कलिंगडाचे डोहाळे

बदलापूर स्टेशनवरून सोनावणे घाईघाईत घरी निघाले. आता घरी पोहोचायला उशीर करून चालणार नव्हते. कारण पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे भराभर घरी पोहोचले. स्नान करून पत्नीसमोर निवांत बसले. चहा पिताना तिच्याशी गप्पा सुरु झाल्या.
पत्नी जुन्या आठवणीत रमून गेली. ती सांगू लागली ” आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! “



बदलापूर स्टेशनवरून सोनावणे घाईघाईत घरी निघाले. आता घरी पोहोचायला उशीर करून चालणार नव्हते. कारण पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे भराभर घरी पोहोचले. स्नान करून पत्नीसमोर निवांत बसले. चहा पिताना तिच्याशी गप्पा सुरु झाल्या.
पत्नी जुन्या आठवणीत रमून गेली. ती सांगू लागली ” आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! ”
गरोदर महिलेला डोहाळे लागतात हे सोनावणे ह्यांना माहित होतं. त्यामुळे तिने इच्छा केल्यावर कलिंगड आणावं हे त्यांच्या मनात आलं. पण रात्र झाली होती. तरीही सोनावणेंनी लगेच सायकल काढली आणि ताबडतोब बाजारात पोहोचले.
फळ वाल्याला विचारलं, ” कलिंगड आहे का ?”
फळवाल्याने सोनावणेंना वरून खाली पाहिलं,
” साहेब, डिसेंबरमध्ये कलिंगड मागणारे तुम्ही एकटेच. कलिंगड मार्च नंतर मिळतं, आता नाही ”
मग सोनावणेंनी फळवाल्याला सांगितलं, ” मिसेस प्रेग्नंट आहे. तिला कलिंगड खायची इच्छा झाली आहे.”
मग तो फळवालाही खुलला, म्हणाला,
” असं सांगाना…एक काम करा. तुम्ही पनवेल रस्त्यावर शिळ फाटा आहे. तिथे जा. तिथे बारा महिने कलिंगड विकतात. ”
बदलापूर ते शिळ फाटा अंतर 2७ किलोमिटर होतं. सायकलने जावून परत यायला तीन तास लागणार होते. त्यावेळी आजसारख्या फार रिक्षा नव्हत्या. सोनावण्यांनी निश्चय केला, आज कलिंगड आणायचाच. २७ किलोमीटर सायकल चालवावी लागली तरीही चालेल!! मग त्यांनी शिळ फाट्याच्या रस्त्यावर सायकल पळवायला सुरुवात केली. रस्ता कच्चा होता. खूप खड्डे होते. म्हणून त्यांनी जोर लावून पायडल मारायला सुरुवात केली.
तब्बल दीड तास सायकल हाणल्यानंतर ते घामाघूम होवून शिळ फाट्यावर पोहोचले. तिथे एका तंबूमध्ये कलिंगडाचा ढीग लावला होता. एकावर एक हिरवेगार कलिंगड रचून ठेवले होते. सोनावणेंनी आधी अनेक वेळा कलिंगड पाहिलं होतं. पण आज त्यांनी डोळा भरून कलिंगड पाहिलं. त्यातून एक मोठं कलिंगड विकत घेतलं आणि ते प्लास्टिक पिशवीत घालून पिशवी सायकलच्या हँडलला लावली.
आता उलटा प्रवास करायचा होता. शिळ ते बदलापूर. तोवर रात्रीचे 12 वाजले होते. रस्ता खराब होता. तरीही सोनावणे जोर लावत बदलपूरकडे निघाले. अंधार असल्याने रस्ता नीट दिसत नव्हता. अचानक अंधारात ” धाप” आवाज झाला.
सोनावणेंनी सायकल थांबवली. पाहतात तर काय- कलिंगडाची पिशवी फाटून ते रस्त्यावर पडलं होतं !!
त्याचे दोन तुकडे झाले होते. दोन्ही तुकडे धुळीत पडले होते. सोनवणेंना खूप वाईट वाटलं.
बायकोला कलिंगड द्यायचच असं त्यांनी ठरवलं होतं. कारण त्यातून प्रेम दिसून येणार होतं. पण कलिंगड तर फुटलं, मातीत खराब झालं. क्षणभर सोनावणे ह्यांनी मनात काहीतरी विचार केला. अंधारात घड्याळ पाहण्याचा प्रयत्न केला. पण काहीच दिसत नव्हतं.
पुढच्या क्षणाला त्यांनी पुन्हा ठरवलं. सायकल वळवली आणि पुन्हा शिळ फाट्याकडे पळवायला सुरुवात केली. काही झालं तरी घरी कलिंगड घेऊन जायचं हे त्यांनी पक्कं ठरवलं होतं.
शिळ फाट्यापर्यंत पोहोचायला त्यांना एक तास लागला. तोवर कलिंगड विकणारा तंबू बंद करून निघून गेला होता. पण बाजूचा पानवाला एक बल्ब लावून टपरीत बसला होता. त्याची गिऱ्हाइके येत होती. सोनावणे ह्यांनी पानवाल्याला सगळा किस्सा सांगितला -” प्रेग्नंट बायकोसाठी कलिंगड नेलं. पण ते फुटलं. ”
कधी न हसणाऱ्या त्या पानवाल्याच्याही तोंडावर खळी उमटली.
तो टपरीमधून बाहेर आला. कलिंगडाच्या तंबूचा एक पडदा उचलून आत गेला आणि दोन मोठे कलिंगड त्याने आणले. एका गोणीत ते भरले आणि ती गोणी सोनावणेंच्या सायकलला घट्ट बांधून दिली. सोनावणेंनी पैसे देऊ केले, त्याने ते घेतले नाही. तो म्हणाला, मी माझे पैसे उद्या कलींगडवाल्याला देईन. तो माझा दोस्त आहे.
मग पानवाला म्हणाला, ” दिदी को बोलना. शील फाटेपर तुम्हारा एक भाई पान बेचता है. उसने यह टरबुजा भेजा है. ”
सोनावणे ते दोन्ही कलिंगड घेवून पुन्हा बदलापूरकडे निघाले. घरी पोहोचेपर्यंत 2 वाजले. पत्नी काळजी करत बसली होती. दारावरची बेल वाजताच तिने घाईघाईने दरवाजा उघडला. दारात सोनावणेंना पाहून तिला हायसे वाटले. त्यांनी इतक्या लांबून कलिंगड आणले हे पाहून तिला खूप आनंद झाला. कलिंगड कसे मिळाले, कसे पडून फुटले आणि पानवाला कसा भेटला हे त्यांनी तिला सांगितले.
कोणीतरी पानवाला मला दीदी म्हणाला आणि त्याने कलिंगड पडू नयेत म्हणून गच्च बांधले हे ऐकून तिचे डोळे भरून आले.
सोनावणेंना मुलगा झाला. त्यापेक्षा जास्त आनंद होता ह्याचा की माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खूप काही करणाऱ्या पत्नीचे डोहाळे मला पूर्ण करता आले. पुढे ते पत्नीसोबत जेव्हा जेव्हा गप्पा मारायचे तेव्हा कलिंगडाची आठवण हमखास निघायची. अनेक वर्षे उलटली तरी ती आठवण दोघांच्या मनात कायम राहिली.
पुढे मुलाचं लग्न झालं. त्याची पत्नी प्रेग्नन्ट राहिली.
सोनावणेंनी मुलाला आणि सुनेला कलिंगडाचा किस्सा ऐकवला.
मग त्या मुलाने आपल्या प्रेग्नंट पत्नीला सांगितलं ,
” मी तुझ्यासाठी कलिंगड आणतो. ”
तिलाही आनंद झाला. गरोदरपणात लाड पुरवून घ्यावेत असे तिलाही वाटले.
खरं तर त्यावेळेस बदलापूरमध्ये कलिंगड मिळत होतं. तरीही मुलाने ठरवलं, बाबा जसे शिळ फाट्याला गेले तसं आपणही जायचं. त्याने बाईक काढली आणि तो शिळ फाट्याच्या दिशेने निघाला. आता रस्ता पूर्वीसारखा कच्चा नव्हता. दिवेही आले होते. बाईक असल्यामुळे तो थोड्या वेळात शील फाट्यावर पोहोचला. तिथे कलिंगडाचे अनेक तंबू होते. कापून ठेवलेले लालेलाल काप होते. पण आसपास कुठेही पानवाला दिसला नाही. २५ वर्षात खूप बदल झाले होते. पानवालाही कुठीतरी निघून गेला होता.
काही माणसे फक्त आठवणीत राहतात, पुन्हा भेटत नाहीत. पाहू न शकलेल्या मामाचे त्याने मनात आभार मानले.
आणि दोन कलिंगड घेवून तो बदलापूरच्या दिशेने निघाला.
कलिंगड एक मधुर फळ आहे. पण सोनावणे कुटुंबाला त्या फळाने मधुर आठवणही मिळवून दिली आहे.