“बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार !” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. असे असून सुद्धा काही अपवादात्मक अनुभव येतात हेही खरे आणि इथे तर पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.
मी, माझी बायको, मुलगी आणि आमचा मोटार चालक असे चार जण आमच्या गाडीने काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्याहून ठाण्याला चाललो होतो. दुपारची वेळ होती कारण संध्याकाळी पोहोचायचे होते. बोरघाटातून [विषेतः अमृतांजन बोगद्याच्या वळणावर] कुठलाही वाहतूक खोळंबा न होता विनासायास खाली खोपोलीला पोहोचलो.
घाट उतरल्यावर मनावरील एक अनामिक दडपण आपोआपच कमी होते. काहीवेळा कानात बसलेले दडे पण सुटतात. लगेचच येणाऱ्या दत्त धाब्यावर नित्य नियमाप्रमाणे हसत खेळत चहा आणि नाश्ता झाला. स्वच्छतागृहाची भेट झाली. आता फारतर दीड तासात वेळेवर ठाण्याला पोहोचणार आणि सगे सोयरे पुनः एकदा भेटणार या विचाराने खुशीत होतो.
पुढे ऐरोलीपर्यन्तचा प्रवास गप्पा मारत मारत अगदी मजेत झाला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हवालदाराने अचानक आम्हाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. वेळ भर उन्हाची होती. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केल्यावर, हवालदाराने गाडीच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. मी रीतसरपणे सर्व कागदपत्रांचा गठ्ठा त्याच्याकडे सुपूर्द केला. चिंता करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते.
अचानक त्या हवालदाराचा चेहरा उजळला आणि माझ्या पोटात धस्स झाले. त्याने माझ्या चालकाचे लायसेन्स [चालक परवाना] मागून घेतले आणि खिशात ठेवले. “साहेब, हे काय, प्रदूषण परवान्याची [PUC] मुदत संपली आहे.” मला तर अगदी आत्ता आत्ता PUC केल्यासारखे वाटत होते. काही वेळा दिवस कसे चटकन सरतात याचा अनुभव आला, कारण PUC ची मुदत खरोखरच चार दिवसांपूर्वी संपली होती. मी जरा ओशाळे हसत विनंती केली, “जाउदे ना साहेब, चुकून विसरलो आहे. आत्तापर्यंत असे कधी झाले नाही. आज जरा ठाण्याला पोहोचायची घाई आहे. पुढे गेल्यावर लगेच PUC करून घेतो.”
त्याचे निर्विकार उत्तर आले, “PUC न करणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला ८०० रु दंड पडेल.” चूक माझी होती. मी ८०० रु काढून त्याला विनंती केली की ही दंडाची रक्कम घ्या, त्याची पावती आणि चालकाचे लायसेन्स परत द्या म्हणजे आम्ही पुढे जायला मोकळे होऊ.”
त्यापेक्षा साहेंब असे कराना. मला ५०० रु तसेच द्या आणि निघा. हा प्रकार मला जराही मान्य नसल्याने, मी त्याला पुन्हा विनंती केली की चूक माझी आहे. तरी योग्य तो दंड घेउन मला कृपया पावती द्या आणि मोकळे करा.
“ साहेब, पावती पुस्तक इथे नाही आहे. ८०० रु कमविण्यासाठी तुम्हालापण खूप कष्ट करावे लागतात. त्यापेक्षा निदान ४०० रु देऊन मिटवा आणि जा. तुम्हाला घाई पण आहे ” मागे नजर टाकत त्याने मला सुनावले. आमच्या गाडीतील महिला समाज तिरक्या कटाक्षातून लवकर निघण्याची अपेक्षा करत होता आणि चालक गोंधळून हा सर्व प्रकार हताशपणे बघत होता.
माझ्या प्रथमच लक्षात आले की मागच्या बाजूस साधारण १५ ते २० मीटर अंतरावर झाडाच्या सावलीत, एका बुलेट गाडीवर गुढगा टेकून रेबॅन या कंपनीचा काळा चष्मा लावून एक इन्स्पेक्टर टेचात उभा आहे. या लोकांच्या चेहेऱ्यावरील भावामध्ये आणि देहबोलीत एक प्रकारचा दरारा ओसंडून वहात असतो. मी त्याच्यापर्यंत चालत जावून पुन्हा एकदा पैसे घेवून पावती देण्याची विनंती केली. त्याला हे ही सांगितले की मी लाच दिल्यास मला शांत झोप लागणार नाही.
काळ्या काचेतून गालात हसत हसत त्याने मला सांगितले की पावती पुस्तक येथे नाही. येथून जवळच ४ किलोमीटर अंतरावर ऐरोली पोलीस स्थानक आहे. तेथे जाऊन दंड भरा आणि मग चालकाचे लायसेन्स परत मिळेल. थोडक्यात काय माझी सत्व परीक्षा घेत होते.
आम्ही होतो तेथून ऐरोली पोलीस चौकी काही अंतरावर असल्याने आणखी अर्धा तास वाया जाणार हे नक्की होते. तरी पण नाईलाजाने आमची वरात ऐरोली पोलीस चौकीवर पोहोचली. तेथे एक पोलीस खूप उकडत असल्याने, नुसत्या बनिअनवर पंख्याखाली दात कोरत बसला होता.
मी त्याला कशाकरता आलो आहे ते सांगितले आणि ८०० रु पुढे केले. तो माझ्याकडे कुठलातरी विचित्र प्राणी बघितल्यासारखा बघत राहिला. पुन्हा तोच सल्ला. “साहेब, ४०० रुपयात मिटवून टाकाना.” पुन्हा एकदा मी माझा मनःशांती आणि झोपेचा प्रोब्लेम त्याला सांगितला.
मी बाहेर उन्हात उभा. गाडीतील महिलांची चुळबुळ सुरु झालेली. अजून थोडावेळ अळमटळम केल्यावर आणि मी बधत नाही हे लक्षात आल्यावर, अचानक त्याचे हावभाव बदलले. अत्यंत नम्र आवाजात मला म्हणाला, “साहेब, कस सांगू पण तुम्हाला दंड करणे माझ्या जीवावर आले आहे. पण गुन्हा झाला आहे म्हणून मी १०० रु ची पावती करतो. अहो रोज दिवसभर आमचा संबंध फक्त लाच देवून स्वस्तात व्यवहार मिटवणाऱ्याशी येतो. तुमच्यासारखे फार विरळ. आज रात्री घरी गेल्यावर घरच्यांना सांगायला एक चांगला अनुभव मिळाला. अहो, आमच्या कामात घरी सांगण्यासारखे फार विरळा घडते.”
मी शंका व्यक्त केली,” तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण तिकडे रस्त्यावरच्या तुमच्या इन्स्पेक्टरला ते पटेल ना? माझ्या चालकाचा लायसेन्स त्यांनी काढून घेतला आहे. तो परत देतील ना?” त्याने मग हसत हसत साहेबांना फोन करून काय झालेय ते सांगितले आणि मला सोडायला स्वतः गाडी पर्यंत आला.
पुन्हा आमची वारी हायवे वर आली. मी घाबरत घाबरत इन्स्पेक्टरला दंडाची पावती दाखवली. पण आता नूर एकदम बदलला होता. काळा चष्मा खिशाला लावून दिलखुलास पणे हसत त्याने मला आमच्या चालकाचा लायसेन्स परत दिला. मला म्हणाला, “भेटून फार आनंद झाला. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी. बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार! ”
मी जाऊद्याहो असे काहीतरी मोघम बोलत निघालो तेव्हा त्याने चक्क मला खाडकन सलाम केला. यानंतरही बऱ्याच वेळा पोलिसांच्या चांगुलपणाचे अनुभव आले पण हा सलाम पहिलावहिला असल्याने, त्याचीच ही गोष्ट.
माझा चालक आदराने तर आमचा महिला समाज कौतुकाने माझ्याकडे बघत होता आणि मी लोकांच्या हृदयातील लपलेल्या झऱ्याच्या ओघात चिंब झालो होतो.
बरेचशे नातेसंबंध खोटे बोलल्याने बिघडत नाहीत तर नको तेथे खरे बोलण्याने बिघडतात.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/