गोव्यातील रम्य सकाळ ! (स्मरणगाथा : १)

प्रचंड उत्साहात आणि गर्दीत निघालेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी. उत्साह, उत्सुकता, अभिमान आणि साहित्य संमेलनाच्या वेळी असणारे चैतन्य , दिंडीच्या वेळी जाणवत होते. माऊलींची प्रतिमा ठेवलेली पालखी विविध फुलांच्या गजऱ्यांनी , फुलांच्या माळानी सजवलेली . अवघा आसमंत सुगंधाने , अभंगांच्या गजराने आणि कोकणी गीतांनी भारून गेलेला .



गोव्यातील रम्य सकाळ !

प्रचंड उत्साहात आणि गर्दीत निघालेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी. उत्साह, उत्सुकता, अभिमान आणि साहित्य संमेलनाच्या वेळी असणारे चैतन्य , दिंडीच्या वेळी जाणवत होते. माऊलींची प्रतिमा ठेवलेली पालखी विविध फुलांच्या गजऱ्यांनी , फुलांच्या माळानी सजवलेली . अवघा आसमंत सुगंधाने , अभंगांच्या गजराने आणि कोकणी गीतांनी भारून गेलेला .

मी त्या साहित्य संमेलनाचा उदघाटक होतो. फोटो सेशन , व्हिडिओ शूटिंग असे सर्वत्र आढळणारे दृश्य . मोबाईलवर साहित्यिकांबरोबर सेल्फी. अवघं वातावरण हवंहवंसं वाटणारं . साहित्यिक म्हणून सुखावणारं .

ग्रंथदिंडी संमेलन स्थळी पोहोचली . आता पाच मिनिटांत संमेलन सुरू होईल , असं मनाला बजावलं .इतक्यात आयोजक असणारे सागरजी माझ्याजवळ आले , म्हणाले ,
” सर , दहा मिनिटं थांबायचं का ?”
मी प्रश्नार्थक चेहरा केला .
” सर , आत्ताच प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचा फोन आला होता . दहा मिनिटात ते इथे येत आहेत , त्यांना तुमची भेट घ्यायची आहे . एकदा का कार्यक्रम सुरू झाले की मग निवांत बोलता येणार नाही . म्हणून …” मी चालेल म्हणून सांगितले .
” तुम्ही म्हणाल तेव्हा सुरू करू कार्यक्रम , मलाही त्यांना भेटायला आवडेल . तुमच्या निमित्तानं एका मोठ्या प्रतिभावंताला भेटण्याचा योग येतोय . ”
मी सांगितलं .

सागरजी संमेलनाच्या रंगमंचाकडे वळले .

मी खुर्चीतून उठून बाहेर आलो .

एका मोठ्या व्यक्तीने मला भेटण्याची इच्छा धरावी, हा मला सन्मानच वाटला .

प्राचार्य गोपाळराव मयेकर माजी खासदार , गोव्याचे मंत्री , एक थोर शिक्षणतज्ज्ञ , नामवंत लेखक , एका महाविद्यालयाचे प्राचार्य , व्याख्याते आणि त्याहीपेक्षा ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक . हे दान कसे मज पडले… या जवळपास हजारभर पानांच्या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक .

प्राचार्य मयेकर सर म्हणजे प्रकांड पांडित्य हे मी ऐकून होतो . पण अद्याप त्यांची भेट झाली नव्हती . ती आज होणार या आनंदात असताना प्रवेशद्वाराशी गाडी येऊन थांबली . आणि भारदस्त व्यक्तिमत्वाचे सर गाडीतून उतरले . सागरजीनी त्यांचे स्वागत केले . मी जवळ जवळ धावतच त्यांच्याकडे गेलो आणि त्या अक्षरब्रह्माला वाकून नमस्कार केला . आणि सरांनी मला मिठी मारली . मी भारावून गेलो . मला काय बोलावे हे सुचेना . अक्षरशः गोंधळून गेलो होतो . सरांच्या ते लक्षात आलं.त्यांनी माझे हात हाती घेतले . ” तुम्हाला भेटायचं मनात होतं . तुमचं संगीत नाटक शांतिब्रह्म मी वाचलं आणि प्रयोग सुद्धा पाहिला . त्या नाटकातला आनंद प्रभुदेसाई माझा विद्यार्थी . त्याने आग्रह केला म्हणून मी ते नाटक वाचलं, पाहिलं . आणि ठरवलं तुम्हाला भेटायचं . खूप खूप आवडलं नाटक …”

सर प्रवेशद्वाराशीच थांबून भरभरून बोलत होते . नाटक, कथानक , संगीत , दिग्दर्शन , कलावंतांच्या भूमिका , नाटकात मांडलेला विचार आणि त्याचे साहित्यिक मूल्य … सर खूप काही बोलत होते .

संमेलनाला आलेल्या रसिकांना सगळं काही नव्यानं ऐकायला मिळत होतं . त्यामुळे उशीर होत असल्याबद्दल कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी सरांच्याच ते लक्षात आलं . आणि आम्ही आत निघालो . पण पुन्हा सरांनी थांबवलं, आणि गाडीतून त्यांच्या आत्मचरित्राची एक प्रत सही करून मला दिली . मला धन्यता वाटली . माझ्या नाटकाचं गुणगान करताना सर थकले नव्हते . त्यांच्या गुणग्राहकतेला मी मनोमन नमस्कार केला .

एखादी कलाकृती आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवते यापेक्षा त्या कलाकृतीचे मोल अस्सल रत्नपारखी कसे करतात , हे साक्षात अनुभवायला मिळाले . संगीत शांतिब्रह्मला राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यानंतर महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , मध्यप्रदेश , दिल्ली अशा ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास प्रयोग , खल्वायन या संस्थेने केले . शिवाय गोवा , मुंबई इथल्या संस्थानी सुद्धा त्याचे प्रयोग केले . इतकं अफाट यश त्या नाटकाला मिळालं .

पण असं यश नक्की मिळणार हे छातीठोकपणे सांगणारी एक प्रतिभावान व्यक्ती रत्नागिरीत होती . नाटकाची रंगीत तालीम पाहण्यासाठी संस्थेनं प्रसिद्ध नाटककार , ज्येष्ठ लेखक प्र.ल. मयेकर यांना बोलावले होते . नाटकाचा पहिला अंक झाला आणि ते इतके खूष झाले की या नाटकाचा पुढचा प्रवास कसा असेल ते जणू त्यांनी सांगून टाकलं होतं.आणि तसंच घडत गेलं. याहून आणखी एक सुखद धक्का मला मिळाला .

वरळीला संगीत नाट्यमहोत्सवात शांतिब्रह्म हे नाटक पहायला ललित कलादर्श या संस्थेचे अध्यक्ष , थोर गायक अभिनेते लोकप्रिय असणारे भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर आले होते . गाण्याला , संवादांना ते दिलखुलास दाद देत होते . नाटक संपल्यानंतर त्यांनी उभं राहून दाद दिली . दुसऱ्या दिवशी गिरगावात साहित्य संघ मंदिरात शांतिब्रह्मचा प्रयोग होता .
कलाकार मंडळींची पूर्वतयारी चालू होती . झी मराठी चॅनल, लेखक म्हणून माझा बाईट घेत होते . इतक्यात कुणीतरी सांगितले . अण्णा पेंढारकर नाटक पहायला येऊन बसले आहेत . ते तेव्हा साहित्य संघ मंदिरात राहायचे , तेथे त्यांचे संशोधन सुरू होते .

मी तसंच उठलो आणि उत्सुकतेने त्यांना भेटायला गेलो . माझी ओळख करून दिली . मी त्यांना विचारलं , ” अण्णा काल पण तुम्ही हे नाटक पाहिलं . आणि आज पुन्हा ?” ते हसले . म्हणाले , मला खूप आवडलं हे नाटक . प्रकृती साथ देत नाही म्हणून , नाही तर या तुझ्या नाटकातला श्रीखंड्या करायला मला आवडलं असतं . चांगलं लिहिलं आहेस नाटक ” मी धन्य झालो .उठलो . त्यांच्या पावलांना स्पर्श केला आणि नमस्कार केला .

ही आठवण त्यांच्या इतकी लक्षात होती की रत्नागिरीतील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात त्यांनी मला ती सांगितली . त्यावेळी मी त्यांची सांगितिक मुलाखत घेतली होती .

संगीत शांतिब्रह्मने मला प्रसिद्धी , पुरस्कार , सन्मान मिळवून दिले . पण आयुष्याच्या महत्वाच्या टप्यावर मला भेटलेल्या या दिग्गजांचे आशीर्वाद महत्वाचे वाटतात . अशी पिंपळपाने आयुष्य समृद्ध करून जातात . हे त्यांचे ऋण न विसरण्यासारखे आहे . आणि मला रत्नागिरीतील एक नाट्यरसिक आठवला .

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात संगीत शांतिब्रह्मचा प्रयोग होता . पहिला अंक झाला आणि तो रसिक मला भेटायला आला . म्हणाला , ” सर , कसाबसा एक अंक सहन केला . यापेक्षा नाटक लिहिलं नसतं तर चांगलं झालं असतं.”
मी हसलो . ही प्रतिक्रिया नवीन नव्हती . पण ती प्रेरणादायक होती हे निश्चित !

डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी .
दिनांक : २१ जुलै २०२५
८९५१९०६७०१

Author