महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आपल्या कलेच्या जोरावर मुंबईसारख्या कलेची पंढरी मानल्या जाणार्या मयानगरीच्या मुख्य प्रवाहात येणे, वाटते तितके सोपे नसते. अनेक कलावंतांचे ते केवळ स्वप्नच ठरले आहे. पण अनेक कलावंत आपले कर्तृत्व व नशीब यांच्या तारा जोडून तिथवर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत व मग कय विचारता त्यांच्या संपुर्ण आयुष्याचेच तिथे सुंदर व सुरमय असे गाणे झाले आहे.
अशा कलावंतांमध्ये बीडच्या संजीवनी बीडकर होत्या. त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले होते. परंतु त्यांच्याकडे अतिशय अप्रतिम व साक्षात नटराजाचे पृथ्वीवरील दर्शन घडविणारी अशी नृत्यकला होती. व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. शिडशिडीत बांधा, भरपूर उंची, धारदार नाक व ठसकेबाज अदा अशी कलाक्षेत्रात स्वीकारले जाण्यासाठी लागणारी भक्कम शिदोरी त्यांच्यापाशी होती. त्या बळावर त्यांना मुंबईत आल्यावर शाहीर साबळे पार्टीचे ‘कशी काय वाट चुकला’ हे लोकनाट्य मिळाले. सुहास भालेकर यांनी दिग्दशिर्त केलेल्या या लोकनाट्यात त्यांनी प्रमुख भूमिकेत बहार उडवून दिली होती. ‘राया माझ्या हिरीला इंजिन बसवा’ ही लावणी आणि त्यावरचे संजीवनीबाईंचे नृत्य गाजले. सुहास भालेकर यांच्यासारखा कसबी लोकनाट्य अभिनेता प्रमुख भूमिकेत समोर असतानाही संजीवनीबाई कुठेही कमी पडल्या नाहीत, उलट त्यांनी हे आव्हान यशस्वीपणे स्विकारले. या लोकनाट्याने पाचशेहून अधिक प्रयोग केले.
त्यानंतर संजीवनी बीडकर यांचे लक्षात राहणारे काम दिसले ते ‘जंगली कबुतर’ या नाटकात. त्या केवळ लोकनाट्यात न अडकता सर्व प्रकारच्या नाटकांत कामे करू लागल्या. ही त्यांच्यातील अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न कलावंताला मिळालेली दादच होती. ‘मृत्युंजय’, ‘नाते युगायुगांचे’, ‘मला मंगळ आहे’ या त्यांनी काम केलेल्या प्रत्येक नाटकाची जातकुळी वेगळी होती. सत्तर ते ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटांमध्ये लावण्यांचे प्राबल्य होते. संजीवनी बीडकर यांना तिथे संधी मिळाली नसती तरच नवल होते. त्यांनी ‘नवरा माझा ब्रह्माचारी’, ‘ठकास महाठक’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’ अशा चित्रपटांतून नृत्यांगनेचे कौशल्य दाखवलेच; परंतु ‘सामना’ आणि ‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटांतही त्यांच्या लावण्यांनी वेगळीच रंगत आणली. रूप आणि अभिनय कौशल्य असूनही त्यांना चित्रपटातील नायिकेच्या भूमिका मात्र त्यांना का मिळाल्या नाहीत, हे न उमगणारे कोडे आहे.
तथापि, ‘चंद होता साक्षीला’, ‘देवापुढे माणूस’, ‘नेताजी पालकर’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटांत छोट्या सहाय्यक भूमिकांमध्ये त्या दिसत राहिल्या. मात्र गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांनी त्यांना चांगलाच हात दिला. आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये त्या दूरचित्रवाणी मालिकांकडे वळलेल्या आणि तिथेही त्यांचे चांगलेच बस्तान बसत चालले होते.
संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स
####