आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घटना घडतात त्या टीपकागदासारख्या टिपून घेत त्यावर भाष्य करणारे अस्सल शाहीर म्हणजे आत्माराम पाटील. ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ शाहीर आत्माराम पाटलांचा हा पोवाडा शाहीर अमरशेख यांनी शिवाजी पार्कातल्या जाहीर सभेत खडय़ा आवाजात गायला आणि क्षणार्धात अवघ्या वातावरणात एक चैतन्य सळसळलं.
सगळ्या घटनांवर वास्तववादी पोवाडे रचणाऱ्या शाहीर आत्माराम पाटील यांचे मुंबईत प्रभादेवी येथे एका खाजगी इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले. ते केवळ गाणारे शाहीर नव्हते तर लिहिणारे शाहीर म्हणून त्यांची ख्याती होती. ते उत्तम भाष्यकार होते. रोज सर्व वर्तमानपत्रे वाचून त्यावर कवने करण्यात त्यांचा हातखंडा होता.
गोवा मुक्ती संग्रामाचा लढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शाहीर आत्माराम पाटील यांचे योगदान फारच मोठे होते. शाहिरांच्या पोवाडय़ांमध्ये, कवनांमध्ये अतिशय वास्तववादी आणि व्यक्तींना योग्य न्याय देणाऱ्या रचना असत. पोवाडे, लावण्या, समरगीते, समूहगीते, स्मरणगीते अशा स्वरूपाचे विपुल लिखाण त्यांनी केले. अभंगापासून ते लावण्यांपर्यंत वेगवेगळे प्रकार त्यांनी पोवाडय़ांमध्ये हाताळले. शाहीर हे पुरोगामी विचारसरणीचे होते.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या मुशीत ते तयार झाले होते. दैववाद, सांप्रदायिकता त्यांना मान्य नव्हती. त्यांची शाहिरी ही सर्वसामान्यांची शाहिरी होती. ‘एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. तेथे माणसावानी जात पुन्हा मिळायची नाय’ हा आणि ‘मिसळ झाली मुंबई रे बाबा मिसळ झाली मुंबई’ हे त्यांचे मुंबईवरचे कवन प्रचंड गाजले होते. जाती विसर्जनाबद्दलच्या लावणीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या ११८ जातींचे वर्णन करून आपले सुक्ष्म निरीक्षण नोंदविले होते. उतारवयात त्यांनी नव्या पिढीसाठी शाहिरीच्या जतन-संवर्धनाचे काम हाती घेतले होते.
महाराष्ट्रातल्या अनेक शाहिरांचे संघटन करून त्यांनी सबंध महाराष्ट्रभर प्रचार फेऱ्या काढल्या. त्यांच्या ‘शाहिरी फुलोरा’ या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग झाले. नवोदित शाहिरांना त्यांनी आपली कवने देऊन टाकली आणि त्यासाठी कधीही पैशांची अपेक्षा केली नाही. अशा स्वभावामुळेच शाहीर आयुष्यभर उपेक्षित जीवन जगले. इतर लोककलावंतांप्रमाणे त्यांनी शासनदरबारी कधीच हुजरेगिरी केली नाही आणि म्हणून अनेक सन्मानांपासून त्यांना वंचित रहावे लागले.
शाहीर अमरशेख पुरस्काराने आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती त्यांना मिळाली होती. ठाणे जिल्ह्यातील कपासे खेडेगावातील शेतकरी कुटुंबात ९ नोव्हेंबर १९२४ रोजी आत्माराम पाटलांचा जन्म झाला. लोअर परळ रेल्वे वर्कशॉपजवळील कवळी कंपाऊंडमधल्या एका चाळीत शाहीर राहात होते. निधनाच्या २४ तास अगोदर त्यांनी निवडक मित्रांसोबत ८६ वा वाढदिवस साजरा केला होता.
भायखळा येथील मंडईत भाजी विकता विकता त्यांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहिली. ‘भाजीत कमावलं आणि जीजीत गमावलं’ असे त्यांची मित्रमंडळी नेहमी चेष्टेने म्हणायचे. आपली लेखणी त्यांनी नेहमी भांडवलदारांविरुद्ध वापरली. मंडईत भाजीचा व्यवसाय करताना उगीचच व्यापाऱ्यांचा रोष नको म्हणून ते कधीकधी ‘धरतीनंदन’ या टोपणनावानेदेखील लिहायचे.
आणीबाणीच्या काळात वसंतदादा पाटील यांनी शाहिरांना २० कलमी कार्यक्रमावर आधारीत गाणी लिहायला सांगितली होती. दादा शाहिरांच्या घरी गेले, तेव्हा तिथे वीजही नव्हती. दादांनी ते चित्र पाहून तुम्हाला सरकारी कोटय़ातून घर देतो असे आश्वासन दिले. मात्रशाहिरांनी सरकारी घर स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ‘मुंबईचा भाजीबाजार’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून प्रभाकर ओहोळ लिखित ‘एका शाहिराची कथा’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची चित्तरकथा रेखाटण्यात आली आहे.