गणेश कृष्ण जोशी

 



गणेश कृष्ण जोशी हे एक मराठी नाट्य कलावंत. गणेश जोशी यांचा जन्म १८६७ सालचा व त्यांचे घराणें मूळ आडिवरे, जिल्हा रत्नागिरी येथींल राहणारें होते. लहानपणींच वडील निवर्तल्यामुळें व गरिबामुळें त्यांच्या शिक्षणाचा हेळसांड झाली. वयाच्या १० व्या वर्षींच ते मधुकरी मागण्याच्या त्रासाला कंटाळून कार्लेकरांच्या नाटकमंडळींत पळून गेले. तेथें आपल्या काम करण्याच्या कुशलतेनें त्यानीं बरीच वाहवा मिळविली. पुढे १८८१ मध्यें कार्लेकरांची नाटकमंडळी बंद पडून ते घरी परत आले. परंतु त्याच सुमारास रा. कृ. ब. जोशी यांनी ठाणें येथे शाहुनगरवासी नाटक मंडळी स्थापन केली होती. त्यांच्या विनंतीनुसार ते सदर मंडळींत येऊन दाखल झाले.

ही मंडळी प्रथम ७/८ वर्षेंपर्यंत पौराणिक नाटकेंच करीत असे. त्यापुढें समाजाच्या बदलत्या अभिरुचीस अनसरून नवीन गद्य नाटके करण्यास मंडळीनें सुरुवात केली. याच सुमारास महाराष्ट्र रंगभूमीची पडदे, सनसिनरी वगैरे बाबतींत सुधारणा होऊं लागली होती. अशा नवीन सजावटीनें मंडळीनें बरेचसे खेळ बसवले. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीनें मंडळीची स्थिती काही सुधारेना.
त्यांच्या सहजाभियनादि गुणांचा उत्कर्षच या वेळेपासून मंडळीच्या उत्कर्षास कारणीभूत झाला. या वेळेपर्यंत मंडळीनें शेक्सपीयरचीं झुंझारराव, हॅम्लेट, तारा, वगैरे व मंजुघोषा, मोचनगड, वीरकांत, वीरसेन वगैरे इतर नाटकें रंगभूमीवर आणली होतीं. १८९२ पासून मंडळीनें ऐतिहासिक नाटकें बसविण्यास सुरुवात केली व या प्रयत्‍नांत चांगलेंच यश आलें. ‘राणा भीमदेव’ या नांटकांत गणपतराव भीमदेवाची भूमिका घेत असत. त्यांच्या वीररसान्वित पहाडी आवाजानें, सहजाभिनयानें व तद्रूपतेनें प्रेक्षकांच्य चित्तवृत्ती अगदीं थरारून जात. याच सुमारास ‘तुकाराम’ या धार्मिक नाटकाचा प्रयोग करण्यांत आला. या ना
कांतील भूमिका गणपतराव इतक्या यथायोग्य तर्‍हेनें करीत असत कीं या २० व्या शतकांतील तुकारामाचें दर्शन घेण्याकरितां अखेरपर्यंत भाविक प्रेक्षकांच्या उड्या पडत असत.

इतर नाटकाप्रमाणेंच त्राटिका, फाल्गुनराव व मानाजीराव (मॅक्बेथ) या नाटकांतहि त्यानीं चांगली कीर्ति मिळविली. गणपतरावांच्या अंगीं कमावलेलें शरीरसौष्ठव व स्वाभाविक परंतु ‘परार्थी’ अभिनय यांचें प्रकृष्ट मिश्रण होतें. बहिर्‍या प्रेक्षकालाहि नाट्याचा सर्व भाव व भाषा केवळ अभिनयानें समजूं शकेल इतक्या सूक्ष्मतर्‍हेनें व भिन्न भिन्न मनोवृत्तींनीं उचित असा अभिनय मुद्राभिनय व अंगविक्षेप-भावार्थ समजून करण्यांत त्यांच्या गुणांचें सार होतें. गणपतराव हें मंडळीच्या मालकांपैकीं एक असल्यामुळें इतरांनां वागवून घेण्याचा त्यांचा गुण चांगलाच दिसून येत असे. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध नट गॅरिक किंबहुना त्याहूनही सरस अशी हॅम्लेटची भूमिका करतानां त्यांची यौगिक तन्मयता यामुळेंच महाराष्ट्र रंगभूमीवर त्यांनां नाट्याचार्य ही पदवी मिळवितां आली. हॅम्लेटमधील भूमिकेच्या अप्रतिमपणाबद्दल यूरोपियन लोकांनीं पाश्चात्य नटांच्याहि वर त्यांनां बसविलेले आहे व याचें कारण त्यांचें अभिनय पाटव, भाषणशैली व स्वरलाघब हे गुण होत. शोकभावाप्रमाणेंच सुखभावहि यथायोग्य तर्‍हेनें वळविण्याची त्यांची हातोडी वाखाणण्याजोगी होती. दान धर्माकडेही त्यांचा कटाक्ष असे, १९२२ साली गणेश जोशींनी या जगाचा निरोप घेतला.

Author