‘कलावैभव’चे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं आकस्मिक निधन ही सहा महिन्यांतली मराठी नाटय़सृष्टीवर आघात करणारी दुसरी मोठी दुर्दैवी घटना आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘चंद्रलेखा’ संस्थेचे निर्माते मोहन वाघ यांचंही असंच आकस्मिक निधन झालं.
मराठी नाटय़व्यवसायातील दुसरा बडा निर्माता असा लागोपाठ गेल्यानं नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाटकाचं वेड असलेले आणि नाटक सतत जगणारे असे हे दोन निर्माते होते. काहीएक रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची नाटके करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासही ते मागेपुढे पाहणारे नव्हते.
दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांचा हा नाटय़निर्मितीचा वारसा पुढे नेणारे त्यांच्या कुटुंबीयांत कुणी दिसत नाही. मोहन तोंडवळकर हे व्यावसायिक नाटय़निर्मात्यांमधले ‘प्रायोगिक निर्माते’ म्हणून ओळखले जात. राज्य नाटय़स्पर्धा तसेच इतरत्र होणाऱ्या नव्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावून त्यातलं एखादं नाटक वा कलाकार त्यांच्या रत्नपारखी नजरेस पसंत पडला की व्यावसायिक गणितं बाजूला ठेवून, ते त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत.
विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सई परांजपे, महेश एलकुंचवार, सुरेश खरे ते किरण पोत्रेकर, योगेश सोमणपर्यंत त्या-त्या काळातील नव्या लेखकांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं. साहस हे त्यांच्या रक्तातच होतं. ते करताना त्यांनी परिणामांची कधीच पर्वा केली नाही.
‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मला उत्तर हवंय’, ‘महासागर’, ‘पुरूष’, ‘जास्वंदी’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘सावित्री’, ‘पर्याय’, ‘दुसरा सामना’, ‘गोष्ट प्रेमाची?’, ‘नातीगोती’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘राव जगदेव मरतड’, ‘शॉर्टकट’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अपूर्णाक’, ‘कस्तुरीमृग’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘नल-दमयंती’, ‘पाऊलखुणा’, ‘महायोग’, ‘मी राष्ट्रपती’, ‘सौभाग्य’, ‘वन रूम किचन’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘लफडा सदन’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लपंडाव’, ‘अचानक’, ‘प्रासंगिक करार’ ते ‘शंभुराजे’पर्यंत कलावैभवने निर्मिलेल्या नाटकांचं वैविध्य पाहिलं तर त्यांच्या नाटय़निर्मितीच्या कक्षा किती लांब-रुंद आणि सखोल होत्या, याची कल्पना येते. नाना पाटेकरांपासून डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत अनेक कलावंतांना त्यांनी आपल्या नाटकांतून पुढे आणलं. परंतु याचं श्रेय मात्र त्यांनी कधीच घेतलं नाही. ‘जो-तो आपापल्या कर्तृत्वानं पुढे येतो. मी फक्त निमित्तमात्र ठरलो. त्यात कसलं श्रेय घ्यायचं?,’ असा त्यांचा सवाल असे. त्यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे.
लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. लगेचच ते नाटक बंद करीत आणि पुढच्या नाटकाकडे ते वळत. अर्थात त्यापुढचं नाटकही ते धंद्याचं गणित मांडून करतील, असंही कधी घडलं नाही. कलावैभव संस्था काढण्याआधी ते जुनी नाटकं कंत्राटी पद्धतीनं लावीत. त्यासाठी बीपीटीतल्या आपल्या सहकाऱ्यांकडून ते कर्ज वगैरे काढत. मात्र व्यवहार चोख असल्यानं त्यांना हवे तेव्हा पैसे उभे करता येत. पण तोंडवळकरांनी एकाच उद्योगात स्वत:ला कधी अडकवून घेतलं नाही. त्यांनी नाटकांबरोबरच सीरियल्स, टेलिफिल्म्सचीही निर्मिती केली. त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची ऑफर दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी दिली होती. परंतु तोंडवळकर चित्रपट क्षेत्रापासून मात्र का कुणास ठाऊक, कटाक्षानं दूर राहिले.
पल्लवी अॅडव्हर्टायझिंग ही जाहिरात संस्था काढून जाहिरातीची कामंही ते करीत. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तर त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून ते कळवीत. नाटय़क्षेत्रात ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. कुठलीही गोष्ट करताना फळाची अपेक्षा न धरता करणं, ही साधारणत: योग्यालाच साध्य होणारी गोष्ट तोंडवळकरांना साध्य झालेली होती. ते नेहमी म्हणत, ‘मी ‘आज’ जगतो. काल किंवा उद्याबद्दल मी बिलकूल विचार करीत नाही.’ त्यामुळेच ते नेहमी ‘आज’ला सामोरे गेले आणि म्हणूनच कायम समकालीन राहू शकले. जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.
वरकरणी ते आध्यात्मिक वृत्तीचे वाटत नसले तरी अंतर्यामी मात्र ते सगळ्यापासून अलिप्त असत. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, हे लगेचच जाणवणार नसलं तरी प्रायोगिकांना व्यावसायिक रंगभूमीवर काहीएक सादर करायचं असेल, त्या प्रत्येक वेळी एक खंदा आधारस्तंभ हरवलाय, याची जाणीव त्यांना-आणि पर्यायानं सशक्त आशयाच्या नाटकांच्या भुकेल्या रसिक प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय निश्चितच राहणार नाही.