एखाद्या पदावर असलेल्या काही व्यक्तींच्या संदर्भात एक सारख्या घटना घडतात आणि त्या घटनेची कुठेतरी आपणही संबंधित असतो. हा एक निव्वळ योगायोग असतो. मात्र तरीही आपलाच संबंध येऊन हे असे का घडावे हा प्रश्न मनात येतो. आज महाराष्ट्रातील लागोपाठ आलेल्या तीन मुख्यमंत्र्यांच्या बाबत घडलेल्या आठवणी मी शेअर करायचं ठरवले आहे.
१९७८ ते १९८३ या काळात महाराष्ट्रात ३ मुख्यमंत्री झाले. या तिघांनाही दोन वर्षाच्या आत पद सोडावे लागले होते. विशेष म्हणजे या तिघांनीही आपला विदर्भातील पहिला दौरा अकोला येथून सुरू केला होता आणि त्याच्या वृत्तचित्रणासाठी मला उपस्थित राहावे लागले होते.
१९७८ च्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर झाले. वसंतदादा पाटील यांना सत्तेतून बाजूला करत शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी शपथ घेतली आणि अवघ्या तीन-चार दिवसातच विदर्भातील अकोला शहरात शहराबाजूने वाहणाऱ्या मोरणा नदीला जोरदार पुर आला. संपूर्ण गावात हाहा:कार माजला होता.
दुसऱ्या दिवशी सुद्धा पुराचा जोर ओसरला नव्हता. त्या दिवशी मला दुपारीच मुंबई दूरदर्शन कडून वृत्त संपादक डॉ. गोविंद गुंठे यांचा फोन आला. त्यांनी मला ताबडतोब अकोल्याला जाऊन पुराचे चित्रीकरण करून दूरदर्शनसाठी पाठवावे अशी सूचना दिली. हा फोन आला त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजत होते. अकोल्याला जायला रात्री दहाची दादर एक्सप्रेसच उपलब्ध होती. मग मी त्याच गाडीने रात्री दहाला निघालो. पहाटे तीनच्या सुमारास अकोल्याला उतरलो आणि गावातच असलेल्या माझ्या चुलत भावाकडे पोहोचलो. रात्री तिथे थोडा वेळ झोप घेऊन सकाळी सात वाजताच उठून तयार झालो. त्यावेळी तिथे जवळच शांताराम सरदेशपांडे नामक पत्रकार राहत होते. त्यांना फोन करून सहज विचारले, तेव्हा त्यांनी आठ वाजता मुख्यमंत्री शरद पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः येत आहेत अशी माहिती दिली. हे कळताच मी सुखावलो. कारण फक्त पुरग्रस्त भागाचेच नव्हे तर मुख्यमंत्री भेटीचेही चित्रीकरण करायला मिळणे हा माझ्यासाठी बोनस होता. लगेच तयार होऊन मी सर्किट हाऊसला पोहोचलो. मी पोहोचलो तितक्यातच पवार तिथे येऊन पोहोचले होते. मी लगेच जिल्हा माहिती अधिकारी सुधाकर धारव यांना गाठले आणि त्यांच्या गाडीत बसून पवारांच्या दौऱ्यात सोबत फिरू लागलो. आठ ते साडेनऊ पवारांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली. अकरा वाजता ते विशेष विमानाने मुंबईला रवाना होणार होते. बैठक सुरू झाल्याचे काही शॉट्स घेतले आणि उर्वरित पूरग्रस्त भागाचे चित्रीकरण करायला मी गाडी घेऊन रवाना झालो. साडेदहापर्यंत चित्रीकरण करून आम्ही विमानतळ गाठले. तिथे पवारांचे जनसंपर्क अधिकारी वसंत खेर यांच्याजवळ चित्रीकरणाच्या फिल्म्स दिल्या आणि या दूरदर्शनला पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. मग खेर साहेबांनी माझी मुख्यमंत्र्यांशी ओळख देखील करून दिली. पवारांची मुख्यमंत्री झाल्यावर ही पहिलीच विदर्भ भेट होती आणि ती अकोल्यात सुरू झाली होती. त्यानंतर ते अनेकदा विदर्भात आले आणि दरवेळी मी चित्रीकरणालाही गेलो होतो.
सुमारे १९ महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी १९८० मध्ये इंदिरा गांधींनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त केली. परिणामी पवारांचे मुख्यमंत्रीपद देखील गेले. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि जून १९८० मध्ये बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर सर्वप्रथम ऑगस्ट १९८० मध्ये विदर्भात आले, ते थेट अकोल्यालाच. ते अकोल्याहून वाशिमला जाणार होते आणि तिथून वाशिम जिल्ह्यातील गहुली या वसंतराव नाईक यांच्या जन्म गावी नाईकांच्या पुतळ्याचे अनावरण करायला जाणार होते. त्यांचे या दौऱ्याचे चित्रीकरण करायलाही दूरदर्शनने मलाच सूचना दिली होती. त्याप्रमाणे मी रात्री दादर एक्सप्रेस ने निघून पहाटे अकोल्याला पोहोचलो. तिथे थेट रेस्ट हाऊसलाच जाऊन थांबलो आणि तयार होऊन सकाळी सात वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर अंतुले यांच्या स्वागताचे चित्रीकरण करायला पोहोचलो. तिथून मग सर्किट हाऊस, मग वाशिमचा कार्यक्रम आणि नंतर गहूलीचा कार्यक्रम असा आटोपला. गहुलीचा कार्यक्रम संपताच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अंतुलेंचे जनसंपर्क अधिकारी रमेश वाबगावकर यांच्याजवळ चित्री करणाच्या फिल्मस दिल्या आणि नागपूरची वाट धरली. यानंतर अंतुले देखील जेमतेम एकोणवीस महिन्यात महिनेच मुख्यमंत्री होते. त्यांनी स्थापन केलेल्या इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या मिळवण्याच्या प्रकरणात झालेल्या सिमेंट घोटाळ्याने त्यांना अडचणीत आणले आणि त्यांना जानेवारी १९८२ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. अंतुले मुख्यमंत्री असतानाही ते नागपुरात बरेचदा आले होते आणि त्यांच्या प्रत्येक दौऱ्याचे चित्रीकरण करायला मी सोबतही जात होतो. त्यांची कारकीर्द देखील अवघ्या १९ महिन्यातच संपली.
जानेवारी १९८२ मध्ये अंतुले गेल्यावर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी १९८२ च्या पहिल्याच आठवड्यात अकोला येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे चित्रीकरण करून दूरदर्शन आणि फिल्म्स डिव्हिजन या दोघांनाही पाठवावे अशा सूचना मला आल्या होत्या. त्यानुसार मग मी अकोल्यात पोहोचलो आणि सकाळीच संमेलनस्थळी जाऊन चित्रिकरणाची तयारी केली. संमेलनाचे चित्रीकरण केले नंतर भोसले यांचे अकोल्यात आणखी दोन कार्यक्रम होते. त्याचेही चित्रीकरण केले आणि त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांकडे फिल्म सोपवून मी संमेलनाचे पुढले चित्रीकरण करायच्या मागे लागलो.
बाबासाहेब भोसले यांचे मंत्रिमंडळ एक वर्ष टिकले. जानेवारी १९८३ मध्येच त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. आता दादा तरी दोन-तीन वर्ष टिकावे अशी अपेक्षा सर्वच सुजाण नागरिक करत होते.
त्याचवेळी माझ्या मनात सहजच विचाराला आला महाराष्ट्राचे हे तीनही मुख्यमंत्री विदर्भात पहिल्यांदा अकोल्यात आले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करायला मला जावे लागले. या तिघांनाही जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहता आले नाही. म्हणजे मुख्यमंत्री अकोल्याचा पहिला कार्यक्रम आणि वृत्तचित्रणाला अविनाश पाठक हा काही विपरीत योग वगैरे तर नाही ना आणि त्या विपरीत योगातील पापग्रह मी तर नाही ना अशी शंका येत होती. आणि हे इजा बिजा तिजा असा प्रकार झाला आहे. त्यामुळे मग आता वसंतदादांनी तरी अकोल्यात येऊ नये आणि ते अकोल्यात कार्यक्रमाला आले ही तरी मला वृत्तसंकलनासाठी जावे लागू नये म्हणजे हे मंत्रिमंडळ तरी महाराष्ट्रात टिकेल असा विचार मी करू लागलो. योगायोगाने महिनाभरातच वसंतदादांचा अकोल्यातच कार्यक्रम ठरला. त्यांचाही हा विदर्भातील पहिलाच कार्यक्रम राहणार होता. मला दूरदर्शनकडून अकोल्याला जाण्यासाठी सूचना देखील आली. मात्र ऐनवेळी नागपुरातच केंद्रीय मंत्री वसंत साठे आणि एन के पी साळवे यांचे कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे मग मला अकोल्याला न जाता नागपुरातच थांबावे असे कळविण्यात आले. त्यामुळे अकोल्याला न जाता मी नागपूरातच राहिलो. वसंतदादांच्या अकोला दौऱ्याचे चित्रीकरण करायला मग दूरदर्शनने जळगाव वरून छायाचित्रकार पाठवला होता.
योगायोगाने वसंतदादांचे मंत्रिमंडळ १९८५ पर्यंत टिकले. १९८५ जानेवारीतील लोकसभा निवडणुका आणि मार्च १९८५ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या दादांच्याच नेतृत्वात पार पडल्या. नंतरही जवळजवळ वर्षभर दादा मुख्यमंत्रीपदावर राहिले. त्यामुळे मग मी देखील सुटकेचा श्वास सोडला. लागोपाठ तीन मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पहिला दौरा अकोल्याला करणे त्याच्या वृत्तचित्रणाला मीच जाणे आणि दोन वर्षा वर्षांच्या आत त्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले हा प्रकार आता तरी थांबला होता. इजा बिजा तिजा झाल्यावर किमान चौथे तरी मुख्यमंत्री टिकले होते.
कालांतराने महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलाढाली झाल्या. दादांनंतर अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले. मात्र असा प्रकार कधी झाला नाही. आता जे काही घडले तो एक निव्वळ योगायोगच असावा. पण कुठेतरी त्यात मी देखील संबंधित होतो. अर्थात त्याची दखल कोणीच घेतली नव्हती. मात्र आज इतक्या वर्षानंतरही मला त्या प्रसंगांची आठवण झाली की गंमतही वाटते आणि हसू देखील येते.
अविनाश पाठक..
आठवणींच्या हिंदोळ्यावर…३
दि. ०३ जून २०२६