आजी



विसरले जाणे येणे
विसरले गणगोता
माजिया सानुल्याची
फक्त आजी आहे आता

दिन उगवतो माझा
त्याच्याच आवाजाने
दिन मावळे रात्रीला
अंगाई गाता गाता

आठ वाजले का बाई
झाली दुधाची ग वेळ
जीव होई कासावीस
वेळेवरी आटोपता

दहा वाजले जाहली
आंघोळीची त्याची वेळ
आता वाजणार भोंगा
जरा साबण लावता

बारा वाजता अचूक
जेवणाची त्याची वेळ
कधी चुकणार नाही
तुम्ही चुकाल घड्याळ
बालकृष्णाचे दर्शन
दहीभात भरवता

भर दुपार टळली
आता पुरे झाला खेळ
डोळे मिटू मिटू होती
माडिवरी थोपटता

संध्याकाळ फुलपंखी
येई नटून – थटून
टिकामिका करुनिया
बाळ खेळते अंगणी
दिनमान जाई अस्ता
त्याला पाहता पाहता

त्याच्या बालमूठीमध्ये
माझे बंदीस्त अस्तीत्व
त्याच्या आसूत हसूत
माझे सामावले विश्व
बोबडे बोल त्याचे
माझी गीता माझी गाथा
माझीया तान्हुल्याची
फक्त आजी आहे आता

— सुधा मोकाशी

Author