अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी
तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी...१,
अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला
सूर्यालाही लाजवित असता, गर्वपणाचा भाव चमकला...२,
पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची
तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची...३,
मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे
रूप भयानक बघून सारे, कंपीत त्यांची मने धडधडे...४,
त्याच वेळी वादळ सुटूनी, देह घनाचा टाकी विखरूनी
गर्व हरण होऊन जाता, अश्रू पडती नयनामधूनी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 24, 2019
November 26, 2021
June 19, 2012
मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव
पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव ||
मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव
बाहेर समित्या साधती आपलाच डाव ||
माणसाला किती रे ही संपत्तीची हाव
नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव ||
मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव
विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव ||
मनी नाही भाव तरी देवा मला पाव
अशा भक्तांसाठी किती ही धावा धाव ||
नाचती करुनी रे वेडेवाकडे हाव भाव
भक्तांच्या ह्या भक्तीचा लागत नाही ठाव ||
मुर्तीतल्या देवा कर न रे तू एक ठराव
राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव ||
रविंद्र कामठे
२२ सप्टेंबर २०१५.
September 22, 2015
वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 20, 2018
सावल्यांचा खेळ चाले, दिवस आणि रातीला,
माणसाला संगत मिळे,
त्यांचीच हो घडीघडीला,--!!!
पहाटेच्या प्रहरी उगवे,
आवरण सारे धुक्याचे,
सोबत देत माणसा,
भोवती सारखे नाचे,--!!!
सूर्यराज उगवते,
खेळ चालू उन्हाचा,
पायात सारखे येऊ पाहे,
दूर कसा करशी मनुजा,--!!!
समय मध्यान्ह ये ,
सावली जडते पायाला,
जिथे जाई माणूस तिथे,
कवटाळी ज्याला-त्याला,--!!!
संध्याकाळ हळूच येते,
घेऊन संधिकालाला,
सावली पायाखाली जाते,
छेद देत माणसाला,--!!!
आगमन होता रजनीचे,
सुरुवात अंधार कवचाला, आपलीच सावली वाटते,
का येई अशी भेटीला,--!!!
खेळ गगनात चाले,
भोवताली सर्व चंद्र चांदण्या,
धरेवर साऱ्या वरून पडे,
भासती इथे त्यांच्या छाया,--!!!
भिंतीवर सावली पडे,
माणूस घाबरे पाहून तिला,
आत आत दडवत सारे,
का भितसे प्रतिमेला,--!!!
© हिमगौरी कर्वे
February 6, 2020
निळ्याशार समुद्री,
चालली कुठे नाव,
पुढे पुढे जाई अगदी,
घेत जीवनाचा ठांव, -!!!
जीवन आहे पसरलेले,
असीम आणखी अथांग,
निसर्गाची ,जादू सगळी,
फेडावे कसे त्याचे पांग,-!!!!
नाव चालली संथ अगदी,
खाली पारदर्शी पाणी,
सूर्यराजे उगवलेले वरती,
निळ्या निळ्या नभांगणी,
सोनेरी किरण त्यांचे,
अंबरात मुक्त विहरती,
पाण्याची सफर करायला,
चटाचटा उतरून येती,
सोनेरी रंगाची नक्षी,
पाण्यावर रेखाटत,
छोट्या बिंदूंची शलाका,
वरून खाली ओघळत,
ओजस्वी दिनकराचे कसे,
पाण्यावरती प्रतिबिंब,
नुसते त्याला पाहुनी वाटे,
तेजाचाच तो स्फुल्लिंग,-!!!!
वर खाली,- खालवर,
लाटा किती उचंबळती,
सोनेरी नक्षा हालत- हालत,
ठिकठिकाणी रांगोळी काढती, सोनेरी रंगावर कधी,
जळाची निळाई चढे,
कधी निळसर पाण्यामध्ये, सोनसळीरंग खेळे,-!
जीवनीही अशाच लाटा, वरवर किती उठती,
निळे सोनसळी थेंबही,
कधी सुखाचे होती मोती,-!!!
हिमगौरी कर्वे
March 13, 2019
जीवन, जगण्यासाठी
जीव, आतुरलेला आहे
जन्म! हा मानवाचा
विवेकी जगायचाआहे
ऋतूऋतूंचे आविष्कार
निसर्गाचे वरदान आहे
नाती सारी ऋणानुबंधी
भावप्रिती! साक्ष आहे
अंतरी लळा जिव्हाळा
प्रारब्धाचे वरदान आहे
शिरी आभाळ नक्षत्रांचे
मनस्वी सुखशांती आहे
निर्मोही स्पर्श भावनांचे
स्वर्गसुखाची नांदी आहे
जगता जगता जगवावे
मानवी नितीमुल्य आहे
येताजाता रिक्त ओंजळी
अंतिम नग्न सत्य आहे
सदा भजावे अनामिका
तो कृपाळू तारणार आहे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३६
२१ - १० - २०२१.
October 22, 2021
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"
"immigration च्या requests ने system झालीये hang
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"
"असं कर बाप्पा एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"
"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला......
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
January 15, 2013
सुरमयी गीत गाऊ,चल आज प्रीतीत नाहू
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।धृ।।
तुझ्या सवे निशा ढळे,
धुंद पहाट वात येई
तिथे माझ्या मिठीत, येशिल का?
मिठीत येऊनी, स्वप्ननगरी रत होऊ
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।१।।
भाव तुझे मनातील,हलकेच वदशील का?
भावसुमांची महफिल ,तिथेच छान भरेल का?
प्रीतीचा गंध नवा,चल चौफेर उधळू
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।२।।
प्रीतीत नाहूया,सुखात लोळूया
तुझ्या-माझ्या प्रीतीचा,रंग बघुया
प्रीतीच्या रंगात,रंगुनीएकरुप होऊ
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।३।।
-- सौ. माणिक शुरजोशी
November 24, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti