आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.
नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते. म्हणून मी १ जानेवारीला सकाळी गोरखगडावर जायचा बेत आखला. गोरखगड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावाजवळ आहे.
मुरबाडकडून देहरी गावात आलो. समोर दोन सुळके दिसत होते. त्यातील गोरखगड कोणता हा प्रश्न पडला. शेतात राबणाऱ्या एका काकांना विचारलं,
” काका, गोरखगडावर जायला वाट कुठून आहे?”
माझा प्रश्न ऐकून काकांनी हातानी थांबण्याची खूण केली. डोक्यावरची मोळी खाली ठेवली आणि तिला दोरीने घट्ट बांधताना विचारलं,
“”पहिल्यांदाच चालले का?…सोबत बारकी पोर आहेत म्हणून इचारतो!!”
मी होकार दिल्यावर म्हणाले,
“मग मी येतो संगतीला. तुम्हाला वाट नाही कळली तर जाल दूसरीकड ”
असं म्हणून काका आमच्यासोबत निघाले. वय सत्तर होतं. पण इतके काटक होते की ते आम्हाला सहज वर नेतील ह्याची खात्री झाली. गावातील म्हातारी माणसं आजच्या तरुणांपेक्षा जास्त सक्षम असतात हे गावागावात फिरून मी अनेकवेळा पाहिलं होत. त्यामुळे काकांच्या मागोमाग आम्ही धूळवाट चढू लागलो. सोबतची मुले झाडीमधून जाणाऱ्या वाटेवर बागडू लागली. मध्ये दगड येत होते, चढ येत होते. मुलांना साहस करायची संधी मिळत होती आणि काकाही जराही न थकता पायवाटेने भराभर चढू लागले. वाटेत त्यांनी आपट्याची पाने तोडून स्वतःजवळ ठेवली. हीच पाने आपण दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो. पण काका ही पाने गोळा का करत होती. मी त्यांना शंका विचारली.
“ ह्या पानांपासून आम्ही टोपल्या, पत्रावळ्या बनवतो. अनेक महिने त्या पुरतात.” काका सांगू लागले.
त्यांच्या कमरेला विळा होता. झटकन एका उभ्या फांदीवर मारला आणि ती छाटून आधाराच्या दोन काठ्या बनवल्या. त्याच्या खाली टोक तयार केलं आणि म्हणाले,
” ही काठी घ्या आधारासाठी. खालचं टोक मातीत रुतेल आणि पाय घसरणार नाही. ”
माझ्या सोबत असलेल्या मुलांनी हातात काठ्या घेतल्या आणि आम्ही वर चढू लागलो आम्ही वर चढत असताना काही मुला-मुलींचा एक ग्रुप खाली उतरत होता. सकाळचे ९ वाजले होते. ही मुले रात्री गडावर राहिली हे लक्षात आलं. म्हणून मी एकाला विचारलं. तो ठाण्याचा होता. नाव अक्षय काळे. तो सांगू लागला,
” आम्ही दर वर्षी ३१ डिसेंबरला रात्री एखाद्या गडावर जातो. रात्री चूल पेटवून तिथेच मुक्काम करतो आणि सकाळी खाली येतो. सोबत दारू आणि प्लास्टिक नेत नाही. गडावर रात्रभर देशभक्तीपर गाणी म्हणतो. ज्याला क्रांतिकारकांची माहिती असेल ती तो सांगतो”
मग त्याने हातातील एक मोठी पिशवी दाखवली आणि पुढे म्हणाला,
” सकाळी गडावर सापडेल तितकं प्लास्टिक गोळा करतो आणि घरी नेऊन डस्टबिनमध्ये टाकतो.”
त्याच वाक्य ऐकून काका म्हणाले,
” वा रं बहादरानो, तुमी रात्री गडावरच्या मंडपात राहिलात. लई बेस केलं. तिकडं शहरात पिऊन पडलेली पोरं आता कुठं उठत असतील. ”
देशमुख काकांचं बोलणं मलाही भावलं.
त्या मुलाला शाबासकी देण्यासाठी माझा हात आपोआप उचलला गेला.
वरून आलेली मुलं-मुली खाली जाऊ लागली आणि आम्ही वर चढू लागलो.
गड चढताना काका माहिती सांगत होते. मुरबाडी साग दाखवत होते. स्वच्छ पांढरा बुंधा असलेली झाडे दाखवून त्यांची नावे सांगत होते. हे देशमुख काका लहानपणापासून ह्या झाडांसोबत वाढले. त्यामुळे प्रत्येक झाड त्यांच्याशी जणू बोलत होत. जुनी ओळख होती. अनेक जन्मांच नात होतं.
हे भाग्य शहरातील लोकांना कसं मिळणार?
ते माणसांशी, पैशांशी नातं जोडत बसतात आणि शेवटी कोणतच नातं उरलं नाही ह्याची खंत हातात उरते.
काकांचे गावात सगळेच नातेवाईक होते आणि गडावर सारी हिरवी मंडळी त्यांच्यावर माया करत उभी होती.
आम्ही धापा टाकत पाहिला टप्पा पार केला. आणि थोडा वेळ बसलो. पण काका उभेच होते. त्यांना थकवा आला नव्हता आणि घामही नव्हता. डायबेटीस-गुडघेदुखीशी त्यांचा कधीच संबंध आला नव्हता. भाजी भाकरी व तांब्याभर पाणी असं जेवण आणि दिवसभर शेतात राबल्यामुळे सत्तरीत ते तरुणासारखे वागत- बोलत होते.
मग त्यांनी मुलांना कड्याजवळ नेलं. खाली छोटासा देहरी गाव दिसत होता. त्यांनी स्वतःच कौलारू घर दाखवलं. इतक्या वर चढून आलो हे पाहून दोन्ही मुलांना आश्चर्य वाटलं.
तिथून पुढे सुळका सुरु झाला होता. त्यात पायऱ्या कोरल्या होत्या. गोरखगडाचा हा टप्पा अवघड आहे. कारण अतिशय छोट्या आणि उतरत्या पायऱ्या आहेत आणि खाली खोल दरी आ वासून बसलेली आहे.
आम्ही सुळक्याच्या दिशेने निघालो आणि पाहतो तर एक तरुण मुलगी तिथे बसली होती. टी शर्ट आणि जीन्स असल्यामुळे टी शहरी भागातून गड चढायला आली आहे हे लगेच समजले. पण एकटीच? आणि अशी बसून का राहिली?
तिच्याकडे चौकशी केल्यावर कळलं की ती गोरखगडाच्या कठीण कड्यावरून चढू शकली नव्हती. म्हणून ती कड्याच्या पायथ्याशी बसली होती. बाकी मित्रमंडळी वर गेली होती. समोर आलेला कठीण कडा तिला चढता आला नव्हता.
ट्रेकिंगचे कपडे अंगावर होते. शूज होते. काका तिला म्हणाले,
” भ्यालीस व्हय…चल मी तुला दगडी मंडपापर्यंत नेतो. ”
असं म्हणून काका खाली वाकले आणि तिला खांद्यावर पाय ठेवायला सांगितला. आजोबांच्या वयाच्या माणसाच्या खांद्यावर ती पाय ठेवत नव्हती.
शेवटी काका ओरडले, ” अग, पोरी. ठेव पाय. मला वजन उचलायची सवय आहे”
शेवटी तिने त्यांच्या खांद्यावर पाय ठेवला आणि कठीण कडा काकांच्या आधारे पार करून ती गोरखगडाच्या दगडी मंडपापर्यंत पोहोचली. वर पोहोचल्यावर सुंदर गड पाहून ती हरखून गेली.
तिथे त्या मुलीची मित्र मंडळी विसावली होती. त्या मुलीला पाहून तिच्या मित्र मंडळीना आश्चर्य वाटलं. मग तिने काकांकडे बोट दाखवून ह्यांनी मला वर आणलं हे सांगितल्यावर सगळेजण काटक काकांकडे कौतुकाने पाहू लागले.
तोवर काकांनी हातातील काठीने कुंडातील पाण्यात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या भराभर खेचून बाहेर काढल्या. गडावर झालेला कचरा त्यांना सहन होत नव्हता.
आम्ही दगडी मंडपात विसावलो. हा मंडप कसा कोरला हे आश्चर्य आहे. गडाच्या मंडपापर्यंत एकटा माणूस येणे कठीण आहे. तरीही इथे येवून मंडप बांधणारे अज्ञात कारागीर म्हणजे जादुगार होते. आजच्या काळात बांधकामात दोष राहतात आणि फार तर 50 वर्षे इमारती टिकतात. मग अनेक शतकांपूर्वी ह्या कारागिरांनी अनेक शतके टिकणार बांधकाम कसं केल? त्यांना कोणती निराळी वस्तू निर्मिती विद्या माहित होती?
परग्रहावर किंवा अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीराइतकी ह्यांची कामगिरी श्रेष्ठ आहे. आता भारतीयांनीच आपल्या प्रतिभेची मानाने दखल घेतली पाहिजे. आता अनेकजण गडकिल्ल्यांवर चढतात. त्यांनी प्राचीन काळात असलेली ही हुशारी जगापर्यंत न्यायला हवी.
गोरखगडाचा इतिहास फार थोडा आहे. या गडाचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरुन गोरखगड असे ठेवले आहे. शहाजी राजांच्या काळात ह्या गडाला महत्व होते. काही जाणकारांच्या मते नाणेघाट वरून जुन्नरला जाताना इथे यात्रेकरू मुक्काम करत असत. शिवाय गोरखनाथांच्या दर्शनसाठी अनेकजण येत होते. आजही मुरबाड, माळशेज, जुन्नर मधील निवासी इथे दर्शनासाठी येतात. उत्सव भरतो.
आम्ही दगडी मंडप सरळ रेषेत कसा कोरला हे आश्चर्याने पाहत होतो. पण काका अजूनही बसले नव्हते. रात्री थांबलेली मुले कचरा साफ करून गेली तरी कचरा उरलाच होता.
उरलेला कचरा देशमुख काकांनी गोळा केला. तिथे असलेल्या तरुण मुलांनीही लगेच साथ दिली. सगळ्यांनी मिळून कचरा एका ठिकाणी जमा केला आणि काकांनी माचीस काढून सारा कचरा जाळून टाकला.
एक माणूस सच्च्या मनाने चांगली कृती करू लागतो तेव्हा इतरजण स्वतःहून पुढे येतात.
सगळी मुले-मुली जमा झाली.
” जय भवानी, जय शिवाजी”, ” हर हर महादेव” अशी आरोळी उठली.
महाराजांच्या गड किल्ल्यात काय जादू आहे कळत नाही. एकमेकांना न ओळखणारे गड प्रेमी अचानक एकाच सूरात अश्या आरोळ्या देतात. जणू ते आधी असं ठरवून आले असावेत. अशावेळी पुनर्जन्म असावा असे वाटू लागते. शिवबाचे मावळे पुन्हा जन्म घेऊन आले आणि एकसुरात आरोळी ठोकू लागले असं वाटू लागतं!!
तोवर काकांनी आम्हाला कातळातून थंडगार पाणी काढून दिलं आणि स्वतःही ओंजाळीभर पाणी प्यायले.
गोरखगडावर दगडी मंडप आहे. त्याच्या उजव्या बाजूने कोरलेल्या पायऱ्या गडाच्या माथ्यापर्यंत जातात. माथ्यावर मंदिर आहे. ते पाहून आम्ही गड उतरायला लागलो.
गड उतरताना काकांनी जळणासाठी वाळलेली लाकडं जमा करून एक मोळी बांधली. ती मोळी डोक्यावर घेवून ते सहज उतरत होते आम्ही काही लाकडे त्यांना जमा करून दिली आणि सायंकाळ होईपर्यंत खाली आलो.
गडावरून खाली आल्यावर त्यांनी आम्हाला स्वतःच्या घरी नेलं. मग आम्ही त्यांच्या सारवलेल्या अंगणात बसून तांदळाची भाकरी आणि झुणका खाल्ला.
बाजूला वासरे होती. त्यांच्या गळ्यातील घंट्या मंद आवाजात वाजत होत्या. एक कोंबडा अवेळी आरवला. कुत्रा राखण करत होता आणि एक मांजर डोळे मिटून निवांत पडली होती.
खरा महाराष्ट्र हा असा आहे. आर्थिक राजधानी, IT City वैगैरे कौतुकात काही अर्थ नाही.
म्हणून वेळ मिळेल तेव्हा गड-किल्ले चढावेत.
महाराजांनी, अनेक अज्ञात माणसांनी असं काही बांधकाम केलं आहे की अनेक शतके उन पावसाचा मारा झेलून त्यातील कणही झीजला नाही.
महाराज निरंतर आणि गड किल्ले चिरंतन आहेत.
नवीन वर्ष गड-किल्ल्यांवर

(Gold)
आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.