आनंदी

रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो.



रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो. अशा अनेक वेगळ्या वेगळ्या आठवणी आपल्या मनांत एकत्रीत असतात. अनेक वेळा आयुष्यात कित्येक सुंदर गोष्टी सुद्धा घडत असतात. तर कित्येक वेळा प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रसंग ही समोर येत असतात. काही प्रसंग आपल्या मनांत खोलवर रुजलेले असतात. ते आपल्याला कळत ही नाही. एक विचार येतो कि माणसाचे मन म्हणजे काय? मन हा क्षणाक्षणांच्या आठवणींचा ठेवा असतो. कधीतरी एखादा प्रसंग असा घडतो की मनांत रुजलेल्या एवाद्या जुन्या प्रसंगाला उजाळा देतो आणि नकळत आपण त्याची तुलना करत बसतो.
माझ्या समोर अशीच एक घटना घडली की जुन्या गोष्टीची आठवण देवून गेली. खरे तर दोनही प्रसंग फार काही भयंकर किंवा दुखःद नाहीत. पण त्यांनी विचार करण्यास जरुर भाग पाडले.
ही एक जुनी गोष्ट आहे. जुनी म्हणजे पाच – सहा महिन्यांपूर्वीची असेल अगदी जवळच्या नातेवाईंकाकडे लग्नाला गेले होते. आणि कार्यालयामध्ये मुली कडच्या लोकांसाठी एक खोली दिली जाते, ती खोली सांभाळण्याचे काम आम्हा दोघी-तिघींना मिळाले होते. म्हणून त्या खोलीतच बसलो होतो. नवऱ्या मुलीची गौरीहाराला बसण्याची तयारी चालू होती तिच्या काकी लग्नानंतर मुलीला देण्याचे सामान, ओटीचे सामान ताटात काढून तयार करत होत्या. आम्ही आपले इकडे तिकडे खोलीत लक्ष ठेवत बसलो होतो.
सहज एका कोपऱ्यात लक्ष गेले. एक पाव्हण्या बाई आपल्या मुलीला बॅगेतून लग्नासाठी नवीन आणलेला तिचा ड्रेस काढून देत होत्या. मुलगी खरे तर काही लहान नव्हती. तेरा-चौदा वर्षाची नक्कीच असेल. बाईंच्या अंगावरची साडी, दागिने आणि मुलीचे रहाणीमान अगदी सुशिक्षित well to do घराचे पुरावे देत होते.
बॅगेतून कपडे काढून त्यांनी ते मुलीच्या हातात दिले. त्या बरोबर तिने एकदम रागाने आईकडे बघीतले आणि तावा – तावाने वाद घालायला लागली. “मी तुला सांगितले होते नां, असले कपडे मला आवडत नाही दुसरे कपडे पण बॅगेत ठेवायला दिले होते. ते तु आणले नाहीस कां? ” बाई जरा लाजल्यासारख्याच झाल्या. पण हळू आवाजात म्हणाल्या, “अग बाबांनी आणले आहेत नां, त्यांची इच्छा आहे थोडा वेळ घाल मग बदलून टाक, इतर वेळा ते तुम्हाला कधी काही म्हणतात कां? लग्ना कार्यात त्यांच्या आवडीचे घाल.”
ती मुलगी काही एकायलाच तयार नव्हती. उलटे सुलटे बोलणे चालूच होते. शेवटी चिडून त्या म्हणाल्या, “तु बाबां बरोबर खरेदीला गेली होतीस तेव्हाच कां नाही सांगितलेस त्यांना, त्यांनी दुसरा ड्रेस घेतला असता.”
आता मात्र त्या मुलीने सगळा ताळतंत्र सोडला. आणि जवळ जवळ आईच्या अंगावर ओरडलीच, “त्यांच्या एकदा डोक्यात आले कि ते काय ऐकतात का माझे.”
बराच वेळ आईने समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिने नाही तर नाही ऐकले. शेवटी नाईलाजास्तव आईने तिला हवे ते कपडे दिले. आणि कसलाही विचार न करता ते कपडे घालून ती उद्धटपणे निघून गेली.
खोलीतले सगळेच लोक हे बघत होते. बिचाऱ्या बाई कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. शेजारी उभ्या असलेल्या बाईंना म्हणाल्या, “आजकालची मुले, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्याच करायच्या असतात. तिच्या बाबांनी अगदी हौशीने ‘दोन हजार रुपयांचा ड्रेस आणलाय. पण तो तिला नाही आवडला. आपण काय बोलणार?” खरेच आहे आजकाल मुले थोडी मनमौजी झालीत. थोड्या वेळ बिचाऱ्या बाईंची दयाच आली. त्या ही अगदी लाजिरवाण्या झाल्या होत्या. नंतर लग्न पार पाडून आम्ही घरी आलो. आणि हा प्रसंग विसरून सुद्धा गेला.
काही दिवसांपूर्वी बाजारात घरातल्या काही छोट्या-मोठ्या वस्तु विकत घेण्यासाठी गेले होते. दिवाळीचे दिवस असल्यामुळे छोट्या छोट्या दुकानात ही भरपूर माल आला होता.
एक लहानशी मुलगी साधारणपणे नऊ-दहा वर्षाची असेल आपल्या आई-बाबां बरोबर कपडे खरेदीला आली होती. त्यांच्या अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, वडिलांची सायकल अगदी साधारण परिस्थिती असावी हे सांगत होते. वडिल तर अगदी कुठेतरी रोजावर काम करत असावेत असेच वाटत होते. आई अगदी खेडेगावातील असावी. गुपचुप उभी होती. मी बाजुला काही सामान घेत होते. पण दुकानांत खुप गर्दी होती. त्यामुळे बराच वेळ उभी होते. सहज समोर हे लोक दिसले म्हणून बघत होते.
बहुतेक त्या मुलीच्या वडिलांनी दुकानदाराला सांगितले असावे की काही ठराविक रक्कमेपर्यंत फ्रॉक दाखवा. दुकानदार ही तसेच दाखवत होता. त्यानी त्या मुलीला विचारले, “कुठल्या रंगाचा दाखवू?”
एका झटक्यात ती म्हणाली, “गुलाबी.” त्याने आठ-दहा गुलाबी फ्रॉक काढले. पण ती आपल्या इवल्याश्या हातांनी पुढच्या बाजुला डिझाईन हवे असे सांगत होती.
दुकानदार सुद्धा तसाच दाखवण्याचा प्रयत्न करत होता. नकळत त्याच्या हातून एक पिवळ्या रंगाचा डिझाईन वाला फ्रॉक निघाला. आणि तो तिला आवडला. असे डिझाईन गुलाबी रंगात द्या असा बालहट्ट तिने चालू केला. दुकानदार सुद्धा न चिडता तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता,
” तसा माझ्याकडे नाही.”
शेवटी वडिल म्हणाले, “बघा आहे कां? ”
“आहे तसा पण जरा महाग आहे, कदाचित तो तुम्हाला महाग पडेल
म्हणून मी दाखवत नाही.”…..• दुकानदार म्हणाला
“किती किंमत असेल? ” “. मुलीच्या वडिलांनी हळूच विचारले.
” दोनशे रुपये. ”— दुकानदार.
हे एकून मुलीचे बाबा जरी पाठी वळले आणि स्वतःकडचे पैसे मोजू लागले. दुकानदाराच्या बहुतेक लक्षात आले असावे कि ते पैसे कां मोजत असावेत. त्याने पटकन मुलीच्या अंगावर तो फ्रॉक लावला व तिला म्हणाला, “बघ बेटा काय बढ़िया दिसतोय हा फ्रॉक तुला.
तशी इतका वेळ गुपचुप उभी असलेली आई पण पटकन म्हणाली, “खरेच खूप छान दिसतोय. ‘ हे ऐकून ती वडिलांजवळ जाऊन म्हणाली, “हे अंकल म्हणतायत हा फ्रॉक छान दिसतोय मला.
क्षणभर वडिलांनी दुकानदाराकडे कृतज्ञतेने पाहिले आणि म्हणाले, “आमची छोटी एकदम गुड़िया दिसते आहे.” असे म्हणत त्याने तो तिच्या अंगावर धरला आणि तिच्या आईकडे बघून म्हणाले, “खरे आहे नां, एकदम गुड़िया.
हे बोलतांना, आणि तिला समजवणाऱ्या बाबांच्या जिवाला होणाऱ्या वेदना त्या चिमुरड्या जिवाल जशा समजल्या असाव्यात इतका वेळ हट्ट करणारी मुलगी बाबांकडे बघून म्हणाली, “मला हाच फ्रॉक हवा” आणि हातात घेवून उड्या मारायला लागली.
हट्ट करणारा तो चेहरा आणि हा खुशीने फुललेला चेहरा ह्यातला फरक अगदी लक्षात येण्याजोगा होता, ती आनंदाने नुसती नाचत होती.
पण त्या बाबांच्या चेहऱ्यावर मात्र मुलीचा हट्ट पुरवण्यात कमी पडलो हे भाव स्पष्ट दिसून येत होते.
न रहावून मी हसत हसत त्या माणसाला म्हणाले, “तुमची मुलगी हुषार आहे आणि समजुतदार पण आहे.’
ते म्हणाले, “आमच्या सारख्या गरीबांच्या मुलांना असेच रहावे लागते. ” क्षणभर असे वाटले परिस्थिती लहानपणापासूनच त्यांना आयुष्याचे धडे देत असते माणसाच्या विचारसरणीवर त्यांच्या आजुबाजुच्या परिस्थितीचा खूप परिणाम होत असतो. अडथळीच्या शर्यतीतले आयुष्य जगणाऱ्या कुटुंबात मोठी होणारी मुले त्यांच्या लहान वयातच अनुभवाने तडजोड करुन जीवन आनंदाने जगायला शिकतात वयाच्या आकड्याच्या गिनतीपुढे त्यांचे वय केव्हाच निघून गेलेले असते हे आज उदाहरणासह पाहिले.
त्या वडिलांच्या उत्तराने डोके सुन्न करुन टाकले होते. एक मिनिटे काय बोलावे सुचलेच नाही. काहितरी बोलायचे म्हणून विचारले.
“काय नांव आहे हिचे !” “आनंदी” – ते म्हणाले.
आम्ही काय बोलतोय तिला काहीच समजत नव्हते. ती आपली हातात फ्रॉक ची पिशवी घेवून सायकलवर बसली खुशीने तिचे डोळे जणू चमकत होते. वाटले हिचा एक फोटो काढावा. आनंद कसा असतो हे “आनंदी” च्या डोळ्यात टिपावे.
पण त्या क्षणी असे वाटले. कुठल्याही कॅमेऱ्याची कितीही powerful lense (पॉवरफुल – लेन्स) हे तिच्या चेहऱ्यावरचे भाव, हा आनंद टिपूच शकणार नाही.
खिन्न मनाने काम संपवून घरी परत आले. त्या छोट्याश्या जीवाने लहान वयांत तिच्या आवडीशी नकळत पण आनंदाने केलेली ती तडजोड सारखी आठवत होती. मनातले विचार जातच नव्हते. तिचा तो आनंदी चेहरा डोळ्यासमोरुन हालतच नव्हता. मनातल्या मनात मी प्रार्थना केली-
“परमेश्वरा मला ह्या प्रसंगाची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तिचा आनंदाने नाचणारा निरागस चेहरा आणि खुशीने चमकणारे हे तिचे डोळे मला दिसू दे. आणि ह्या ‘आनंदी’ ला सदैव ‘आनंदी’ ठेव तिच्या बाबांना भरपूर मिळू दे आणि त्यांना पण खूप आनंद मिळू दे आणि नकळत मी ‘दोन हजाराच्या’ ड्रेसवाली मुलगी आणि हि छोटी ‘दोनशे रुपयाची फ्रॉकवाली ‘आनंदी’ ह्यांच्यात तुलना करत बसले…..

Author