अनुभूती

ट्रिंग-ट्रिंग फोनची घंटी जोरजोरात घणघणली, मी उठून उभा राहतो तो पर्यंत बंद झाली. बहुतेक रॉंग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई-घाईत घेतला, काय रे काय झाले?

काही नाही, मला माहित आहे अगदी अवेळी फोन केलाय मित्रा, sorry पण फारच बेचैन झाल्यासारखे झाले आहे, येऊ शकशील का? ड्रायव्हरला पाठवतो. सुधीर म्हणाला.

अरे sorry काय? येतोच. माझा तर पेशाच असा आहे. निघतो लगेच. माझ्या ड्रायव्हरला फोन करतो तो येईल. तुझ्या ड्रायव्हरला सध्या तुझ्याजवळच राहू दे. काळजी करु नकोस मी पोचतोच. मी म्हणालो.

फोन ठेवला, पहाटेचे चार वाजले होते. ड्रायव्हरला फोन केला. मीनलला उठवले आणि सांगितले, सुधीरचा फोन होता त्याची तब्येत बिघडली आहे. राजू आला कि निघतोच. तिला आता माझ्या या life-stile ची सवय झाली होती परंतु सुधीरला काय झाले असेल ह्या विचाराने ती जरा काळजीत पडली होती तितक्यात राजू आला त्याने माझी visit-bag गाडीत ठेवली आणि आम्ही निघालो. नाही म्हंटले तरी २५-३० मिनिटांचा रस्ता होता. गाडीत बसल्यावर परत सुधीरला फोन केला. आवाजावरून त्याला बरे नसल्याचे जाणवले.

सुधीर हा माझा बालमित्र. आम्ही एकाच मोहल्ल्यात राहत होतो, एकाच वर्गात शिकत होतो. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, मला दोन बहिणी आणि एक भाऊ. त्याच्या घरी आजी-आजोबा होते. त्यामुळे खेळायला आमच्याकडे आणि अभ्यासाला त्याच्याकडे हा आमचा नित्यक्रम होता. आमच्या शाळेत देखील सुधीर-सचिन ची जोडी एकदम फेमस होती. बारावी नंतर मी मेडिकलला गेलो आणि तो इन्जिनिअरिंगला. त्यामुळे आम्ही थोडे दुरावलो. हळूहळू मी माझ्या कॉलेजच्या मित्रात आणि तो त्याच्या कॉलेजच्या मित्रात मग्न झालो. दोघांचे विषयही वेगळे त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात तर फारच दुरावलो. नंतर तो M. S. करायला अमेरिकेला गेला. आणि मी Post-graduation साठी बंगलोरला. त्यामुळे तर अगदीच एकमेकांपासून लांब झालो. बऱ्याच वर्षानंतर त्याच्या लग्नात भेटलो होतो. नंतर कित्येक वर्ष एकमेकाला भेटलो सुद्धा नव्हतो.

काका-काकी म्हणजे त्याचे आई-बाबा मात्र नियमित भेटत होते. ते त्याच्याकडे जाऊन आले कि त्याची खुशाली कळायची. तो मात्र फारच कमी येत असे, कारण त्याला M.S. झाल्यानंतर लगेचच नौकरी लागली होती. आणि तो खूप हुशार असल्यामुळे लवकरच कंपनीत खूप वरच्या पोस्टवर निघून गेला होता. त्यामुळे कायमच busy असायचा. कितीतरी वर्षे काका-काकी त्याच्याकडे जात-येत असत. परंतु हळूहळू दोघेही थकले होते. त्यांच्या तब्येती देखील वयोमानाप्रमाणे कमकुवत होत गेल्या आणि त्यांचे त्याच्याकडे येणे-जाणे कमी झाले. मीही डॉक्टर झालो, इथेच गावात practice सुरु केली त्यामुळे माझ्याकडची काका-काकींची ये-जा वाढत गेली. काकी खूपच लवकर थकल्या होत्या. त्या फक्त माझ्याकडूनच औषध घेत असत त्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या कारणाने परत एकदा माझा आणि सुधीरचा फोनवर contact सुरु झाला होता. तो त्या दोघांची खूप काळजी करायचा. तो त्यांना कायम तिकडे बोलवत असे परंतु ह्या दोघांनाहि इतका प्रवास करणे आता शक्य राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी घरात कायमसाठी कामाला दोन माणसे ठेवली आणि इथेच राहणे पसंत केले होते. काकी तर बघता-बघता इतक्या थकल्या कि नंतर नंतर त्यांना माझ्या दवाखान्यात सुद्धा येणे शक्य होत नव्हते. मग मीच त्यांच्या घरी जात असे.

बरेच वर्षानंतर, प्रथम जेंव्हा मी त्यांच्या घरी काकींना बघायला गेलो, तेंव्हा सगळ्या जुन्या आठवणी एखाद्या सिनेमाची रीळ फिरावी तशा माझ्या नजरेसमोरून पळाल्या होत्या. सतत पळापळ करत असणाऱ्या काकी बिछान्यात केविलवाण्या दिसत होत्या. कायम स्वतःच्या कामात मग्न असणारे काका, काकींच्या सेवेत हजर होते. सतत त्या दोघांच्या मागे फिरणारा सुधीर कुठेही दिसत नव्हता. प्रत्येक खोलीत असणाऱ्या त्याच्या फोटोने मात्र त्याचे अस्तित्व टिकून होते. काकींच्या बेडरूम मधल्या एका फ्रेम मध्ये सुधीर, संगीता वाहिनी आणि दोन्ही नातवंडांचे वेगळे वेगळे फोटो व्यवस्थित फ्रेम करून लावले होते. मला घरी आलेला बघून त्या अतिशय खुष झाल्या होत्या. कदाचित सुधीर आल्यावर त्यांना जसा आनंद होत असावा तसाच आनंद मला पाहिल्यावर झाला होता. ह्या नंतर मात्र माझे आणि सुधीरचे नियमित फोनवर बोलणे होत असे. आईबाबांच्या प्रकृतीची तो सारखी चौकशी करीत असे. त्यांना औषधपाणी व्यवस्थित मिळावे म्हणून भरपूर पैसे पाठवत असे, शक्य होईल तेंव्हा दोन-चार दिवस येऊन जात असे. ह्यामुळे आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला होता.

एके दिवशी काकी अचानक हे जग सोडून गेल्या. आणि सुधीर इथे येईपर्यंत काकांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आणि मीनलवर येऊन पडली. तशी ह्या छोट्याश्या गावात काका-काकींनी लोकांना वेळोवेळी भरपूर मदत केली होती त्यामुळे संपूर्ण गावच काकांची काळजी घेत होते.

त्या नंतर सुधीरने तुम्हीतरी माझ्याबरोबर चला असा काकांजवळ हट्ट धरला. नाईलाजाने, इथली कामे आटोपून वर्षभरात तुझ्याकडेच राहायला येतो असे आश्वासन काकांनी त्याला दिले होते. आणि खरोखरीच त्यांनी आपली तिकडे जाण्याची तयारी केली होती. परंतु काकी गेल्यानंतर काका अगदी खचून गेले होते. सुधीरने येऊन इथे महिनाभर राहावे अशी शेवटी शेवटी काकींची फार इच्छा होती ती पूर्ण न झाल्यामुळे काकांना खूप वाईट वाटत असे. पण कामधंदा सोडून मी इतका राहू शकत नाही अशी तो त्यांची फोनवर समजूत काढत असे. ह्या प्रसंगाची आठवण होऊन काका अगदी बचैन होऊन बोलत असत. परंतु तरीही स्वतःला सावरून त्यांनी त्याच्याकडे जायचे नक्की केले होते. बरेचसे सामान बांधूनही ठेवले होते. काही सामान आणि कपडे गावातील गरजू लोकांना वाटून टाकले होते.

आणि एका रात्री अचानक, तब्येत बिघडली आहे, तू लगेच ये असा त्यांचा मला फोन आला होता. पण दुर्दैवाने मी पोचण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ह्याच सगळ्या आठवणींनी माझ्या मनाची चलबिचल झाली होती आणि रस्ता संपता संपत नव्हता.

खरे तर आज आम्ही सगळे म्हणजे मी, सुधीर, वाहिनी व मुले बरोबरच होतो. सुधीरने गावातल्या वृद्धाश्रमाला काका-काकींच्या नावे भरपूर देणगी दिली होती. गावातल्या शाळेमध्ये मुलांसाठी बारा computers दिले होते. कित्येक वर्षानंतर तो जवळजवळ महिनाभर गावात राहिला होता. सगळ्या बँकांची कागदपत्रे, इतर प्रॉपर्टीचे कागद त्याच्या नावावर करून घेत होता. बहुतेक रोज रात्री आम्ही भेटतच होतो. जुन्या आठवणी काढून गप्पात रंगून जात होतो. वृध्श्रामामध्ये आणि शाळेमध्ये त्याने जे काही दान केले होते त्यासाठी गावातल्या लोकांनी आज त्याचा सत्कार केला होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ह्या दिलेल्या रकमेचा किंवा वस्तूंचा योग्य वापर होतो आहे ह्यावर देखरेख ठेवण्याचे काम मी आणि मीनलने करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. त्यासाठी जरुरी असलेल्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी आम्ही दिवसभर एकत्रच होतो आणि तसा तो खूष दिसत होता. मग अचानक काय झाले असावे? असा विचार माझ्या मनात सारखा डोकावत होता.

समोरच्या घरात दिसणाऱ्या लाईटच्या उजेडाने माझ्या विचारांची शृंखला तोडली. मी घाई-घाईने गाडीतून उतरून दाराकडे जवळ-जवळ धावतच गेलो. सुधीरनेच दार उघडले. त्याला पाहिल्यावर मला एकदम हायसे झाले.
काय रे काय झाले? मी विचारले.

काही समजत नाही परंतु खूप अस्वस्थ झालो आहे. झोपही येत नाही. असे कधीच झाले नाही म्हणून तुला फोन केला. सुधीर म्हणाला.
ठीक आहे, चल बघू या झोप इथे. मी म्हणालो. राजू visit bag घेऊन आलाच. सुधीरला व्यवस्थित तपासले. थोडे B.P. जास्त होते, पण इतकेही जास्त नव्हते की ज्यामुळे तो अस्वस्थ होईल. मी विचार करत होतो, ह्याला काय झाले असावे? आता जवळ-जवळ पहाटेचे पाच वाजले होते. वाहिनी म्हणाल्या, जरा गरम चहा करून आणते. तो प्यायल्यावर याला बहुतेक बरे वाटेल. एवढा वेळ त्याने मला इथून हलूनच दिले नाही. तुम्ही आता त्याच्याजवळ बसा मी येते. असे म्हणून त्या किचनमध्ये गेल्या.

माझे सुधीरच्या डोळ्यांकडे लक्ष गेले. ते पाण्याने भरलेले होते. चेहरा देखील उतरून गेलेला दिसत होता. मी विचारले, सुधीर नेमके काय होत आहे तुला? मला इतका problem दिसत नाही. पण तुला तसे काही वाटत असेल तर आपण हॉस्पिटलला जाऊ या.

नाही रे तसे नाही, पण आईबाबांची खूप आठवण येते. असे म्हणून तो रडायलाच लागला. अचानक हे बघून मी स्तब्धच झालो. त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला म्हणालो, शांत हो. हे अगदी स्वाभाविक आहे. बस इथे. वाहिनी चहा घेऊन आल्या आहेत, आपण चहा घेऊ या.

वहिनिंनी आणलेला चहा आम्ही तिघांनी बसून शांतपणे घेतला. आता जरा सुधीर शांत झाला होता. डोळ्यातले अश्रू पण कमी झाले होते. मनाने ही थोडा मोकळा झाला होता.

बघ ना सचिन, आज आईबाबा नसताना मी कामे पूर्ण करण्यासाठी महिनाभर इथे राहिलो आहे रे. आई डोळ्यात पाणी आणून बोलवत होती तेंव्हा मला कधी कळलेच नाही कि आईबाबांना माझ्या इथे त्यांच्या सोबत राहण्याने किती आनंद झाला असता. कदाचित त्यांच्या उतारवयातील आयुष्यात ते सगळ्यात जास्त आनंदाचे क्षण असते. त्यांच्या जीवात जीव होता तो पर्यंत माझ्यासाठी त्यांनी इथली एक-एक वस्तू सांभाळली. अरे, काल कपाट साफ करताना माझा लहानपणीचा स्वेटर, शाळेचा युनिफोर्म, मी लहानपणी काढलेली चित्रे, कितीतरी वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या मिळाल्या. आणि हा बघ, हा बॉल आठवतोय तुला, ह्याने आपण खेळत होतो. असे बोलत तो आतल्या खोलीतून पिवळ्या रंगाचा टेनिस बॉल घेऊन आला. त्या हातातल्या बॉलकडे पाहून त्याला अश्रू अनावर होत होते. मी आणि वाहिनी शांतपणे त्याच्याकडे बघतच होतो. वाहिनी त्याला काहीतरी समजविण्याचा प्रयत्न करणार इतक्यात मी त्यांना डोळ्यांनीच शांत बसा, काही बोलू नका असे खुणावले.

डोळे पुसता पुसता त्याने परत बोलावयास सुरवात केली, पाहिलेस सचिन, माझ्या सगळ्या आठवणी ते सांभाळून ठेवत होते आणि मी..... माझ्या मधेच इतका मग्न होतो की त्यांच्याजवळ माझे येऊन रहाणे किती आवश्यक होते ह्याचा विचार देखील केला नाही. माझ्या दृष्टीने त्यांना पैसे पाठवणे महत्वाचे वाटत होते. लहानपणी पाहिलेले बाबांचे ते कष्ट डोळ्यासमोर सतत उभे राहायचे. आणि आईची घर चालवताना होणारी तारांबळ दिसत राहायची. म्हणून खूप पैसे पाठवत होतो. एकाच विचाराने, की माझ्या आईबाबांना कष्ट पडू नयेत. अरे सचिन, काय सांगू तुला, आज हे सगळे पैसे मी जे दान केलेत ना, ते सगळे पैसे मी त्यांना पाठवलेले होते. बँकेत ते तसेच जमा होते. शिवाय ह्या बघ ह्या समोर सगळ्या F.D. दिसत आहेत ना त्या, हे घर, ती मामाची शेताची जागा हे सगळे ते माझ्यासाठी ठेऊन गेलेत. अरे स्वयंपाकवाल्या मावशी सांगत होत्या, बाबा त्यांना सांगत होते की त्यांच्या नंतर मला सख्खे कोणी नाही आणि मला काही लागले तर मी कुठे जाईन? हा विचार करूनच हे सगळे त्याच्यासाठी ठेवतोय. देव करो, त्याला आमच्यासारखे कष्ट ना पडो. आणि मी, मी का नाही असा विचार केला की मी त्यांचा एकाच मुलगा आहे. मी जर त्यांच्याजवळ राहिलो नाही तर त्यांच्याजवळ कोण राहील? कोणाला ते सुधीर म्हणून हाक मारतील? असे बोलत तो खिडकीजवळ जाऊन उगवत्या दिवसाची वाट बघत उभा राहिला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात. मी स्तब्ध होऊन ऐकत होतो. वहिनींच्या डोळ्यातून देहील अश्रुधारा वाहत होत्या.

पाच-दहा मिनिटाने माझ्याजवळ बसून परत त्याने बोलायला सुरुवात केली, बघ सचिन, आत्ता ह्या क्षणी माझ्याकडे हे सगळे आहे.पण ते दोघे नाहीत. त्यांच्या न होण्याचे दुःख मला खूप जाणवते आहे. त्यांना सुद्धा असेच झाले असेल का रे? त्यांच्या जवळ देखील हे सगळे होते परंतु मी नव्हतो. आज मी माझी ही व्यथा तुम्हा दोघांजवळ बोलत आहे, त्यांनी कोणाला सांगितले असेल रे? आणि परत त्याचे डोळे भरून आले. मी आणि वाहिनी शांतपणे त्याच्याकडे बघत होतो. त्याला समजाविण्याची अमच्य दोघांचीही मनस्थिती नव्हती.

कोकिळेच्या कुहू-कुहू आवाजाने पाहत झाल्याची चाहूल दिली होती. थोड्याच वेळात झाडावर पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून घरात प्रवेशली होती. कावळे कर्कश्य आवाजात काव-काव ओरडत होते. रात्रीची भयाण शांतता संपुष्टात आली होती.

हळूहळू सुधीरही सावरत होता. मी आता परत गेल्यानंतर माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माझ्या मनाची परिस्थिती सांगणार आहे. मी आयुष्यात किती मोठा failure आहे याचे उदाहरण देणार आहे. माझ्यासारखी चूक त्यांच्याकडून होऊ नये एवढीच इच्छा. आणि मी निश्चय केला आहे, शक्य तितक्या लवकर मी इथे परत निघून येणार आहे. माझ्या मुलांच्या वागण्यात अशी चूक होऊ नये असा प्रयत्न मी जरूर करीन. सचिन, मी नक्की परत येईन. तू इथेच असशील, आपण परत आपल्या जुन्या दिवसांची आठवण करुन इथेच जगू या. निदान आईबाबा जिथे असतील तिथून मी घरी परत आलो हे बघून खूष होतील. असे म्हणत डोळ्यातील आसवांसकट थोडासा हसला.
तितक्यात मीनलचा फोन आला. ती काळजी करत होती. घड्याळात पहिले, सात वाजले होते. तिला फोनवर सांगितले, काळजी करू नकोस, आमच्या सगळ्यांचाच ब्रेकफास्ट तयार कर आम्ही सगळे घरीच येतो. सुधीर नाही म्हणत होता पण तसाच जबरदस्तीने त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन घरी आलो होतो,
आमच्या सगळ्यांच्या गप्पा-गोष्टीत तो रात्रीचे दुःख बहुतेक विसरला असावा. नंतर तो घरी गेल्यावर शांत झोपला होता. वहिनींचा तसा फोन आला होता.

सकाळच्या त्या सगळ्या गोंधळात रात्री काय घडले हे मीनल बरोबर बोलताच आले नव्हते. clinic ची वेळ झाल्यामुळे तयार होऊन सरळच clinic मध्ये पोहोचलो.

दुपारी clinic मधून घरी येताना मी मीनलचे नागपूरचे तिकीट काढून घेऊन आलो. तिच्या हातात ते दिल्यावर ती माझ्याकडे, हे काय? अशा प्रश्नार्थक नजरेने बघू लागली.

मी तिला म्हणालो, मीनल तुला तुझे आईबाबा किती दिवसांपासून बोलवत आहेत ना, जा त्यांच्याजवळ ८-१० दिवस तरी राहून ये. इथे मी आणि राजू दोघे मिळून मुले आणि आईबाबांना manage करतो. Go & enjoy.

ती एकदम खुदकन हसली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. पण तिच्या त्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यातले कुतूहल मात्र तसेच कायम होते. माझ्या या अचानक झालेल्या हृदय परिवर्तनाचे कारण तिला समजत नव्हते.

सौ वैजयंती गुप्ते.
9638393779.

Author