लंडनमध्ये जाम, आला घाम

गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘द नेदरलंड’ असे न म्हणता त्या देशाला हॉलंड असेच संबोधत असू. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती. माझा लहान भाऊ डॉक्टर असून आईसलंड या देशाचा रहिवासी आहे. कर्म धर्म संयोगाने, तो नेमका त्याच सुमारास वैद्यकीय परिषदेसाठी लंडनला येणार होता. मनात आले की मधल्या शनिवार रविवारच्या सुट्टीत लन्डनला जाऊन त्याला भेटावे. एक भाऊ पुण्याहून तर एक भाऊ आईसलंडहून एका तिसऱ्याच देशात भेटण्याचा योग आणायचा विचार ठरला. त्याकाळी मी स्वतः स्वखर्चाने परदेशात जाऊन भावाला भेटणे हे कल्पने पलीकडचे होते. त्या काळात परदेश प्रवास तसा दुर्मिळ होता आणि त्यामुळे या भेटीचे जास्त अप्रूप वाटत होते.



आता ३५ वर्षे उलटली तरी अजूनही तो अनुभव स्पष्ट आठवतो. अर्थात आता मागे वळून पाहताना गम्मत वाटते हेही खरे.

गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘द नेदरलंड’ असे न म्हणता त्या देशाला हॉलंड असेच संबोधत असू. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती.

माझा लहान भाऊ डॉक्टर असून आईसलंड या देशाचा रहिवासी आहे. कर्म धर्म संयोगाने, तो नेमका त्याच सुमारास वैद्यकीय परिषदेसाठी लंडनला येणार होता. मनात आले की मधल्या शनिवार रविवारच्या सुट्टीत लन्डनला जाऊन त्याला भेटावे. एक भाऊ पुण्याहून तर एक भाऊ आईसलंडहून एका तिसऱ्याच देशात भेटण्याचा योग आणायचा विचार ठरला. त्याकाळी मी स्वतः स्वखर्चाने परदेशात जाऊन भावाला भेटणे हे कल्पने पलीकडचे होते. त्या काळात परदेश प्रवास तसा दुर्मिळ होता आणि त्यामुळे या भेटीचे जास्त अप्रूप वाटत होते.

आता आईन्धोवेन पासून लन्डनला जायचे म्हणजे आधी अडीच तास रेल्वेने आम्सटरडॅमला जायचे आणि तेथून विमानाने लन्डनला पोचायचे. आधी ठरविले नसल्याने, लंडनचे तिकीट हॉलंडमधून काढणे भाग होते. हातखर्चाचा भत्ता अगदीच तुटपुंजा असे. तरीही घरून खाण्याचे पदार्थ भरपूर नेले होते त्यामुळे थोडे पैसे वाचत होते. त्याशिवाय मुंबई [त्यावेळीस बॉम्बे] विमानतळावर भारत सरकारकडून परदेश प्रवासासाठी विकत घेतलेले ५० डॉलर होते. हो तेव्हा दर डोई फक्त ५० डॉलर विकत घेता येत असत.

धाडस करून एका प्रवासी एजंट कडून सर्वात स्वस्त विमान तिकीट काढले. शुक्रवारी संध्याकाळी जायचे आणि रविवारी संध्याकाळी परतीचे. त्याने स्पष्ट सांगितले की ते तिकीट फक्त त्याच उड्डाणासाठी व त्याच तारखेला वापरता येणार होते. रात्री हॉटेलमधून भावाला त्याच्या घरी फोन करून येत असल्याचे कळविले. त्यानेही त्याच्या लंडन मधील होणाऱ्या वास्तव्याचा तपशील दिला. मोबाईल फोन अजून अस्तित्वात आले नव्हते.

शेवटी आमची स्वारी शुक्रवारी संध्याकाळी निघून दोन तास रेल्वेचा प्रवास करून आम्सटरडॅम मार्गे, रात्री लंडन विमानतळावर दाखल झाली. माणसाला पुढील घटनांची जराही कल्पना नसते हे एक प्रकारचे वरदानच आहे. मला आठवते त्याप्रमाणे त्यावेळी लंडनला वेगळा व्हीसा लागला नव्हता. विमानतळावर परतीच्या अटीवर लंडनमध्ये शिरण्याची परवानगी मिळाली. भाऊ त्यारात्री लंडन मध्ये उशीरा पोहोचणार होता.

काहीच माहिती नसल्याने विमानतळावरूनच एका रात्रीसाठी एक स्वस्त हॉटेलची खोली निवडली. एजंट कडून हॉटेलचा पत्ता लिहून घेतला आणि भाड्याची गाडी [टॅक्सी] करून हॉटेलकडे निघालो. १९८६ च्या सुमारास डॉलर साधारण साडेबारा आणि पौंड एकोणवीस रुपयांना असल्याने [ आणि पहिलाच परदेश प्रवास असल्याने ] टॅक्सी मीटरच्या प्रत्येक उडीबरोबर माझी धडधड वाढत होती. हॉटेलवर पोहोचल्यावर हुश्श झाले. या आधी आणि नंतर कधीही, हॉटेलमधील तळघरातील बिन खिडकीची वातानुकूलित एवढी छोटी खोली मी कधीच पाहिली नव्हती आणि नाही. त्या बिन खिडकीच्या खोलीत मला सतत शवपेटीकेत असल्याचे भास होऊन अस्वस्थ वाटत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी भावाने मला त्याच्या हॉटेलवर नेले. शनिवार अख्खा दिवस आणि रविवार दुपारपर्यंतचा वेळ भावाच्या बरोबर आठवणींना उजाळा देत, गप्पा मारण्यात, फिरण्यात, खाण्यात आणि लंडन बघण्यात कधी गेला ते समजले पण नाही. दुपारी दोनच्या सुमारास परतीचे वेध लागले. भावालापण मित्राकडे जावून उद्याच्या परिषदेची तयारी करायची होती.

माझे परतीचे विमान संध्याकाळी साडेसातला होते. भावाने सुचवले की लंडनमधील बस सेवा अतिशय उत्तम आहे. हातात वेळ पण आहे तर तू टॅक्सी ऐवजी दुमजली बसने विमानतळावर जा. शिवाय जाताना अजून थोडे लंडन दर्शन पण होईल. येताना दिलेले घाम आणणारे टॅक्सी भाडेपण आठवत होते. त्यामुळे त्याच्याशी सहज सहमत झालो. गळाभेट केली आणि त्याने मला योग्यत्या बसमध्ये चढवून दिले. चांगले चार पाच तास हातात होते. सम्पूर्ण कार्यक्रम इतका छान पार पडला होता त्यामुळे पूर्णपणे निवांत होवून बाहेरील देखावा बघत बसलो. पुढे काय वाढून ठेवलं होते त्याची कल्पनाही नव्हती.

माझ्या अंदाजाप्रमाणे विमानतळापासून साधारण ३-४ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अचानक बस थांबली. सुरुवातीला मधुन मधुन थोडी पुढे जात होती. मी पण मनातल्यामनात हसत होतो की लंडनमध्येही वाहतूक ठप्प होते तर. [ट्राफिक जाम] काही वेळाने मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अर्धा तास असाच गेल्यावर प्रथमच माझ्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली. मिनिटा मिनिटा गणिक कधी समोर साचलेल्या वाहतुकीकडे तर कधी घड्याळाकडे बघत होतो. अशावेळी घड्याळ जास्त जोरात पुढे जात असल्याचा अनुभव येऊ लागला. साडेपाच वाजून गेल्यावर माझी धडधड अजूनच वाढली. ट्राफिक जाम सुटायची काहीही लक्षणे नव्हती. सहा वाजले. साडेसहा वाजले. विमान सुटण्याआधी निदान एक तास आधी तेथे पोहोचणे आवश्यक असते. अखेरीस तीही वेळ टळून गेली.

अचानक आठवले की माझे परतीचे तिकीट फक्त त्याच उड्डाणासाठी व त्याच तारखेला वापरता येण्यासारखे होते. शिवाय दुसरे तिकीट काढायला खिशात पैसे तरी कुठे होते. अखेरीस साधारण सव्वासात वाजता बस हळू हळू निघाली आणि घामाने थबथबलेला मी साडेसातला विमानतळावर उतरलो. मनातल्या मनात, कधी नव्हे, ते देवाची प्रार्थना केली की विमान सुटण्यास विलंब झालेला असूदे.

त्या काळात चेक इनची क्रिया आजप्रमाणे अजिबात अवघड नव्हती. घाबरत घाबरत चेक इन काउंटरवर तिकीट दाखवले. तेथील बाईने माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पहात सांगितले की माझे विमान आधीच सुटले आहे. मला माहीत होते की रविवारी संध्याकाळी जवळजवळ दर अर्ध्या तासाने लंडनहून आम्सटरडॅमला विमाने जातात. मी जरा धीर करून तिला विचारले की याच तिकिटावर मी पुढच्या उड्डाणाने जावू शकतो का? आता मात्र त्या बाईने माझ्याकडे जास्तच विचित्र नजरेने पहात सांगितले की “तुझे तिकीट स्वस्तातले आहे आणि त्यामुळे ते आता वाया गेले आहे. तू नवीन तिकीट खरेदी कर आणि खुशाल प्रवास कर.”

मी पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून तिला माझी रडकथा सांगायचा प्रयत्न केला – किती लवकर निघालो होतो, रस्त्यात झालेला वाहतूक खोळंबा व त्यामुळे मला झालेला विलंब, माझी उद्याची मीटिंग, फिलिप्स मधली नोकरी, लंडनला कोणीही ओळखीचे नसणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझी आर्थिक चणचण.

अजून एकदा, तिच्या मदतीसाठी कळकळीची विनंती केली. मला वाटते काउंटरवर फारशी गर्दी नसल्याने किंवा कुतूहलापोटी तिने माझे रडगाणे ऐकून घेतले असावे. ती पण असल्या विचित्र विनंत्यांना निर्ढावलेली असावी. निर्विकार चेहेऱ्याने,  पुन्हा एकदा पण जास्त ठामपणे तिने मला ऐकवले की “तुझे तिकीट स्वस्तातले आहे आणि त्यामुळे ते आता वाया गेले आहे. तू नवीन तिकीट खरेदी कर आणि खुशाल प्रवास कर. तुला मदत करणे माझ्या अखत्यारीत नाही.”

मी पुनः तिला सांगितले की मी सांगितलेली सर्व परिस्थिती सत्य आहे आणि मला मदत न मिळाल्यास येथेच विमानतळावर झोपावे लागेल. तिला वाटले असावे की मी तीकिटाचे पैसे असूनही ते वाचवायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे पैसे तर नव्हतेच आणि क्रेडीट कार्ड तर माहित पण नव्हते. यानंतर तिने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून खाली बघत दुसरे काम सुरु केले.

पायाखालची जमीन सरकणे या म्हणीचा शाळेत असताना वाक्यात उपयोग केला होता पण प्रत्यक्ष प्रत्यय तेव्हा आला. दुसरे दिवशी सोमवारी सकाळी नऊ वाजता आईन्धोवेनमध्ये असलेली महत्वाची मीटिंग आठवली. मी त्या मिटींगला उपस्थित असणे अत्यावश्यक होते. माझ्या अनुपस्थितीमुळे होणारा मीटिंगचा फज्जा डोळ्यासमोर आला. पहिल्याच परदेशवारीमध्ये कंपनीच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या नाचक्कीचे चित्र पुन्हा पुन्हा समोर येऊ लागले. “खिशात पुरेसे पैसे नसताना लंडनला जायचा आगावूपणा तुला कोणी सांगितला होता?”  असे सहकारी लोकांचे मानभावी प्रश्न ऐकू येऊ लागले.

भाऊ त्याच्या मित्राकडे लंडन बाहेर गेल्याने त्याच्याशी संपर्क साधणेही अशक्य होते. लंडनमध्ये माझ्या ओळखीचे दुसरे कोणीही नव्हते. रविवार असल्याने कंपनीतील सर्व सहकारी त्यांच्या घरी असणार आणि माझ्याकडे कोणाचेही घरचे फोन नंबर नव्हते. ब्रम्हांड आठवणे म्हणजे काय असते त्याचे प्रत्यंतर आले. मती गुंग झाली. दरदरून घाम सुटला.

माझ्या कह्यात जे करणे शक्य होते ते करून झाले होते. आता तिला माझी परिस्थिती पटवण्यासाठी एकच गोष्ट माझ्या हातात होती. ठामपणे मी त्या काउंटरपासून समोर पण काही अंतरावर तिला दिसत राहील अशा एका खुर्चीत ठिय्या ठोकला. त्यानंतर साधारण दर अर्धा तासाने आम्सटरडॅमला जाणाऱ्या पुढील विमानाची घोषणा होत होती. त्यागणिक माझी निराशा, हतबलता, छातीतील धडधड आणि घाम वाढत होते, तरी पण निश्चयाने तेथेच बसून राहिलो.

मी समोरच बसलेला असल्याने, ती बाई मधून मधून माझ्याकडे कटाक्ष टाकीत होती आणि लक्ष न दिल्यासारखे दाखवीत होती. साधारण अडीच तास मी देहधर्म विसरून एका जागी बसून होतो. घड्याळाचे काटे दहाच्या पुढे गेल्यावर मात्र माझ्या निश्चयाची सत्व परीक्षा सुरु झाली कारण आम्सटरडॅमला जाणारे शेवटचे उड्डाण साडेदहा वाजता होते.

अचानक माझे ग्रह पालटले असावेत आणि मी ज्या उद्देशाने तिच्या समोरच बैठक ठोकली होती त्याला फळ आले. अखेरीस त्या बाईला खात्री पटली असावी की हा इसम सांगतोय ते खरे असणार. अथवा तिला स्त्रीसुलभ दया आली असावी. तिने मला खूण करून बोलावून घेतले  आणि म्हणाली की, “बघते काही करता येते का. रविवार संध्याकाळी सर्व उड्डाणे पूर्ण भरून जातात.” मला आशेचा किरण दिसू लागला आणि तिचे केविलवाणे आभार मानले.

पुढील पाच मिनिटामध्ये घड्याळ जणू फार फार हळू चालत होते. ती कोणालातरी फोन करत होती आणि माझी उत्कंठा वाढत होती. अखेरीस संध्याकाळपासून प्रथमच चांगले हसून तिने सांगितले की सुदैवाने शेवटच्या उड्डाणात एक जागा मोकळी असल्याने मला घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे. मला तर ते शब्द देववाणी सारखे वाटले व ती बाई एखाद्या कल्पनेतल्या देवी सारखी दिसू लागली. विमानात चढायचे तिकीट हातात पडल्यावर, पुन्हा पुन्हा तिचे आभार मानत मी विमानाकडे धावत सुटलो आणि एकदाचा मिळालेल्या आसनावर जावून बसलो. कित्येक तासानंतर प्रथमच माझा घाम कमी होवू लागला.

मंडळी, त्यापुढची कहाणी सुलभ होती. रात्री अडीचच्या सुमारास आल्या मार्गाने मी परत आईन्धोवेनच्या हॉटेलवर पोहोचलो. सोमवार पासून सर्व कामे व्यवस्थित पार पडली. मात्र अजुनही आठवतो तो “लंडनला जाम [दोन्ही अर्थानी – ठप्प वाहतूक आणि भरपूर ], आला घाम !”

*******

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे !