दिलकी कलम_से…… …..गीत क्र. २५.
परमेश्वराची लिला अगाध आहे. त्याने नेमून दिलेलं काम रात्रंदिन करत रहायचं, एवढंच आपल्या हाती आहे का? दिवस सारा धकाधकीत जातो.पण,रात्र……….. तीचं काय करायचं?”रात्र” सोबतीने फुलवायची की, पार ताणून द्यायचं,ते आपल्या भावावस्थेवर अवलंबून असतं. रंजक स्वप्न आणि सत्य हा निव्वळ काल्पनिक दृष्यमाध्यमांचा लपंडाव असतो.
परमेश्वराने काळीज सगळ्यांनाच दिलंय! पण,तिथे सजगतेचा वावर असेलच, याचा नेम नाही.आंतरीक मनोबलातून तीव्रता प्रकट होते.अंतर्मन हुळहुळतं आणि नकळत आपण आपल्या प्रियतमेचा माग काढत जातो. अशा वेळी आपण नेमकं काय करतोय, हे बहुधा आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडचं असतं. त्यावर नियंत्रण ठेवणं,केवळ अशक्यच! ती……… आपली आहे,तरीही आपल्यासोबत नाही.याहून “प्राक्तन” ते कोणतं ? ‘सहवास’ नाती दृढ करतो. प्रीत रोपवता येत नाही आणि तगमग थोपवता येत नाही. बरं! आसक्ती काबूत ठेवली, तर असोशी शाबूत रहात नाही. वियोग शाश्वत असला, तरी विरहाने घालमेल वाढतेच. दर्शनाची आस तीव्र होत जाते आणि मग शोधक नजरेला ‘मोहक मुखडा’ दृष्टांत देतो. प्रत्यक्ष “मुख दर्शन” झाल्याने भक्त आरक्त होतो. बेधुंद वातावरणात अंधुकशी वीज चकाकते.काळीज लकाकतं.
अशा प्रयत्नात देवच काय,सारी सृष्टी भरभरून आशीर्वाद देत आपल्या पाठीशी उभी असते.मिलनाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. अंतिमतः प्रतिशोधानंतर दृष्टीभेद झाल्यावर खुललेलं तिचं मुखकमल हर्षोल्हासाने कृतकृत्य झाल्यासारखं बहरत जातं. हा “उन्मादाचा क्षण” आयुष्यभर स्मृतीच्या कोषात जपता आला पाहिजे. जगणं समृद्ध करण्यासाठी आणखी काय हवं?