क्रीडापटू या नात्याने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, हे तर ते सांगायचेच पण काय टाळायला हवे याविषयी त्यांच्याइतकी माहिती देणारे दुसरे कुणीही सापडले नसते. त्यांनी या गोष्टीचा जणू ध्यास घेतला होता. उत्तमोत्तम क्रीडापटू तयार करून त्यांना स्पर्धेत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने ते मैदानामध्ये उतरायचे. एखादा खेळाडू चांगला दिसतो आहे, पण मार्गदर्शनाअभावी तो वा ती मागे पडण्याची शक्यता आहे असे दिसले तर ते त्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्याशिवाय राहणार नाहीत.
पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये अनेक वर्षे क्रीडाप्रशिक्षक या नात्याने काम पाहणारे बाबुलाल प्रेमराज झंवर आता आपल्यात नाहीत. ९४ व्या वर्षांपर्यंत आयुष्य लाभलेले बाबुलाल झंवर हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्वयंचलित दुचाकीवरून हिंडायचे आणि सायंकाळच्या सुमारास मैदानावर उभे राहायचे. या वयातही ते खेळ पाहून चुका दाखवून देत असत. त्यांनी सांगितलेले शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार अनेक वर्षे अनेकांना उपयुक्त ठरले आहेत. तुम्ही शारीरिकदृष्टय़ा त्या त्या क्रीडाप्रकारांसाठी तंदुरुस्त आहात की नाही हे तपासायचे त्यांचे मार्ग निराळे होते. ते म्हणायचे की, पाच मिनिटांमध्ये शंभर जोर, तीन मिनिटांमध्ये शंभर बैठका, १४ सेकंदांमध्ये शंभर मीटर धावणे, सहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे, हे सगळे तुम्ही न दमता करू शकणार असाल तर तुम्ही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना पात्र आहात, असे मानायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या खेळात महत्त्व कशाला असेल तर ते तुमच्या पूर्ण तंदुरुस्त असण्याला.
नृत्य असो की गायनकला, त्यासाठीही तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा सक्षमच असावे लागते. त्यासाठी त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स प्रोग्राम’ या नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्याला त्यांनी ‘आयसोमेट्रिक’ प्रशिक्षणाची जोड दिली. त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक पातळ्यांवर उपयोग करून घेतला गेला. शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि त्याबरोबरच स्वास्थ्य यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व होते. स्वास्थ्य म्हणजे केवळ काहीही न करता बसून राहणे नव्हे तर त्यात त्यांना निसर्गोपचार पद्धती अपेक्षित होती. तुम्ही जो काही खेळ खेळाल तो उत्तम खेळा आणि त्यात प्रावीण्य मिळवा, एवढेच त्यांचे सांगणे असे. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत असंख्य स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील असे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणात शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रप्रकारांचा समन्वय असे. आपले मनगट मजबूत तर सर्व काही तुम्ही त्या जोरावर करू शकता हा त्यांचा विश्वास होता. ते कडवे गांधीवादी होते. साधी राहणी आणि स्वावलंबन यांना आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये स्थान दिले होते. त्यामुळेही ते विद्यार्थीप्रिय होते. भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर क्रीडाक्षेत्रावर पैसे खर्च होऊनही चांगले ‘स्टॅमिना’बाज खेळाडू तयार होत नाहीत, ही त्यांची खंत होती.
कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, अॅथलेटिक्स, सायकलिंग, शरीरसौष्ठव, पोहणे, क्रिकेट अशा कितीतरी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी घडवलेले खेळाडू केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर सगळ्या जगात पसरलेले आहेत. त्यांच्या नावामधली ‘बा. प्रे.’ अशी आद्याक्षरे त्यांच्या शरीरसंपदेचे दर्शन घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांच्याकडे पाहून कुणीही एकदम चकीत होऊन ‘बापरे’ असे म्हणत असे आणि तीच त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या कारकिर्दीची पावती म्हणावी लागेल.
कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी मांसाहारच हवा हे थोतांड आहे, असे ते सांगायचे आणि त्यांच्या प्रचाराचाही तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला. सामाजिक दृष्टय़ा अत्यंत प्रगत विचार आणि केव्हाही कुणालाही मदतीसाठी पुढे हे तर त्यांचे ब्रीद होते. ते १९३० च्या जंगल सत्याग्रहामध्ये होते आणि ते १९४२ च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्यात अग्रभागी होते. एका निरलस अशा क्रीडा प्रशिक्षकाला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना कधीच मिळाला नाही.