
मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता.
गुजराथच्या पाटणमधल्या बिंब राजाने प्रतिष्ठान इथल्या राजाची मदत घेऊन अकराव्या शतकाच्या अखेरीस महिकावती जिंकली आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. लगेच त्याने ससैन्य कूच केले वालुकेश्वर आणि बाणगंगेकडे, जे आजच्या मलबार हिल इथे आहे.तिथे श्रीरामस्थापित शिवाचे दर्शन घेऊन तो परत फिरला खरा, पण दरम्यान महिकावतीचा पाडाव झाला होता. त्यामुळे बिंब राजा वाळूकेश्वराहून निघाला होता तो प्रवासातील एका बेटावर थांबला. पुन्हा पाटणला परतण्यापेक्षा त्याने निश्चयपूर्वक त्या बेटाचेच नामकरण महिकावती असे केले. तिथे पुन्हा एकदा स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेकप्रसंगी परमेश्वरी आशीर्वाद असावा म्हणून त्याने तिथे देवीच्या मूर्तीची स्थापना केली. तसा शिलालेखदेखिल त्याने तिथे शिल्पित केला. हा शिलालेख पुराभिलेख खात्याकडे हस्तांतरीत झाला आहे.
ही देवी आजच्या मुंबईत आहे, ती म्हणजे आजची प्रभादेवी. आणि ज्या बेटाचे नामकरण बिंब राजाने महिकावती असे केले, ते आजचे माहीम.
ही हकीकत कुठे सापडते?इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी महिकावतीची बखर ही पुस्तिका लिहिली ज्याला त्यांची १११ पानी प्रदीर्घ प्रस्तावना आहे. ही बखर तत्कालीन महिकावती, तिथले जनजीवन, परंपरा आणि प्रचंड व्यापारी उलाढाल याबद्दल भरपूर माहिती देणारी आहे.
