आयुष्याच्या वाटचालीवर वा ज्याला जीवनकर्तृत्त्व असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावर आसपासच्या वातावरणाचा वा संस्कारांचा प्रभाव असतो. वातावरण आणि संस्कार याच्या जोडीला पिंड म्हणून जो काही प्रकार असतो तोच त्या व्यक्तीच्या कर्तृत्वगाथेची उंची ठरवत असतो. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यातील क्षण न क्षण दुसऱ्यासाठी वेचलेल्या आणि कृतार्थ ठरलेल्या संभा चव्हाण यांचा पिंड हा शूर योद्धय़ाचा, लढवय्याचा होता.
म्हणूनच अंतिम श्वासापर्यंत हा वीर झुंजत राहिला. त्यातील सुमारे ६० वर्षे समाजातील दुर्लक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि अखेरची सात-आठ वर्षे मृत्यूविरुद्ध या योद्धय़ाचा लढा हा असा अखंड होता. कोकणातील देवगडमधील तारामुंब्री हे मूळ गाव असलेल्या संभा चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि तेही वरळी विभागात गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घट्ट संस्कार आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा गडद प्रभाव त्यांच्यावर पडला होता. स्वातंत्र्याचं तेज उरात घेऊन नवा भारत घडवायला निघालेल्या तळागाळातील आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरूण पिढीचा झपाटय़ाने भ्रमनिरास झाला.
देशप्रेम, साधेपणा, कृतज्ञता, त्याग ही मूल्ये भांडवलशाहीच्या चक्रात नष्ट होत गेली आणि याचसाठी का मिळवले स्वातंत्र्य असा प्रश्न त्या पिढीला पडू लागला. संभा चव्हाण याच भ्रमभारित युवा पिढीचे एक प्रतिनिधी होते. मात्र या चकव्यात त्यांनी स्वत:ला गुंतू दिले नाही. आधी समाज सुधारला की देश सुधारेल, या विचारधारेचे ते पाईक बनले आणि ज्या पोलीस दलात काही काळ त्यांनी सेवा केली, त्या पोलिसांच्या जीवनकल्याणासाठी अखंड झुंजण्याचा निर्धार त्यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी जे दल राबते ते पोलिसच अत्यंत हलाखीत राहतात, त्यांना चांगलेवेतन मिळत नाही, त्यांना कायम मानसिक दडपणाखाली काम करावे लागते आणि ज्यांची वरिष्ठ कायम उपेक्षा करतात, त्या महाराष्ट्र पोलिसांवरचा अन्याय दूर करण्यासाठी अखंड लढय़ाला पर्याय नाही, हे संभा चव्हाण यांनी हेरले. म्हणूनच १९६६ साली जगावेगळा असा पोलिसांच्या पत्नींचा मोर्चा त्यांनी पोलीस आयुक्तालयावर नेला. या त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान येरवडा तुरुंगात तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना जाऊन भेटले. पोलीस कल्याणाचे काम सोडून द्या, आपण म्हणाल त्या पदावर पोलीस दलात आपली नियुक्ती करतो, अशी सुखासीन भविष्याची हमी देणारी ऑफर त्यांनी संभा चव्हाण यांना दिली.
कारावासात असलेल्या अन्य कोणालाही हा मोहाचा क्षण स्वीकारावासा वाटला असता; त्याचे चित्त डळमळले असते. पण भगवद्गीतेचा संस्कार झालेल्या संभा चव्हाण यांनी आपले पोलीस कल्याणाचे समरांगण अधिक मोठे मानले आणि मुख्यमंत्र्यांची ऑफर निग्रहाने बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि मग याच पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले संभा चव्हाण कर्मयोद्धा ठरले. याच भूमिकेतून त्यांनी वरळीच्या पोलीस वसाहतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. १९५६-५७ साली वरळीच्या गांधीनगरात गुंडांचे साम्राज्य होते.
दारूच्या भट्टय़ा राजरोस लागायच्या. हे गुंड संभा चव्हाण यांनी संपुष्टात आणले. पत्रकारितेत त्यांनी आचार्य अत्रेंना आपले गुरू मानले होते. अत्रेंची बेधडक, जहाल लेखणी संभा चव्हाणांना प्रिय होती. आपल्या ‘शूर शिपाई’ आणि ‘आमचा हिंदुस्थान’ या नियतकालिकांतून संभा चव्हाण यांनी अत्रेंचाच वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आपले लेखणी परजली.
संघ विचार आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहताना सुखकर आयुष्यासाठीच्या साऱ्या तडजोडी झुगारून दिलेल्या या लढवय्याची इच्छा महाराष्ट्राच्याविधिमंडळात जाऊन पोलीस कल्याणासाठीचा आवाद बुलंद करण्याची होती. आमदारकी ‘विकत’ घेतली जाण्याच्या आजच्या काळात ती पूर्ण होणे अशक्यच बाब होती. मात्र झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. एका झुंजाराची जीवनगाथा शंभर टक्के निष्कलंकच राहिली!