आत्महत्या करण्याआधी

राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील.



राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील.
राजनने ठरवले. आज स्टेशनवर जायचे. एखादी एक्सप्रेस आली की तिच्या समोर उडी मारायची….मनाचा पक्का निश्चय करून तो स्टेशनवर पोहोचला !!
स्टेशनवर फार गर्दी नव्हती. कारण गाडी आली नव्हती. अजून अर्धा तास होता. रेल्वे स्टेशन ही अशी जागा आहे जिथे गाडी येते तेव्हा अनेक लोक येतात. गाडी गेली की सगळं सामसूम. गाडी गेल्यावर चहावाले बिडी पेटवून कोपरा धरतात. वडा पाववाले थोडी झोप काढून घेतात. हे सगळे मावळ भागातले कष्टकरी. गाडी आली की ह्यांची धावपळ सुरु होते, गाडी गेली की एकदम शांत भूमिकेत शिरतात. खरं जीवन जगतात. जोवर जीव आहे तोवर धावायचं. श्वास थांबला की शांत व्हायचं.
पुण्याकडून किंवा मुंबईकडून ट्रेन येताना दिसली की त्यांच्यात चैतन्य भरतं. अंग झाडून ते तयार होतात. कंबरेचा पट्टा आणि हाताचा बिल्ला घट्ट करतात. त्यांच्या लाल डगल्यात जीव भरतो. ट्रेन थांबण्याआधी ते डब्यात शिरतात आणि ट्रेन थांबेपर्यंत एका गिर्हाईकाचं सामान डोक्यावर घेवून उतरायलाही निघतात.
राजन एका बाकड्यावर येऊन बसला. ट्रेन येईपर्यंत वाट पाहायची होती. स्टेशनमध्ये ट्रेनचं इंजिन शिरलं की त्याच्यापुढे उडी मारून मोकळं व्हायचं होतं. राजनने आसपास पाहिलं. सगळं सामसूम होतं. दोन कुत्रे कचऱ्यातून काहीबाही शोधून खात होते. लांबवर पिवळ्या फलकावर ‘लोणावळा’ लिहिलेलं स्पष्ट दिसत होत. त्याला टेकून एक भिकारी बसला होता. नुकतीच एक ट्रेन निघून गेली होती. त्यामुळे स्टेशन शुन्य अवस्थेत आलं होत. इतक्यात काही हमाल स्टेशनवर आले आणि राजनच्या बाजूला खाली बसले. पुढची ट्रेन अजून अर्धा तास येणार नव्हती. त्यामुळे ते निवांत झाले. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
एकाने सुरुवात केली, ” बाळ्या गेला रे, साल्याची लई आठवण येते. दोन तुकडे झाले व्हते त्याच्या बॉडीचे”
राजनने कान टवकारले…. कोण बाळ्या? त्याच्या बॉडीचे दोन तुकडे झाले?
मग दुसरा हमाल बोलू लागला. ” आम्ही चा पिलो आणि बसलो. बाळ्या लई उदास होता. मी इचारलं तसा भडभडा बोलू लागला. म्हनला, आमच घर वळवण मध्ये होत. धरण बांधायचं म्हणून आमाला हाकलल. माझा आज्जा डोंगरगावाकड आला. तिथे त्याने घर बांधलं. आता त्याला लई वर्स झाली. आमच घर पडायल आलंय. घूस येते नी समदं घर पोखरते. उंदीर बी लई माजले. परवा माझा पोरगा रांगत व्हता अन समोर साप आला. फना उगारून बसला राव. बायडीनी बघितल म्हणून बर. नाहीतर माझा चिंट्या तिथच मेला असता. च्यायला घराची डागडुजी करायला पाहिजे. पण एवढा पैका कुठे घावायाचा? एक गाडी येती तवा एक पॅसेंजर मिळतं. दहा रुपय बी देत नाहीत. च्यामारी, आता दर ट्रेनला दोन-तीन पॅसेंजर घावले पाहिजे.”
त्या हमालाने मोठा श्वास घेतला आणि तो पुढे सांगू लागला,
” तेवढ्यात पुण्याहून डेक्कन आली. गाडीची शिट्टी ऐकली अन बाळ्या संगती मीबी ट्रेनकडे धावलो. त्यादिवशी ट्रेनचा स्पीड जरा ज्यादा व्हता. बाळ्या पहिल्या डब्यात घुसायला गेला. स्पीड लई होता. त्यान दरवाजा बी बराबर पकडला पण पाय सटकला अन तो गेला गाडीखाली….डेड बॉडी पाहिली तव लई लई रडलो राव. अरं, त्याचा लाल डगला रक्ताने माखला व्हता. एक पाय तुटून बाजूला पडला व्हता…च्यामारी, त्यादिवशी मी घावलेला पॅसेंजर सोडला अन बाळ्याची बॉडी उचलली. आजवर लई बोजा उचलला. पन बाळ्याची बॉडी उचलली तो बोजा साला जलमभर ध्यानात राहील.”
त्याचं बोलणं ऐकून सारे हमाल स्तब्ध झाले. राजनच्या अंगावर काटा आला. जास्त गिर्हाईक मिळवण्यासाठी बाळ्या जीवावर उदार झाला आणि गाडीखाली सापडून मेला.
राजनने सगळ्या हमालांचे चेहरे पहिले. ते कष्टकरी भेदरले होते. असं वाटत होतं, हे आता पुन्हा ट्रेन पकडण्यासाठी कधीही धावणार नाहीत. धावती ट्रेन पकडण्याची हिम्मत तर करणार नाहीतच, उलट हमालीचा धंदा सोडून देतील !!
बाळ्यासारखे आपले दोन तुकडे होतील ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
” अर, एका टायमला ५० किलो उचलीन असा गाडी हाय मी” अस म्हणणारे हे रांगडे गडी गळून पडले होते.
इतक्यात ट्रेनचा आवाज आला. पलीकडच्या स्टेशनवर ट्रेन येत होती. राजनने हमालांकडे पाहिलं. वाटलं, आता हे घाबरून गप्प बसतील. पण नाही. लाल डगला घातलेल्या त्या गड्यांच्या अंगात वारं शिरलं. एकामागून एक उठला आणि भराभर रेल्वे रुळांवर उड्या मारून पलीकडच्या फलाटावर पोहोचला. मिनिटभर उशीर झाला असता, तर येणारी ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली असती. त्याचं बाळ्या झाला असता. बॉडीचे तुकडे झाले असते.
ट्रेन स्टेशनवर शिरण्याआधी सारे हमाल एक एका डब्यात शिरले. पटापट गिर्हाईके शोधली. ट्रेन थांबायच्या आधी डोक्यावर बोजा घेऊन उतारायलाही लागले. काही क्षणापुर्वी असलेली निराशा केव्हाच झटकली होती. भीतीचा कुठेही लवलेश नव्हता. सगळ्यांच्या लाल कपड्यांमध्ये चैतन्य, उत्साह सळसळला होता.
ह्या हमालांनी राजनला जीवनाचं सत्य उलगडून दाखवलं होतं. धावती ट्रेन पकडताना खाली मरण आ वासून बसलेलं असतं. हात सटकला की मेला. काही मिनिटात डेड बॉडी बनते. पण मरणाला घाबरून कसं चालेल. मरणाला घाबरून मागे फिरलं तर मागे गरिबी आहे. दारिद्र्य आहे. घर बांधायचं आहे, बहिणीच लग्न लावायचं आहे. मुलाला चांगल्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवायचं आहे. खाली आ वासून बसलेल्या मरणाला घाबरून मागे फिरलो तर ही स्वप्न पूर्ण होणार कशी? मरण चुकवून गिर्हाईक पकडायलाच पाहिजे. जगायलाच पाहिजे…सर्व अडीअडचणींवर मात करून, सगळे प्रॉब्लेम सहन करून!!
राजन स्वतःशी विचार करू लागला. मलाही जगले पाहिजे ना. अनेक अडचणी सोसणारे हमाल जगू शकतात. मित्राची डेड बॉडी उचलून, ते दुःख गिळून स्वतःही ट्रेन पकडायला धावू शकतात !! मग मी मरणाला जवळ का करावे?
राजनने मनोमन त्या हमालांना सलाम ठोकला. ना ते फार शिकलेले होते, ना जीवनच तत्वज्ञान त्यांना कळल होत. पण ते जिवंत होते. आपली डेड बॉडी होणार आहे हे त्यांना माहित होतं. तरी त्याआधी ते कर्तव्य पार पडत होते.
मरण त्यांना शरण गेलं होतं. आणि त्यांनी राजनला जगण्याचा, लढण्याचा मंत्र दिला होता.
राजनने मनाशी निश्चय केला. मी आत्महत्या करणार नाही.
तो हमालांकडून जगण्याची कला शिकला. लढायला शिकला.