शापित गंधर्व – पद्माकर शिवलकर

पत्रिका आणि जन्मवेळ ही अचूक जमायला खरं भाग्य लागतं आणि ते भाग्य प्रत्येक आणि ती भाग्य वेळ प्रत्येकाच्या नशिबात येतेच अशी नाही. मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असाच एक शापित गंधर्व जन्माला आला होता. तो ज्या काळात जन्माला त्या काळात क्रिकेट खेळणं हे अतिशय मानाचं होतं तो सन्मान त्याला मिळाला पण त्याला योग्य ते कोंदण मात्र बसलं नाही आणि तो दुर्दैवी खेळाडू होता पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी …..



पत्रिका आणि जन्मवेळ ही अचूक जमायला खरं भाग्य लागतं आणि ते भाग्य प्रत्येक आणि ती भाग्य वेळ प्रत्येकाच्या नशिबात येतेच अशी नाही. मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असाच एक शापित गंधर्व जन्माला आला होता. तो ज्या काळात जन्माला त्या काळात क्रिकेट खेळणं हे अतिशय मानाचं होतं तो सन्मान त्याला मिळाला पण त्याला योग्य ते कोंदण मात्र बसलं नाही आणि तो दुर्दैवी खेळाडू होता पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी …..

पद्माकर शिवलकर याची निवड कै. विनू मंकड यांची. त्यांनी मुंबई क्रिकेटच्या संघासाठी निवडले तो किस्सा कदाचित सर्वांनाच माहीत असेल. ‘त्याबाबतीत मी पद्माकर शिवलकर स्वतः विनू मंकड यांचा अत्यंत ऋणी आहे’ असे ते अगदी सहजपणे कबूल करत असत. त्यानंतर मुंबईच्या संघात त्यांची निवड जेव्हा झाली आणि मुंबईला अनेक अशक्य प्राय विजय त्यांनी मिळवून दिले ते मुंबई कधीच विसरू शकणार नाही. कदाचित मुंबई संघावरती हे ऋण कायम राहील.

पद्माकर शिवलकर अर्थात पॅडीची जेव्हा निवड झाली त्यावेळेला भारतीय संघात बापू नाडकर्णी जम बसवून होते. बापू नाडकर्णी नंतर बिशन सिंग बेदी आणि बिशन सिंग बेदी नंतर दिलीप दोशी हे संघात घेतले गेले आणि डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची जागा कधीच रिकामी झाली नाही. मला आठवतंय १९७५ च्या वेस्टइंडीज संघाविरुद्ध बिशन सिंग बेदी वर एका सामन्याची बंदी आली होती. त्यावेळी राजिंदर सिंग गोयल की पद्माकर शिवलकर असा निवड समितीला प्रश्न पडला होता पण निवड समितीने त्या दोघांनाही संधी दिली नाही आणि हा प्रश्नच मोडीत काढला. वास्तविक राजिंदर सिंग गोयलला जरी संधी मिळाली असती तर तोही तितकाच लायक खेळाडू होता यात शंकाच नाही. पण कधी कधी मला एक मनातल्या मनात शंका येते की बिशन सिंग बेदीनेच सांगितलं असावं की तुम्ही कोणताच खेळाडू खेळवू नका नाहीतर माझी जागा संघातली कायमची जाईल!! अर्थात हा एक माझ्या मनाचा खेळ आहे …..

शिवलकरला मुंबईतर्फे खेळताना बघताना मी अनेकदा पाहिले आहे किती सहजसुंदर शैलीत गोलंदाजी करत असे. तो आल्यानंतर गोलंदाज मुंबईची गोलंदाजी बहरते आणि प्रतिस्पर्धी अक्षरशः त्याच्या तालावर नाचत असत. मुंबईने असे अनेक सामने शिवलकरच्या एका हाती गोलंदाजीने जिंकून दिले होते. मला आठवतंय त्यावेळेला श्रीलंकेचा संघ भारतीय दौऱ्यावर अनधिकृत कसोटी खेळण्यासाठी आला होता. रॉय डायस नावाच्या एका डावखुऱ्या फलंदाजाला शिवलकर सामोरा गेला शिवलकर चे पहिले चारही चेंडू रॉय डायसने सीमा पार धाडले. शिवलकरने काहीही प्रतिक्रिया देणे टाळले. हात झटकले नाहीत की काही नाही. शिवलकर पाचवा चेंडू असा काही सोडला तर रॉय डायसचा त्रिफळा उडाला इतक्या शांतपणे शिवलकरने टाळी वाजवली आणि पश्चिम विभागाच्या खेळाडूंनी त्याला शाबासकी दिली होती.

त्या आधीचा मला शिवलकरचा किस्सा आठवतोय १९७२-७३ चा रणजी करंडकाचा अंतिम सामना. मद्रास मध्ये तामिळनाडू विरुद्ध खेळला गेला. बलाढ्य मुंबई संघ विरुद्ध घरच्याच मैदानावर तामिळनाडू. बलाढ्य म्हणजे काय हे मुंबईकरांना नक्कीच माहिती. पण त्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यासाठी कर्णधार वेंकट राघवन आणि मद्रासच्या क्रिकेट धुरिणांनी खेळपट्टी वेंकट राघवन व वामन कुमार यांना साथ देईल अशी फिरकीला पोषक खेळपट्टी बनवली. कारण त्यांचा अंदाज मुंबईकडे तितकासा दर्जेदार फिरकी गोलंदाज नव्हता की जो आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळू शकत होता. अर्थातच त्या लोकांना शिवलकरच्या दर्जाचा काहीच अंदाज नव्हता हेच खरं. मुंबई मुंबईचा पहिला डाव १५१ धावा गुंडाळला गेला. झालं आता मुंबई हरणार या हिशोबातच तामिळनाडूचे खेळाडू फलंदाजीला उतरले. त्या वेळेचा त्यांचा सर्वात मातब्बर खेळाडू अब्दुल जब्बार हा मैदानात उभा राहिला व दिवस अखेर दोन बाद ६२ अशा धावसंख्येवरती दिवस संपला.

सामन्याचा दुसरा दिवस बघ उजाडला दोन बाद ६२ वरून सुरू झालेला तामिळनाडूचा डाव ८० धावा संपला शिवल करने १६ धावात आठ गाडी बाद केले होते. पुढे आठ खेळाडू केवळ १८ धावात तंबूत परतले. मुंबईच्या दुसरा डाव सुद्धा ११३ धावा संपला. आता शिवलकरच्या जोडीला एकनाथ सोलकर होता. शिवलकरांनी एकनाथ सोलकर यांच्यासह पाच पाच गडी बाद करत तामिळनाडूचा दुसरा डाव केवळ ६२ धावात गुंडाळला आणि मुंबईने सलग पंधराव्यांदा रणजी करंडक उंचावला. असे अनेक किसे आणि प्रसंग शिवलकरने अगदी आपल्या डाव्या हाताने सोडवले होते. खरंतर आपल्या डाव्या हाताने अनेक डाव गुंडाळले होते.

शिवलकरची खासियत आणि त्याची अतिशय साधी शैली शिवलकरला महान बनवत होती. पण या महानतेला कसोटी खेळण्यासाठी लागणारी किनार मात्र कधीच लाभली नाही. तो याबद्दल ना खेद गोष्ट करत होता ना त्याला खंत होती. होय त्याच्या मनात मात्र त्याला ती गोष्ट खटकत होती पण त्यांनी कधी जाहीर व्यक्त केलीच नाही.

मुंबई क्रिकेटचे जेव्हा जेव्हा कौतुक होईल तेव्हा मुंबई क्रिकेटचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासात शिवलकरचे नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल यात शंकाच नाही. विनू मंकड वगळता मुंबईकडे मुंबईतर्फे कोणताही डावखुरा फिरकी गोलंदाज असा नव्हता की जो शिवलकरच्या आसपासही फिरू शकेल.

हल्ली एखाद्या डावखुऱ्या गोलंदाजाने पाच गडी बाद केले तरी त्याला लगेच महान ठरवले जाते. पण शिवलकरने असे पराक्रम अनेक वेळेस केले आहेत. त्याने अशा भल्या भल्या फलंदाजांना तंबूत धाडले होते ते शिवलकरला कधीच विसरणार नाहीत. मला आठवतंय १९८८ चा सुमारा असावा. हरियाणा विरुद्ध मुंबईचा सामना हरियाणा मध्ये खेळला जात होता. दिग्गज मुंबईकर असल्यानंतर मुंबईला सहज विजय मिळेल असा विचार करत राजिंदर गोयलला पोषक अशी खेळपट्टी तयार करण्यात आली होती. मुंबईतर्फे दिलीप वेंगसरकर पायाचा सुरेख उपयोग करत एक उत्तम खेळी केली आणि पायाच्या कसा उपयोग करावा याचा सुरेख परिपाठ घालून दिला. हरियाणा फलंदाजीला आल्यानंतर कपिल देवही त्याच्या पावलावर पाऊल टाकण्यात गेला. परंतु शिवलकरच्या पहिल्या षटकात बाद झाला. शिवलकरने त्याला झटक्यात तंबूचा रस्ता दाखवला. दिलीपची फलंदाजी आणि कपिल देवच्या फलंदाजीचे तुलना करण्याचा माझा हेतू नाही. परंतु शिवलकरच्या गोलंदाजीत आणि राजिंदर सिंग गोयल च्या गोलंदाजी हाच फार फरक होता जो शिवलकरने इथे सिद्ध करून दाखवला.

क्रिकेटच्या संदर्भात जर मला काही देवाकडे मागायचं असेल तर मी एकच मागेन; ‘देवा पुढल्या जन्मात शिवलकरला त्याची शैली, त्याची गोलंदाजी आणि त्याचं नशीब हे त्याला बरोबर देच, पण देताना एकच गोष्ट कर त्याच काळामध्ये इतर कोणताही डावखुरा फिरकी गोलंदाज जन्माला घालू नकोस.’

पॅडी शिवलकर आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत आणि पुन्हा आपली गोलंदाजी बघायला आपण पुन्हा मुंबईला कधी याल याची सतत वाट पाहू.

श्रीकांत राजे, ठाणे.
फाल्गुन शुक्ल पंचमी, शके १९४६

Author