आगरी भाषेत म्हातारा आणि म्हातारीला, डोकरा आणि डोकरी बोललं जाते. घरात आजी असेल तर तिला आजी ऐवजी डोकरी ब अशा नावाने संबोधले जायचे.
थोडक्यात जेवढ्या पण ब होत्या त्या अशिक्षित होत्या. घरात ब ऐवजी आई तेव्हा व्हायची जेव्हा ती स्त्री शिकलेली असायची. आता तर आई ऐवजी आमच्यात पण मम्मा झाल्यात आणि त्यामुळे ब हा शब्द आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आमचा वरचा काका ज्याला आम्ही वरचा बाबा म्हणायचो तो रंगाने खूप सावळा होता, अंगाने शिडशिडीत आणि उंच होता. त्याचे शिक्षण चौथी की पाचवी पर्यंतच झाले होते, त्याचे नांव प्रधान होते. आमची वरची ब अशिक्षित आहे तिचे नांव कृष्णा बाई. तिचा एक डोळा तिच्या लहानपणापासून एका अपघातात निकामी झालेला आहे. तिला तेव्हापासून फक्त एकाच डोळ्याने दिसते. आजमितीला आमच्या वरच्या ब चे वय पंच्याएंशीच्या पुढे असावे. पण ही म्हातारी पंच्याएंशीची कसली साठीचीच असली पाहिजे असं कोणीही तिला बघितल्यावर बोलल्या शिवाय राहणार नाही.
आमचा वरचा बाबा खुप दारु प्यायचा आणि जुगार सुद्धा खेळायचा.
वरच्या ब ने आमच्या वरच्या बाबाचे जेवढे सोसले आहे आणि तरीही त्याचे एव्हढे सोहळे पुरवले आहेत की कोणाला सांगून पटणार नाही.
पंधरा एक वर्षांपूर्वी गणपती गेल्यानंतर काही दिवसांनी आमचा वरचा बाबा जुगार खेळायला गेला होता, गावातल्या एका क्लब मध्ये त्याला बघितले गेले त्यादिवशी खुप जोराचा पाऊस पडत होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा वरचा बाबा घरी परत आलाच नाही.
सगळीकडे शोधाशोध केली पण वरचा बाबा काही सापडला नाही. जवळपासचे सगळे हॉस्पिटल, शवागरे,पोलिस स्टेशन आमच्या कल्याण चे खाडी किनारे सगळीकडे त्याचा शोध घेतला पण वरचा बाबा किंवा त्याचे प्रेत काही मिळाले नाही.
तिच्या या मानण्यावर ती जवळपास आठ नऊ वर्ष ठाम राहिली. शेवटी माझ्या चुलत भावाने कोर्टाकडून नऊ दहा वर्ष उलटून गेल्यावर आमच्या वरच्या बाबाला रीतसर मृत घोषित करवून घेतले. तरीही आमची वरची ब तो जिवंत असेल या आशेत होती , तो परत येईल या अपेक्षेत होती.
शेवटी काही वर्षांपुर्वी आता आमचा वरचा बाबा काही परत येणार नाही, त्याचे काहीतरी बरे वाईट झाले असणार, त्याचे अंतिम संस्कार तर आपल्याला करायला मिळाले नाहीत निदान त्याच्या नावाने अंतिम विधी तरी उरकून घेऊ या आणि त्याच्या आत्म्याला मुक्त करू या , अशा प्रकारे वरच्या ब ची समजूत घातली गेली.
आईला सांग ब बरी हाये,बाबा पन बरा हं, उंद्या आमी आग्र्याला जाव, चल आता ठेवताव.
वरच्या ब ला काही वाचता येत नव्हते की लिहिता येत नव्हते तरीपण तिने वरच्या बाबाला दिल्लीतल्या मेट्रोची सफर घडवून आणली होती.
वरच्या ब ला एकाच डोळ्याने दिसते याचे मला लहान असताना खूप वाईट वाटायचे. तिला एका डोळ्याने कसं दिसत असेल याचा अनुभव घेण्यासाठी मी माझा एक डोळा मिटून पाच दहा मिनिटं इकडे तिकडे फिरायचो मग तिला जाऊन विचारायचो, ब तू एका डोळ्याने कसं सगळं बघते.
ती तिचा हात माझ्या डोक्यावरून मायेने फिरवायची आणि बोलायची देवाने एक डोला तरी दिले ना मना, त्येन मना सगला दिसतं रं माझ्या ल्येका.
आमची वरची ब मी लहान असताना मला कडेवर घेऊन अख्खा गाव फिरवायची, आता माझ्या मुलीला कडेवर घेतल्यावर तिला बोलायची, मग तुझ्या बापासला पण मीच कडेवर उचलून फिरवायची झे.
वरची ब आपल्या बोलण्याने कोणाला काय वाटेल याचा कधीच विचार करत नाही, तिला कोणाही बद्दल जे वाटेल ते ती मागचा पुढचा विचार न करता बोलून मोकळी होते. आपले मत मांडल्या शिवाय तिला चैन पडत नाही. कोणाला आवडो वा न आवडो, कोणाला चांगले वाटो नाहीतर राग येवो मनात कोणाबद्दल काहीच ठेवायचे नाही, जे काही असेल ते बोलून मोकळं व्हायचं.
तिच्या या सवयी मुळे घरात अजूनही भांडणे होतात. तिच्यामुळे भांडणे झाली तरी ती सगळं विसरून पुन्हा हाक मारायला हजर असते. जुन्या म्हणी वापरून नावं ठेवण्यात आणि सहज बोलता बोलता कोणालाही टोमणा मारण्यात तिचा हात कोणीही धरू शकणार नाही.
माझी जहाजावरली नोकरी तिला काही पटत नाही, जहाजावरुन परत आलो की तिचं एकच म्हणणं असतं. बाला आता नको रं जाव परत.
माझ्या विरुद्ध गावातील काही लोकांनी खोटी पोलिस केस दाखल केली होती. आमच्या वरच्या ब ने आठ दिवस सकाळ संध्याकाळी सतत त्या लोकांना आमच्या जुन्या घराच्या समोर असलेल्या चावडीवरुन हात वारे करून शिव्यांची लाखोली वाहिली. माझ्यावर खोटी केस करणाऱ्यांवर अब्रु नुकसानीचा दाव्यातून कोर्टात जेव्हा कधी ना कधी न्याय मिळेल तेव्हा मिळेल. पण वरच्या ब ने मला सगळ्या गावासमोर रोज आठ दिवस न्याय मिळवून दिला. शेवटी तिला सांगावं लागलं ब आता बास कर त्या लोकांनी जनाची आणि मनाची पण सोडली आहे त्यांना काही फरक पडणार नाही. पण वयाचे पंच्याएंशी वर्ष उलटून गेल्यावरही आपल्या घरातील मुलावर खोटं करणाऱ्यांच्या विरुद्ध तिच्या मनातील खदखद आणि चीड तिने अशा प्रकारे व्यक्त केलीच.
मी लहान असताना मला कडेवर घेऊन फिरवणे, मायेने डोक्यावरून हात फिरवून कडकडा बोटं मोडणे, चुलितल्या निखाऱ्यांवर लाल मिरच्या उतरवून दृष्ट काढणे, दिवाळीला कानात तेल घालुन, ईडा पिडा टळो म्हणून फुक मारणे. बाहेर तिर्थ क्षेत्री फिरायला गेल्यावर आवर्जून काही ना काही वस्तू आणणार. आमच्या कुटुंबात कितीही भांडणं झाली, वाद झाले तरीही आमच्या वरच्या ब चा तिच्या ईतर पुतण्यांपेक्षा फक्त माझ्यावरच सगळ्यात जास्त जीव अजुनही आहे. तिला मला काही पटवून द्यायचे असले की अक रं माझ्या ल्येका, असं बोलुन मला इमोशनली ब्लॅकमेल करायची पद्धत अजुनही ती वापरते.