उठा, उठा.. ‘मोती’ आंघोळीची..

अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!



पूर्वी रामायणाच्या काळात सर्वजण वल्कलं वापरत होते. तेव्हा कापडाचा शोध बहुधा लागलेला नसावा.. महाभारतात मात्र पाचही पांडवच नव्हे तर शंभर कौरवही भरजरी कपडे घालत होते. मग हे सर्वजण कपडे धुवायचे तरी कसे? त्यावेळी तर साबण अस्तित्वातच नव्हता.. की, फक्त पाण्यातून खंगळून काढायचे? ते काहीही असो साबणाचा उल्लेख हा इंग्रजांच्या काळातच पहिल्यांदा आढळतो.. १८९५ ला कलकत्ता बंदरात इंग्लंडहून ‘लिव्हर ब्रदर्स’चा ‘सनलाईट सोप’ नावाचा पहिला साबणसाठा भारतात आला.
ते पाहून टाटांनीही स्वदेशी साबणाची निर्मिती केली, त्याचं नाव ठेवलं ‘५०१ बार’! याच टाटांनी कालांतराने आंघोळीसाठीही साबण तयार केला.. त्याचं नाव ठेवलं ‘हमाम’!
आज जे नागरिक, साठ वर्षांहून अधिक वयाचे आहेत.. त्यांना हा ‘हमाम’ साबण नक्कीच आठवत असेल.. हिरव्या रंगाच्या वेष्टनातील हिरवी मोठी वडी.. त्यावर एम्बाॅस केलेली ‘हमाम’ची इंग्रजी अक्षरं.. याचा सुगंध आंघोळीनंतर बराच काळ नाकाला सुखावत रहायचा..
त्याचेच पुढे अनेक ब्रॅण्ड येत राहिले.. ‘जय’ नावाचा गुलाबी रंगाचा साबण, मोगऱ्याच्या सुगंधाचा होता.. ‘लक्स’ ह्या साबणाची शिफारस तर गेल्या पंच्याहत्तर वर्षातील मधुबाला पासून करिना कपूर पर्यंत तमाम हिंदी सिनेतारका करीत आलेल्या आहेत..
पूर्वी साबण आकाराने मोठे होते. एकदा वापरायला घेतला की, महिनाभर पुरायचे. आता त्यांचे आकार व वजन ‘स्लीम’ होत गेले. परिणामी आठवड्यातच ते संपू लागले.
‘लाईफबाॅय’ हा साबण पुरुषांसाठी असायचा.. लाल रंगाची ही मोठी वडी अंगावरील घामाच्या वासाला हद्दपार करायची. नंतर कडू लिंबाच्या पानांचा ‘नीम’ साबण आला. अनेक प्रकारचे आयुर्वेदिक साबण आले. त्यामध्ये ‘चंद्रिका’ मला आवडत असे. ‘लिरील’ या साबणाची थिएटरमधील जाहिरात पाहूनच तो घेण्याची इच्छा होत असे. धबधब्याखाली ‘लिंबाचा मदमत्त ताजेपणा’ असलेल्या या साबणाने आंघोळ करायला कुणाला नको वाटेल?
त्यानंतर डेटाॅल, सॅव्हेलाॅन या औषधी कंपन्यांनीही आंघोळीसाठीचे साबण बाजारात आणले.. अशा जंतुनाशक साबणाने, सर्वसामान्य माणूसही निर्जंतुक होऊ लागला..
काही ब्रॅण्डेड सेंट, स्प्रे, डिओवाल्या कंपन्यांनी त्यांचे महागडे साबण विक्रीसाठी उपलब्ध केले. ‘सिंथाॅल’ हा त्यातीलच एक!
पारदर्शक ‘पियर्स’ साबण वापरणं श्रीमंतीचं लक्षण वाटायचं. त्यांचा मनमोहक सुगंध वेड लावायचा.. हा ग्लिसरीनयुक्त साबण हिवाळ्यात वापरला जात असे. त्यांची झीज झपाट्यानं व्हायची व शेवटी अंडाकृती पातळ पापुद्रा हातात रहायचा..
‘डव्ह’ कंपनीचा साबण वापरला की, त्वचा मऊमुलायम होते.. मग समोरच्या स्त्रीचा गालगुच्चा घेण्याचा मोह होतो.. असं जाहिरातीतून दाखवतात..
‘संतुर’ कंपनीने हळद व चंदनाचे काॅपीराईट घेऊन स्त्रियांचं वय कमी करणारा ‘अद्भुत’ साबण बाजारात आणला.. कितीही वर्षांच्या स्त्रीला एखाद्या लहान मुलीनं ‘मम्मीऽऽ’ म्हटलं की समजावं ही ‘संतुर’चीच जादू आहे!!
..मग ह्याच ‘संतुर’ने एखाद्या आजोबांनी आंघोळ केल्यावर त्यांना ‘काकाऽऽ’ म्हणायला काय हरकत आहे?
‌‌ वर्षातील ३६१ दिवस तुम्ही कोणताही साबण वापरा, कोणीही पहायला येणार नाही.. मात्र भारतात दिवाळीचे चार दिवस हे टाटांच्या स्वदेशी ‘मोती’साठीच राखीव असतात..
मी माझ्या लहानपणापासून ‘मोती’नेच दिवाळी साजरी करतो आहे. त्याच्या जोडीला ‘म्हैसूर चंदन’ हा देखील साबण विक्रीसाठी असतो.. तरीदेखील प्रत्येकजण ‘मोती’ घेतोच.. त्यामध्ये ‘गुलाब’ व ‘चंदन’ हे दोनच प्रकार असतात..
गोल आकाराचा होती साबण अंगाला लावला की, स्वर्गीय आनंद मिळतो.. दिवाळीचे चार दिवस संपताना त्याचा आकार लहान लहान होत जातो.. शेवटी चपटा गोलाकार मोती दिवाळी संपल्याची जाणीव करुन देतो..
वर्षातून चार दिवसांसाठी होणारी ही आंघोळ पुढे वर्षभर आठवणीत रहाते.. आयुर्वेदिक उटणे अंगाला लावल्यानंतर त्याचा येणारा घमघमाट.. त्यानंतर मिळणारं रोजच्या एकाच ऐवजी दोन बादल्या गरम पाणी.. अंग पुसल्यावर डोक्यावरील केसांसाठी पूर्वी सुगंधी केस्टर आॅईल असायचं, आता बजाजचं बदाम तेल असतं… मस्त भांग पाडायचा आणि फराळाचा समाचार घ्यायचा…
अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-१०-२१.

Author