अनुभूती

ट्रींग ट्रींग फोनची घंटी जोरजोरात घणघणली. मी उठून उभा राहतो तोपर्यंत बंद झाली. बहुतेक राँग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई घाईत घेतला, “काय रे काय problem? ” मी विचारले.



ट्रींग ट्रींग फोनची घंटी जोरजोरात घणघणली. मी उठून उभा राहतो तोपर्यंत बंद झाली. बहुतेक राँग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई घाईत घेतला, “काय रे काय problem? ” मी विचारले.
म्हणाला, “काही नाही, मला माहित आहे अगदी अवेळी फोन केलाय मित्रा, हं, पण फारच बैचेन झाल्यासारखे झाले आहे, येऊ शकशील का? हवे तर ड्रायव्हरला पाठवतो.
” अरे sorry काय? येतो. माझा तर पेशाच असा आहे. निघतोच लगेच. माझ्या ड्रायव्हरला फोन करतो तो येईल. तुझ्या ड्रायव्हरला बोलावून घे आणि तुझ्याजवळच राहू दे. काळजी करु नकोस मी पोहोचतोच. ” मी म्हणालो.
फोन ठेवला. घड्याळात पाहिले पहाटेचे चार वाजत आले होते. ड्रायव्हरला फोन केला. मीनलला उठवले आणि सांगितले, सुधीरच फोन होता त्याची तब्येत बिघडली आहे. राजू आला कि निघतोच. मीनल म्हणजे माझी बायको. तिला आता माझ्या ह्या lifestyle ची सवय झाली होती. परंतु सुधीरला काय झाले असेल ह्या विचाराने तीसुद्धा जरा काळजीत पडली होती. तितक्यात राजू आला त्याने माझी visit bag गाडीत ठेवली आणि आम्ही निघालो. नाही म्हटले तरी २५-३० मिनिटांचा रस्ता होता. गाडीत बसल्यावर परत सुधीरला फोन केला. आवाजावरुन त्याला बरे नसल्याचे जाणवले.
सुधीर हा माझा बालमित्र. आम्ही एकाच आळीत राहत होतो, एकाच वर्गात शिकत होतो. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, मला दोन बहिणी आणि एक भाऊ. त्याच्या घरी आजी – आजोबा होते. त्यामुळे खेळायला आमच्याकडे आणि अभ्यासाला त्याच्याकडे हा आमचा नित्यक्रम होता. आमच्या शाळेत सुधीर – सचिन ची जोडी एकदम फेमस होती. बारावी नंतर मी मेडिकलला गेलो आणि तो इंजिनिअरींगला. त्यामुळे आम्ही थोडे दुरावलो. हळूहळू मी माझ्या कॉलेजच्या मित्रात आणि तो त्याच्या कॉलेजच्या मित्रात मग्न झालो. दोघांचे विषय वेगळे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात तर फारच दुरावलो. नंतर तो M. S. करायला अमेरिकेला गेला आणि मी Post Graguation साठी बंगलोरला. त्यामुळे तर अगदीच एकमेकांपासून लांब झालो. बऱ्याच वर्षानंतर त्याच्या लग्नात भेटलो होतो. मध्यंतरीच्या कालावधीत आम्हीही घर बदलून मोठ्या घरात दूर रहायला गेलो होतो. त्यामुळे नंतर कित्येक वर्ष एकमेकाला भेटलो सुद्धा नव्हतो.
काका-काकी म्हणजे त्याचे आई-बाबा मात्र नियमित भेटत होते. ते त्याच्याकडे जाऊन आले की त्याची खुशाली कळायची. तो मात्र फारच कमी येत असे, कारण त्याला M. S. झाल्यानंतर लगेचच नोकरी लागली होती आणि तो खुप हुशार असल्यामुळे लवकरच कंपनीत खूप वरच्या पोस्टवर निघून गेला होता. त्यामुळे कायमच busy असायचा. कितीतरी वर्षे काका-काकी त्याच्याकडे जात येत असत. परंतु हळुहळू दोघेही थकले होते.
त्यांच्या तब्येती देखील वयोमानाप्रमाणे कमकुवत होत गेल्या. तो लांबचा प्रवास त्यांना झेपेनासा झाला आणि त्यांचे त्याच्याकडे येणे-जाणे कमी झाले मी डॉक्टर झालो, इथेच गावात practice सुरु केली त्यामुळे काका-काकींची माझ्याकडची ये-जा वाढत गेली. काकी तर खुपच लवकर थकल्या होत्या. त्या फक्त माझ्याकडूनच औषध घेत असत त्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या कारणाने परत एकदा माझा आणि सुधीरचा फोनवर contact सुरु झाला होता. तो त्या दोघांची खुप काळजी करायचा. तो त्यांना कायम तिकडे बोलवत असे परंतु ह्या दोघांनाही इतका प्रवास करणे आता शक्य राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी घरात कायमसाठी कामाला दोन माणसे ठेवली आणि इथेच राहणे पसंत केले होते. काकी तर बघता-बघता इतक्या थकल्या की नंतर नंतर त्यांना माझ्या दवाखान्यात सुद्धा येणे शक्य होत नव्हते. मग मीच त्यांच्या घरी जात असे.
बरेच वर्षांनंतर, प्रथम जेव्हा मी त्यांच्या घरी काकींना बघायला गेलो, तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी एवाद्या सिनेमाची रीळ फिरावी तशा भुर्रकन माझ्या नजरेसमोरुन पळाल्या होत्या. सतत पळापळ करत असणाऱ्या काकी बिछान्यात केविलवाण्या दिसत होत्या. कायम स्वतःच्याच कामात मग्न असणारे काका, काकींच्या सेवेत हजर होते. सतत त्या दोघांच्या मागे फिरणारा सुधीर मात्र कुठेही दिसत नव्हता. प्रत्येक खोलीत असणाऱ्या त्याच्या फोटोने मात्र त्याचे अस्तित्व टिकवून होते. काकींच्या बेडरुम मधल्या एका फ्रेममध्ये सुधीर, संगीता वहिनी आणि दोन्ही नातवंडांचे वेगळे वेगळे फोटो व्यवस्थित फ्रेम करुन लावले होते. मला घरी आलेला बघून त्या अतिशय खुष झाल्या होत्या. कदाचित सुधीर आल्यावर त्यांना जसा आनंद होत असावा तसाच आनंद मला पाहिल्यावर झाला होता. ह्यानंतर मात्र माझे आणि सुधीरचे नियमित फोनवर बोलणे होत असे.
आईबाबांच्या प्रकृतीची तो सारखी चौकशी करीत असे. त्यांना औषधपाणी व्यवस्थित मिळावे म्हणून भरपूर पैसे पाठवत असे, शक्य होईल तेव्हा दोन-चार दिवस येऊन जात असे. ह्यामुळे आमच्या मैत्रीचा मात्र पुर्नजन्म झाला होता.
एके दिवशी काकी अचानक हे जग सोडून गेल्या आणि सुधीर इथे येईपर्यंत काकांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आणि मिनलवर येऊन पडली. तशी ह्या छोट्याशा गावात काका-काकींनी लोकांना वेळोवेळी भरपूर मदत केली होती त्यामुळे संपूर्ण गावानेच काकांची काळजी घेतली होती.
त्यानंतर मात्र सुधीरने तुम्ही तरी माझ्याबरोबर चलाच असा काकांजवळ हट्टच धरला. इथली कामे आटोपून वर्षभरात तुझ्याकडे रहायला येतो असे आश्वासन काकांनी त्याला दिले होते. आणि खरोखरीच त्यांनी आपली तिकडे जाण्याची तयारीही चालू केली होती. परंतु काकी गेल्यानंतर काका अगदी खचून गेले होते. काकींच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात कायम पाणी दाटून येत असे. सुधीरने येऊन इथे महिनाभर रहावे अशी शेवटी काकींची फार इच्छा होती. परंतु कामधंदा सोडून मी इतका राहू शकत नाही अशी तो त्यांची फोनवर समजूत काढत असे. काकींची ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळे काकांना खुप वाईट वाटत असे. ह्या प्रसंगाची आठवण होऊन काका अगदी बेचैन होऊन बोलत असत. परंतु तरीही स्वतः ला सावरुन त्यांनी त्याच्याकडे जायचे नक्की केले होते. बरेचसे सामान बांधूनही ठेवले, काही सामान आणि कपडे गावातील गरजू लोकांना वाटून टाकले.
एका रात्री अचानक, मला बरे वाटत नाही, तू लगेच ये असा काकांचा मला फोन आला. परंतु दुदैवाने मी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ह्या सगळ्या आठवणींनी माझ्या मनाची चलबिचल झाली होती आणि ह्या विचारात रस्ता संपता संपत नव्हता.
खरे तर आज आम्ही सगळे, म्हणजे मी, सुधीर, वहिनी व मुले बरोबरच होतो. सुधीरने गावातल्या वृद्धाश्रमाला काका – काकींच्या नावे भरपूर देणगी दिली होती. गावातल्या शाळेमध्ये मुलांसाठी बारा computers दिले होते. कित्येक वर्षांनंतर तो जवळजवळ महिनाभर गावात राहिला होता. सगळ्या बँकांची खाती, प्रापर्टीचे कागद त्याच्या, नावावर करुन घेत हाता. बहुतेक रोज रात्री आम्ही भेटतच होतो. जुन्या आठवणी काढून गप्पात रंगून जात होतो. वृद्धाश्रमामध्ये आणि शाळेमध्ये त्याने काही दान केले होते त्यासाठी गावातल्या लोकांनी त्याचा सत्कारही केला होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ह्या दिलेल्या रकमेचा किंवा वस्तूंचा योग्य वापर होतो आहे ह्यावर देखरेख ठेवण्याचे काम मी आणि मीनलने करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. त्यासाठी जरुरी असलेल्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी आम्ही दिवसभर एकत्रच होतो आणि तसा तो खूष दिसत होता. मग अचानक ह्याला काय झाले असावे? असा विचार माझ्या मनात सारखा डोकावत होता.
समोरच्या घरात दिसणाऱ्या लाईटच्या उजेडाने माझ्या विचारांची शृंखला तोडली. मी घाई-घाईने गाडीतून उतरलो आणि दाराकडे जवळ जवळ धावत गेलो. सुधीरनेच दार उघडले. त्याला पाहिल्यावर मला एकदम हायसे झाले. “काय रे काय झाले? ” मी विचारले.
म्हणाला, “ काही समजत नाही परंतु खुप अस्वस्थ झालो आहे. झोपही येत नाही. असे कधीच झाले नाही म्हणून तुला फोन केला. ”
“ठीक आहे, चल बघूया ” मी म्हणालो. राजु bag घेऊन आलाच. सुधीर व्यवस्थित तपासले. थोडे BP जास्त होते, पण इतकेही जास्त नव्हते की ज्यामुळे तो अस्वस्थ होईल. मी विचारात पडलो. नेमकं ह्याला काय झाले असावे? आता जवळ-जवळ पहाटेचे पाच वाजले होते.
वहिनी म्हणाल्या, ” मी जरा गरम गरम चहा करुन आणते. तो प्यायल्यावर याला बहुतेक बरे वाटेल. एवढा वेळ त्याने मला इथुन हलुनच दिले नाही. तुम्ही आता त्याच्याजवळ बसा मी येते” असे म्हणून त्या किचनमध्ये गेल्या.
माझे सुधीरच्या डोळ्यांकडे लक्ष गेले. ते पाण्याने भरलेले होते. कुठेतरी शुन्यात नजर लाऊन उभा असावा असे वाटले. चेहरादेखील उतरुन गेलेला दिसत होता. मी विचारले, “सुधीर नेमके काय होत आहे तुला? मला इतका problem दिसत नाही. पण तुला तसे काही वाटत असेल तर आपण हॉस्पिटलला जाऊया. ”
“नाही रे तसे नाही, पण आईबाबांची खुप आठवण येते.” असे म्हणून तो रडायलाच लागला. अचानक हे बघून मी स्तब्धच झालो.
त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला म्हणालो, “शांत हो मित्रा, हे अगदी स्वाभाविक आहे. बस इथे, वहिनी चहा घेऊन आल्या आहेत, आपण चहा घेऊया.” वहिनींनी आणलेला चहा आम्ही तिघांनी बसून शांतपणे घेतला.
आता जरा सुधीर शांत झाला होता. डोळ्यातले अश्रू पण कमी झाले होते. मनानेही थोडा मोकळा झाला होता.
माझ्याकडे बघून म्हणाला, “बघ ना सचिन, आज आई बाबा नसताना ती कामे पूर्ण करण्यासाठी मी महिनाभर इथे राहिलो आहे. आई डोळ्यात पाणी आणून बोलवत होती, तेव्हां मला कधी कळलेच नाहि की माझ्या इथे त्यांच्यासोबत राहण्याने त्या दोघांना किती आनंद झाला असता. कदाचित त्यांच्या उतारवयातील आयुष्यात ते सगळ्यात जास्त आनंदाचे क्षण असते. अरे, जीवात जीव होता तोपर्यंत माझ्यासाठी त्यांनी इथली एक-एक वस्तू सांभाळली. अरे, काल कपाट साफ करताना माझा लहानपणीचा स्वेटर, शाळेचा युनिफॉर्म, मी लहानपणी काढलेली चित्रे, कितीतरी वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या मिळाल्या.” असे बोलत बोलत तो आतल्या खोलीत गेला आणि हातात एक जुना टेनिसचा बॉल घेऊन आला. त्याकडे पाहुन मला म्हणाला, “सचिन, हा बघ, हा बॉल आठवतोय तुला? ह्याने आपण खेळत होतो. बारावीची परिक्षा संपल्यावर एक मॅच खेळत असताना तुझे आणि माझे भांडण झाले होते. आईला ते अजिबात आवडले नव्हते आणि तिने आपल्यामध्ये भांडण लावणाऱ्या या बॉललाच लपवून ठेवले होते.” हे बोलताना त्याला अश्रु अनावर होत होते. त्या बॉलकडे पाहून तो प्रसंग माझ्यादेखील नजरेसमोर जसाच्या तसा उभा राहिला आणि माझ्याही डोळ्यात पाणी तरळले. मी आणि वहिनी शांतपणे त्याच्याकडे बघत होतो. वहिनी त्याला समजविण्याचा काहीतरी प्रयत्न करणार इतक्यात मी त्यांना डोळ्यांनीच खुणावले ‘शांत बसा, काही बोलू नका.’
डोळे पुसत पुसत त्याने परत बोलण्यास सुरुवात केली, “ पाहिलेस सचिन, माझ्या सगळ्या आठवणी ते सांभाळून ठेवत होते आणि मी… मी माझ्यामध्येच इतका मग्न होतो की त्यांच्याजवळ माझे येऊन राहणे किती आवश्यक होते ह्याचा विचारदेखील केला नाही. माझ्या दृष्टीने त्यांना पैसे पाठवणे महत्वाचे वाटत होते. लहानपणी पाहिलेले बाबांचे ते कष्ट डोळ्यासमोर सतत उभे रहायचे. आणि आईची घर चालवताना होणारी तारांबळ दिसत रहायची. म्हणून खुप पैसे पाठवत होतो. एकाच विचाराने, की माझ्या आईबाबांना कष्ट पडू नयेत. अरे सचिन, काय सांगू तुला, आज हे सगळे पैसे मी जे दान केलेत ना, ते सगळे पैसे मी त्यांना पाठवलेले होते. बँकेत ते तसेच जमा होते. शिवाय ह्या बघ ह्या समोर सगळ्या F.D. (Fix deposit receipts) दिसत आहेत ना त्या, हे घर, ती पाठची शेताची जागा हे सगळे ते माझ्यासाठी ठेऊन गेलेत. अरे स्वयंपाकवाल्या मावशी सांगत होत्या, बाबा त्यांना सांगत होते की, त्यांच्यानंतर मला सख्खे कोणी नाहि आणि मला काही लागले तर मी कुठे जाईन? ह्या विचारानेच हे सगळे त्यांनी माझ्यासाठी ठेवले आहे. बाबा नेहमी म्हणायचे, देव करो त्याला आमच्यासारखे कष्ट ना पडो. आणि मी, मी का नाही असा विचार केला की मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मी जर त्यांच्याजवळ राहिलो नाही तर त्यांच्याजवळ कोण राहिल? कोणाला ते सुधीर म्हणून हाका मारतील? ” असे बोलत तो खिडकीजवळ जाऊन उगवत्या दिवसाची प्रतीक्षा करत उभा राहिला. डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या. मी स्तब्ध होऊन ऐकत होतो. वहिनींच्या डोळ्यातून देखील अश्रुधारा वाहत होत्या.
पाच-दहा मिनिटाने माझ्याजवळ बसून परत त्याने बोलायला सुरुवात केली, “बघ सचिन, आता ह्या क्षणी माझ्याकडे हे सगळे आहे. पण ते दोघे नाहित. त्यांच्या न होण्याचे दुःख मला खूप जाणवते आहे. त्यांनासुद्धा असेच झाले असेल का रे? त्यांच्याजवळ देखील हे सगळे होते परंतु मी नव्हतो. आज मी माझी ही व्यथा तुम्हा दोघांजवळ बोलत आहे, त्यांनी कोणाला सांगितले असेल रे? त्या दोघांनी एकमेकांना आधार देत, माझ्या वाटेकडे डोळे लाऊन दिवस काढले असतील नाही का रे?” आणि पाणावलेल्या डोळ्यांनी गप्पच झाला. मी आणि वहिनी शांतपणे त्याच्याकडे बघत होतो. त्याला समजविण्याची आमच्या दोघांचीही मनस्थिती नव्हती.
तेवढ्यात, कोकीळेच्या कुहू कुहू आवाजाने पहाट झाल्याची चाहूल दिली होती. थोड्याच वेळात झाडांवर पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. सुर्याची कोवळी किरणे खिडकीतून घरात प्रवेशली होती. कावळे कर्कश्य आवाजात काव काव ओरडत होते. रात्रीची ती विचित्र शांतता संपुष्टात आली होती.
हळुहळू सुधीरही सावरत होता. म्हणाला, “मी आता परत गेल्यानंतर माझ्या आजुबाजुच्या सगळ्या लोकांना माझ्या मनाची परिस्थिती सांगणार आहे. मी आयुष्यात किती मोठा failure आहे याचे उदाहरण देणार आहे. माझ्यासारखी चूक त्यांच्याकडून होऊ नये एवढीच इच्छा. आणि मी निश्चय केला आहे, शक्य तितक्या लवकर मी इथे परत निघून येणार आहे. सचिन मी नक्की परत येईन. तू इथेच असशील, आपण परत आपल्या जुन्या दिवसांची आठवण करुन इथे जगूया. निदान आईबाबा जिथे असतील तिथून मी घरी परत आलो हे बघून खुष होतील. असे म्हणत डोळ्यातील आसवांसकट थोडासा हसला.
तितक्यात मीनलचा फोन आला. ती काळजी करत होती. घड्याळात पाहिले, अरे बापरे, सात वाजले होते. तिला फोनवर सांगितले, “काळजी करु नकोस, सुधीर ठिक आहे तू एक काम कर, आमच्या सगळ्यांचाच ब्रेकफास्ट तयार कर. मी सगळ्यांना घेऊन घरीच येतो. ” सुधीर नाही म्हणत होता पण तसाच जबरदस्तीने त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन घरी आलो.
आमच्या सगळ्यांच्या गप्पा-गोष्टीत तो रात्रीचे दुःख बहुतेक विसरला असावा. नंतर तो घरी गेल्यावर शांत झोपला होता. असे वहिनींनी मला फोनवर सांगितले. सकाळच्या त्या सगळ्या गोंधळात रात्री काय घडले हे मीनलबरोबर बोलताच आले नव्हते. Clinic ची वेळ झाल्यामुळे मी तयार होऊन सरळच clinic मध्ये पोहोचलो होतो. दुपारी clinic मधुन घरी येताना मात्र मी मीनलचे नागपूरचे तिकीट काढून घेऊन आलो. तिच्या हातात ते दिल्यावर ती माझ्याकडे हे काय? अशा प्रश्नार्थक नजरेने बघतच राहिली.
मी तिला म्हणालो, “मीनल तुला तुझे आईबाबा किती दिवसांपासून बोलवत आहेत ना, जा त्यांच्याजवळ ८-१० दिवस तरी राहून ये. इथे मी आणि राजू दोघे मिळून मुले आणि आईबाबांना manage करतो. You go and enjoy.”
ती एकदम खुदकन हसली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले. परंतु तिच्या त्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यात प्रचंड कुतूहल दिसत होते.
माझ्या या अचानक झालेल्या हृदयपरिवर्तनाचे कारणच तिला समजल नव्हते.

Author