कोतवाल, मनोहर
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने निर्णायक वळण घेतले त्याच कालखंडात, ब्रिटिश राजवटीत राजकीय आंदोलनांबरोबर कामगारांचेही समांतर लढे सुरू होते. पुढे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात राजकीय चळवळीइतकेच कामगार चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कामगार संघटना स्थापन केल्याचे दिसते.
इंटक, आयटक, एचएमएस, बीमएस ही काही त्याची ठळक उदाहरणे. परंतु त्या काळातील नेतृत्वाने राजकीय विचारांची बांधीलकी मानूनही केवळ कामगारांच्या हितासाठी या कामगार चळवळीचे अस्तित्व जाणीवपूर्वक वेगळे व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. देशातील संघटित व विशेषत: कंत्राटी कामगारांचे ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केले, त्यात भाई मनोहर कोतवाल यांचे नाव अग्रभागी होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अगदी जागतिकीकरणापर्यंत जे काही बरे-वाईट कामगारवर्गावर परिणाम झाले, या संबंध ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजकीय, आर्थिक व कामगारविषयक घडामोडींचे ते साक्षीदार होते. एक अभ्यासू, लढाऊ आणि कामगार संघटनांमध्येही शिस्तीचा आग्रह धरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अध्ययन सुरू असतानाच त्यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला. एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यात आली असताना कामगारांचे लढेही ब्रिटिश सरकारपुढे आव्हान म्हणून उभे होते. अशा वातावरणात कामगार चळवळीचे पितामह म्हणून ज्यांना ओळखले जात होते, त्या ना. म. जोशी यांच्या संपर्कात कोतवाल आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बीपीटी रेल्वेमेन्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. या युनियनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे एक संस्थापक नेते पी. डी’मेलो यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. देशातील प्रमुख बंदरातील कामगार व गोदी कामगार महासंघाच्या मुख्य प्रवाहात ते आले. पुढे डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी आदी नेत्यांच्या बरोबरीने कोतवाल यांनी गोदी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले. गोदी कामगारांच्या न्याय-हक्काच्या लढय़ांमध्ये ते कायम अग्रभागी राहिले. देशात १९७५ मध्ये लादल्या गेलेल्या आणीबाणीने राजकारणाबरोबर कामगार चळवळही ढवळून निघाली होती. कामगार चळवळींच्या नेतृत्वामध्येही आणीबाणीचे समर्थक व विरोधक अशी विभागणी झाली. मनोहर कोतवाल हे समाजवादी विचारातून तयार झालेले नेतृत्व, परंतु काँग्रेस विचारांशी थोडी जवळीक ठेवणारे होते. अंतर्गत राजकीय मतभेदांचा गोदी कामगार चळवळीवर परिणाम झाला. देशव्यापी बंदर व गोदी कामगार महासंघाचे दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व शांती पटेल करीत आहेत, दुसऱ्या गटाचे नेतृत्व एस. आर. कुलकर्णी व मनोहर कोतवाल यांच्याकडे गेले. तरीही नेतृत्वांमधील सामंजस्य, सभ्यता आणि समजूतदारपणामुळे गोदी कामगारांमध्ये कधी अंतर्गत संघर्ष उभा राहिला नाही. निर्णायक क्षणी सारे नेते एकत्र येऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देत. या अर्थाने मनोहर कोतवाल मोठे व वेगळे नेते होते. समाजवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या हिंद मजदूर सभेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. भारतीय अन्न महामंडळातील कंत्राटी कामगारांचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढविला. सरकारी उपक्रमात काम करूनही या कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. पुढे कंत्राटी कामगारांचे कोतवाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.