एक होती वेडी चिऊ…

एक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती.



एक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती.

काय झालं की तिच्या घरात आधी फक्त ती दोघंच होती. म्हणजे आपली ही चिऊताई अन् तिचा तो चिमणोबा. ती होती अगदी नाजूक अन् तो होता गब्बूराम. दोघं खूप मजेत होते. एकमेकांच्या खूप प्रेमात होते. मोठ्या लिंबाच्या झाडावर छोटंसं घरटं होतं त्यांनी बांधलेलं. त्याचं सगळं काम दोघं मिळूणच करायचे. मिळून बाहेर जायचे. काडी काडी शोधून आणायचे. थकल्या भागल्यावर एकमेकांना चारा भरवायचे. हळूहळू बऱ्याच काड्या जमल्या. मग त्यांनी एक सुंदरसं छोटं घरटं तयार केलं. मग आपल्या चिऊताईला एकदम बाळ हवंसं वाटायला लागलं. एक नाही काही. खूप पिल्लं हवी होती तिला. ती लागली चिमणोबाच्या मागं. अगदी हट्टच धरला म्हणा ना! त्याला मात्र वाटलं की एवढी काय घाई आहे? आता कुठं बांधलेलं घरटं अगदी आपल्यापुरतंच आहे. त्यात आपले पिल्लं कशी राहणार? याहून मोठं घरटं बांधावं लागेल. तो तिची समजूत घालू लागला; पण छे! ती ऐकून घ्यायला तयारच नव्हती मुळी. चांगली रुसून बसली. अगदी बोलेनाशीच झाली. शेवटी त्याने हार मानली. चिऊताईच्या मनासारखं झालं. तिनं, एक नाही, दोन नाही, चांगली चार अंडी घातली. खूप समाधानानं ती पिल्लांची वाट पाहू लागली. चिमणोबा मात्र चिंतेत पडला. ग़वसाळा आलाय जवळ. जास्तीचा चिमणचारा साठवून ठेवायचा कुठं? शेजारच्या कावळे अन् घारींपासून कसं वाचवायचं या अंड्यांना अन् नंतर बघून चिऊताई हसू त्यातून येणाऱ्या चिमण्या जीवांना? त्याची काळजी लागली. त्याची समजूत काढू लागली, की अरे का चिंता करतोस? जो चोच देतो तोच चाराही देतो हे माहीत नाही का तुला? आणि हे बघ जो जन्माला घालतो तोच रक्षणही करतो बरंका ! इथं ‘तो’ म्हणजे तू किंवा मी नाही तर ‘तो’ म्हणजे बाप्पा ! चिऊताई आभाळाकडे बाप्पाच्या दिशेनं अगदी श्रध्देनं पाहायची. तिचा उत्साह व आशावाद पाहून चिमणोबानं शांत बसायचं ठरवलं. आपली चिंता तो मनातच ठेवू लागला. शेजारच्या फांद्याफांद्यावर त्यांच्या बाळांच्या येण्याची बातमी पसरली. कुणाला आनंद झाला. कुणाला असूया वाटली. कावळे अन् घारींनी परस्परांना चुकवत घरट्यावर डोळा ठेवण्याचा निश्चय केला.

चिऊताई मात्र सगळ्यापासून अगदी अलिप्त होती; परंतु स्वत:तच मग्न ! हळूहळू दिवस भरले. अंड्यातून तिची पिल्लं बाहेर आली. ती गोजिरवाणी रूपं बघून चिऊताई धन्य धन्य झाली. अंड्यातून बाहेर आल्या आल्या पिल्लांनी चोची वासून चिवचिवाट करायला सुरूवात केली.
चिमणबाबानं आधीच जमवून ठेवलेले कोवळे तंतू, दाणे त्यांना भरवले. पिल्ल शांत झाली. घरट्याची साफसफाई करून दोघं घरट्यातच बसून राहीली. दोघांपैकी एकानं घरट्यातच थांबायचं व एकाने बाहेरची कामं करायची असं त्यांनी ठरवून टाकलं. डोळ्यात तेल घालून ती दोघं पिल्लांचं रक्षण करू लागली. जोपर्यत चिमणी बाळं उडू शकत नव्हती तोपर्यंत ते करणं गरजेचच होतं.

आपली चिऊताई आता चिऊआई झाली. पिल्लांचं करण्यात वेळ कुणीकडे निघून जाईहे देखील तिला समजत नसे. स्वतःच्या कष्टांचे तिला भानही नसायचे. हळूहळू चिमणी बाळं घरट्यातून बाहेर डोकाऊ लागली. पंख हलवू लागली. त्यांच्या आई-बाबानं त्यांना शिकवायला सुरूवात केली.

दाणे कसे टिपायचे. किड्या मुंग्यांवर कसा नेम धरायचा, कसे उडायचं, दुष्ट कावळे अन् घारींपासून कसं चार हात लांब राहायचं, सगळं त्यांनी पटकन शिकून घेतलं. बाळं हुशारच होती. त्यांची कामं ती स्वतंत्रपणे करू लागली.

इकडे चिऊआईच्या मनात पुन्हा एक वेगळा विचार आला. अजून थोडं मोठं घरटं बांधायला हवं म्हणजे साऱ्यांना ऐसपैस जागा मिळेल. चिमणोबानं तिच्या बेताला होकार दिला. ती बाळांना म्हणाली, बाळांनो तुम्ही आता मोठे झालात. हे घरटं आपल्याला लहान होतंय. आपण एक मोठं घरटं बांधू. तुम्ही पण जरा जास्त चकरा मारून चांगल्या चांगल्या काड्या जमवा बरं का. बाळं अर्थातच हुशार होती. ती एकत्र बसली. त्यांनी चर्चा केली. काही तरी ठरवलं व आईला म्हणाली, अगं आई, आता नाही तरी. घरटं बांधायचंच ठरवलं आहे तर एकच मोठं कशाला? आम्ही ठरवलंय की, आपापली स्वतंत्र घरटी बांधावीत. या घरट्यात तुम्ही दोघं राहा. आम्ही आमच्या नव्या घरट्यात जाऊ. चिऊआईला एकदम धक्काच बसला. खूप वाईट वाटलं. चिमणोबाजवळ खूप रडली. त्यानं तिला धीर दिला. तो म्हणाला, बरोबरच आहे की त्यांचं. त्यांना पण कधी तरी बाळं होणारच ना, जाउदे त्यांना. चिऊआईनं स्वतःला सावरलं, आपल्या पिल्लांना स्वतंत्र घरटी बांधायला त्या दोघांनी खूप मदत केली. बाजूच्याच झाडावर त्यांची चार घरटी तयार झाली. ते स्वतंत्र राहू लागले. आपापल्या आवडीनं त्यांनी चिमण्या आणल्या, त्यांचे संसार सुरू झाले. त्यांच्या सुखात आनंद मानायला चिऊआई तयारच होती की. कधीकधी आठवण आली की ती एकेका पिलाकडे जाऊन यायची. त्यांना मात्र मूळ घरट्याकडे यायला वेळच नसायचा. ती भेटायला गेली की खूप गोड गोड चिवचिव व्हायची; पण चिऊआईला वाटायचं की कुणीतरी म्हणावं, राहा ना आई एक-दोन दिवस माझ्याकडे पण तसं व्हायचं नाही. कारण खरंच त्यांची घरटी लहानच होती. अगदी त्यांच्यापुरतीच. मग मन तरी मोठं असून काय उपयोग? चिऊआई भेटून आली की उदास व्हायची. फांदीवर बसून आसवं गाळायची.

होता होता अजून काही दिवस गेले. चिऊआई व चिऊबाबा आता थकू लागले. पंखातलं बळ कमी होऊ लागलं. पाय कापायचे. खाद्य टिपताना चोचीचा नेम चुकायचा, कसं तरी स्वत:चं पोट भरून ते दिवस कंठू लागले. त्यांना वाटायचं आपल्या एका तरी बाळानं यावं. आपली विचारपूस करावी. आपल्यासाठी चारा, दाणा पाणी आणावं, आपल्याला भरवावं; पण खरंच त्यांना वेळच मिळत नव्हता. त्यांच्या घरट्यात त्यांची बाळं येऊ घातली होती. त्यांच्याही जबाबदाऱ्या वाढत होत्या. शेजारचे काऊदादा, घारूताई राघूदादा यांच्याही या दोघांची अवस्था लक्षात आली. त्यांना या दोघांची दयाच वाटू लागली. त्यांनी यांच्याशी मैत्री केली. स्वतःचा घास ते यांना भरवू लागले. चिऊताई राघूदादाशी अगदी मनमोकळं बोलत असे. तेवढंच तिला हलकं वाटे. चिमणोबा या बाबतीत काहीसा तटस्थ होता. तो कुणाच्याच विरोधात बोलायचा नाही.

एके दिवशी राघूदादाला राहवले नाही. तो चिऊताईला सांगून तिच्या बाळांकडे गेला. त्यानं त्यांना सर्व समजाऊन सांगितलं. त्यांनी थकलेल्या आई-बाबाकडे लक्ष द्यायला हवं असंही समजावलं; पण काही उपयोग झाला नाही. त्या बाळांचं असं म्हणणं पडलं की अशी वेळ कधी ना कधी येणारच होती. या दिवसांसाठी त्यावेळी आधीच बेगमी करून ठेवायला हवी होती. आमचे लाड करण्यात सर्व उडवून लावलं. आता आम्ही तरी काय करणार? आम्हालाही आमची घरटी, आमची बाळं आहेतच की. राघूदादा निराश झाला. परत आला. चिऊ आतुरतेनं त्याची वाट पाहत होती. राघूदादा काहीच बोलेना तसं तिच्या सारं लक्षात आलं. डोळ्यातून अश्रू टपटप पडू लागले. राघूदादा आपल्या मिठ्ठास वाणीनं तिची समजूत घालू लागला. म्हणाला, हे बघ चिऊताई, तू वेडी का खुळी? अगं मुलाबाळात इतकं गुंतवून घ्यायला आपण माणसं आहात का? आपण तर पाखरं आहोत. तू नाही का उडायला शिकल्याबरोबर वेगळी झालीस? राहिलीस का तुझ्या आईच्या घरट्यात? अन् हे चिमणोबा ते नाही का तुझी भेट झाल्याबरोबर त्यांचे घरटे सोडून आले? अगं हे असंच नसतं का आपल्यात? कसं काय विसरलीस तू? हं आता आलंय बघ माझ्या लक्षात. सांगू का तुला? हा सगळा या कॉलनीत राहण्याचा परिणाम आहे. या झाडावरून अन् त्या लाईटच्या तारेवरून समोरच्या घरट्यात पाहत असतेस ना सारखी ! त्यांच्या घरातल्या गोष्टीत चोच खुपसून माहिती करून घेतेस आणि शिवाय घरातल्या टी.व्ही. सिरियल्सदेखील पाहतेस त्याचेच आहेत हे परिणाम तुझ्यावर झालेले. घरात अन् टी.व्ही.त असतं काय गं दुसरं? सगळ्या माणसांच्याच तऱ्हेवाईक गोष्टी, सारखे हेवेदावे, भांडणं, रुसवेफुगवे, कपट कारस्थान, स्वार्थीपणा, दुःख, रडणं आणि सारखं रडणंच. त्यांना बघता बघता त्यांचा स्वभावही उचललास की तू ! अगं ते आता आपल्यासारखं वागायला बघताहेत अन् तू कुठं त्यांच्यासारखं व्हायला बघतेस? जरा त्या जगातून बाहेर ये. आपल्या जगात, पाखरांच्या जगात ये. चल, हे घरटं सोडून दे. या कॉलनीत नकोच राहायला. दूरच्या रानात जाऊन नवीन घरटं बांध. अगदी छोटंसं तुमच्या दोघांपुरतं. सारखं कुणाकडे जाऊ नका, कुणाला बोलावू नका. कुणात गुंतू नका. दोघंच राहा ना मजेत.

राघूदादाचं बोलणं चिमणोबा डोळे मिटून मान डोलवत ऐकत होता. चिऊताईलाही ते पटलं. खरंच की, मी माणसासारखाच विचार करीत होते. आम्ही त्यांना जन्म दिला, मोठं केल, सांभाळलं. आता त्यांनी आम्हाला सांभाळलं पाहिजे. हे माणसासारखे हिशेब मी का मांडू लागली होती? त्यांचं जग वेगळं, आमचं पाखरांचं वेगळं. तिचं दु:ख निवळलं. स्वत:लाच टपली मारून घेतली खुदकन हसली. राघूदादाकडे बघत तिनं होकारार्थी मान हलवली. चोच फाकवून प्रसन्न हसली. सगळं मोकळं मोकळं झालं. तिघंही शुभस्य शीघ्रम म्हणत रानाच्या दिशेनं झेपावली.

Author