
लेखक दत्तु बांदेकर यांनी मनोहर दिवाळी अंक, १९५१ मध्ये लिहिलेला हा लेख व्यास प्रतिभा दिवाळी २०१५ मध्ये पुनर्प्रकाशित झाला. त्यामधून साभार.
तुम्हाला आठवत नाही का?- त्या दिवशी ज्या गाडीने तुम्ही प्रवास केलात त्याच गाडीत स्वरूपसुंदर सिनेनटी कुंदाबाला, नायक मदनकुमार, खलनायक मास्टर कलंदर आणि दिग्दर्शक महाशय ही मंडळी होती. तुमचे स्टेशन येताच आपल्या नेहमीच्या गडबडीत तुम्ही गाडीतून झटपट उतरून गेलात. पण त्या चौघांनी प्रवासात कायकाय केले याविषयीचे तुमचे कुतूहल अतृप्तच राहिले होते ना? ते आता तृप्त करून घ्या कसे!
एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे.
पुणे स्टेशन –
गाडी सुटण्याची वेळ. प्लॅटफॉर्मवर हमालांची आणि उतारूंची धावपळ चालली आहे. चित्रपटाची मुख्य नायिका कुंदाबाला गिरक्या घेतघेत प्लॅटफॉर्मवर येते. दिग्दर्शक ‘शूट’ म्हणून ओरडतो. कॅमेऱ्याची हालचाल होते. कुंदाबाला अल्लडपणे नाचत एका डब्यात शिरते. गाडी चालू होते. चालत्या गाडीत तो एक गाणे म्हणतो. एक पंजाबी प्रवासी आपला ढोल वाजवतो; दिग्दर्शक हा ‘सीन’ घेऊन मोकळा होतो.
शिवाजीनगर –
या स्टेशनवर चित्रपटाचा नायक मदनकुमार प्रवेश करतो. त्याच्या एका हातात टेनिस रॅकेट व दुसऱ्या हातात सिगरेटचा डबा असतो. ज्या डब्यात नायिका बसली आहे, त्याच डब्यात तो शिरतो. दोघांची नजरानजर होते. प्रथम दृष्टीतच दोघांनाही ‘कसेसेच’ होऊ लागते. नायिकेच्या गालावर प्रवयाचा गुलाबी रंग चढतो. गाडी चालू होते. गाडीच्या वेगाबरोबर प्रेमाचा वेगही वाढू लागतो. नायक आणि नायिका यांच्यामध्ये चोरटे कटाक्ष सुरू होतात. डब्यातल्या इतर उतारूंमध्ये काही संवाद चालू होतात. दिग्दर्शक या दृश्याचे शूटिंग घेतो.
खडकी –
गाडी खडकी स्टेशनवर येऊन पोचेपर्यंत नायक आणि नायिका ही दोघे एकमेकांना बिलगून बसलेली असतात. या ठिकाणी काही ‘आऊट-डोअर’ दृश्ये घ्यावयाची असल्याकारणाने सर्वांना खाली उतरावे लागते. खडकी येथील लष्करी छावण्या व सैनिकांची परेड यांचे चित्रीकरण होते. नायक मदनकुमार आणि नायिका कुंदाबाला यांना लष्करी गणवेश देण्यात येतो. नतंर बँडच्या चालीवर एक स्फूर्तीदायक कोरस गीत घेण्यात येते. या गाण्यात भारतीय संस्कृती, शौर्य, बलिदान, स्वातंत्र्य, अशोकचक्र, आझादीचा झेंडा वगैरे बरेच शब्द असतात. शूटिंग संपल्यावर सर्व मंडळी पुन्हा गाडीत जाऊन बसतात.
चिंचवड –
गाडी चिंचवड स्टेशनवर येऊन थांबते. तेव्हा एक भिकारी गाणे म्हणत डब्यात भीक मागत असतो. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील दैन्य, अंगातील फाटके कपडे आणि तो म्हणत असलेले करुणरसपूर्ण गाणे सर्वच काही हृदयाला पीळ पाडणारे असते. बोलपटात भिकाऱ्याच्या एका गाण्याची भर पडते.
तळेगाव-
एक नवीन पात्र तळेगाव स्टेशनवर दाखल होते. चित्रपटाचा खलपुरुष मास्टर कलंदर गाडी पकडण्यासाठी आवेशाने धावत येतो. त्याचे पिंजारलेले केस, क्रूर मुद्रा आणि खुनशी नजर जातीवंत बदमाशाला शोभण्यासारखीच आहे. नायक आणि नायिका यांच्या डब्यात घुसण्याचा तो प्रयत्न करतो. पण डब्यात बेसुमार गर्दी असल्यामुळे त्याला आत शिरकाव करून घेणे अशक्य होते; तरीपण त्याची धडपड चालू असते, त्याला बाहेर ढकलून देण्यासाठी नायक मदनकुमार मूठ आवळून उठतो. दोघांमध्ये झटापट सुरू होते. नायक आणि खलनायक एकमेकांना ठोसे हाणतात. जंगी मारपीट सुरू होते. नायिका कुंदाबाला भीतीने किंकाळी फोडते. डब्यातले प्रेक्षक ळ्या आणि शिट्या वाजवतात. आगगाडीची कर्कश शीळ त्या भयानक वातावरणात भर घालते, अशा रीतीने बोलपटाला आवश्यक असा खळबळजनक स्टंट-प्रसंग तयार होतो.
वडगाव –
आगगाडी वडगाव स्टेशनवर येईपर्यंत नायक आणि खलनायक यांची मारपीट चालूच असते. पण वडगाव स्टेशनवर पुन्हा ‘आऊट डोअर’साठी सर्वांना बाहेर पडावे लागते. वडगाव येथे राधा वडगावकरीण हिचा संगीत तमाशा चाललेला असतो. ढंगदार लावणीचे सूर ऐकू येतात. राधा वडगावकरणीची मस्त जवानी आणि दिलखेचक नाचकाम अतिशय प्रेक्षणीय असते. हा तमाशा म्हणजे बोलपटाचे एक मोठेच आकर्षण होय. तमाशाचे शूटिंग संपवून दिग्दर्शक गाडी पकडण्यासाठी स्टेशनच्या दिशेने धावतो. पण इतक्यात त्याला आणखी एक ‘सीन’ घ्यावा लागतो. खलपुरुष मास्टर कलंदर याने तमाशेवाल्या बाईची टिंगल केल्यामुळे थोडी बाचाबाची चाललेली असते. नायक मदनकुमार कलंदरच्या थोबाडीत मारतो. नायक आणि खलनायक यांच्यात पुन्हा मारामारी जुंपते. तमाशाच्या शेवटी मारामारी असणे हे कलेच्या आणि वास्तवतेच्या दृष्टीने योग्यच आहे असे वाटल्यामुळे दिग्दर्शक या दृश्याचेही शूटिंग सुरू करतो.
कामशेत –
भर वेगाने चाललेली गाडी कामशेतला थांबताच दिग्दर्शकाच्या डोक्यात मराठ्यांचा अितिहास घोळू लागतो. कामशेत ही रियासतकार सरदेसाओ यांची कर्मभूमी असल्यामुळे दिग्दर्शकाला इतिहासाची आठवण होणे स्वाभाविक होय. म्हणून तो बाजीराव-मस्तानीचा एक अफलातून ‘डान्स’ घेण्याचा विचार करतो. नायकाला बाजीरावांचा आणि नायिकेला मस्तानीचा वेष देण्यात येतो. या प्रेमी जोडप्याचे ऐतिहासिक नृत्य सुरू होते. मस्तानीचा नाजूक हावभाव आणि बाजीरावाची मर्दानी ऐट फारच शोभून दिसते. नृत्याच्या शेवटी बाजीराव मस्तानीला घोड्यावर घालून स्टेशनच्या दिशेने दौडत जातो.
मळवली –
आत्तापर्यंत बोलपटाचे काम समाधानकारक चालले आहे. या आनंदात दिग्दर्शक फराळाचा डबा काढतो आणि मुख्य नटीबरोबर नास्ता करतो. पण बोलपटात अजून ग्रामीण देखावे आले नाहीत याची त्याला आठवण होते. शेतकऱ्यांच्या चित्रणाशिवाय बोलपट सर्वत्र लोकप्रिय होणार नाही म्हणून ही उणीव भरून काढण्यासाठी ते मळवली स्टेशनवर उतरतात. या ठिकाणी बैल, नांगर, मोट, खेडूत स्त्रिया, भाजीपाल्यांचे मळे इत्यादि विविध दृश्ये घेण्यात येतात.
लोणावळा –
नायिका कुंदाबाला हिचा श्रीमंत बाप लोणावळा येथे हवा खाण्यासाठी आलेला असतो. एका टुमदार बंगल्यात त्याचे वास्तव्य असते. कुंदाबाला आपल्या पिताजींना भेटण्यासाठी त्या बंगल्यात जाते, पण त्या ठिकाणी तिच्या लग्नाच्या वाटाघाटी चाललेल्या असतात. कुंदाबालेचे लग्न एका धनिक पुत्राबरोबर करण्याचे घाटत असते. हा प्रकार पाहून कुंदाबालेला भयंकर धक्का बसतो. तिला आपल्या आगगाडीतल्या वल्लभाची आठवण होते. पुणे स्टेशन सोडल्यापासून आगगाडीत घडलेल्या प्रणयप्रसंगाचे ती चिंतन करते. आपल्या लाडक्या मदनकुमाराचा फोटो पोलक्याच्या खिशातून काढून ती अश्रू ढाळते. वडील तिला धमकी देतात. या प्रसंगी काही संवाद होतात. वडील हट्टाला पेटतात आणि कुंदाबालेचे लग्न धनिक पुत्राबरोबरच करण्याचे ठरवून लग्नाची तयारीही करतात. कुंदाबाला हताशपणे बाहेर बागेत येऊन एक विरहगीत म्हणते. तिचे शोकगीत ऐकून नायक मदनकुमार हळूच त्या ठिकाणी येतो. कुंदाबाला, ‘जा मला विसरा’ एवढेच शब्द बोलून मूर्च्छित पडते. मदनकुमार जड पावलांनी परत स्टेशनकडे जातो. काही वेळाने शूटिंग संपल्यानंतर कुंदाबालाही आगगाडीत येऊन बसते.
खंडाळा –
आगगाडी खंडाळ्याला येताच निसर्गाचे काही ‘शॉटस्’ घेण्याची इच्छा दिग्दर्शकाला होते. खंडाळ्याच्या रमणीय वनश्रीचे विविध देखावे चित्रित करण्यात येतात. नायक आणि नायिका यांना प्रेम करण्यास हे स्थळ फारच अनुकूल असते. निसर्गशोभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे प्रेमाचे स्वैर चाळे सुरू होतात. बोलपट ‘हिट्’ होण्याच्या दृष्टीने हा रोमान्स आवश्यक असतो. दिग्दर्शक त्यांना वेगवेगळ्या ‘पोज’मध्ये प्रेम करण्यास सांगतो आणि आपले सारे कौशल्य खर्च करून शूटिंग करतो. खंडाळ्याच्या डोंगरावर नायक आणि नायिका खूपच रंग उडवितात. ती दोघे टेकडीवरून धावतात. खोल दरीत पडतात आणि कुंजात जाऊत दडतात. शेवटी एका शिलाखंडावर बसून दोघेही प्रीतीचे द्वंद्वगीत म्हणतात. इष्काची लयलूट दाखविणारा हा सीन झाल्यावर सर्वजण परत आगगाडीत जाऊन बसतात.
कर्जत –
नायिकेला फारच भूक लागलेली असते म्हणून नायक कर्जत स्टेशनवर चिवडा विकत घेण्यासाठी खाली उतरतो. ही संधी साधून खलनायक मास्टर कलंदर हा कुंदाबालेच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्याशी लगट करतो. कुंदाबाला, ‘धावा! धावा!’ म्हणून ओरडते. चिवड्याचा पुडा घेऊन मदनकुमार धावत येतो. पुन्हा नायक आणि खलनायक यांच्यात जोरदार हाणामारी होते. गाडी चालू झाली तरी मारामारी थांबत नाही. मास्टर कलंदर दातओठ खाऊन मदनकुमाराचा गळा पकडतो व त्याला उचलून बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकून देतो. कुंदाबाला एक आर्त किंकाळी फोडते. कलंदर विकट हास्य करतो. इतक्यात मदनकुमार पुन्हा धावत येतो आणि चालत्या गाडीत उडी ठोकतो. कलंदरला एक ठोसा हाणून तो त्याला चीत करतो. कुंदाबालेला आनंद होतो. ती आपल्या विजयी प्रियकराकडे कौतुकाने पाहतो. या स्टंट प्रसंगाचे शूटिंग आटोपल्यावर सर्वजण शांतपणे चिवडा खावयास बसतात.
नेरळ –
सुदैवाने नेरळ येथे जत्रा चालू असते. त्यामुळे जत्रेची विविध दृश्ये घेण्याची संधी दिग्दर्शकाला मिळते. आयताच ‘मॉब सीन’ मिळतो. कुस्त्यांचे फड, पोवाडे, करमणुकीचे विविध प्रकार यांची बोलपटात भरती होते.
बदलापूर –
बदलापूर स्टेशनवर चाकू, सुऱ्या विकणाऱ्या बलुची स्त्रियांचा एक दिलखेचक डान्स घेण्यात येतो. बोलपटात नृत्य-संगीताची रेलचेल असावी आणि वैचित्र्यही असावे म्हणून ही खास योजना आहे.
अंबरनाथ –
येथील आगपेट्यांच्या कारखान्यात कामगारांचा मेळावा दिसतो. नायक आणि नायिका मजूर वस्तीत हिंडून येतात. कामगारांपुढे दारूबंदीचा एक पोवाडा म्हणण्यात येतो. बोलपटात थोडा सरकारी प्रचार आणि राष्ट्रहिताचाही विचार असणे आवश्यक आहे.
कल्याण –
कल्याण स्टेशनवर दिग्दर्शकाला निर्वासितांच्या छावणीची आठवण होते. एका निर्वासित सुंदरीची करूण विलापिका बोलपटात कोंबण्यात येते. त्याचप्रमाणे हाजी मलंगच्या एका फकीराचेही दर्शन बोलपटात घडते. भाविक प्रेक्षकांच्या दृष्टीने बोलपटात एक तरी साधू किंवा फकीर पाहिजेच.
डोंबिवली –
आगगाडी डोंबिवली स्टेशनवर मुक्काम ठोकते. तेवढ्या वेळात नायक आणि नायिका डोंबिवलीच्या गोशाळेला भेट देऊन येतात. दिग्दर्शक गोमातेचे ‘क्लोज-अप्’ घेतात. राष्ट्रासाठी गायीचे आणि बैलांचे रक्षण करण्याचा आदेश नायक देतो.
मुंब्रा-
मुंब्रा स्टेशनवर नायिकेच्या गळ्यातील मोत्याचा कंठा चोरीस जातो. मग भराभर चोर, पोलीस, कोर्ट, तुरुंग यांचे देखावे घेतले जातात.
ठाणे –
वेड्याच्या इस्पितळातील काही दृश्ये घेतली जातात. चित्रपटात विनोद निर्माण होण्यासाठी हे देखावे पुढे एडिटिंगच्या वेळी उपयोगी पडतील, अशी यात दिग्दर्शकाची दूरदृष्टी असते.
दादर-
सिनेमानटींची अमरपुरी म्हणून ख्यातनाम असलेल्या दादर स्टेशनवर गाडी थांबताच दिग्दर्शकाला खूपच अवसान चढते. या ठिकाणी रंगीबेरंगी एक्स्ट्रा नटींचा एक सामुदायिक डान्स शूट करण्यात दिग्दर्शक गढून जातो. डान्स संपल्यानंतर पावसाची एक जोरदार सर येते. मुख्य नटी भिजून चिंब होते. अशा रीतीने ओलेतीचेही मस्त दृश्य बोलपटाला मिळते.
बोरीबंदर –
आता बोलपट संपण्याची वेळ आली आहे. बोरीबंदर स्टेशन येताच नायक आणि नायिका हातात हात घालून गाडीतून उतरतात. त्यांच्या डोक्याला ताबडतोब मुंडावळ्या बांधण्यात येतात आणि प्लॅटफॉर्मवरच उभ्या असलेल्या एका भटजीच्या हस्ते लग्नविधी उरकरण्यात येतो.
अशा रीतीने पुणे स्टेशनवर सुरू झालेला बोलपट बोरीबंदर स्टेशनवर पुरा झाला. लोकप्रिय बोलपटाला आवश्यक असे सर्व गुण या बोलपटात आहेत हे सुज्ञ वाचकांस (आणि भावी प्रेक्षकांस) सांगायला नकोच.
अशा प्रकारचा बोलपट काढण्यासाठी इतर अनेक निर्माते लाखो रुपये खर्च करतात आणि अनेक महिने श्रम घेतात. वास्तविक पैशांचा आणि वेळेचा एवढा चुराडा करण्याची जरूरी नाही. पुण्याहून मुंबईला निघायचे आणि वाटेत जे जे देखावे दिसतील ते घेत सुटायचे. बोरीबंदरला येऊन पोचेपर्यंत एका सर्वांगसुंदर बोलपटाची उभारणी सहज होईल! हा आमच्या प्रस्तुत कल्पक दिग्दर्शकांचा सोपा फॉर्म्युला इतर दिग्दर्शकांना ज्या वेळी पटेल तो हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग्याचा दिवस ठरेल. हे उघड नाही काय?
लेखक दत्तु बांदेकर यांनी मनोहर दिवाळी अंक, १९५१ मध्ये लिहिलेला हा लेख व्यास प्रतिभा दिवाळी २०१५ मध्ये पुनर्प्रकाशित झाला. त्यामधून साभार.