माणुसकी

संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.



संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.
प्रत्येकालाच घरी लवकर जाण्याची घाई होती. थोडी थोडी गाडी पुढे सरकायची, परत थांबायची जवळ जवळ पस्तीस-चाळीस मिनिटे हा खेळ चालूच होता. अगदी मुंगीच्या पावलाने गाड्या पुढे सरकत होत्या. अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची इच्छा होती. पण ते शक्य नाही हे पण समजून चुकलो होतो. पाठीमागे एक अॅम्ब्युलन्सवाला बिचारा जीवाचं आकाडतांडव करुन सायरन वाजवत होता. पुढचा प्रत्येक ड्रायव्हर कुठून तिला निघायला जागा होते का याचा मनापासून प्रयत्न करत होता. पण मुंबईच्या अथांग वाहणाऱ्या या ट्रॅफिकमध्ये जागा मिळणे दिव्यच, आतल्या पेशंटचे ‘सद्भाग्यच’ म्हणायचे.
एवढ्या पावसात देखील अंगावर पांढऱ्या प्लास्टिकचे रेनकोट घालून छोटेसे खेळणे विकणारा फेरीवाला, दहा रुपयाला चार गजरे देणारा गजरेवाला, एखाद्या गाडीत लहान मूल दिसले की त्याच्या जवळ धावत जाणारा फुगेवाला हे दृश्य तसेच दिसत होते. बाजूच्या गाडीजवळ सतत हाताला तोंडाकडे नेऊन दिनवाण्या चेहऱ्याने काही खायला द्या अशा विनवण्या करत एक बाई उभी होती. रंगाने अगदी काळीकुट्ट. जणू किती वर्षात तिने आंघोळ ही केली नसावी. अंगावर फाटकं ब्लाऊज, ज्याची बटणेसुध्दा धड लावलेली नव्हती. तिच्या कडेवर असलेले शेंबडे मूल सतत रडत तिच्या पदराला खेचत होते. डोळ्यातील पाणी आणि पावसाचे पाणी दोन्ही एकत्र होऊन तिच्या चेहऱ्यावर टपकत होते. बाजूने जागा मिळेल तिकडून मोटार सायकलवर भुर्रकन एखादा दुसरा तरुण निघून जात होता. वेळ जावा म्हणून माझे मधून कोणाला वॉटस अॅप कर तर कोणाला फोन करणे चालूच होते.
तेवढ्यात एक फाटका तुटका ठिगळ लावलेला शर्ट, सैलशी ठिगळ लावलेली पँट परिधान केलेला, पांढरे केस असलेला साधारण साठीचा माणूस ‘छत्री’ विकायला गाडी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या कपाळावरच्या आठ्या जाणू त्याला स्वतःलाच प्रश्न करत असाव्यात ” अरे हे सगळे माझ्या वाट्याला का? ” असा अवतार असून सुध्दा पटकन आपले लक्ष त्याच्याकडे जाईल असे त्याचे व्यक्तिमत्व होते.
खूप पावसात दुसऱ्यांसाठी नवीन छत्र्या विकताना त्याच्या डोक्यावरच्या छत्रीला मात्र ठिगळे दिसत होती. एका गाडीकडून दुसऱ्या गाडीकडे जात कोणी त्याची छत्री विकत घ्यावी याची पराकाष्ठा करत होता. त्याीच ती धडपड बघून असे जाणवत होते की सकाळपासून याची विक्री झालेली नव्हती. त्याच्याकडे बघता बघता लक्षात आले घरात एखादी दुसरी छत्री घेऊन ठेवायचीच आहे. कधी कामवाले विसरून येतात तर कधी थोडेसे चालायला आपल्याला पण लागतेच.
कांच खाली केली आणि विचारले, “केवढ्याला दिली? ”
तो म्हणाला, “ताई तशी तर शंभर रुपयाला विकतो. पण आज अजून बोहणी पण झाली नाही. सकाळपासून काही खाल्ले पण नाही. तुम्ही द्याल तेवढे पैसे घेईन. पण एक छत्री घ्या.” मी विचार केला आणि म्हटले “चला एक छत्री द्या. पण उघडून ती व्यवस्थित आहे हे बघून घ्या.”
हातातल्या छत्र्या मागे पुढे करत त्याने एक छत्री काढली, मला तो देणार तेवढ्यात ट्रॅफिक सुरु झाला. गाडी थोडी पुढे सरकली. खूप वाईट वाटले. तो माणूस आमच्या गाडीच्या मागे धावत होता. मी मागे वळून त्याच्याकडे बघत होते. पण काय करणार? बऱ्याच वेळाने गाडी पुढे सरकली होती. जरा थांबला असतो तर मागच्या सगळ्या लोकांनी हॉर्न वाजवून आसमंत डोक्यावर घेतले असते. तेवढ्यात ड्रायव्हरने गाडी थांबविली. मी विचारले, “काय झाले रे बाबा का थांबलास? ” म्हणाला, “लाल लाईट परत आलेला दिसतोय.” इतर वेळा या लाल लाईट वर मी चिडले असते. पण आता तसे झाले नाही. उलटा आनंदच झाला. पटकन छत्री घेतली. तेवढ्या गर्दीत त्याने मला ती उघडून दाखविली आणि प्लॅस्टिकमध्ये घालून दिली.
त्याला पाचशेची नोट काढून दिली. हातात घेऊन हसत हसत तो म्हणाला, “काय ताई माझ्या गरीबाची परीक्षा बघता का? आज सकाळपासून एकही छत्री विकली नाही. सुट्टे पैसे कुठून देऊ? बघा तुमच्याकडे असतील.
इतर वेळा हिशोबाच्या पैशासाठी कटकट करणारा माझा स्वभाव आहे. पण त्या क्षणी काय वाटले देव जाणे, म्हटले, “राहू दे, पण मेहनत करत जा. रोज कुणी तुला असे भेटणार नाही. कदाचित माझ्या आयुष्यात मी सुध्दा परत असे करणार नाही.”
बाजूच्या आरशातून ड्रायव्हर बघत होता जणू विचार करत होता, “आज मला काय झाले? सगळे ठीक आहे ना.”
त्या माणसाला काही समजलेच नाही. क्षणार्धात त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. खूप आनंदाने आमच्याकडे बघत घाईघाईने पुढे गेला. जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत होते. अचानक हातात एखादी हवी असलेली वस्तू जर मिळाली तर त्याची प्रतिक्रिया खरेच काय होते हे समोर बघत होते.
परत एकदा गाडी पुढे सरकली आणि तो ही कुठे दिसला नाही. जरा गाडी पुढे गेली आणि सिग्नलच्या जवळ येऊन परत थांबली. सिग्नल जवळ दिसत जरी होता तरी अजून एकदा सिग्नल जवळ थांबायला लागेल हे कळत होते.
इतक्यात ड्रायव्हर म्हणाला, “मॅडम तो छत्रीवाला बघा समोर दिसतोय. ”
आम्ही बघत होतो. फूटपाथ वर वडापावची गाडी उभी होती. त्याने वडापाव घेतले आणि बाजूला उभे असलेला फुगेवाला, खेळणी विकणारा माणूस, गजरे विकणारा मुलगा, ती भिकारी बाई सगळ्यांना त्याने भराभर ते वडापाव दिले आणि सगळ्यांसोबत तो सुध्दा तिथे वडापाव खात उभा राहिला.
मी बघून थक्कच झाले. ते प्रत्येक जण एकमेकांची व्यथा जाणत असावेत. कदाचित त्या दिवशी सगळे जणच उपाशी असतील किंवा त्या प्रत्येकाला वडापाव खाण्याची इच्छा असेल हे त्या माणसाला बहुतेक माहित असावे. त्याच्या उदार मनाला काय तुलना द्यावी हे समजत नव्हते. बरेच वेळा भरपूर मिळणाऱ्या माणसाला सुध्दा असे काम शक्य होत नाही. किती मोठे मन असेल त्याचे. आज त्याला एवढे पैसे मिळाले. कदाचित उद्या ते मिळणार सुध्दा नाहीत याची त्याला पूर्ण कल्पना असावी आणि हे माहित असून ही त्यानी त्या दुसऱ्या लोकांची भूक, मन जाणले. ‘उपाशी’ रहाणे म्हणजे काय हे तो पूर्ण जाणत असावा. एकत्र उभे राहून वडापाव खाताना त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जणू श्रीखंड पुरी खायला मिळाली असेल असे भाव दिसत होते. वरतून पडणाऱ्या पावसाची आणि समोरुन जाणऱ्या गाड्यांची त्यांना जाणीव पण होत नव्हती.
त्या छत्री विकणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर तर “परमानंद ” दिसून येत होता. परमानंद याचा अर्थ त्याचा चेहरा मला शिकवून गेला. माझ्या मनाला खूप समाधान वाटले. असे वाटले आज परमेश्वराने त्याला पैसे देण्याची मला बुध्दी दिली असावी. कारण त्याने आज हे जे काही केले कदाचित त्यातल्या दुसऱ्या कोणी ते केले नसते. न जाणे बिचारे किती वेळापासून या ट्रैफिक सिग्नल मध्ये गाड्यांच्या मागे पुढे करत असतील.
आमची गाडी तिथून निघाली तेव्हा ते आमच्याकडे कुतूहलाने बघता बघता जणू धन्यवाद देत असतील असे वाटले त्या गजरा विकणाऱ्या बारा तेरा
वर्षाच्या मुलाने तर दोनही हात उंच करुन चक्क टाटा केला. असे वाटले त्यांना जावून सांगावे अरे मला नाही सगळे धन्यवाद त्या छत्री विकणाऱ्या माणसाला द्या. हा त्याचा मोठेपणा आहे. तो उपाशी असूनही त्याने तुमच्या भुकेला जाणले तुम्हाला टाकून एकट्याने वडापाव नाही खाल्ला.
रात्री किती वेळ डोक्यातले विचार जातच नव्हते. काही वेळा काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादे स्थळ, एखादी घटना अशा काही आठवणी देऊन जातात की थेट त्या आपल्या हृदयाला भिडतात. परत कधीपण ती वस्तू, तशी व्यक्ती किंवा ती जागा पाहिली की त्या आठवणी ताज्या करून जातात.
पावसाळ्यात ‘छत्री’ या माणसाची आठवण करुन देईल का? या पुढे माझ्या आवडीचा ‘वडापाव’ खाताना हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येईल का?
हे तर भर पावसात भुकेल्या पोटी हातात वडापाव येईल तेव्हाच समजेल आणि पूर्वी इतका तो चविष्ट लागेल का देव जाणे.
धन्य हो त्याची ‘माणुसकी’.

Author