वारी ही केवळ पावलांची नसते,
ती आत्म्याने परमात्म्याकडे निघालेली
निःशब्द, निरंतर यात्रा असते.
डोक्यावर तुळशीची माळ असो वा नसो,
ओठांवर नाम असो वा नसो,
मनात भक्तीचा एक दिवा तेवत राहिला की,
प्रत्येक वाट पंढरीकडेच वळते.
कधी अश्रूंची चंद्रभागा वाहते,
कधी स्मितहास्यच प्रसाद बनतो.
कधी भुकेल्याला दिलेला एक घास,
कधी दुःखी मनावर फिरवलेला मायेचा हात,
याच क्षणांत विठ्ठल
निःशब्दपणे भेटून जातो.
अहंकाराचे शेवटचे पान गळून पडते,
तेव्हाच भक्तीची नवी पालवी फुटते.
स्वार्थाची धूळ झटकून
जेव्हा मन अनवाणी चालू लागते,
तेव्हा प्रत्येक श्वासातून
“विठ्ठल… विठ्ठल…” असा नामनिनाद दुमदुमतो.
संसाराच्या वाटेवर
ऊनही असते… पाऊसही असतो…
कधी काटे टोचतात,
कधी पाय रक्ताळतात.
पण अंतःकरणात उभा असलेला सावळा विठू
हात धरून चालवत राहतो,
म्हणून भक्ती कधीच थकत नाही.
माझ्या हृदयाचे मंदिर व्हावे,
प्रेमाचा अखंड नंदादीप तेवत राहावा.
दयेची आरती,
क्षमेचा गंध,
सेवेचा नैवेद्य,
आणि माणुसकीचाच हरिपाठ
माझ्या जीवनात अखंड घुमत राहावा.
मला नको वैभव,
नको कीर्ती, नको मान.
माझ्या प्रत्येक श्वासात
फक्त गुंजत राहो तुझेच नाम.
आणि शेवटचा क्षण जेव्हा येईल,
तेव्हा डोळे मिटताना
तुझ्या विटेवरील सावळे रूप दिसावे.
ओठांवर अखेरचा शब्द
“विठ्ठल…” असावा,
आणि आत्म्याची अंतिम वारी
तुझ्याच चरणी विसावावी.
कारण…
ज्याच्या अंतःकरणात विठ्ठल जागा होतो,
त्याला पंढरपूर गाठण्यासाठी
रस्त्यांची गरज भासत नाही.
ज्याच्या हृदयात प्रेम, दया आणि माणुसकी नांदते,
त्याच्या अंतरी
रोज आषाढी, रोज कार्तिकी फुलत असते.
आणि त्याच्या प्रत्येक श्वासात
अखंड विठ्ठलाची वारी सुरूच असते.
म्हणूनच…
अंतरी जेथे विठ्ठल नांदे, तेथेच पंढरी वसे.
प्रेम, दया, नामस्मरणात, जीवन धन्य होऊन हसे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212