैकी ६०% मुले तरी शरीराने क्षीण झालेली समोर आली.
इथल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर औदासिन्य आणि डोळ्यात कारुण्य दिसत होते. कित्येक लहान मुलांना तर त्यांच्या व्याधीची कल्पनाही नसावी. काही मुले आमच्याकडे एकटक भेदरलेल्या नजरेने बघत होती.
त्या मुलांच्या नजरेत बघताना क्षणभर असे जाणवले, की हा प्रत्येक मुलगा आपल्यालाच विचारतोय, मला असे आयुष्य जगावे लागते आहे ह्या मध्ये माझा काय दोष? ह्या कल्पनेनेच मन खिन्न झाले. क्षणभर भितीने आणि उदासीनतेने शहारुन अंगावर काटा आला.
मनाला पटकन आवर घातला आणि पुढील कामाला लागलो. बरोबर असलेल्या मुलांनी प्रोजेक्टर लावला. आमच्यामधील एका मुलानी त्या मुलांना संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम सांगितला. त्या मुलांच्या चेहऱ्यावर कसलेही भावना नव्हते. निर्विकार चेहऱ्याने त्यांनी शांतपणे सगळे ऐकून घेतले. त्यांच्या ‘वॉर्डन मॅडमने ‘ आमची सगळ्यांची थोडक्यात ओळख करुन दिली. त्यांनी आम्हाला त्या मुलांच्या दैनंदिन कार्यक्रमाची थोडी माहिती दिली. त्यातल्या त्यात तब्येतीने व्यवस्थित असलेली मुले जवळच्या सरकारी शाळेत जातात असेही सांगितले.
पण शाळेत त्यांना पाठीमागच्या बेंचवर बसविले जाते. बाहेरच उभी असलेली ambulance हीच त्यांची school-bus आहे असे सुद्धा सांगितले. अशीच मुलींसाठी एक जागा आहे. ती सुरतला आहे. तिथे ८० च्या जवळपास मुली आहेत. अशी धक्कादायक माहिती दिली.
NGO पैकी एका मुलाने त्यांना सांगितले, मुलांनो आम्ही तुम्हाला दोन छोटे छोटे सिनेमे दाखवणार आहोत. तुम्ही शांतपणे आणि काळजीपूर्वक बघायचे आहेत. नंतर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आणि बरोबर उत्तर देणाऱ्या मुलांना बक्षिसे दिली जातील. बक्षिसे मिळतील हे ऐकून ती जरा खुश झाली होती.
पहिला सिनेमा आपले लाडके दिवंगत राष्ट्रपती Dr. APJ Abdul Kalam ह्यांच्या जीवनावर दाखविण्यात आला. त्यावर त्यांना छोटे छोटे प्रश्न विचारण्यात आले. जसे डॉ. कलाम कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांच्या भावाचे नाव काय? वगैरे वगैरे मुलांनी उत्तरे बरोबर दिली.
दुसरा सिनेमा म्हणणे गांधी नगर शहरातील प्रेक्षणीय स्थळांची एक छोटीशी documentary बनविण्यात आली होती. ह्या मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना गर्दीत नेले जात नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते त्यामुळे ह्या फिल्म द्वारे त्यांना थोडा शहराचा फेरफटका होईल असा आम्ही विचार केला होता. ती फिल्म त्यांनी मोठ्या आनंदाने पाहिली. त्यांच्या हावभावावरुन गांधीनगर शहर ते प्रथमच बघत असावेत असे वाटले.
ही फिल्म संपूर्ण झाल्यावर इथेही काही प्रश्न विचारले होते. विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा होता की, “ह्या फिल्ममध्ये किती मंदिरे होती? ” पाच-सहा मुलांनी वेगळी वेगळी उत्तरे दिली. कोणी म्हणाले तीन, कोणी म्हणाले पाच वगैरे वगैरे. एक आठ-नऊ वर्षाचा मुलगा उभा राहिला. अतिशय अशक्त, पिवळट पडलेला चेहरा, गालावरची हाडे मोजून घेता यावीत अशी अवस्था होती त्याची. ह्या जगाचा शोध घेणारे खोल गेलेले त्याचे निरागस डोळे होते. त्याने शांतपणे प्रश्न विचारणाऱ्या मुलाला प्रश्न विचारला, “भैय्या, तुम्ही मंदिर कशाला म्हणताय? ”
“मंदिर म्हणजे मंदिर, जिथे लोक देवाची पूजा करतात, दर्शन घेतात किंवा देवाची प्रार्थना करतात, ” आमच्या मधील एकाने उत्तर दिले. तो मुलगा एकटक त्याच्याकडे बघत म्हणला, “मी तुम्हाला हेच विचारतोय मंदिरामध्ये लोक दर्शन घेतात, प्रार्थना करतात, मस्जिदमध्ये लोक प्रार्थना करतात, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये पण लोक प्रार्थना करतात. हे सगळे मिळून किती मंदिरे होतात असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे का?”
हे ऐकून आम्ही अवाक झालो. एका अनाथ ८-९ वर्षाच्या मुलाने, जो अतिशय विचित्र दुखण्याने पीडित आहे. ज्याला ह्या जगाचा कुठलाच अनुभव नाही. ज्याने ह्या जगात बालपण ही अनुभवले नाही अशा मुलाकडून हा प्रश्न ऐकुन आम्ही थक्कच झालो. आपण काही वेड्यासारखा प्रश्न विचारला कि काय अशी आमची आम्हालाच लाज वाटली.
त्याच्याबद्दल चौकशी करता असे कळले की हा दुसऱ्या वर्गात शिकतो. आणि वर्गात चांगले मार्क्स मिळवतो. हे पाहून एका गोष्टीची खात्री झाली की हुशारी (ज्याला आपण इंग्रजी मध्ये intelligence म्हणतो) ही जात्याच असते आणि ती परमेश्वराने दिलेलेली देणगी असते.
पूर्ण दिवस आम्ही तिथे होतो. त्या मुलांबरोबर ठरल्याप्रमाणे सगळा कार्यक्रमपूर्ण केला पण ह्या मुलाच्या प्रश्नाने पिच्छा सोडला नाही. दिवसभर आमच्या बरोबर त्या warden मॅडम होत्या. वयाने फार मोठ्या नव्हत्या. ३०-३५ च्याच असतील. अतिशय नेटक्या आणि उत्साही बाई होत्या. मुलांशी अगदी प्रेमाने, मिळून मिसळून वागत होत्या. आम्ही त्यांच्याबरोबर बोलत असताना एका लहान मुलाने त्यांच्याजवळ येऊन “आयाची” complaint केली की, तिने त्याच्या skinवर औषध निट लावले नाही.
नंतर दुसरे दोघे जण आपापसात भांडणे झाली म्हणून गाऱ्हाणे घेऊन आली होती. ह्याबाईंनी त्यांना आई जशी आपल्या मुलांना समजावते तशी समजूत काढून दिली. जेवता जेवता दोन लहान मुले आपल्या पानातील गुलाब-जाम त्यांना द्यायला आली.
हे सगळे दृश्य बघताना खरेच त्या बाईंचेही कौतुक वाटत होते.
संध्याकाळी त्यांचा निरोप घेऊन परत निघताना न राहवून मी त्या बाईंना म्हणाले. “तुम्ही ह्या मुलांसाठी खूप कष्ट घेत आहात. तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे” त्या हसल्या.
आमच्यापैकी एकीने त्यांना विचारले, “वाईट वाटून घेऊ नका. just for curiosity मला सांगा तुम्ही ह्या मुलांबरोबर असे काम करता; तुमचे घरचे लोक तुम्हाला काही objection घेत नाहीत? किंवा तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नाही वाटत?”
हळूच हसत त्यांनी उत्तर दिले ” मॅडम मी पण HIV+ve पेशंट आहे. माझ्या नवऱ्याने मला फसवले. तो तर गेला. पण माझा काही गुन्हा नसल्यामुळे आणि मी चांगल्या घरातील असल्यामुळे घरच्यांनी माझ्या करता खूप कष्ट घेतले आणि मला उभे केले आहे. मी रेग्युलर औषध घेते. माझ्या आयुष्याचा आता दुसऱ्या कोणाला काय उपयोग? म्हणून मी माझे आयुष्य ह्या मुलांची सेवा करण्यात घालविण्याचे ठरविले आहे. ही मुले सुद्धा माझ्यासारखीच निर्दोष आहेत.” त्या बाई बोलत होत्या आणि आम्ही नि:शब्द होऊन ऐकत होतो.
त्या सांगत होत्या, “अशीही मी M. A. B.ed आहे. शाळेत सहावी-सातवीचे classes घेत होते. आता ह्या मुलांना शिकविते. त्यांनाही थोडेफार शिक्षण मिळते. सरकार मला चांगला पगार ही देते आणि माझ्या ह्या उरलेल्या छोट्याशा आयुष्यात काहीतरी चांगले कार्यपण होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मुलांचे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकेल?”
तिचे शांतपणे दिलेले उत्तर ऐकून दुसरा धक्का बसला.
तिच्या त्या अंधःकारा पुढच्या प्रकाशाला शोधण्याच्या केलेल्या प्रयत्नाला काय म्हणावे. कसली उपमा द्यावी हेच कळत नव्हते.
इथे पोहोचलो होतो, ह्यांना काही देण्यासाठी, काही शिकविण्यासाठी पण झाले वेगळेच. त्यांच्याच कडून खूप काही शिकवण घेऊन घरी निघालो होतो.

Author