साठीच्या उंबरठ्यावर

काही केल्या झोप येत नव्हती जीवाची घालमेल चालू होती. कधी ह्या कुशीला वळ कधी त्या कुशीला. सहज उठून घड्याळ पाहिले. बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. बाहेर सगळी सामसूम होती. रात किड्यांची किरकिर ऐकू येत होती. एकदा उठून खिडकीतून बाहेर पाहिले



काही केल्या झोप येत नव्हती जीवाची घालमेल चालू होती. कधी ह्या कुशीला वळ कधी त्या कुशीला. सहज उठून घड्याळ पाहिले. बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. बाहेर सगळी सामसूम होती. रात किड्यांची किरकिर ऐकू येत होती. एकदा उठून खिडकीतून बाहेर पाहिले. रस्त्यावरचा लाईट नसल्यामुळे बाहेर काळाकुट्ट अंधार होता. लांबवर एक लाईट चालू होता. तिथे थोडासा उजेड दिसत होता. पाणी पिऊन घेतले आणि परत झोपण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ संध्याकाळी घडलेला प्रकार डोक्यातून जातच नव्हता.
शेजारच्या कुसुमताईंचा आवाज अजूनही कानांत घूमत होता.
“हो, मुलगी बघायला गेलो होतो. काय झाले म्हणून काय विचारतेस. मुलीकडच्यांनी विचारले मला, घरांत किती ‘Dustbin’ आहेत!”
‘Dustbin’ते का?” ….. मी म्हणाले.
“तुला काहीच कसे कळत नाही गं, ‘ Dustbin’ म्हणजे म्हातारी माणसे, थोडक्यात आई-बाप, म्हणजे आम्ही दोघे आणि आमच्या सासुबाई. आता तरी काही कळले कां?” जरा रागानेच माझ्या अंगावर ओरडल्या.
“आता आपली वय झाली नां, म्हणजे आपण काही कामाचे नाही. उलटे काही वर्षानंतर त्यांच्या मुलीला आमच्या हातात चहाचा कप नाही कां द्यावा लागणार? हो की नाही? मग ह्याचा विचार नाही कां करणार, मुलीचे आईबाप. ” तावा-तावान त्यांची बडबड चालू होती.
त्यांचा तो अवतार बघून मी गुपचुप तिथून पळता पाय काढला आणि घरात स्वयंपाकाला लागले होते.
कुसुमताईंच्या बोलण्याचा डोक्यांत विचार चालूच होता आणि थरथरणाऱ्या हाताने भाजी हालवता – हालवता गुडघा दुखणारा पाय हलकेच लांब ठेवत माझे आपले काम चालू होते. थरथरणाऱ्या हाताने आणि दुखणाऱ्या गुडघ्याने एकदम जाणीव करुन दिली होती, “अरे बापरे, ह्या वर्षी आपल्याला ही साठावे वर्ष लागणार.”
आणि मनात भितीचे काहूर माजले होते, “जर आत्ता आपल्या हातापायांची अशी परिस्थिती झाली तर पाच वर्षाने आपण नक्कीच ‘Dustbin’ होणार.”
पण तरीही मला एका गोष्टीचे मात्र समाधान होते की मी अजूनही पिढीजात डायबिटीसला जवळ येवून दिलेले नाही. “दुःख मे सुख.” आणि स्वतःशीच हसले.
तेवढ्यात दुसरे मन म्हणाले, “काय मोठे कौतुक? ” त्या मागच्या गल्लीतल्या आजी लोकांचा ग्रुप पाहिला आहे नां. सगळ्यांच्या वयांची पंचाहत्तरी होऊन गेली आहे. कशा टणटणीत आहेत. मजेत फिरत असतात. दुपारी कोणा एकाच्या घरांत बसुन मोठमोठ्याने सगळी स्तोत्र, श्लोक, भजन म्हणत असतात, अगदी एका सुरात आणि तालात. त्यांना कधी उन लागत नाही, कधी झोप येत नाही. कधीही श्लोक विसरल्यात म्हणजे स्मृती कमी झाली अशी तक्रारही करतांना ऐकले नाही. गार्डनच्या कट्टावर संध्याकाळी बरेचशे रिटायर्ड पुरुष, आजोबा सुद्धा फिरायला येवून बसलेले दिसतात. मोठ्या मोठ्याने गप्पा मारत असतात. मनाला तरुण करणारे ‘जोक्स’ ही करतात आणि हसतांना दिसतात. बहुतेक त्यांच्या डोक्यांत अजुन ते प्रकरण (‘Dustbin’) घुसलेले नसावे.
कदाचित तसे नसावे सुद्धा. त्यांनी ह्या वयाबरोबर त्याचे होणारे परिणाम आनंदाने स्वीकारले असावेत. (accept केले असावेत) आणि त्यांच्याशी तडजोड करुन ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असावेत. पण मला कुसुमताईंचे वाक्य ऐकून भिती कां वाटली? हा माझ्या मनाचा खेळ तर नाही ना?
‘साठी’ ह्या शब्दाची माणसाला भिती वाटते हे तर सत्यच आहे. कारण ह्या पुढे आपल्याजवळ फार मोठा कालावधी जगण्यासाठी राहिला नाही. ह्याची पहिल्यांदा जाणीव होते.
कदाचित असे असेल कां की आयुष्याच्या कर्तव्याचा काळ संपलेला असतो. जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. मुलाबाळांची शिक्षण संपलेली असतात. ते ही आपल्या उद्योगधंद्याला लागलेले असतात, मुलीबाळींची लग्न उरकलेली असतात. घरांतली मोठी माणसे (बऱ्याच अंशी) ह्या जगाचा निरोप घेवून गेलेली असतात. त्यामुळे मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या मागे फिरणारे आपल्या आयुष्याचे रहाटगाडगे एकदम Break ( ब्रेक) लागल्यासारखे उभे रहाते. घरांत बोलणारी माणसे ही कमी होतात आणि आपल्याजवळ वेळच वेळ असतो.
आयुष्य एखाद्या झपाटलेल्या वेगाने कुठल्या कुठे पळून पुढे आले आहे ह्याची जाणीव होते. हाच ‘साठी’ ह्या शब्दाचा अर्थ की काय?
आणि जर कां हे पुढचे आयुष्य ‘ Dustbin’ होवू नये असे वाटत असेल तर प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. एकतर आपले ‘आरोग्य’ आणि दुसरे आपले ‘विचार’
आरोग्य टिकविण्यासाठी ‘व्यायाम’ आणि ‘औषधे’ ह्यांची मदत तर लागणारच आणि ति स्वीकारण्याची तयारी पाहिजेच.
अलिकडे माझा दुखणारा गुडघा बघून नवरा आणि मुलगा चार महिन्यांपासून ओरडत होते डॉ. कडे जा. पण माझेच आपले, “जाउ दे रे वयोमानाप्रमाणे हे होणारच” असे उत्तर होते. पण आता मात्र नाही. डॉ. कडे जाऊन औषधे घेण्याचे नक्की केले. कारण मला ‘Dustbin’ व्हायचे नाही.
काल-परवाच एक बाई भेटल्या होत्या, बिचाऱ्या वयाने बऱ्याच मोठ्या आहेत. ऐंशीच्या आसपास असतील. त्या म्हणत होत्या, “अलिकडे शरीराची हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे पेशींचा व्यायाम होत नाही. फार चालणे शक्य होत नाही. म्हणून थोडी थोडी चालत इथे ‘Laughing Club’ ला येते तेवढाही व्यायाम मला भरपूर होतो. आणि सगळ्या वयांची वेगळी-वेगळी माणसे भेटतात. जरा आपले विचार ही बदलतात. ‘कौतुकाने सांगत होत्या’ आपले विचार तरुण पाहिजेत. तर आपण सुद्धा तरुण रहातो. नव्या पिढी बरोबर जगू शकतो. एक साधी गोष्ट बघा, आजकाल सुन येईल पॅन्ट घालून आणि तुम्ही म्हणाल आम्ही अजूनही मोठ्यांसमोर डोक्यावर पदर घेतो. आम्ही असे कधी वागलो नाही. तर पुढची पिढी म्हणेल. ” ही म्हातारी नको रे बाबा.” असे होउ नये अशी इच्छा असेल तर जगाबरोबर चालावेच लागेल.
मागच्या शनिवारी क्लबमध्ये तंबोला खेळण्यासाठी गेलो होतो. Mrs. Bhatia अगदी कौतुकाने निशा वहिनींना म्हणत होत्या, “अच्छी बात है, आजकाल आप शाम के टाईम गरीब बच्चों को पढाने evening school में जा रही हो नां, बहुत ही बढ़िया काम कर रही है । आपका टाईम भी निकलता है और बच्चे भी सीख रहे है । ”

खरोखरीच, निशा वहिनींनी वयाच्या पासष्ठ वर्षानंतर हे काम चालू केले आहे. आणि त्यांच्या रहाणीमानापासून प्रत्येक गोष्टित फरक पडला आहे. त्या एकदम Confident आणि समाधानी दिसतात आणि इतर लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. त्यांच्या ‘संध्याकाळ’ ला खरोखरीच अर्थ आला आहे.
कित्येक वयस्कर मंडळी नातवंडाना शाळेत घेऊन जातात. शाळेतून घरी घेऊन येतात. आजी लोक त्यांच्यासाठी आवडीचे पदार्थ करतात अशी काम करत असतातच. अनेक वयस्कर मंडळी तर समाजासाठी शक्य होईल ते चांगले काम करुन ‘Back to Society’ ह्या तत्त्वावर जगतांना दिसतात. अशा अनेक चांगल्या गोष्टी बघून साठीनंतर आपण आपले आयुष्य चांगले करु शकतो ह्याचा दिलासा मिळतो. ह्याबरोबर जर आपण नविन विचारांनाही अंगीकृत करु शकलो तर आपले वय ‘साठ’ नंतर ‘एकोणसाठ – अठ्ठावन्न – सत्तावन’ असे descending order मध्ये वाढेल नाहीतर ‘साठ’ नंतर direct सत्तरीच येईल.
विचार करता करता न कळत आयुष्याच्या भूतकाळात निघून गेले आणि लक्षांत आले की आयुष्य जगण्याच्या धावपळीत कित्येक चांगले वाईट क्षण किंवा संधी आपल्या हातून सुटून गेलेल्या आहेत. निसटून गेलेले क्षण तर परत मिळविणे दुर्मिळच आहे. त्या क्षणांची आठवण काढून तडजोड आपण आजपर्यंत केलेलीच आहे. मग आता एवढा मोकळा वेळ जर आपल्याकडे ह्या पुढे असेल तर त्यातील काही गोष्टी परत मिळविण्याचा थोडासा प्रयत्न कां नाही करायचा? कित्येक मंडळी ह्या वयांत गाणी म्हणायला शिकतांना दिसतात, काही पेंटिंग शिकताना दिसतात, कोणी समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतांना आढळून येते. ह्याचे कारण बहुतेक ‘Dustbin’ न होणे हेच असावे. खरोखरीच ‘रिकामटेकडे’ आयुष्य किंवा कुठल्याही ‘ध्येया’ शिवायचे आयुष्य हे भरकटलेले असते.
नकळत आयुष्याच्या जमाखर्चाचा हिशोब लावण्याचा मी प्रयत्न करत होते. आयुष्याची खरी किंमत कळण्यासाठी खूप ‘टप्पेटोणपे’ खाल्ले होते. जीवनाचे नाट्य समजावून घेणे फार कठिण आहे. तिथे आनंद आहे आणि दूःखही आहे. मन आनंदाच्या क्षणी सुद्धा नको त्या ठिकाणी भरकटत जाते. काळजी करत रहाते. दिलखुलास मनाने आनंदही अनुभवु शकले नाही ह्याची खंत वाटते. खरे तर मन आनंदाचे वेध घेणारे असेल तरच ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चहूकडे’ अशी अनुभुती येईल.
ही सगळी आनंदाने जगणारी वयस्कर मंडळी बघून असे वाटते ह्यांनी स्वतःला ह्या आनंदयात्रेत सामावुन घेतले आहे. ती ह्या आनंद यात्रेत रमलेली आहेत. त्यांच्याकडचा हा दुर्मिळ गुण अगदी घेण्यासारखा आहे.
त्याच्या नशिबात दुःख नाही असे नाही. कोणी काठी घेवून चालत आहे. तर कोणाला ह्या आयुष्याचा अर्ध्या वाटेवर त्यांचा साथीदार सोडून निघून गेला आहे, कोणाची मुलेबाळे परदेशी आहेत, कोणाकडे नोकर चाकर ठेवायला पैसे नाहीत, तर कोणाला व्याधींनी ग्रस्त केले आहे, तरीही त्या सगळ्यांना बरोबर घेवून आपली यात्रा ही मंडळी पूर्ण करत आहेत. कोणाच्या आधाराची जरुरी असली तरी कोणाला त्रास न देता स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही माणसे सकारात्मक विचारांच्या लहरी ह्या आसमंतात फेकत जगताहेत. त्यांच्या सहवासात येणारा त्यांचा दुसरा साथीदारही त्यांच्या सारखाच आशावादी होतो.
आणि मला उगीचच स्वतःची लाज वाटली. आपण आयुष्यातल्या कमी शोधत राहिलो ह्याचे वाईट वाटले. ह्या सर्व वयस्कर मंडळीकडे बघून दुःखाला ओझे न समझता, ते जगण्याचा एक भाग म्हणून स्वतः जवळ बाळगण्याचा, वेगळाच विचार करण्याचा दृष्टिकोन मिळाला.
अरे, पण ह्या ‘साठी’ बद्दल सारखा नकारात्मक विचाराच कां करायचा? आता ह्या पुढे जेव्हा पण बाहेरगांची प्रवासाला जाणे होइल तेव्हा तर खूप मोठा फायदा होणार आहे. हे तर मी विसरलेच. रेल्वेची तिकिट तर ५०% कमी पडणार आहे. Senior Citizen झाल्याच्या फायदा त्यामुळे आता पहिल्या वर्गानेच प्रवास करणे होणार. ह्या वर्षीपासून बँकेस १% व्याज पण जास्त मिळेल. कुठे पण रांगेत उभे राहणे नाही. Senior Citizen ची रांग वेगळी. आहे ना गंमत?
आणि रिकाम्या वेळेचा फायदा करुन थोडी समाजसेवा करीन गाणे शिकीन मग माझ्याकडे वेळच कुठे आहे? की माझे काय दुखते हे बघण्यासाठी, आणि कोणी Dustbin म्हणते हे ऐकण्यासाठी.
आणि म्हणुनच रात्री काळ्याकुट्ट अंधारात दूरवरच्या लाईटच्या उजेडात आशेचा किरण दिसला होता की काय!….

Author