तुमने किसीकी जान को

नेहमीच्या वाटेवरून आपण आपसूक सहज सरळ चालत असतो,आपल्याच नादात! चालतांना मधेच आलेल्या वळणावर आपण नकळत कधी वळलो,ते लक्षातच येत नाही. वाट तीच असते.पण भोवताल बदललेला असतो. त्यात नाविन्याची ओढ असते.त्यामुळे त्यात गुंतून जाण्याची शक्यताच अधिक. तिथेच अचानक एका ठिकाणी आपलं लक्ष वेधलं जातं. काळीज लकाकतं. निश्चल मन आतुर होतं.पुन्हा पुन्हा वळून पहावसं वाटतं.चित्त थाऱ्यावर रहात नाही.”विवश होणं” काय असतं? हे त्या अवस्थेतून जाणाऱ्यालाच कळतं. ते शल्य दुसऱ्याला दाखवताही येत नाही की, नीटपणे समजावताही येत नाही. “जायबंदी_होणं” हे असंच असेल का?



तुमने किसीकी जान को

दिलकी कलम से..गीत क्र.३२

नेहमीच्या वाटेवरून आपण आपसूक सहज सरळ चालत असतो,आपल्याच नादात! चालतांना मधेच आलेल्या वळणावर आपण नकळत कधी वळलो,ते लक्षातच येत नाही. वाट तीच असते.पण भोवताल बदललेला असतो. त्यात नाविन्याची ओढ असते.त्यामुळे त्यात गुंतून जाण्याची शक्यताच अधिक.

तिथेच अचानक एका ठिकाणी आपलं लक्ष वेधलं जातं. काळीज लकाकतं. निश्चल मन आतुर होतं.पुन्हा पुन्हा वळून पहावसं वाटतं.चित्त थाऱ्यावर रहात नाही.”विवश होणं” काय असतं? हे त्या अवस्थेतून जाणाऱ्यालाच कळतं. ते शल्य दुसऱ्याला दाखवताही येत नाही की, नीटपणे समजावताही येत नाही. “#जायबंदी_होणं” हे असंच असेल का?

गुंतण्याची प्रक्रिया सहज घडत असली तरी तगमग त्यातूनच जन्म घेते. कोणताच हवाला नसतांनाही हवालदिल होणं, मग क्रमप्राप्त ठरतं. गुंतणं सोपं असतं,पण गुंता सोडवणं महकाठीण.अडकण्याचा आनंद मिळतो खरा,पण सुटण्याची धडपड त्याहून तिप्पट. शिवाय सुटका नकोच असते मुळी. कोशात अडकून रहाणं,हा सुखद विजनवास भ्रमरास केव्हाही आल्हाददायकच.

जीव लावावा लागत नाही,तो जडतो. हे जडत्व हलक्यात घेता येत नाही. अडकवणारा मात्र अडकलेल्याची मजा बघत असतो.प्रेमातली ओढ आणि त्यानंतरची हुरहूर विलोभनीय असते.त्यात रमणीने दिलवराच्या तीव्र भावना प्रलंबित ठेवणं, प्रचलीत असतं. त्यामुळे घालमेल वाढत जाते. निसर्गानेही मदत करून मिलन घडवावं,अशी आशा वाटत राहते. आमचं प्रेम खरं असेल,तर तीने असा छळवाद का मांडलाय?
तिच्या मनातली चलबिचल ध्यानात येतेय माझ्या,आता “संगम” होणं अटळच!

तुम्ही कधी कुणाचा जीव जाताना पाहिलाय का?
ती पहा माझ्यावर रागावून माझी प्रिया चाललीय

कोण जाणे कोणत्या चुकीची,शिक्षा देतेय मला
वेडावून टाकतायत या,घायाळ करणाऱ्या अदा
कुंतलात मुखडा लपवून मला आसक्त करतेय
ती पहा माझ्यावर रागावून माझी प्रिया चाललीय

स्वतःच घाबरतेय नी,बेचैन होऊन धास्तावतेय
आपल्याच रक्तलालीमेत तो पदरही भिजवतेय
निष्प्राण होतोय मी,अन् ती मात्र खुशाल हसतेय
ती पहा माझ्यावर रागावून माझी प्रिया चाललीय

धुंद भरून आलेल्या ढगांनो,तुम्हीच थांबवा तीला
तुम्हास शपथ आहे माझी,जरा समजावून थांबवा
तीचा विरह नेमका,काळीज चिरत जातोय माझं
ती पहा माझ्यावर रागावून माझी प्रिया चाललीय
माझी प्रिया चाललीय……

“तुम्ही कुणाचा जीव जातांना पाहिलाय?, हि तर माझ्यावर रागावून माझं काळीजच घेवून चाललीय” हि जीवघेणी कैफियत हसरत जयपुरी यांना कशी सुचली असेल? सन १९६४ साली आलेल्या “#राजकुमार” या चित्रपटातील हे तरल प्रेमगीत त्यांनी शंकर जयकिशन यांच्या हातात ठेवलं,तेव्हा काय वाटलं असेल त्यांना? प्रेमालाप उत्तुंग होण्यातली मुख्य बाब म्हणजे त्यातली नजाकत!त्याचं आविष्करण अगदी काळजातून सहज ओघावत्या शैलीत समर्पकपणे मांडणं,हि सोपी गोष्ट नाही. शंकर- जयकिशन अशा रचना वाद्यमेळात खुबीने गुंफण्यात वाकबगार होते.रफी साहेबांबद्दल काय बोलावं?काळजातून स्त्रवणारं अमूर्त अमृत वाणीतून कसं ओघळावं,याचं खणखणीत प्रत्यक्ष प्रमाणच ते!

शम्मी कपूर आणि साधनाने याचं मुक्त चित्रण बहुधा स्वर्गातच केलं असावं,इतकं ते बेमालूम उतरलंय;पडद्यावरून थेट मर्मबंधात! दिग्दर्शक के.शंकर यांनी घडवलेली हि स्वर्गवारी वेगळ्याच विश्वात नेणारी. साधनाचं रूप,नखरा, दागिने,पेहराव,सौंदर्य,नटखटपणा अगदी डोळे दिपवणारा! शेवटी “धुक्यात हरवली वाट” असं शम्मीलाच काय मलाही वाटत रहातं. शम्मीची मुडपी चाल,रुबाब, विरहवेदना,ध्येय,आस,जिद्द, समर्पण, व्याकूळता अगदी नकळत काळजाला भिडणारी.

डोळ्यांनी सोनं लुटावं,ते असं!
अंतर्मन अलगद खुणावतंय!
मिलनाची ससेहोलपट थांबवायची असेल, तर हिच संधी साध_ना!

“जीव देणं” हे प्रवर्तन मात्र  जीवघेणं!

अनिल वासुदेव तावडे.
दि.२४/१०/२०२३.