जिंदगी का सफर

जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.



दिलकी कलम से. गीत क्र. २६.

जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं. जीवनात काहीच शाश्वत नसतं. ज्याचा थांग लागत नाही,ते अथांग! म्हणूनच कधीच कशावर हक्क सांगू नये. कारण ‘देह नश्वर आणि आत्मा ईश्वर’. अवतार कार्यात रिक्त हस्ते येणं – जाणं जर क्रमप्राप्त असेल,तर हव्यास तरी का धरावा? संचित शेवटपर्यंत साथ देईल,याची खात्री नाही आणि कर्म कधी माग काढत येईल, त्याचा नेम नाही. आलेल्या प्रसंगाला हसत हसत सामोरं जाण्यातच खरी गम्मत आहे.

इथे शाश्वत सत्य एकच… आपला आनंद आपणच शोधायचा…. मग,तो वनभुवनी सर्वदूर पसरायला कितीसा वेळ लागणार
याला जीवन ऐसे नाव!

जीवनाची वाटचाल,हा संपूर्ण प्रवास कसा आहे?
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही!
जीवनाची वाटचाल,हा संपूर्ण प्रवास कसा आहे?
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही!
कसा आहे हा मार्ग? सगळे तर इथूनच जातात
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही!

जीवनाला तर आम्ही बरंच प्रेम दिलेलंच आहे
मृत्यूशी असलेलं नातंही, निभावू की आम्ही!
आलो असू रडत – रडत या दुनियेत जर
जातांना हसत हसत जावू की, इथून वर

पण जाऊन जाणार कुठे! कुणास ठाऊक?
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही

असंही जीवन आहे की,जे जगलेलंच नाही
जे जगण्यापूर्वीच आधी मृत्यूने कवटाळलं
फूलं अशीही असतील,जी उमललीही नसतील
जी उमलण्यापूर्वीच खुडून टाकण्यात आली

नजरही त्रस्त झाली नी सारे उपचारही थकले
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही!
जीवनाची वाटचाल,हा संपूर्ण प्रवास कसा आहे?
कुणाला कळलाच नाही,कुणी जाणलाच नाही!

सन १९७० साली आलेल्या सफर या चित्रपटाने त्यावेळच्या प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं होतं. असित सेन या दिग्दर्शकाने वेगळाच विषय मांडून अर्थवाही जीवनाचा एक अनोखा प्रवाह आणि त्यातून मनोपटलांवर उमटणारी वादळी आंदोलनं समर्थपणे पडद्यावर मांडली होती.त्यातील एक गीत  आपली जगण्यातील ओढ आणि त्यातील निष्फळता अधोरेखीत करते.

इंदिवर यांची सिध्दहस्त लेखणी इथे आपल्याला मनोमन अंतर्मुख करते. कल्याणजी_आनंदजी यांनी त्यातला दर्द अविरत पाझरत राहील,याची पूर्ण दक्षता घेतली आहे. हे गीत गायल्यावर #किशोरच्या मनातलं अतीव दुःख अर्धअधिक निघून गेलं असेल,इतका तो त्यात विलीन झालाय. #राजेश_खन्ना हा अभिनेता आयुष्यातील शिल्लक राहिलेल्या दिवसांचा विचार आणि त्याच्या अंतर्मनातील द्वंद्व अतिशय तरलपणे साकारतो,त्यावेळी तो सल अगदी सार्वजनिक होऊन जातो,इतका तो काळजात भिनतो. त्याचवेळी जिच्याकडे पाहून जगण्याची लालसा बळावेल,अशा लोभसवाण्या……. शर्मिलाची एन्ट्री…. त्यामुळे प्रसंगाला आणखी धार चढते.

इतक्या कमी शब्दात जीवनाच्या या क्षणभंगुर अस्थित्वाला वेदनेची  किनार देत अगदी तटस्थपणे सामोरं जाता आलं असतं, तर किती बरं झालं असतं? आक्रंदनाच्या घनघोर वावटळीतून अंतर्नादाची हतबल पराधीनता पेलवत आपल्याला लाभलेलं हे अनमोल जीवन अर्थवाही करून जगण्याच्या आशेला तिलांजली देत पुढे जाणं, वाटतं तितकं सोपं नाही.बरं का!
हे देवाला तरी कधी कळणार?

अनिल वासुदेव तावडे.
दि. ०१/०७/२०२३.