एक सत्यकथा

ऐन थंडीचे दिवस होते, भर दुपारी देखील अंगावरच्या चादरीत गुरफटुन झोपण्याची मजा येत होती. पण भिंतीवरचे घड्याळ साडे चार वाजले असे आनंदाने ठण ठण करुन ओरडले आणि नाईलाजास्तव उठावेच लागले. खरे तर उठून काम करण्याची बिलकूल इच्छा होत नव्हती



ऐन थंडीचे दिवस होते, भर दुपारी देखील अंगावरच्या चादरीत गुरफटुन झोपण्याची मजा येत होती. पण भिंतीवरचे घड्याळ साडे चार वाजले असे आनंदाने ठण ठण करुन ओरडले आणि नाईलाजास्तव उठावेच लागले. खरे तर उठून काम करण्याची बिलकूल इच्छा होत नव्हती. तरीही उठून चहा ठेवत होते तितक्यात दारावरची बेल वाजली. ह्या वेळेस कोण आले असेल असा विचार करतच दार उघडले आणि बघून आश्चर्याचा धक्काच बसला.
रेखा, तिचा नवरा आणि तिच्या हातात एक गोंडस बाळ असे तिघे जण दारात उभे होते.
” अरे वा, ये, ये” म्हणत मी दार उघडले. हसत हसत ती आत आली. पटापट दोघेजण माझ्या पाया पडले. मी तर बघतच राहिले होते. कुठेही ध्यानी मनी सुद्धा नव्हते की रेखा येईल. त्यामुळे काय बोलावे समजतच नव्हते.
“काय ग कशी आहेस? बरी आहेस ना? ” पाणी देता देता मी विचारले.
“चांगली आहे, म्हणूनच तुम्हाला भेटायला आलो. हा माझा मुलगा गौरव. आता चार महिन्याचा झाला. त्याचे बाबा गेल्या पंधरा दिवसांपासून म्हणत होते, मी एक दिवस सुट्टी घेतो आणि आपण तिघेही मावशींना भेटायला जाऊया. आज योग आला.” बाळाला माझ्या हातात देत रेखा म्हणाली.
मी बाळाला घेतले. फारच गोंडस होता तिचा मुलगा. रंगाने सावळा, गुटगटीत, गोबरे गाल, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट बंद केलेल्या होत्या. इवल्याशा सुंदर मनगटावर काळ्या पिवळ्या मण्यांची छोटी बांगडीवजा माळ घातलेली होती. हनुवटीवर लावलेले काळे तीट तर त्या गोबऱ्या गालांवर फारच शोभून दिसत होते. गळ्यात छोटीशी चैन आणि घट्ट मुळी वळलेला हात तोंडात घालून काजळाने बरबटलेल्या डोळ्यातून तो माझ्याकडे एकटक बघत होता. माझा नवीन चेहरा बघून जरासुद्धा घाबरला नाही की रडलासुद्धा नाही.
” ओळख पाळख लागत नाही वाटते ह्याला, अगदी तुझ्यासारखाच दिसतोय” मी म्हणाले.
त्यावर तिचा नवरा माझ्याकडे बघून हसत हसत म्हणाला, ” माझी माय म्हणते अगदी माझ्यासारखा दिसतो.” ह्यावर आम्ही तिघेही हसलो. जरा वेगळ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि चहा ठेवायला आत गेले. ती पटकन माझ्या पाठोपाठ स्वयंपाक घरात आली. तिला घरातील सगळी माहिती होतीच. तिनेच चहा साखरेचे डबे काढून माझ्या हातात दिले. कप बश्या काढून तिनेच टेबलावर ठेवल्या. तशी ती पहिल्यापासूनच चुणचुणीत होती.
चहा करता करता आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. ती तिच्या सासुरवाडीचे खुप कौतुक करत होती. ऐकुन अगदी समाधान झाले होते. बोलता बोलता तिने विषय काढला, “मावशी आई भेटली होती का कधी तुम्हाला?”
“नाही गं, तु गेल्यानंतर एकदाच भांडण करत आली होती, त्यानंतर कधीच नाही आली. तुझ्या वडीलांना घेऊन ती गावाकडे गेली असे कळले ” मी म्हणाले.
“ मला सुद्धा गावातल्या लोकांनीच सांगितले. तिकडे जाऊन तिने शेतीचा एक तुकडा विकला, उरलेल्या भागात घर बांधले. दोन म्हशीसुद्धा घेतल्या. ”
” हे सगळ ती आधीसुद्धा करु शकत होती, पण तेव्हा तिला शहर सोडून जायचे नव्हते. म्हणून मला इथे घेऊन आली होती.” थोडीशी रागातच रेखा बोलली होती.
“जाऊ दे गं, झाले गेले विसरुन जा आता. माझ्याकडे आली आहेस ना तशीच एकदा तिलापण जाऊन भेट. बाळाला बघून आई बाबा दोघेही खूश होतील आणि स्वतःची चूक त्यांच्या लक्षात येईल.” तिची थोडी समजूत घालत मी बोलले.
तेवढ्यात बाळ रडायला लागले म्हणून ती बाहेर गेली. मी त्या दोघांचा चहा घेऊन बाहेर आले. चहा घेता घेता संध्याकाळी जेवायला थांबता का म्हणून विचारले पण तिच्या नवऱ्याचा मामा जवळच रहात होता, तिकडे जेवायला जाणार असे म्हणाली. थोडावेळ बसून दोघांनी माझा निरोप घेतला आणि मामाकडे गेले.
मी आतमध्ये येऊन बसले, आणि एक एक गोष्ट आठवत गेली आणि पूर्वीची माझ्याकडे येणारी रेखा डोळ्यासमोर आली. अगदी सडपातळ, नाकी डोळी नीटस, सावळी, डोक्यात एखादे फुल, गळयात मंगळसूत्र, हातात भरपुर बांगड्या, चापून चोपून नेसलेली साडी. काम करुन थकलेली असली तरीही चेहरा हसतमुख असायचा. एखादा ‘बॉडीगार्ड’ बरोबर असावा तशी तिची आई सतत बरोबर असे. तेव्हापण ती खूप छान दिसत असे. आता मात्र जरा अंगाने भरली होती आणि चेहरा जास्त तजेलदार दिसत होता.
मला चांगले आठवतयं आम्ही इथे नुकतेच रहायला आलो होतो. पाच सहा वर्षांपूर्वी नाशिक रोड इतके मोठे शहर नव्हते आणि आम्ही रहातो हा भाग तर अगदी गावाच्या बाहेर होता. नवीन गावी रहायला आल्यामुळे मी माझ्या पहिल्या मोहिमेवर निघाले होते. ती म्हणजे कामवाली शोधणे. नवीन जागी रहायला गेल्यावर शेजारी-पाजारी तुम्हाला सगळी मदत करायला तयार असतात पण त्यांची चांगली काम करणारी बाई तुमच्याकडे कधीही पाठवायला तयार होत नाहित. तिच्याबद्दल विचारपूस केली की पहिले उत्तर येते, “इथे बाकी सगळे चांगले आहे पण कामवाल्या बायकांचा फारच तुटवडा आहे, पण बघुया कोणी असेल तर सांगते. आमच्याकडे बाई आहे पण तिला वेळच नाही.” खरे बघितले तर लक्षात येते की ह्या बाईला कोणी विचारतच नाही की नवीन आलेल्या लोकांना बाई पाहिजे, तु तिकडे काम करायला जाशिल का? हा माझा नेहमीचा अनुभव आहे. आपली कामवाली share न करणे हा बायकांचा स्वभाव आहे. तसे केल्याने ही बाई आपले काम सोडून जाईल अशी कदाचित मनातून त्यांना भिती वाटत असते. असो, थोडक्यात काय तर मी कामवाली बाई शोधत होते आणि शेजाऱ्यांनी कोणीसुद्धा बाई न पाठवल्यामुळे आमचा ड्रायव्हर रेखा आणि तिच्या आईला घेऊन आला होता. त्या दिवसापासून ह्या मायलेकी आमच्याकडे कामाला येत होत्या.
रेखा स्वभावाने अगदी शांत होती, आपले काम गुपचूप करणे ही तिची सवय होती. तिची आई ह्या उलट होती, अतिशय बडबडी होती. तिचा हात आणि तोंड दोन्ही बरोबरच चालू असायचे. आईने भांडी घासली तर रेखा ती धुऊन पुसून ठेवत असे, एकीने कपडे धुतले की दुसरी वाळत घालत असे, एकीने केर काढला तर दुसरी फरशी पुसत असे. त्या दोघींचे कामाचे tuning खूप छान होते. शांत स्वभावाची रेखा मला खूप आवडली होती. म्हणून तिच्या आईला मी दोन चार वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता, हिला आमच्याकडे कामाला ठेवा, सकाळी तुमच्या बरोबर आणून सोडा आणि संध्याकाळी घेऊन जा. पण ते त्यांना कधीच पटले नव्हते. त्या रेखाला अजिबात एकडे सोडायच्या नाहीत.
हळुहळू माझी त्या दोघींबरोबर चांगली ओळख झाली. बऱ्याच वेळा चहाच्या कपाबरोबर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा होत असत. कधीतरी तिची आई त्यांच्या घरातल्या कहाण्या पण सांगू लागली होती. तिची एक कायमची कहाणी असे, गावाकडे जमीन आहे, पण शहर सोडून जाता येत नाहि. रेखाचे वडील आजारी आहेत, तिकडे त्यांचे औषधपाणी नीट होणार नाहि, वगैरे वगैरे. पण ती रेखा बद्दल कधीही काहीदेखील बोलत नसे. त्यामुळे मला नेहमीच रेखाबद्दल कुतूहल वाटू लागले होते. दिसायला, वागायला इतकी छान मुलगी आहे तरीसुद्धा बिचारीच्या नशिबी धुणीभांडी कशाला आली असतील? अशा अने शंका मला सतावीत होत्या. त्यादिवशी ती एकटीच कामावर आली होती आणि काम करता करता मी तिला सहज विचारले, “रेखा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तुझे लग्न झाले आहे की असेच उगीचच घातलेस? ”
बादलीत फरशी पुसायचे फडके पिळता पिळता म्हणाली, “ उगीच कोणी घालते का? माझे लग्न झाले आहे” आणि हसली.
मी थोडी आश्चर्यचकीत झाले होते. मी तिला विचारले, “आम्ही इथे आल्यापासून मी पाहते तु आईकडे आहे. तुझा नवरापण कामानिमित्त इतेच राहतो का? ”
“नाहि हो मावशी, तो त्याच्या आईबापाकडे, मी माझ्या आईबापाकडे” ती म्हणाली.
“ असे का? ” माझ्या तोंडातून पटकन निघून गेले.
“सवडीने सांगेन कधीतरी, आता खुप काम राहिली आहेत” असे म्हणून ती त्यादिवशी निघून गेली. पण तिच्या बोलण्यातून सगळे काही ठीक नाहि असा संकेत मात्र मिळाला.
त्या दिवसापासून मला तिच्याकडे बघितले की फार वाईट वाटत असे. पण सतत तिची आई बरोबर असल्यामुळे तिला काही विचारणे सुद्धा शक्य नव्हते. ज्या दिवशी ती एकटी आली होती त्यादिवशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की हिच्याबरोबर आई नसली तरच ही मुलगी बोलते. नाहीतर तोंडातून चक्कार शब्द देखील काढत नाहि. म्हणून मी पण संधीची वाट बघत होती आणि एके दिवशी तशी संधी मिळाली. रेखाची आई दोन दिवस गावाला गेली म्हणून रेखा एकटीच कामावर आली होती. त्या दिवशी मी तिला तिचे आईकडे राहण्याचे कारण काय आहे ते सांगण्यास भाग पाडले. तसे तर हे विचारण्याचा मला काही हक्क नव्हता. पण तिला बघून मला नेहमी असे वाटत असे की या मुलीबरोबर अन्याय होत असावा. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी विषय काढताच क्षणीच तिने सांगायला सुरुवात केली. एक क्षण मला असे जाणवले की ही मुलगी पण मला तिच्या मनातले सांगण्यासाठी जणू संधीची वाट बघत होती. “मावशी तुम्ही विचारले होते ना माझे लग्न झाले आहे का? तर, हो माझे लग्न झाले आहे. माझा नवरा सरकारी ऑफीसमध्ये नोकरी करतो. घरची परिस्थितीपण चांगली आहे. सासु सासरे, दिर जाऊ आहे. दोन नणंदा आहेत. दोघींचीही लग्न झाली आहे. त्या त्यांच्या घरी असतात. माझे लग्न होऊन चार महिने झाले होते. एके दिवशी माझी आई आणि माझा मामा माझ्या सासरी आले होते. माझ्या सासऱ्यांना मला माहेरी पाठवा असे सांगत होते. नक्की काय झाले हे आजदेखील मला माहित नाहि. पण माहेरी पाठवण्यावरुन त्यांची भांडणे झाली. त्यादिवशी आई आणि मामा परत गेले पण दुसऱ्या दिवशी दोघेही मोठ्या मामाला बरोबर घेऊन आले होते आणि तिघांनी मिळून माझ्या सासरच्या लोकांशी खूप भांडण केले. अगदी शिवीगाळ, मारहाण केली. शेवटी माझ्या सासुने मला त्यांच्याबरोबर माहेरी पाठवून दिले. आता तर मला असे वाटते की ह्या तिघांनी जाणूनबुजून माझ्या सासरकरांशी भांडण उकरुन काढले असावे.”
“अगं पण सख्खी आई असे का करेल? ती मंडळी तुझ्याबरोबर चांगली वागत नव्हती का? ते तुझ्या आई वडिलांकडे काही हुंडा वगैरे मागत असतील म्हणून तुझा छळ होऊ नये ह्यासाठीसुद्धा भांडण झाले असेल. तू काही विचारले नाहीस का?” मी म्हणाले.
“विचारले ना मावशी, पण ते मला काय उत्तर देणार? तुला काही कळत नाही. आम्ही केले ते योग्य आहे, तु मुकाट्याने रहा असे उत्तर मिळाले. आजच्या काळातही आमच्या जातीत मुलींना काही बोलण्याची मुभा नाही. त्यांना कसलाही अधिकार नाही.” बिचारी अगदी हताशपणे बोलत होती. ” माझ्या आईला दोघी मुली आणि एक मुलगा आहे. मी सगळ्यात लहान आहे. बहिण माझ्यापेक्षा वयाने खुप मोठी आहे. तिची मुले पण मोठी मोठी आहेत. भावाचे लग्न झाले आहे. त्याच्या बायकोबरोबर हिचे कधी पटले नाही. कायम भांडायची, शेवटी त्याने त्याचा वेगळा संसार थाटला. तो आता मुंबईला असतो. माझे वडील माझ्या लग्नानंतर आजारी पडले. आता खर्चापाण्याला पैसे कमी पडतात. मग जावयाचा पायगुण वाईट असे भांडवल करुन सासरच्या लोकांशी भांडण करुन ती मला इथे घेऊन आली. आम्ही दोघी मिळून काम करतो तेव्हा भरपूर पैसे मिळतात. तेवढ्यासाठीच तिने हा खेळ रचला. खरेतर माझे वडील पण सरकारी नोकरीत आहेत. त्यांना औषध पाण्याचा खर्च देखील मिळतो.” आणि बोलता बोलता रडवेली झाली.
“अगं पण तुझी भावंडे, वडील कोणी काहीच बोलले नाही तिला? ” मी विचारले.
“कोण बोलणार? बहिणीने विचारले होते. तिला सांगितले आमच्याकडे हुंडा मागतात, तु पैसे देतेस? ती बिचारी गप्प बसली. भाऊ तर काय तो कुठल्याही भानगडीत पडत नाही. स्वतःचा संसार कोण मोडेल?
आणि वडील, त्यांच्या अंगात तर ताकदच नाही. माझे नशीब म्हणायचे दुसरे काय? ” बोलता बोलता तिची घरी जाण्याची वेळ झाली होती. ती उठून पटापट निघून गेली. मी मात्र विचार करत होते, ह्या मुलीला आपण काही मदत करु शकतो का? त्या रात्री मला नीटशी झोपदेखील आली नाही. दुसऱ्या दिवशी ती परत कामावर आली तेव्हा मी तिला विचारले, “रेखा तु म्हणतेस, तुझ्या सासरची माणसे चांगली आहेत. पण तुझा नवरा कसा आहे गं? काही व्यसन वगैरे आहे का? ”
“नाही हो मावशी, कसलेही व्यसन नाही, असे काही असते तर मला नक्कीच दिसले असते नाही का? तो खुप चांगला आहे. चार महिन्यात एकदा देखील तो माझ्याशी वाईट वागला नाही.” ती म्हणाली.
” सासरी परत जावे असे तुला वाटत नाही का गं? ” मी विचारले.
” नाही कसे? खुप इच्छा आहे परत जाण्याची पण माझी आई तिकडे इतके भांडण करुन आली आहे की ते लोक आता मला परत त्यांच्या घरातसुद्धा घेणार नाहित. तरी सुद्धा त्या लोकांनी तीन-चार वेळा समझोता करायला माणूस पाठवला होता. पण आईने त्याला हाकलून लावले. आता तर त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.” बोलता बोलता तिचे डोळे पाण्यांनी भरुन आले होते. तिच्या आवाजात तिच्या जीवाला होणाऱ्या वेदना जाणवत होत्या.
” तु गप्प का बसतेस? आईला सांगना मला सासरी जायचे आहे.” मी तिला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करत बोलले. तशी ती नुसतीच बघून हसली. तिची नजर आणि तिचे हसणे सगळे काही सांगून गेले. “अगं रेखा, जीवनात काही समस्या अशा येतात की त्यांना आपण वाचा फोडणे जरुरी असते. तुला ते शक्य नसेल तर मी प्रयत्न करुन बघू का? ” मी म्हणाले.
“नको मावशी, माझी आई तुम्हाला त्रास देईल” असे म्हणत ती बिचारी काम करायला निघून गेली. तिच्याकडे बघून फार वाईट वाटत होते. आजच्या काळातही अशा गोष्टी घडू शकतात याची कल्पना करणेपण कठीण होते. सख्खी जन्मदाती आई मुलीचा संसार सवतःच्या गरजेसाठी मोडू शकते हे किती भयानक आहे. आजकालच्या युगात आपण एकीकडे परिवर्तनाची भाषा बोलतो. बेटी बचाओ, बेटी पढाओ चे नारे लावतो तिथे असे प्रसंग बघून मन हादरुन गेले. स्त्री जन्माच्या बाबतीत किंवा स्त्रियांचा विकास या बाबतीत आपण अजूनही मागासलेले आहोत याचे हे जागतेजोगते जिवंत उदाहरण आहे. खुप विचार केला आणि निश्चय केला, या मुलीचा संसार वाचवण्यासाठी शक्य होईल तितके प्रयत्न करायचेच.
पुढील आठवडाभर मी तिला एकटीला गाठण्याचा प्रयत्न करत होते. पण सतत तिची आई बरोबर असल्यामुळे ती माझ्या नजरेला नजरही देत नव्हती. माझ्याकडे तिच्या सासरची काहीच माहिती नव्हती, मी तिला मदत तरी कशी करणार होते? अशातच हळुहळू किमान महिना तरी निघून गेला असेल. एक दिवशी घरात भांडी लावता लावता तिने हळूच आईची नजर चुकवून एक कागदाचा तुकडा पटकन माझ्या हातात कोंबला आणि ती परत कामाला लागली. त्या मायलेकी काम करुन गेल्यावरच मी तो कागद उघडला. त्यात तिने तिच्या सासुरवडीचा पत्ता, सासऱ्याचे नाव आणि नवरा काम करतो तिथला पत्ता असे लिहलेले हाते. ते बघून मला फार आनंद झाला. एक तर ती शिकलेली होती आणि दुसरे महत्वाचे म्हणजे तिला तिच्या घरी जाण्याची इच्छा आहे ह्याचा तो पुरावा होता. आणि तिच्या हस्ताक्षरातला असल्यामुळे मी तो तिच्या नवऱ्याला दाखवू शकणार होते. रात्री जेवताना मी हा सगळा प्रकार ह्यांच्या कानावर घातला आणि आपण दोघे मिळून ह्या मुलीच्या सासरी जायचे असे आम्ही दोघांनी ठरवले.
रविवारी आम्ही ड्रायव्हरला बरोबर घेतले आणि तिच्या गावी पोहोचलो. त्यांचे घर शोधत शोधत तिथे पोहोचलो. आम्ही त्यांच्याच घरी आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला घरात नेले. घरी रेखाचे सासू, सासरे आणि जाऊबाई होती. नवरा बाहेर गेला होता. खरोखर घर व्यवस्थित होते. आणि रेखाच्या आईच्या तुलनेत तिच्या सासरची माणसे खुपच सुशिक्षित वाटली. आम्ही लगेचच विषय छेडला होता. आमच्या येण्याचे कारण कळल्यावर प्रथम ती सगळी मंडळी गप्पच झाली. पण नंतर तिच्या सासऱ्यांनी सगळा घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. ते सांगत होते, “रेखाच्या आई रेखाला माहेरी नेण्यासाठी आल्या होत्या. अगदी तोंडावर सण आला होता म्हणून आम्ही म्हणालो तिला पंधरा दिवसानंतर पाठवतो. आठवड्याभराने तुम्ही तिला परत पाठवा. पण तिच्या आईला ते पटले नाही. तिने इथे भयंकर कांगावा केला. आम्ही रेखाला खुप छळतो, तिला माहेरी पाठवत नाही वगैरे उलट सुलट गोष्टी रेखाच्या मामाला सांगितल्या आणि भरपूर भांडण केले. शेवटी आम्ही रेखाला त्यांच्याबरोबर पाठवून दिले. आणि कहर म्हणजे आता दोन महिन्यापूर्वी रेखाला घटस्फोट हवाय असा निरोप पाठवला होता. त्यामुळे आम्ही आत्ताच घटस्फोटासाठी अर्ज केलाय.”
आम्ही नवरा बायकोने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले होते आणि त्यांना समजावून सांगितले की या प्रकरणात रेखाची काहीच चूक नाही. तिची सासरी नांदण्याची इच्छा आहे. त्याचा पुरावा म्हणून तिने दिलेला कागद त्यांना दाखवला. त्यामुळे ते थोडे नरमले होते. कुठेतरी त्यांना सुद्धा रेखाचा दोष नसावा हे पटले होते. पण तिचा नवरा घरी नसल्यामुळे ते ठामपणे काहीच बोलू शकले नव्हते. जवळजवळ आम्ही तासभर त्यांच्या घरी होतो. लोक अगदी व्यवस्थित वाटले होते. शेवटी तिच्या सासऱ्यांनी आमचा फोन नंबर घेतला होता आणि म्हणाले होते, “आम्ही आमच्या मुलाबरोबर बोलतो. त्याचाही विचार जाणून घेतो आणि तुम्हाला फोन करतो.”
त्यानंतर आठवडा उलटून गेला तरी त्या मंडळींचा काही फोन आला नव्हता. रेखाच्या बरोबर सतत तिची आई असल्यामुळे काही बोलणे होत नव्हते. अखेरीस त्यांचा एके दिवशी फोन आला, “आम्ही तुम्हाला कधी भेटायला येऊ?” जरा विचार करुन मी त्यांना ह्या मायलेकी कामावरुन गेल्यानंतरची म्हणजे थोडी उशिराचीच वेळ दिली होती. ठरल्याप्रमाणे ते लोक आले होते. ते अतिशय समजूतदापणे वागले. तिचा नवरा तर खुपच समंजस वाटला. तिचे त्या कागदावरचे अक्षर बघून तो अतिशय खुश झाला होता. कारण त्यामुळे त्याला पहिल्यांदा रेखाचा विचार कळला होता आणि रेखाला घरी यायची इच्छा आहे तर घटस्फोटाचा अर्ज मी मागे घेईन हे त्याने आनंदाने सांगितले.
आता सगळ्यात मोठा प्रश्न होता रेखाला घरी कसे पाठवायचे? तिच्या आई सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. तिने रेखाचे बाहेर पडणे बंद केले असते. म्हणून खुप विचार करुन आम्ही ठरवले की आम्ही रेखाला त्यांच्या घरी पोहोचती करायची. ह्या गोष्टीला ते तयार झाले पण त्यांनी एक अट घातली की रेखाने प्रथम पोलीस चौकीत लिहून द्यायचे, “ती स्वईच्छेने सासरी रहायला आली आहे.” आम्ही त्यांच्या या विचाराला संमती दिली आणि असे सगळे ठरवून ते परत गेले.
दुसऱ्या दिवशी मी रेखाला सारखी खुणावत होते, तु माझ्याशी बोल पण आई समोर ती काहीही करु शकत नव्हती. अशा परिस्थितीत आणखी दोन दिवस निघून गेले. शेवटी मी सुद्धा तिचाच game खेळला. एका कागदावर लिहून मोका बघून गुपचूप तो कागद तिच्या हातात दिला. मला वाटले होते की ही मुलगी आता कदाचित घाबरुन मागे फिरेल. आता पुढे येणार नाही. पण झाले उलटेच. तो कागद वाचून की काय कोण जाणे तिला खुपच हिम्मत आली होती. दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या आई समोर मला विचारले होते. मावशी तुम्ही रविवारी बाजारात जाणार आहात का? माझे थोडे काम आहे, मी तुमच्याबरोबर येईन. तिच्या आईने तिला बरेच प्रश्न विचारले आणि ह्या पट्टीने तिला भरपूर व्यवस्थित उत्तरे दिली. त्या दिवशीची रेखा अगदीच वेगळी होती. शांत गरीब शेळीसारखी असणारी रेखा एकदम शेर झाली होती.
‘समझनेवाले को इशारा काफी होता है’, म्हणतात ना तसे तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळला होता.
आणि रविवार उजाडला. बाजारात म्हणून निघालेल्या रेखाला आम्ही तिच्या घरी घेऊन गेलो होतो. त्यापूर्वी पोलीस चौकीत ओळखीचे इन्स्पेक्टर होते त्यांना आम्ही पूर्ण कल्पना दिली होती आणि त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्ण सहाय्य करण्याचे ठरविले होते. तिच्या घरी गेल्यावर तिथे त्या लोकांनीही आजुबाजूचे चार लोक गोळा करुन त्यांच्या आणि पोलिसांच्या साक्षीने रेखाला घरात घेतले होते. त्यांच्या घरी तर आनंदी आनंद झाला होता.
आम्ही दुपारपर्यंत घरी न पोचल्यामुळे तिच्या आईने, मामाने सगळीकडे शोधाशोध सुरु केली होती. संध्याकाळपर्यंत बहुतेक काय घडले असावे हे त्यांच्या लक्षात आले होते. ते पोलिस चौकीत गेल्यावर पोलिसांनी त्यांना त्यांची मुलगी कोठे गेली हे सांगितले.
तुमची मुलगी वीस वर्षाची असल्यामुळे ती सज्ञान आहे. तिने स्वतः इथे लिहुन ठेवले आहे, की ती राजीखुषीने तिच्या सासरी नांदायला जात आहे. आता तुम्ही काही करु शकणार नाही हे पण सांगून टाकले होते.
हे समजल्यावर मात्र त्यांनी आमच्या घरी येऊन भरपूर तमाशा केला. त्यांच्या मुलीचे काही बरेवाईट झाले तर आम्हाला जेलमध्ये घालू असेसुद्धा धमकावले होते. पण आम्ही घाबरलो नाही. रेखाच्या सासरी तिची आई भांडण करायला गेली तेव्हा रेखानेच समोर येऊन आपल्या आईला ठणकावून समज दिली. त्यामुळे तिची आई नाईलाजास्तव परत निघून आली होती. रेखा मात्र सासरी व्यवस्थित राहिली. तिच्या सासरच्या मंडळींनी तिला सासर आणि माहेर दोन्ही घरचे प्रेम दिले. आज तिला, तिच्या बाळाला आणि तिच्या नवऱ्याला एकदमच बघून मी फारच खुष झाले होते. आपल्या हातून एक संसार जोडला गेला याचे पूर्ण समाधान झाले होते. हा एक आगळाच आनंद होता.
कुठलीही गोष्ट तोडणे फार सोपे असते. तुटलेली गोष्ट जोडणे फार कठीण असते आणि हा तर संसार होता, कोणीतरी दोन जिवांची स्वतःच्या स्वार्थसाठी जाणूनबुजून केलेली ताटातूट होती. पण परमेश्वरकृपेने सगळे व्यवस्थित झाले होते.
ज्या आईनी, मायेच्या माणसांनी मुलीला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा त्या मुलीच्या सुखदुःखाच्या वेळी भिंतीसारखे उभे राहणे जरुरी आहे त्याच माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तिला दुःखात लोटण्याचा हा केलेला प्रयत्न म्हणजे समाजातील एका दारुण परिस्थितीचे महाभयंकर चित्र समोर आले होते. अतिशय अस्वस्थ करणारा, मनाला हादरून टाकणारा हा प्रकार होता.
कधी बदलेल हा समाज?
कधी मिळेल स्त्रीला खरे स्वातंत्र्य?
कधी सुटका होईल तिची या गुलामगिरीतून? समाजाचे खरेच परिवर्तन होणार का?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त येणारा काळच देऊ शकतो आणि आपण फक्त त्याची प्रतिक्षाच करु शकतो.

Author