अधिकमास 2026 : पुरुषोत्तम मासात कोणती व्रते करावीत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारणे

हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिकमास, ज्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते, हा अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद काळ मानला जातो. या महिन्यात विशेष व्रते, दानधर्म, उपवास आणि नामस्मरण यांना मोठे महत्त्व असते. सामान्यतः शुभमंगल कार्ये टाळून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो.



अधिकमास 2026 : पुरुषोत्तम मासात कोणती व्रते करावीत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारणे

हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिकमास, ज्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते, हा अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद काळ मानला जातो. या महिन्यात विशेष व्रते, दानधर्म, उपवास आणि नामस्मरण यांना मोठे महत्त्व असते. सामान्यतः शुभमंगल कार्ये टाळून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो.

अधिकमासाला ‘पुरुषोत्तम मास’ का म्हणतात?

अधिकमासात सूर्याचे कोणत्याही राशीत संक्रमण होत नाही. त्यामुळे या काळात सूर्यसंक्रांत नसते. चंद्र आणि सूर्य यांच्या गतीतील फरकामुळे वातावरणात सूक्ष्म बदल होत असल्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या बदलांचा मानवी शरीर आणि मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून व्रते, जप, दान आणि पुण्यकर्म करण्याची परंपरा रूढ झाली आहे.

या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या पुरुषोत्तम स्वरूपाची उपासना विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे याला ‘पुरुषोत्तम मास’ असे संबोधले जाते.

अधिकमासात कोणती व्रते आणि पुण्यकर्म करावीत?

धर्मशास्त्रानुसार अधिकमासात पुढील धार्मिक आचरण करण्यास विशेष महत्त्व दिले जाते :

  • महिनाभर उपवास, एकभुक्त किंवा नक्तभोजन करणे
  • श्री पुरुषोत्तम कृष्णाची दररोज पूजा आणि नामजप करणे
  • शक्य असल्यास मौन ठेवून भोजन करणे
  • तीर्थस्नान आणि गंगास्नान करणे
  • दीपदान करून अखंड दिवा लावणे
  • तीर्थयात्रा आणि देवदर्शन करणे
  • तांबूलदान आणि अन्नदान करणे
  • गोपूजन आणि गोग्रास देणे
  • अनारसे किंवा गोड पदार्थांचे दान करणे

शास्त्रानुसार संपूर्ण महिनाभर दान करणे शक्य नसल्यास शुक्ल व कृष्ण पक्षातील द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना विशेष दानधर्म करावा.

अधिकमासात कोणती कर्मे करणे योग्य मानले जाते?

या काळात नित्यपूजा, श्राद्ध, जप, शांतीविधी आणि धार्मिक संस्कार करण्यास मान्यता आहे. यामध्ये :

  • नामस्मरण आणि जप
  • ज्वरशांती व पर्जन्येष्टी यांसारखी धार्मिक कर्मे
  • ग्रहणश्राद्ध
  • जातकर्म, नामकरण आणि अन्नप्राशन
  • तीर्थश्राद्ध आणि नित्यश्राद्ध

यांसारखी कर्मे केली जाऊ शकतात.

अधिकमासात कोणती कामे टाळावीत?

अधिकमासात काही शुभकार्ये टाळण्याची परंपरा आहे. त्यामध्ये :

  • विवाह
  • गृहप्रवेश
  • वास्तुशांती
  • नवीन घर बांधण्याचा आरंभ
  • उपनयन संस्कार
  • देवप्रतिष्ठा
  • संन्यास ग्रहण

यांसारख्या मंगल कार्यांचा समावेश होतो.

अधिकमास म्हणजे नेमके काय?

चांद्रमास आणि सौरमास यातील फरक

हिंदू पंचांगात दोन प्रकारच्या कालगणना मानल्या जातात — चांद्रवर्ष आणि सौरवर्ष. चंद्राच्या गतीनुसार चांद्रमास ठरतो, तर सूर्याच्या गतीनुसार सौरवर्ष निश्चित होते.

चांद्रवर्षात सुमारे ३५४ दिवस असतात, तर सौरवर्षात ३६५ दिवस असतात. या दोन्हीमध्ये सुमारे ११ दिवसांचे अंतर पडते. हे अंतर भरून काढण्यासाठी साधारणपणे २७ ते ३५ महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच ‘अधिकमास’ म्हटले जाते.

कोणत्या महिन्यात अधिकमास येतो?

धर्मशास्त्रानुसार चैत्र ते अश्विन या सात महिन्यांपैकी कोणताही महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. क्वचित फाल्गुन महिनाही अधिकमास ठरतो. मात्र कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष महिन्यांमध्ये अधिकमास येत नाही.

माघ महिना हा ना अधिकमास असतो, ना क्षयमास मानला जातो.

आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा काळ

अधिकमास हा केवळ धार्मिक विधींचा महिना नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान आणि भक्तीचे कार्य विशेष पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे अनेक भाविक या काळात आध्यात्मिक साधना आणि सेवा कार्याला प्राधान्य देतात.

संकलक – कीर्तीराज घुगे.

(वरील माहिती ही सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून संकलित केली आहे.)

Author