रुखरुख

आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
मागच्याच मंगळवारी सकाळी दूध घेऊन येताना तो गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता.



आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
मागच्याच मंगळवारी सकाळी दूध घेऊन येताना तो गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. जोरात ब्रेक मारून गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन त्याला खूप ओरडले होते.
“कळत नाही का रे? एवढी गाडी समोरुन येत आहे जोरात हॉर्न वाजतोय, तुला ऐकायला नाही आले? असे गाडी समोर येतात आणि मग तुमचे आई वडिल याचे भांडवल करुन आमच्या सारख्या माणसांकडून पैसे काढतात. कोण आहे मोठे तुझ्याबरोबर? बोलव इकडे.
मी इतके सगळे बोलले. पण एक नाही की दोन नाही. तो आपला निर्विकारपणे माझ्याकडे बघत होता. जशी काही मी अगदी मुर्ख. मी जे काही बोलते आहे त्याच्याशी त्याचा काही संबंधच नाही. मला अतिशय राग आला. काहीतरी बडबड करत गाडी चालू करुन घरी आले. डोक्यात राग तसाच होता. चहा केला, चहा घेता घेता माझी आपली बडबड चालूच होती. “आज नशीब चांगलं होतं. तो मुलगा वाचला नाहीतर सकाळी सकाळी पोलीस चौकीत जायची वेळ होती.” समोर पेपर पडला होता. तो वाचायला घेतला आणि वाचता वाचता जरा राग ही शांत झाला आणि सगळा प्रकार विसरूनही गेले. नंतर पूजा करताना मला त्याचा तो निरागस शांत, माझ्याकडे बघणारा चेहरा आठवला.
सात आठ वर्षाचाच असेल तो. लांब, फाटका तुटका कोणीतरी दिलेला जुना कोट अंगात घातला होता. पायात पायजमा होता पण तो ही मापाचा नसावा. खाली खूप दुमडून दुमडून त्याने तो स्वतःच्या उंचीचा केलेला होता. पायात चप्पलही नव्हती. लांब वाढलेले काळेभोर केस. त्याला कित्येक महिन्यात तेलही लावलेले नसावे त्यामुळे ते राठ दिसत होते. शेंबडाने भरलेले नाक, सावळा रंग आणि त्याच्या उंचीपेक्षाही जास्त लांब वाटणारे पाठीवर टाकलेले सिमेंटचे पांढऱ्या रंगाचे पोते कचऱ्याने, प्लॅस्टिकच्या तुटक्या फुटक्या बाटल्यांनी भरलेले होते. असा तो निर्विकार चेहऱ्याचा मुलगा मला आठवला आणि काळजात एकदम चर्र झाले.
असे वाटले अरे हा एवढासा चिमुरडा इतक्या थंडीत कचरा गोळा करत फिरत होता. दिवसही पूर्ण उगवला नव्हता थोड्याशा अंधारातच कसलीही भीती न बाळगता तो आपल्या आई वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करत असावा. मी इतके बोलले आरडा ओरडा ही केला पण “त्याला आई बाबा तरी असतील का?”
मला गाडीत बसून हिटर चालू ठेवून अंगात स्वेटर घालून बाहेरच्या थंडीची कल्पनाही नव्हती आणि हा इतक्या थंडीत मात्र सकाळी, सकाळी कानटोपीही न घालता अनवाणी फिरून कचऱ्यातून काहीतरी शोधून दोन पैसे मिळतील का ते पहात होता.
कदाचित त्याने माझी समोरुन येणारी गाडी पाहिलीही असेल, हॉर्न ऐकलाही असेल. पण रस्त्यापलीकडे समोर पडलेला कचरा त्याला जास्त महत्वाचा वाटला असेल. कदाचित त्यामध्ये त्याला त्या दिवसाची रोजी रोटीही दिसली असेल.
त्या चिमुरड्या पावलांना ‘अरे गाडी आहे, थांब’ असा त्याच्या मेंदूचा संदेशही ऐकू आला नसेल. असे नको नको ते विचार मनात येऊन माझे मन खूप बैचेन झाले. आपण आपल्या मुलांना किती जपतो. अरे स्वेटर घाला, बूट घाला, डोक्याला टोपी घाला आणि या बिचाऱ्याला असे सांगायला तरी कोणी असेल का?
चपलात पावलांना जाणवणारी ऊब, डोक्यातल्या टोपीने कानांना जाणवणारा गरमपणा कसा असतो याची त्याला कल्पना तरी असेल का? असे अनेक विचार मनाला शिवून गेले आणि मला स्वतःचीच लाज वाटली.
तेव्हापासून मला सारखे जाणवते आहे की म्हणूनच तो माझ्याकडे बघत असेल आणि कदाचित तो असाही विचार करत असेल की ‘काय मूर्ख बाई आहे मला काय वेड लागले आहे की मी गाडीसमोर पळतोय? हिला दिसत नसेल की समोरच्या एवढ्या काचेच्या बाटल्या मी उचलल्या तर मला आज पैसे मिळतील’ आणि मन अगदी खिन्न झाले असे वाटते की त्याला एकदा तरी ‘सॉरी’ म्हणावे. पण तो मला परत दिसलाच नाही. आजही त्या रस्त्यावरुन जाताना माझे डोळे त्याला शोधतात.. मनात एक ‘रुखरूख राहिली.

Author