सत्यदेव दुबे

बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.

इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.

Author