दिवाळी संपली की साधारणपणे तुळशीविवाह पार पडल्यानंतर आमच्या धंद्याची सुरुवात होते. लग्नांचा सिझन सुरु झाला की आमच्यासारख्या Contractor लोकांची नेहमीच धावपळ असते. आणि सिझनमध्ये धावपळ ही आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. लग्न घरी जितकी धावपळ असते त्याच्या दुप्पट पळापळ आम्हा लोकांची असते. प्रत्येक घरचा मेनू वेगळा, लग्नवेळा वेगळ्या, फुलांचे डेकोरेशन्स वेगळे. हे सगळे डोक्यात ठेवणे तर शक्य नसतेच त्यामुळे डायरीत नमूद करुन ती डायरी सांभाळणे हे अगदीच अगत्याचे असते. कित्येक वेळा वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातच आमची डायरी ३१ डिसेंबरपर्यंत संपून जाते. हा सिझन सुद्धा आमचा जवळजवळ सगळा फुल झाला होता. त्यामुळे आता कोणाचाही फोन किंवा निरोप आला तरी ह्या वर्षी नवीन काम घेण्याचे बंद केले, असे सांगावयाचे नक्की झाले होते. शिवाय गेल्या ३-४ वर्षापासून आम्ही दोघाही नवराबायकोने ठरवूनच टाकले होते की कुठल्याही परिस्थितीत एका दिवशी दोन contracts घ्यायची नाहीत. त्यामुळे शांतपणे आराम करीत बसलो होतो. तेवढ्यात मोबाईल वाजलाच. कधीकधी मोबाईल नसता तर किती बरे झाले असते ते प्रकर्षाने जाणते. एकदा तो वाजला कि त्याला receive करायलाच लागतो नाही तर missed call म्हणून call back तरी करायला लागतो.
सरदेसाईंचा फोन होता. त्यांचा फोन तर घ्यायलाच पाहिजे. सरदेसाई आमचे खूप जुने स्नेही. आमच्या गावातील एक अतिशय इमानदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती. अगदी वंदनीय जोडपे. आपले आत्तापर्यंतचे सगळे आयुष्य ह्यांनी गरिबांच्या सेवेत घालवले. जवळपास आदिवासी खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचा तर जणू त्यांनी विडाच उचलला आहे. गरिबांना मोफत धान्य पुरवठा, औषधे उपलब्ध करुन देण्यात स्वतःचे आयुष्य वेचले आहे. कुठलीही सामान्य व्यक्ती, स्वतःची जितकी ऐपत असेल तितकी रक्कम किंवा वस्तू अतिशय विश्वासाने सरदेसाईंकडे पोहोचती करत असते. ह्याचे कारण एकच आहे. लोकांना खात्री असते, की त्यांच्याकडे दिले गेलेले दान हे योग्य व्यक्तीपर्यंत १००% पोहोचतेच. त्यात कधीच अफरातफर होणार नाही. अशा ह्या सरदेसाईंचा फोन उचलणे हे आमचे परम कर्तव्यच होते.
“नमस्कार, सरदेसाई साहेब”, मी हसत हसत म्हणाले.
“अग वासंती, तुझ्याकडे जरा महत्त्वाचे काम आहे. तुला आणि सचिनला (सचिन माझ्या नवऱ्याचे नाव) सकाळी जरा घरी येणे शक्य होईल का? नाहीतर मी आणि स्वाती (स्वाती म्हणजे मिसेस सरदेसाई) आम्ही येतो तुझ्याकडे”, सरदेसाई जरा घाईघाईतच बोलत होते.
मी म्हणाले, “तुम्ही कशाला धावपळ करता, आम्ही येतो. सकाळी कामावर निघतो त्यावेळेस येतो. म्हणजे साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत पोहोचतो. चालेल ना? ”
ते म्हणाले “काही हरकत नाही. नक्की या काम जरा अगत्याचे आहे.” मी त्यांना त्यांच्याकडे जाण्याचे कबुल केले.
आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्यांकडे पोहोचलो. रेखा ऑफिसला निघाली होती. तिची आणि आमची उभ्या उभ्याच भेट झाली होती. स्वारी जरा खुशीतच दिसत होती.
“बघता बघता मोठी झाली ना रेखा ” सौ. सरदेसाई म्हणाल्या.
“हो ना ” मी म्हणाले.
“काय सचिन, वासंती कसे आहात? आता तुम्हाला एक मोठे काम करायचे आहे.” सोफ्यावर विराजमान होत सरदेसाई म्हणाले.
“आपली आज्ञा शिरसावंद्य, तुमच्यासाठी काम करायला आम्ही कधीही तयार आहोत.” अति उत्साहाने सचिन एकदम बोलून गेला.
“अरे आपल्या रेखाने स्वतःचे लग्न जमविले आहे. तिच्याच कॉलेज मधला मुलगा आहे. दोघेही दोन महिन्यानंतर अमेरिकेला M. S. करायला जाणार आहेत. आमचा आग्रह आहे की लग्न उरकूनच जायचे. मुलाकडील मंडळींचा तसाच आग्रह आहे. पुढच्याच महिन्यातील मुहूर्त निघाला आहे. ती मंडळी बरीच लांबची आहेत. परप्रांतातून येणार आहेत. त्यामुळे सगळे आपल्यालाच करावयाचे आहे.” सरदेसाई बोलून मोकळे झाले आणि आम्ही मात्र आमच्याच शब्दात अडकलो होतो. नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता.
‘रेखा’ ही त्यांची मानलेली मुलगी. तिच्याविषयी आम्हाला नक्की फारसे काही माहित नाही. पण लहानपणीच कुठल्यातरी खेड्यातून त्यांच्याकडे आलेली मुलगी आहे. त्यांच्याचकडे मोठी झाली आहे. बहुतेक कुठल्या तरी आदिवासी भागातलीच असावी. रंगाने थोडी जास्तच सावळी, नकटं नाक, मोठा गोल चेहरा, उंचीलाही ठेंगणीच, जाडसर बांध्याची रेखा, श्री. व सौ. सरदेसाईंपेक्षा दिसायला अगदीच वेगळी आहे. परंतु लहानपणापासूनच शहरात राहिल्यामुळे रहाणीमान व भाषा शहरी आहे. नुकतीच इंजिनिअर झाली आणि नोकरीला लागली आहे. तिच्यासाठी ते दोघेच आईबाबा आहेत.
सरदेसाईंचे बजेट काही खूप मोठे नव्हते आणि पाहुणे मंडळींचा आकडा तर अगदीच बेताचा होता. त्यामुळे खूप मोठा हॉल किंवा कार्यालय बुक करण्याचा विचार करणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याच घराजवळील मोकळ्या जागेवर मांडव घालायचे ठरविले होते. परंतु सरदेसाईंच्या मुलीचे लग्न आहे हे समजल्यानंतर त्यांच्या घराजवळच असलेल्या एक समाजाच्या लोकांनी त्यांचे ‘समाज भुवन’ हे लग्न स्थळ म्हणून देवू केले. त्या भुवनाच्या पाठिमागच्या जागेत आम्ही किचन उभे करायचे पुढे छोटासा मांडव घालायचा आणि त्यांच्याच बरोबर काम करणाऱ्या काही तरुण उत्साही मंडळींनी त्याचे डेकोरेशन करावयाचे ठरविले. झाले अर्धी तयारी तर झाली.
श्री. व सौ. सरदेसाईंची तर बऱ्यापैकी धावपळ सुरु होती. एवढ्या थोड्या कालावधीत मुलीच्या लग्नाची तयारी म्हणजे धावपळ तर आलीच. त्यातून तिचा पासपोर्ट, व्हिसा, काही विचारु नका. नुसती धांदल, धमाल. पण त्यांच्या मदतीसाठी volunteers पण भरपूर जमा झाले होते. आमच्या सगळ्यांचीच घरचे कार्य असल्यासारखी धावपळ सुरु होती.
बोलता बोलता लग्नाचा दिवस येऊन ठेपला. सकाळपासून थोडे फार पाहुणे, गावांतील काही प्रतिष्ठित मंडळी जमा झाली होती. सकाळी आठच्या ठोक्याला नवऱ्या मुलाकडच्या लोकांना घेऊन गाड्या एका मागोमाग एक लाईनीत येऊन लग्नस्थळी उभ्या राहिल्या. सनईच्या सुरांनी वातावरण भरुन निघाले. नवरदेव व त्याच्याकडील मंडळींचे स्वागत करुन त्यांना हॉलमध्ये आणण्यात आले आणि पुढील कार्यक्रमाचा कार्यभाग भटजींना सोपविण्यात आला. श्री. व सौ. सरदेसाईं वर पक्षाकडे जातीने लक्ष देत होते. वातावरण अतिशय सुंदर आणि मंगलमय होते.
त्याच दिवशी दुसरी contract असल्यामुळे मी इथे काही लोकांबरोबर काम करत होते तर दुसरीकडे सचिन काही लोकांबरोबर काम करत होता त्यामुळे जास्तच तारांबळ उडाली होती. किती तरी वेळा किचनमध्ये तर कितीतरी वेळा मांडवामध्ये अशी पळापळ होत होती. मधेच फोन आला की हॉलच्या बाहेर जावे लागत होते. अशा पळापळीत अनेक मंडळी आडवी येत होती. काही वेळाने माझ्या लक्षात आले की अगदी खेडवळ असे एक जोडपे बाहेर उभे राहून आतील कार्यक्रम अगदी कुतूहलाने बघत होते ते. सगळ्या हॉल भर त्यांची नजर फिरत होती. दोघांच्या चेहऱ्यावर खुशीचे पण सोबत थोड़े भीतीचे सावट दिसत होते. मधूनमधून डोळे पुसत होते. अर्थात होमाचा धूर सगळ्या हॉलभर परसरला होताच. आम्हा लोकांना अशी काही मंडळी हॉलच्या आसपास दृष्टीस पडली की त्यांच्या वर नजर ठेवण्याची सवयच झाली आहे. आजकाल हॉलवरच चोरी होणे हे अगदी सर्व सामान्य झाले आहे. त्यामुळे काम करता करता माझी त्यांच्यावर नजर होतीच.
नंतर जेवणाच्या पंगती बसल्या. व्याही लोकांचीच पंगत पहिली बसली होती. कारण इतर आमंत्रित फारसे नव्हतेच. जे होते ते सरदेसाईंची अगदी जवळचीच मंडळी होती, ती सगळी नंतर त्यांच्या बरोबर जेवणार होती. पंगत वाढता वाढता सहज लक्षात आले की बाहेर उभे होते ते जोडपे पण ह्या पंगतीत अगदी एका कोपऱ्यात शेवटी जेवायला बसले होते. सरदेसाईंकडे असे गरीब लोक जेवणे काही नवल नव्हते. परंतु व्याही पंगतीत त्यांना बघून जरा आश्चर्य वाटले. कदाचित बराच वेळ बाहेर उभे बघितल्यावर सरदेसाईंनी त्यांना जेवायला बसवले असावे. असा विचार केला हसत खेळत जेवणे आटोपली, फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला.
आणि नवरी मुलगी सासरी निघण्याची तयारी सुरु झाली. आता मात्र श्री. व सौ. सरदेसाई अगदी केविलवाणे दिसत होते. दोघेही रडवेले झाले होते. कदाचित रेखा सासरी गेल्यावर पुन्हा ते दोघेच रहाणार ह्याची त्यांना जाणीव झाली असावी रेखाच्या त्यांच्या बरोबरच्या राहण्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक सुंदर अर्थ निर्माण झाला होता.
तिच्या संगतीमध्ये त्यांना स्वतःला मुलबाळ नसल्याची उणिवही भासली नव्हती. त्यांनी तिला पोटच्या मुलीसारखी मोठी केली होती, इतकी शिकवली होती, ह्या जगाची ओळख करुन दिली होती आणि रेखानेही त्यांच्यावर निरागस भरपूर प्रेम केले होते. स्वतःच्या डोळ्यातील अश्रुंना अवर घालत. श्री. व सौ. सरदेसाईंनी रेखाला निरोप दिला. तिच्या नवऱ्याबरोबर गाडीत बसताना रेखा सारखी मागे बघून रडत होती. एकंदर वातावरण अतिशय गंभीर झाले होते.
हे सगळे घडत असतानाच पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांपैकी कोणीतरी एक प्रश्न विचारला होता. “ ही अनाथ मुलगी होती का हो? ” कोणी सुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर दिलेल मी ऐकले नव्हते.
थोड्या वेळाने हळूहळू करीत हॉलमधील सगळी मंडळी निघून गेली. सरदेसाई दाम्पत्य माझ्याजवळ येऊन उभे राहिले. एकंदरीत सगळे कार्य सुरळीत पार पडले होते. त्यामुळे दोघेही खुप खुश झाले होते. मला भेटल्यानंतर ते दोघे जण सुद्धा घरी जायला निघाले होते. घरी परत जाताना त्या बाहेर उभे असलेल्या जोडप्या जवळ ते बराच वेळ बोलत उभे होते. आणि नंतर ते घरी गेले.
मला सगळे काम पूर्ण होईपर्यंत थांबणे जरुरीचे होते. सगळे काम संपवता संपवता जवळ जवळ अंधार झाला होता. शेवटच्या खुर्च्या भरुन टेम्पो निघाला, टेम्पोवाल्या ड्रायव्हर बरोबर बोलता बोलता माझी नजर समोर गेली. ते खेडवळ जोडपे एका झाडाजवळच्या बाकावर अजुनही बसले होते. तेवढ्यात कोणाचातरी फोन आला, मी कमीत कमी पंधरा मिनिटे फोनवर बोलत होते. त्यानंतरही ते दोघेजण तसेच बसले होते.
आता मात्र मला हा प्रकार जरा विचित्र वाटला म्हणून त्यांच्याजवळच गेले, त्यांची जरा विचारपूस करत होते तर माझ्या लक्षात आले, त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
मी त्यांना विचारले, “तुम्हाला कुठे जायचे आहे? पैसे वगैरे जवळ नाहीत का?”
तशा त्या बाई एकदम रडायलाच लागल्या. म्हणाल्या ” आम्ही कुठे जाणार? जिथे आम्हाला जाण्याची इच्छा आहे तिथे आम्ही कधीच पोहोचणार नाही.” त्यांच्या त्या उत्तराने मी आश्चर्यचकीत झाले. आणि विचारले, कुठे जायचे आहे सांगा, मी तुम्हाला पाठविण्याची व्यवस्था कते. तसे ते गृहस्थ ही रडायला लागले आणि काही तरी बोलणार तितक्यात त्या बाईनी त्यांना गप्प केले आणि मला सुद्धा निघून जाण्याचा आग्रह धरला. हे थोडेसे विचित्र वाटले म्हणून ड्रायव्हरला गाडी थोडी लांब उभी करायला सांगितली आणि मी त्यांच्या बाजूला बसले. काही वेळाने त्या सद्गृहस्थांचा स्वतःवरचा संयम सुटला आणि ते बोलू लागले. “बेटा आत्ता ज्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे आम्ही जन्मदाते मायबाप आहोत. आमच्या भागात मुलींचा खूप छळ होतो.
त्या भितीने आम्ही तिला लहानपणीच सोडून दिले होते. पण तिचे तकदीर जोरावर होते. ती साहेबांना सापडली. ते तिच्या आईबापाचा शोध घेत आमच्यापर्यंत पोहोचले होते. पण ही मुलगी तुम्हाला मिळाली आहे, तुम्हीच ठेवा, असे उत्तर त्यावेळेस आम्ही दिले होते. आणि त्यांनी खरोखरीच आज तिला इतकी मोठी केली.
त्यांनी आम्हाला रीतसर लग्नाचे आमंत्रण देखील दिले. पण अश्या अटीवर की आम्ही तिला ओळख सुद्धा दाखवायची नाही. आम्ही ह्या गोष्टीला कबूल झालो. कदाचित असे करताना देखील त्या माऊलीने आमच्या मुलीच्या भविष्याचाच विचार केला असावा. परंतु मुलगी समोर दिसल्यावर तिच्याजवळही न जाणे आम्हाला फार कठीण झाले. शेवटी आईबाप आहोत ना, तिच्या डोक्यावरुन हात तरी फिरवावा असे वाटत होते. पण असे करण्याचा आम्हाला काय अधिकार?
आम्ही तिचे आयुष्य घडवू शकलो नाही, तर ते उधळण्याचा आम्हाला काय हक्क आहे? आम्ही खरेच दुर्दैवी. इतकी भाग्यवान, सद्गुणी मुलगी मोठी करण्याचे आमच्या भाग्यातच नसावे. पोटच्या पोराला लहानपणीच दूर करणाऱ्या दृष्ट आई बापाला साहेबांनी इथे बोलावले हा त्यांचा थोरपणा आहे. आणि आम्हा दुर्दैवी, दृष्ट आई बापाचे भाग्यच” असे बोलत ते दोघेही ओक्साबोक्शी रडायला लागले. त्यांचे मी काय सांत्वन करणार? मी काय ऐकते आहे, हे तर मला उमजतच नव्हते. आजच्या विसाव्या शतकात असे प्रसंग घडतात ह्यावर विश्वास बसत नव्हता.
त्यांची एकदाच त्यांच्या मुलीला म्हणजे रेखाला भेटण्याची इच्छा होती.पण ती इच्छा पूर्ती करणे त्या परिस्थितीत शक्यच नव्हते.