जयंत कायकिणी

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कुसुमाग्रज अध्यासनाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ ज्येष्ठ कन्नड साहित्यिक जयंत कायकिणी यांना जाहीर झाला आहे. साहित्याच्या विविधांगी क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता ही निवड सार्थ असल्याचे स्पष्ट होते. शिक्षण आणि समाजसेवेचा वसा घेतलेल्या कुटुंबात जयंतराव लहानाचे मोठे झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत समुद्रकिनारी वसलेले निसर्गरम्य गोकर्ण हे त्यांचे जन्मगाव.

त्याच ठिकाणी बालपणही गेले. वडील गौरीश आणि आई शांता पेशाने शिक्षक. जयंत गुणवान विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवीत होते. उच्च शिक्षणासाठी ते धारवाडला गेले. १९७६ मध्ये त्यांनी बायोकेमिस्ट्री विषयात एम.एससी.ची पदवी प्राप्त केली ती कर्नाटक विद्यापीठाच्या सुवर्णपदकासह. इथपर्यंतचा जयंत कायकिणींचा प्रवास कर्नाटकच्या सीमेपुरता मर्यादित होता. पण नोकरीव्यवसायानिमित्त सीमोल्लंघन केल्यावर शेजारील महाराष्ट्र त्यांनी आपलासा केला.

राजधानी मुंबईत येऊन प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल कंपनीत प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास दोन दशकाहून अधिक काळ त्यांचे वास्तव्य मराठी भूमीतच होते. याच काळात स्वतंत्र व्यवसायी कॉपी रायटर म्हणून लिंटास व मुद्रा या जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्येही काम केले. मुंबईतील या प्रदीर्घ वास्तव्यामुळे कायकिणी यांचा मराठी व हिंदी भाषांशी जवळून संबंध आला. वेगवेगळी औषधे वा संबंधित रसायनांचे अभ्यासक म्हणून नाव कमावूनही ते मराठी मातीमध्ये चांगलेच रमले.

कुटुंबातूनच झालेल्या समाजसेवा व शिक्षणाच्या संस्कारामुळे त्यांना वाचनाची आवड होतीच; पण पुढील काळात मराठी प्रांतातील वास्तव्याच्या कालावधीत कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, ग्रेस आदी मराठी सारस्वतांच्या साहित्याचीही त्यांना भुरळ पडली ती कायमची. या साहित्यिकांच्या साहित्याने आपण प्रभावित झाल्याची प्रांजळ कबुली देताना त्या लेखकांच्या ऋणात राहणे ते पसंत करतात. मुंबई सोडल्यावर अमराठी प्रांतातील बेंगळूरूमध्ये वास्तव्यास जातानाही मराठी सारस्वतांच्या साहित्याची शिदोरी सोबत नेण्यास ते विसरले नाहीत. असे असले तरी अभिजात साहित्याचे त्यांनी अनुकरण केले नाही.

अस्सल देशी शब्दयोजना, विनोदाचा शिडकावा, उपरोधिक आणि मार्मिक विडंबन ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्टय़े. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकरांच्या निर्वाणानंतर सांप्रत गोदातीरी ही उणीव प्रकर्षांने जाणवते. मुक्त विद्यापीठाने जयंत कायकिणींची कुसुमाग्रज पुरस्कारासाठी केलेली निवड म्हणूनच यथायोग्य वाटते. औषधे-रसायनांसंबंधित, सर्वसामान्यांना बोजड वाटणाऱ्या विषयात रस घेणाऱ्या या युवकाचा कन्नड साहित्यप्रवासही औत्सुक्याचा विषय ठरावा. कन्नड भाषेतील ‘रंगादिन्दोदिशत्रू दूरा’, ‘श्रावणा मध्यांना’, ‘निलीमाले’, ‘ओंदू जिलेबी’, ‘कोटितीर्थ’ हे काव्यसंग्रह, ‘गाला’, ‘बन्नाडा कालू’, ‘तूफान मेल’ यांसह सात कथासंग्रह, ‘इति मीना अमृता’, ‘अक्शा बुत्ती’ यांसह चार नाटकांचा त्यांच्या खाती समावेश आहे.

वीसहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. चार चित्रपटांसाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. त्यांच्याच कल्पनेतून साकारलेल्या ‘नमस्कार’ या मालिकेचे कन्नड दूरदर्शनवर तब्बल दोनशे भाग प्रसारित झाले आहेत. कन्नड वाङ्मयाला वाहिलेल्या ‘भावना’ या मासिकाचे ते संपादक आहेत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कन्नड साहित्य अकादमीचा राज्य पुरस्कार मिळालेल्या या सारस्वताच्या शिरपेचात कुसुमाग्रज पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Author