प्रभा राव

महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक महिला नेत्यांनी आपल्या कार्याद्वारे स्वत:ची छाप पाडली, त्यात प्रभा राव याही होत्या. राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या प्रभाताईंनी राज्य मंत्रिमंडळात सहकार, पर्यटन, सांस्कृतिक आणि महसूलसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली. अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीस तर त्या पुढे झाल्याच, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपदही त्यांनी दोनदा भूषविले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या भूमीत वाढलेल्या प्रभाताईंवर लहानपणापासूनच आधुनिक विचारांचे संस्कारही झाले.

त्यांचे वडील गुलाबराव वसू हे वर्धा जिल्ह्याच्या सहकार चळवळीतील कार्यकर्ते होते. जातीपातीच्या पलीकडे पाहणारे हे घराणे होते. यामुळेच प्रभाताई व त्यांच्या बहिणीने त्या काळात केलेल्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा पाठिंबा होता. वर्धा जिल्ह्यात राजकारणाची सुरुवात करणाऱ्या प्रभाताईंना १९७२ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली, तेव्हा चंद्रशेखर, मोहन धारिया आदी तरुण तुर्काचा दबावगट काँग्रेसमध्ये जोरात होता. महाराष्ट्रात शरद पवार, उल्हासदादा पवार हे काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्टद्वारे सक्रिय होते. या दबावगटांमुळेच अनेक तरुण कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली होती, प्रभा राव यांचा समावेश त्यातच होता. प्रभाताई प्रथम उपमंत्री, राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री झाल्या. इंदिरा, राजीव आणि सोनिया या गांधी घराण्यातील तीनही नेत्यांच्या त्या जवळच्या मानल्या जात. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. पराभवानंतर खचून न जाता इंदिरा गांधी यांनी देशभर दौरे सुरू केले, तेव्हा प्रभा राव प्रवासात त्यांच्याबरोबर होत्या. इंदिरा गांधी प्रवास करीत असलेली गाडी उत्तर प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर थांबताच, जमाव त्यांच्या बोगीवर चालून गेला. त्यावेळी प्रभाताई जमावाला सामोऱ्या गेल्या, त्यांना मारहाण झाली, पण जमाव इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्या तरी चंद्रपूर येथील घटनेनंतर आपल्या पत्राची दखल इंदिरा गांधी यांनी घेतली नाही, म्हणून १९८० च्या सुमारास त्या काही काळ शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये गेल्या. खमक्या राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. यामुळेच राजीव गांधी यांनी हरयाणामध्ये भजनलाल यांना चाप लावण्यासाठी प्रभाताईंकडे हरयाणा काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दिली. आयाराम-गयारामांच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या भजनलाल यांना तिकीट वाटपात झुकते माप मिळू नये याची खबरदारी तर तेव्हा प्रभाताईंनी घेतलीच, पण हरयाणा, केरळ आदी राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता असताना काँग्रेसच्या त्या-त्या राज्यांच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रभाताईंनी काँगेसची सत्ता आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. १९८५ मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यावर वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रिपदी फेरनिवड झाली. मात्र प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांची झालेली निवड दादांना रुचली नाही आणि त्यांनी तीन महिन्यांतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे २००४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आली असताना सोनिया गांधी यांनी प्रभा राव यांच्याकडे दुसऱ्यांदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले. २००४ ते २००८ अशी एकूण चार वर्षे त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद भूषविले. दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपदी आल्यावर विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला त्यांनी जेरीस आणले. काँग्रेस संघटनेचे काम करण्याची इच्छा असतानाही काँग्रेस नेतृत्वाने निवडणुकीच्या तोंडावर विलासरावांना मुक्त वाव देण्याच्या उद्देशाने प्रभाताईंची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानायचे त्यांचे धोरण असल्याने त्यांनी सिमल्याच्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त होण्याचा निर्णय घेतला. तरी सुरुवातीचा काही काळ त्यांचे महाराष्ट्राचे दौरे कमी झाले नव्हते. पुढे त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. खो-खो, अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रभाताई संगीत क्षेत्राच्या जाणकार होत्या. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी २००७ मध्ये त्यांच्याकडे चालून आली होती, पण नशिबाचे फासे तेव्हा योग्य पडले नव्हते.

Author