मल्हारराव होळकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.



दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.

दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरु केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भोजराज मामाची मुलगी गौतमी बरोबर मल्हाररावचा विवाह संपन्न झाला आणि पुत्र झाला त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हारबांना धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

उत्तरोत्तर मल्हारबाची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया… गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव विलासी वृत्तीचा असल्याने मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटीत घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी बेधुंद अवस्थेत खंडेराव छावणीतून बाहेर पडला आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हारबांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी आकराजणी सती गेल्या.

पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हारबांनी मोहिमा उघडल्या, इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरगडावरील नगारखाण्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत कि शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.

पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांची पहिली पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्यूमुखी पडल्या त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारबा अनेकदा तिच्याशी सल्ला मसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदा-या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

पानिपतनंतर मराठे शाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हार रावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून स्वतःला व्यस्त ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. मराठेशाहीतील आधाराचा गरुड खांब कोसळला, मराठे शोकाकुल झाले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या, पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

(संदर्भ आणि सौजन्यः jejuri.in)

Author