29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा एक सामना ब्रिटिश पाठीराख्यांच्या अपेक्षांची ‘राख’रांगोळी करीत संपला. 1882च्या मालिकेतील हा एकमेव सामना झाला ओवलवर. आंतरराष्ट्रीय यादीतील हा कसोटी सामना क्र. (केवळ) नऊ होता. नियोजित खेळ तीन दिवसांचा असणार होता.
31 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीत ‘क्रिकेट : अ वीक्ली रेकॉर्ड ऑफ द गेम’ने क्रिकेटच्या मैदनावरील इंग्लिश संघाचे वर्चस्व संपुष्टात आल्याबद्दल एक श्रद्धांजलीपर चौकट प्रसिद्ध केली. 2 सप्टेबरच्या ‘द स्पोर्टिंग टाईम्स’च्या अंकात ब्लूब्ज या टोपणनावाने लिहिणारा रेजिनाल्ड ब्रुक्स आणखी पुढे गेला आणि त्याने ओवलवर 29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लिश क्रिकेट मृत्यू पावले असून त्याचे पार्थिव जाळण्यात येईल आणि राख ऑस्ट्रेलियात नेण्यात येईल अशी घोषणा केली.
1882-83च्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार्या इंग्लिश संघाच्या कर्णधाराने वारंवार राखेचा उल्लेख केला आणि आपण ती पुन्हा मिळवू असेही बोलून दाखविले. मेलबर्नमधील काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला टेराकोटापासून (तांबड्या रंगाची भाजलेली माती) बनविलेले एक रक्षापात्र भेट दिले.
याच्यात नेमके काय होते हे मात्र अजूनही ‘रक्षापात्रा’तच आहे! (तो गुलदस्ता नव्हताच.) ती एक बॅट जाळल्यानंतर निर्माण झालेली राख होती, एक विटी जाळल्यानंतर झालेली राख होती इथपासून ते एका महिलेने आपले एक खास अब्रूझाकू वस्त्र जाळल्याने तयार झालेली राख होती असे अनेक उल्लेख आढळतात. इवो ब्लायच्या मृत्यूपश्चात त्याच्या पत्नीने हे रक्षापात्र मेरिलबोन क्रिकेट क्लबला भेट म्हणून दिले आणि लॉर्ड्सवरील एका संग्रहालयात ते ठेवले गेले आहे. त्याची प्रतिकृती आता ‘चषक’ म्हणून वापरली जाते.
‘दि अॅशेस’ ही संज्ञा मात्र लोक विसरून गेले. ‘विद बॅट अॅन्ड बॉल’ या आपल्या पुस्तकात जॉर्ज गिफिनने या शब्दाचा वापर केला (प्रकाशन 1899). 1903च्या इंग्लिश दौर्यावर जाताना ऑसी कर्णधाराने तिचा पुन्हा उल्लेख केला. विज्डेन क्रिकेटर्स आल्मनॅकमध्ये सर्वप्रथम 1905 साली या संज्ञेचा समावेश झाल्याचे आढळते.
— डॉ. आनंद बोबडे